फ्रेंच गियाना : दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील फ्रान्सचा सागरपार विभाग. क्षेत्रफळ ९१,००० चौ. किमी. लोकसंख्या ५८,००० (१९७७ अंदाज). विस्तार १°२५’ उ. ते. ५° ४५’ उ. अक्षांश व ५१° ४०’ प. ते ५४° ३०’ प. रेखांश यांदरम्यान. याच्या पश्चिमेस सुरिनाम, दक्षिणेस व पूर्वेस ब्राझील हे देश आणि उत्तरेस अटलांटिक महासागर आहे. डेव्हिल्स, रॉयल, सें झोझेफ ही बेटे मिळून बनलेल्या साल्यू ह्या द्वीपसमूहाचाया विभागातच समावेश होतो. कायएन हे याविभागाचे प्रमुख ठिकाण वसर्वात मोठे शहर (लोकसंख्या ३४,०००-१९७७) आहे.

 भूवर्णन : या प्रदेशाच्या पश्चिम व पूर्व सीमा अनुक्रमे मारॉनी व ऑयापॉक ह्या नद्यांच्या असून दक्षिण सीमा तूमूक-ऊमाक पर्वताची आहे. याचे तीन नैसर्गिक विभाग पडतात: दक्षिणेकडील पर्वतमय प्रदेश, मध्यवर्ती टेकड्यांचा पठारी प्रदेश आणि उत्तरेकडील किनाऱ्यालगतचा सखल व मैदानी प्रदेश. या विभागात कँब्रियन-पूर्वकालखंडातील स्फटिकमय गिरिपिंड आढळतात. नद्यांच्या खननक्रियेमुळे या पर्वतीय प्रदेशाचे मूळ स्वरूप बदलले आहे. उत्तरेस किनारी प्रदेशापासून दक्षिणेस तूमूक-ऊमाक पर्वतापर्यंत या विभागाची क्रमाक्रमाने सु. ७०० मी.पर्यंत उंची वाढत जाते. सीं मार्सेल (६३५ मी.) व माँतान्यू (७५० मी.) ही या पर्वतीय प्रदेशातील प्रमुख शिखरे होत. पर्वतीय प्रदेश वनाच्छादित असून याच्या पायथ्यालगत सॅव्हाना गवताचा प्रदेश आहे. किनाऱ्यालगतचा १६ ते ४८ किमी.चा पट्टा सखल व मैदानी आहे.

फ्रेंच गियानातून वाहणाऱ्या बहुतेक नद्या दक्षिणेस तूमूक-ऊमाक पर्वतात उगम पावून उत्तरेस अटलांटिक महासागराला मिळतात. मारॉनी आणि ऑयापॉक या येथील प्रमुख नद्या आहेत. यांशिवाय यारूपी, कामॉपी, आप्रूआग, ओरापू,काँते, कूरू, सीनामारी, कूर्सिबा, ईराकूबो, माना, ईनीनी, ताम्पॉक, अबूनामी या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. काही नद्यांचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी उपयोग होतो.  

 

हवामान :येथील हवामान विषुववृत्तीय प्रकारचे उष्ण व दमट आढळते. तपमानकक्षा बरीच कमी असते. किनारी प्रदेशात वार्षिक तपमानाची सरासरी२७° से. आढळते. दैनिक व ॠतुमानातील तपमानांत फारसा फरक पडत नाही. वार्षिक पर्जन्यमान ३३० सेंमी. असून डिसेंबर ते जुलै यांदरम्यान पर्जन्यमान जास्त असते. अटलांटिक महासागरावरून येणारे ईशान्य व्यापारी वारे या प्रदेशावरून वाहतात, मात्र वादळे क्वचितच निर्माण होतात. हरिकेन वारे तर येथे आढळतच नाहीत.

