डॅन्यूब : यूरोपातील व्होल्गाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी. लांबी सु. २,८५० किमी. जलवाहनक्षेत्र सु. ८,१६,००० चौ. किमी. ही पश्चिम जर्मनीत उगम पावून यूरोपच्या आठ देशांतून वाहत जाऊन काळ्या समुद्रास मिळते. हिची प्राचीन नावे डॅन्यूबीअस व इस्टेर अशी असून पश्चिम जर्मनीत व ऑस्ट्रियात तिला डोनाऊ, चेकोस्लोव्हाकियात डुनाय, हंगेरीत डुनॉ, यूगोस्लाव्हियात व बल्गेरियात डूनाव्ह, रूमानियात डूनर्या आणि रशियात डूनाई म्हणतात.

प्रवाहमार्ग पश्चिम जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट पर्वताच्या पूर्व उतारावरील ब्रेग व ब्रीगाख आणि इतर छोटे उगमप्रवाह डोगाउ-ए-शिंगन येथे एकत्र होऊन डॅन्यूब नदी सुरू होते. उल्मवरून ईशान्येकडे ती रेगेन्झबर्गला येते. या भागातील चुनखडकांत काही पाणी झिरपून ऱ्हाईनच्या खोऱ्यात जाते. नंतर आग्नेयीकडील रुंद, सुपीक, सपाट मैदानातून ती ऑस्ट्रियाच्या सीमेवरील पासौ येथे येते. लिंट्स व व्हिएन्नावरून डॅन्यूब चेकोस्लोव्हाकियाच्या ब्रात्यिस्लाव्हा येथे येऊन मग ती हंगेरियन गेट या निदरीतून हंगेरीच्या छोट्या मैदानात उतरते. येथे तिचा वेग मंद होऊन पात्रात गाळ व खडे साचू लागतात. त्यामुळे छोट्या व मोठ्या शूटसारखी बेटे निर्माण होऊन त्यांवर दाट वस्ती झालेली आहे. अनेक दलदलीही निर्माण झालेल्या आहेत. नंतर व्हीशेग्राट येथील निदरीतून निघून ती थेट दक्षिणेकडे वळते आणि हंगेरीच्या मोठ्या मैदानातून बूडापेस्टावरून जाऊन पूर्वेकडे वळते. यूगोस्लाव्हियाचे बेलग्रेड पार करून ती रूमानियाच्या आयर्न गेट या सुप्रसिद्ध निदरीत प्रवेश करते. ही निदरी सु. तीन किमी. लांब व द्रुतवाहयुक्त आहे. यानंतर डॅन्यूब सु. ४८० किमी. पूर्वेकडे आणि रूमानिया व बेल्गेरीया याच्या सीमेवरून जाते. नदीचे पात्र आता ४४ ते १९२० मी. रुंद, १·७ ते १० मी. खोल असून तिचा वेग ताशी १·६ ते ४ किमी. असतो. चेर्नाव्हाड येथे डॅन्यूब उत्तरेकडे वळते व गलात्सी येथे पुन्हा पूर्वेकडे जाते. टूल्चा येथे ४,३१६ चौ. किमी. विस्ताराचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. तिच्या तीन प्रमुख फाट्यांपैकी कीलीया ही रूमानिया व रशियाचा युक्रेन प्रजासत्ताक यांमधील सीमा आहे. त्रिभुजप्रदेश सुपीक असून तेथे लागवडी व ओकची अरण्ये झाली आहेत. येथील लव्हाळ्यांचा उपयोग कागद व तंतू बनविण्यासाठी होतो.

डॅन्यूबला सु. ३०० उपनद्या आहेत. त्यांपैकी डावीकडून मिळणाऱ्या आल्टम्यूल, नाप, मोराव्हा, व्हा, न्यित्रा, ह्‌रॉन, टिस, ऑल्ट, आर्जेश, सीरेट, प्रुट व उजवीकडून मिळणाऱ्या इलर, लेख, ईझार, इन, एन्स, लॉइतॉ, राबा, द्रावा, साव्हा, मोराव्हा, ईस्कर या प्रमुख आहेत. यांतील कित्येक नौसुलभ आहेत. डॅन्यूबचा पहिला ईशान्यवाही भाग, हंगेरियन गेट, आयर्न गेट येथील भाग हे आकर्षक सृष्टीसौंदर्याचे आहेत.

