शिकागो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी इलिनॉय राज्यातील कुक परगण्याचे मुःख्य ठिकाण आणि न्यूयॉर्क व लॉस अँजेल्सनंतरचे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. बलवान किंवा मजबूत या अर्थाच्या अमेरिकन इंडियन बोलीतील शब्दावरून शिकागो हे नाव पडले आहे. लोकसंख्या २८,०२,०७९ (१९९८). इलिनॉय राज्याच्या ईशान्य भागात, पंचमहासरोवरांपैकी मिशिगन सरोवराच्या सु. ४० किमी. लांबीच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर, सपाट प्रेअरी प्रदेशात हे वसले आहे. शहराने एकूण ५९१ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. शहराच्या साधारण मध्यातून शिकागो नदी वाहते. शहरातील सांडपाणी, मैला इ. नदीद्वारे सरोवरात जाऊन सरोवराचे पाणी दूषित होत असे. त्यामुळे १९०० मध्ये या नदीचा प्रवाह उलट दिशेने वळविण्यात आला. आता ती नदी पश्चिमेस डेस्प्लेझ नदीकडे वाहत जाते. किनाऱ्या पासून आत दीड किमी.वर नदीच्या दोन शाखा होतात. त्यामुळे शहराची उत्तर, दक्षिण व पश्चिम अशी विभागणी झाली आहे. शिकागोचे भौगोलिक स्थान त्याच्या प्रगतीतील महत्त्वपूर्ण घटक आहे.

या प्रदेशात सु. ५,००० वर्षांपूर्वीपासून प्रामुख्याने पोटोवाटोमी या अमेरिकन इंडियनांचे वास्तव्य होते. लूई जोलिएत व झाक मार्केत हे फ्रेंच समन्वेषक १६७३ मध्ये शिकागो परिसरात आले होते. फरसाठी प्राण्यांची पारध करणाऱ्या प्वां दयू साबल या फ्रेंच–आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीने येथे पहिली कायम स्वरूपी वसाहत केली. १८३४ व १८३५ मध्ये पोटोवाटोमी व जवळपासच्या इतर इंडियन जमातींची जमीन बळजबरीने विकत घेण्यात आली. १८३७ मध्ये शिकागोला शहराचा दर्जा मिळाला. ८ ऑक्टोबर १८७१ रोजी लागलेल्या भीषण आगीत येथे फार मोठी प्राणहानी व वित्तहानी झाली. १८९० ते १९३० या कालावधीत शिकागोचा सर्वांगीण विकास घडून आला. ‘प्रगतीचे गर्जणारे दशक’ म्हणूनच १९२० च्या दशकाचा उल्लेख होतो. दारूबंदी, गुन्हेगारी याही बाबतींत हे दशक खूपच गाजले. या दशकात शहराची औद्योगिक भरभराट झाली. कार्ल सॅंडबर्ग (१८७८–१९६७), एडगर ली मास्टर्झ (१८६९–१९५०) थीओडर ड्रायझर (१८७१–१९४५), अप्टन सिंक्लेअर हे शिकोगातील प्रसिद्ध लेखक. जॅझ क्लॅरिनेट बेनीर गुडमन याने आपले पहिले बॅंड पथक येथेच सुरू केले. अमेरिकेतील दारूबंदीच्या काळात शिकागोतील मद्यविक्री, जुगार व इतर बेकायदेशीर धंदे वाढले. गुन्हेगारी वाढून टोळीयुद्धे सुरू झाली.

१९२९ मधील टोळीयुद्धात ‘सेंट व्हॅलेंटाइन डे मॅसॅकर’ या दिवशी सात लोक ठार झाले.

मिशिगन ॲव्हेन्यू, शिकागो.

जागतिक मंदीच्या काळातही शिकागोतील जागतिक औद्योगिक प्रदर्शनास चांगला प्रतिसाद लाभला (१९३३) व हे प्रदर्शन आणखी एक वर्ष चालू राहिले. दुसऱ्या महायुद्धकाळात काही महत्त्वपूर्ण घडामोडी येथे घडल्या. युद्धोत्तर काळात शिकागोत अनेक मोठमोठे सार्वजनिक बांधकाम प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यांत चार द्रुतगतीमार्ग, दोन अवाढव्य जलगाळण प्रकल्प, ओहारे विमानतळ व रिचर्ड जे डॅली सिव्हिक सेंटर इत्यादींचा समावेश होतो. मोठमोठ्या गलिच्छ वस्त्याही या काळात हटविण्यात आल्या.