वनस्पती व प्राणी : या विभागातील सु. ९० टक्के जमीन वनव्याप्त आहे. बहुतेक वने विषुवृत्तीय सदारहित प्रकारची असून कठीण लाकडाच्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. कायएन शहराच्या आग्नेयीस असलेल्या दलदली ह्या अगदी अलीकडच्या काळात निर्माण झाल्या असाव्यात. या प्रदेशात कच्छ वनश्री व सॅव्हाना गवत आढळून येते. कायएनच्या पश्चिमेकडील दलदली मात्र जुन्या काळात निर्माझाझालेल्या असून त्या भागातही सॅव्हाना गवत आढळते. यांशिवाय प्रदेशाच्या इतर भागांत पर्जन्यमान व मृदा यांनुसार सदाहरित वृक्षांची जंगले आढळतात.

फ्रेंच गियाना 

  येथेटॅपिर,सायमन (मगरीसारखाप्राणी), ऑसेलॉटतसेचअस्वल, मुंगीखाऊ, आर्मडिलोइ. प्राणीदृष्टीसपडतात. यांशिवायविविधप्रकारचेपक्षी, मासे, सर्प, कृंतक, कीटक, विविध प्रकारची माकडे इ. आढळतात.


इतिहास व राजकीय स्थिती: इ. स. १५०० मध्ये व्हिथेंते पिंथॉन या स्पॅनिश संशोधकाने गियानाच्या किनाऱ्याचे प्रथम समन्वेषण केले. सोळाव्या शतकात ही भूमी अल्पसायासाने विपुल संपत्ती मिळवून देणारी आहे. अशी वदंता पसरल्यामुळे यूरोपातून अनेक साहसी प्रवासी इकडे वळले. या प्रदेशात फ्रेंचांनी आपली पहिली वसाहत १६०४ मध्ये केली. १६३७ मध्ये कायएन शहराची स्थापना झाली. १६६७ मध्ये ही वसाहत इंग्रजांनी, तर १६७६ मध्ये डचांनी आपल्या ताब्यात घेतली. मात्र त्यांची सत्ता अल्पकाळच टिकली.

या प्रदेशात वसाहत स्थापण्याच्या उद्देशाने १७६३ ते १७६५ यांदरम्यान यूरोपातून ‘कूरू संशोधन मोहीम’ निघाली होती परंतु तिचे सदोष नियोजन आणि विषुववृत्तीय प्रदेशातील आजार यांमुळे १४,००० लोक मरण पावले. १७९४ ते १८०५ या काळात फ्रान्समधून अनेक राजकीय कैद्यांना हद्दपार करून येथे धाडण्यात आले परंतु त्यांतीलही बरेचसे लोक मरण पावले. १८०९ मध्ये ही वसाहत पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. तथापि १८१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसने फ्रेंच गियानाचा ताबा फ्रेंचांना दिला. तेव्हापासून येथे फ्रान्सचीच अधिसत्ता कायम राहिली. १९४६ पर्यंत फ्रेंच गियाना ही फ्रेंचांची वसाहत होती, त्यानंतर मात्र तो फ्रेंचांचा सागरपार विभाग बनला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथील अज्ञात भूभाग शोधून तेथे उसाची लागवड करण्यात येऊ लागली. त्यामुळे या प्रदेशाच्या विकासाला गती मिळाली. तथापि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गुलामांच्या व्यापारास आळा बसल्याने व सोन्याच्या खाणींचा शोध लागल्याने येथील शेतीला मजुरांचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे शेतीच्या विकासकार्यात खंड पडला. १८५२ पासून फ्रान्समधील राजकीय कैद्यांना या प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्याजवळील डेव्हिल्स बेटावर ठेवण्यात येऊ लागले.येथील कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीमुळेच या बेटाला ‘डेव्हिल्स’ असे संबोधिले जाऊ लागले. येथील प्रतिकूल हवामानामुळे अनेक कैदी मरण पावले. असे असले, तरी १९४५ पर्यंत म्हणजेच ९३ वर्षे या बेटावर कैदी पाठविण्याची पद्धत होती. या काळात येथे सु. ७०,००० कैदी पाठविण्यात आले.