महत्त्व : डॅन्यूबचे मुख्य महत्त्व व्यापारी  नौवहन हेच आहे. पासौ व लिंट्स इ. ठिकाणी धरणे व बंधारे बांधून नौवहन सुलभ केले आहे. आयर्न गेट येथे बाजूने एक प्रवाह काढून व नदीला समांतर लोहमार्ग बांधून जोरदार प्रवाहाच्या उलट दिशेने नौका ओढून नेण्याची सोय केलेली आहे. डॅन्यूबवर रशियाची ईझ्माईल व ऱ्येन्यी, रूमानियाची गलात्सी, ब्राईला, जुर्जू, बल्गेरियाची रूसे आणि लॉम, यूगोस्लाव्हियाचे बेलग्रेड, हंगेरीची डुनॉऊईव्हारोश व बूडापेस्ट, चेकोस्लोव्हाकियाची कॉमॉर्ना व ब्रात्यिस्लाव्हा, ऑस्ट्रियाची व्हिएन्ना व लिंट्स आणि पश्चिम जर्मनीचे रेगेन्झबर्ग अशी व्यापारी बंदरे आहेत.

डॅन्यूबचा उपयोग जलविद्युत् उत्पादनासाठी व जलसिंचनासाठीही केला जातो. जार्दाप धरण व आयर्न गेट जलशक्तिकेंद्र हा रूमानिया व यूगोस्लाव्हिया यांनी उभारलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. चेकोस्लोव्हाकिया आणि हंगेरी तसेच रूमानिया आणि बल्गेरिया यांचेही प्रकल्प होत आहेत. व्हिएन्ना, बूडापेस्ट, बेलग्रेड रूसे व इतरत्रही डॅन्यूबचा औद्योगिक कारणांसाठी उपयोग केला जात आहे. शहरातील सांडपाणी व कचरा, खते, औद्योगिक टाकाऊ माल ही सर्व नदीत सोडल्यामुळे डॅन्यूबसुद्धा जगातील अत्यंत प्रदूषित नद्यांपैकी एक झाली आहे. प्रदूषणामुळे तिच्यात मासे व इतर जलचर राहत नाहीत व मूळचा मत्स्योद्योग नष्टप्राय झाला आहे.

इतिहास : रोमन साम्राज्यासारख्या बलाढ्य साम्राज्यांची सीमा, काठांवरील भक्कम दुर्गाची संरक्षण फळी, त्यांच्या आधाराने झालेल्या वसाहती इत्यादींमुळे इतिहासात डॅन्यूबचे वैभव-पोवाडे गायिले गेले आहेत. इ. स. पू. सातव्या शतकात ग्रीकांनी तिच्या खालच्या टप्प्यास इस्टेर नाव दिले. नवव्या शतकात पवित्र रोमन साम्राज्याचा शार्लमेन याने दुर्गांत भर घातली. पंधराव्या शतकात या दुर्गावलीच्या आधाराने तुर्कांनी ऑटोमन साम्राज्याशी लढा दिला. हॅप्सबर्ग घराण्याने डॅन्यूबचे जलमार्ग म्हणून महत्त्व ओळखले. १८३० पासून व्यापारी जलमार्ग म्हणून डॅन्यूबचे महत्त्व प्रस्थापित झाले. १६१६ चा ऑस्ट्रो-तुर्की तह, १७७४ चा क्यूच्यूक कायनार्जा तह, १८३८ आथवा १८४० चे अँग्लो-ऑस्ट्रियन व रूसो-ऑस्ट्रियन करार यांतून उत्क्रांत झालेले नदीवरील खुल्या नौवहनाचे तत्त्व पॅरिसच्या १८५६ च्या तहाने स्पष्ट झाले. १९२१ व १९२३ मध्ये ग्रेट ब्रिटन, इटली, बेल्जियम, ग्रीस व डॅन्यूबशी प्रत्यक्षतः संबंधित असलेली राष्ट्रे यांनी डॅन्यूब संविधी मान्य केल्यामुळे उल्मपासून काळ्या समुद्रापर्यंतच्या नौवहनावर देखरेख आणि व्यवस्था ठेवणारा विस्तृत अधिकाराचा डॅन्यूब आयोग स्थापन झाला. दुसऱ्या महायुद्धात मुक्त आंतराष्ट्रीय नौवहन थांबले. १९४८ मध्ये रशियाच्या सूचनेप्रमाणे फक्त डॅन्यूबशी प्रत्यक्ष संबंधित राष्ट्रांचा समावेश असलेला नवा डॅन्यूब आयोग स्थापन झाला ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका यांनी त्या करारावर सही केली नाही.

 ऱ्हाईन–मेन–डॅन्यूब कालव्याने सर्व युरोपभर नौवहन सोयीचे होणारे आहे. डॅन्यूब, ओडर व एल्ब या नद्या कालव्यांनी व व्हिश्चला–बग–नीपर जलमार्गाशी जोडून डॅन्यूबवरील वाहतूक थेट उत्तर समुद्रापर्यंत व बाल्टिक समुद्रापर्यंत पोहोचविण्याची योजना आहे.

कुमठेकर, ज. ब.