या महानगरातील ७२ टक्के लोक सेवा व्यवसायांत व २८ टक्के लोक कारखानदारीत गुंतलेले आहेत. येथे विविध उत्पादनांचे चौदा हजारांपेक्षा अधिक कारखाने आहेत. शिकागोमध्ये सु. १,२०० संशोधन प्रयोगशाळा असून येथील अणुसंशोधन केंद्र प्रसिद्ध आहे. इटालियन–अमेरिकन भौतिकीविज्ञ एन्रीको फेर्मी यांनी २ डिसेंबर १९४२ रोजी जगातील पहिली नियंत्रित भंजन-विक्रिया साखळी येथील शिकागो विद्यापीठात तयार केली. त्यातूनच पुढे अणुबाँब व अणुशक्ती कार्यक्रम विकसित करण्यात आले. आंतरराज्यीय महामार्ग व लोहमार्ग शिकागोला येऊन मिळतात. ट्रक व रेल्वेने होणारी देशातील सर्वाधिक मालवाहतूक शिकागोत होते. हे जगातील सर्वांत मोठे लोहमार्ग प्रस्थानक असून येथे ओहारे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. महासागरी जलमार्गांचेही शिकागो हे अंतर्गत बंदर आहे. शिकागोत सु. ४६% लोक गौरवर्णीय, तर ४०% कृष्णवर्णीय आहेत. येथे स्पॅनिश भाषक हिस्पॅनिक वांशिक गट मोठा आहे. १९४० नंतरच्या कालखंडात मध्यमवर्गीय गोऱ्या लोकांनी व कामगारवर्गाने उपनगरांकडे स्थलांतर केल्यामुळे मुख्य शहराची लोकसंख्या घटत गेल्याचे दिसते. येथील कृष्णवर्णीय लोक बरेच मागासलेले असल्याचे दिसून येते.


शिकागो शहराचे मध्य, उत्तर, दक्षिण व पश्चिम असे प्रमुख चार विभाग पडतात. मध्य शिकागोत गगनचुंबी इमारती, भव्य विभागीय वस्तुभांडारे, फॅशनेबल दुकाने आढळतात. उत्तर भागातील मिशिगन ॲव्हेन्यू परिसरात दुकाने, हॉटेले, उपाहारगृहे व कार्यालयाच्या इमारती आहेत. मिशिगन व शिकागो ॲव्हेन्यू जेथे एकमेकांना मिळतात, तेथे ‘ओल्ड वॉटर टॉवर’ ही प्रसिद्ध इमारत आहे. शिकागोच्या मध्य भागात आयताकार पाशाकृती मार्गावरून रेल्वे धावतात. यावरून या मध्य भागाला ‘लूप’ या नावाने ओळखले जाते. उत्तर विभाग प्रामुख्याने निवासी भाग आहे. सुमारे १० लक्ष लोक येथे राहतात. मिलवॉकी ॲव्हेन्यू हा उत्तर विभागातील अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. वायव्य कोपऱ्यात ओहारे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

पश्चिम विभागातील कालव्याच्या काठावर प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. ड्वाईट डी. आयझनहौअर हा द्रुतगती मार्ग या विभागात आहे. येथे असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या डाक कार्यालयाच्या खालून बोगदा काढून हा मार्ग नेला आहे. शहराचा दक्षिण विभाग दाट लोकसंख्येचा आहे. या भागात सु. १४ लाख लोक राहतात. येथील सु. ६०% लोक कृष्णवर्णीय आहेत. गोरे व काळे लोक वेगवेगळ्या वस्त्यांमधून राहतात. वास्तुरचना व वास्तुविशारदांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. डॅनिएल एच. बर्नम, लूइस हेन्री सलिव्हन, फ्रॅंक लॉइड राइट, लूटव्हिख मीएस व्हॉन डेर रोअ व विल्यम लबॅरन जेनी हे येथील प्रसिद्ध वास्तुविशारद. ११० मजली व ४४२ मी. उंचीची सिअर्स टॉवर ही जगातील सर्वांत उंच इमारत मध्य शिकागोत आहे. १०० मजली (उंची ३४२ मी.) जॉन हॅनकॉक सेंटर व ७४ मजली वॉटर टॉवर प्लेस या दोन्ही इमारती बहूद्देशी स्वरूपाच्या आहेत. येथील स्टॅंडर्ड ऑइल बिल्डिंग ३४५ मी. उंच आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, शिकागो कॅंपस ऑफ नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोयोला युनिव्हर्सिटी, डिपॉ युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय या शिकागोतील प्रमुख शिक्षणसंस्था. आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो, फील्ड म्यूझीअम ऑफ नॅचरल हिस्टरी, म्यूझीअम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री या प्रमुख कलावैज्ञानिक संस्था येथे आहेत.

शिकागोला सुंदर सरोवरकिनारा लाभलेला आहे. त्याची उपनगरे समृद्ध प्रेअरी गवताळ प्रदेशात विखुरलेली आहेत. सर्वत्र मोठमोठी उद्याने व संरक्षित वनविभाग आढळतात. सरोवराच्या किनाऱ्यावर अनेक सार्वजनिक उद्याने आहेत. ही उद्यानभूमी विस्तृत पुळणी व मखमली हिरवळ यांनी नटलेली आहे. येथील लिंकन पार्क, जॅक्सन पार्क, ग्रॅंट पार्क, बर्नम पार्क, ब्रुकफील्ड प्राणिसंग्रहालय हे प्रसिद्ध आहेत. शिकागो सिंफनी वाद्यवृंद (स्था. १८९१) जगप्रसिद्ध आहे. जगभरच्या पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ आहे.

चौधरी, वसंत