प्रशासनाच्या सोयीसाठी फ्रेंच गियानाचे दोन प्रमुख विभाग करण्यात आलेले आहेत. १७ मार्च १९६९ पासून या प्रदेशातील पूर्वेकडील निम्मा भाग कायएन विभागात असून उरलेला पश्चिमेकडील भाग सँ-लोरां द्यू मारॉनी या विभागात येतो. त्यांची पुन्हा १९ कम्यूनमध्ये विभागणी केलेली आहे.१९५८ मध्ये फ्रेंच गियानाने फ्रेंच संघटनेत राहण्याचा निर्णय सार्वमताने घेतला. जनरल कौन्सिलचे १६ निर्वाचित सभासद व फ्रेंचशासनाचा एक प्रतिनिधी यांच्यामार्फत फ्रेंच गियानाचा राज्यकारभार चालतो. त्याचप्रमाणे फ्रान्सच्या सीनेटवर व नॅशनल असेंब्लीवर प्रत्येकी एक प्रतिनिधी येथून पाठविला जातो.

आर्थिक स्थिती : फ्रेंच गियानात खनिजसाठे, लाकूड, मासे यांचे वैपुल्य असले तरी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची यांत्रिक-तांत्रिक क्षमता व साधने तेथे नाहीत. त्याचप्रमाणे लागवडयोग्य जमिनीचा अभाव, पारंपरिक शेती पद्धती, मजुरांचा तुटवडा यांमुळे येथील शेतीसुद्धा अजून प्रगत झालेली नाही. एकूण क्षेत्रापैकी ३००० हे. क्षेत्र शेतीखाली होते (१९७३). शेतीतून प्रामुख्याने तांदूळ, मका, कसावा, केळी, अननस, ऊस ही पिके घेतली जातात. १९७३ मध्ये तांदूळ (१०० टन), मका (५००), कसावा (१५,०००), केळी (२,०००) वऊस (४,६८८ मे. टन) इतके उत्पादन झाले. ऊस हे प्रमुख उत्पादन असून ते व्यापारी तत्त्वावर काढले जाते. बाकीची पिके स्थानिक गरजेपुरती घेतली जातात. या प्रदेशातील सु. ८०,००० चौ. किमी. क्षेत्र वनव्याप्त असून त्यातून विविध प्रकारचे लाकूड मिळते. १९७६ मध्ये येथे २,०१४ गुरे ५,००० डुकरे ६३६ मेंढ्या व ६०,००० (१९७३) कोंबड्या होत्या.

फ्रेंच गियानाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी व वनसंपत्ती यांवर अधिष्ठित आहे. सोने, बॉक्साइट, टँटॅलाइट, या खनिजांवर आधारित उद्योगांचा अल्पसा विकास झाला आहे. १९६५ पासून मासेमारी, कोळंबी डबाबंदीकरण व प्रशीतन करण्याच्या व्यवसायाची वाढ होत असून त्यांची निर्यात मुख्यतःअमेरिकेला होते. १९७६ मध्ये १,११३ मे. टन माशांचे उत्पादन झाले. पर्यटन उद्योगात वाढ होत असली, तरी त्यासाठी आवश्यक सुखसोयांची अजून कमतरताच आहे. १९७६ मध्ये रम उत्पादन २,१३४ हेलि. व विद्यृत्‌निर्मिती ६३·४ द. ल. किवॉ. ता. झाली. १९६८ मध्ये कूरू येथे रॉकेट क्षेपणतळ उभारण्यात आला आहे.

 

येथून लाकूड, कोळंबी, रम, अल्प प्रमाणात सोने यांची निर्यात होते. अन्नसामग्री, यंत्रोत्पादित वस्तू, खनिज तेल उत्पादने, सिमेंट, लोह व पोलाद इत्यादींची आयात केली जाते. आयात प्रामुख्याने फ्रान्समधून, तर निर्यात अमेरिकेला व फ्रान्सला होते. फ्रँक हे येथील चलन असून १, ५, १०, २०, ५० सेंटिम व १, ५, १० फ्रँकची नाणी आणि १०, ५०, १००, ५०० फ्रँकच्या नोटा चलनात आहेत. १०० सेंटिमचा एक फ्रेंच फ्रँक होतो.

  दळणवळणाची साधने अत्यल्प असून ती किनारी प्रदेशात अधिक आहेत. लोहमार्ग नाहीतच. १९७६ मध्ये ५४० किमी. लांबीचेरस्ते व १५,००० वाहने होती. नदीमुखापासून आत १६ ते २५ किमी. पर्यंत नद्यांची पात्रे जलवाहतुकीस सोयीची आहेत. त्यापुढे मात्र नदीपात्रांतील द्रुतवाहांमुळे जलवाहतूक अशक्य होते. कायएन, सँ-लोरां द्यू मारॉनी व कूरू ही प्रमुख बंदरे आहेत. कायएनजवळील रोचाग्ब्वे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अंतर्गत हवाई वाहतूक खाजगी कंपन्यांद्वारा केली जाते व त्यासाठी सात विमानतळ वापरले जातात. या विभागात एकूण २,९०० रेडिओ ३,०५० दूरचित्रवाणी संच (१९७५) व ८,८८५ दूरध्वनी (१९७७) होते. रेडिओचे दररोज १६ तास आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम आठवड्यातून ४५ तास फ्रेंच व क्रीओल या भाषांमध्ये प्रसारित केले जातात. या प्रदेशातील एक दैनिक, दोन पाक्षिके, एक मासिके, इ. कायएन शहरातूनच प्रसिद्ध केली जातात.

लोक व समाजजीवन : येथील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोक यूरोपीय असून त्यात रोमन कॅथलिकांचे आधिक्य आहे. ⇨अमेरिकन इंडियन (अमेरिंड) हे येथील मूळ रहिवासी आहेत. क्रीओल लोकांची संख्या जास्त आहे तर निग्रो, रेड इंडियन, चिनी, इंडोनेशियन, लेबाननी इ. लोकांचे वास्तव्य आढळते. गलीबी, आरावाक व पलीकर ह्या किनारी प्रदेशांतील तर वायाना, ऑयांपी, एमेरलॉन ह्या अंतर्गत प्रदेशातील भटक्या जमाती आहेत. अंतर्गत भागांतील भटक्या जमाती शिकार, मासेमारी व फिरत्या शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. येथील सर्व लोक फ्रेंच नागरिक असून त्यांना मतदानाचा हक्क आहे. फ्रेंच ही राजभाषा आहे. अँटिलीयन क्रीओल व फ्रेंच ह्या बोलीभाषा म्हणून विशेष प्रचलित आहेत. निग्रो व अमेरिंड यांनी आपल्या सांस्कृतिक परंपरा जतन केलेल्या आहेत. तथापि क्रीओल संस्कृतीचा मात्र ऱ्हास होत आहे. १८८९ पासूनच येथे मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय करण्यात आली. १९७६ मध्ये ५८ प्राथमिक शाळांत ११,८०१ विद्यार्थी, तर ५,९९६ विद्यार्थी माध्यामिक शाळांत शिक्षण घेत होते. येथे उच्च शिक्षणाच्या सोयी असून १९७६ मध्ये १,३५६ विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते.

  कायएन हे या विभागातील सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर असून ते कायएन नदीमुखाजवळील याच नावाच्या बेटावर वसले आहे. १९४५ पर्यंत फ्रेंच कैद्यांच्या वसाहतीविषयी हे प्रसिद्ध होते. सँ-लोरां द्यू मॉरानी हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व मारॉनी नदीवरील प्रमुख बंदर आहे. यांशिवाय माना, सीनामारी, सेंतेली, माकूरीआ,कूरू, सेंट जॉर्जेस, रूरा, ईराकूबो ही इतर महत्वाची शहरे व बंदरे होत.

खांडवे, म. अचौधरी, वसंत