महंमदबीदर : कर्नाटक राज्यातील इतिहासप्रसिद्ध शहर आणि बीदर जिल्ह्याचे मुख्य ठाणे. बीदर गुलबर्ग्याच्या ईशान्येस ११६ किमी. आणि हैद्राबादच्या वायव्येस १३० किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या ७८,८६६ (१९८१). हे विकाराबाद-परळी वैजनाथ या रुंद मापी लोहमार्गावर आहे. बीदर दख्खनच्या पठारावरच्या अगदी काठावर असून येथील हवामान आरोग्यवर्धक व आल्हाददायक आहे.

महाभारतातील नल-दमयंती कथेशी बीदरचा संबंध असल्याची आख्यायिका आहे. १३२१-२२ मध्ये मुहम्मद बिन तुघलकने बीदर काबीज केले. १३४७ मध्ये अलाउद्दीन हसन याने ते आपल्या बहमनी राज्यास जोडले. बहमनी राजा अहमदशाह वली (कार. १४२२-३६) याने शहराची रचना करून तेथे एक किल्ला बांधला (१४२८) व आपली राजधानी गुलबर्ग्यावरून येथे हलवली आणि तिला ’मुहम्मदाबाद’ असे नाव दिले.⇨ बरीदशाहीची राजधानी म्हणून १४९२ ते १५५६ या काळात बीदर महत्त्वाचे ठरले. विजापूरच्या आदिलशाहीने बळकाविलेला प्रदेश (१६१९) औरंगजेबाच्या ताब्यात गेलेले आणि ’जाफराबाद’ म्हणून नामांतर झालेले (१६५६) व हैद्राबादच्या निजामाने घेतलेले (१७२४) अशी बीदरवर अनेक सत्तांतरे होत गेली. ब्रिटिश काळात हैदराबाद संस्थानात असलेले हे शहर स्वातंत्र्योत्तर काळात १९५६ मध्ये तत्कालीन म्हैसूर (विद्यमान कर्नाटक) राज्यात समाविष्ट करण्यात आले.

अहमदशाह बहमनीने बांधलेल्या किल्ल्याचा तिहेरी खंदक, इतर अवशेष, रंगीन महाल, तख्त महाल, सिंहासन, महंमद गवानाने बांधलेली मद्रसा (१४७२-८१), १६ खांबी मशीद, जवळच्या अष्टूरगावी १२ बहमनी तसेच बरीदशाहीतील राजांची थडगी इ. ऐतिहासिक वास्तू आढळतात.

येथील झरणी नरसिंहाचे स्थान पूर्वी पठाराच्या एका भागात होते. औरंगजेबाने तेथे मशीद बांधल्यानंतर पुढे हिंदूंनी त्या मशिदीजवळ एक भुयार केले. त्याच्या सु. २२ मीटरवरील दुसऱ्या टोकाशी भिंतीत एक चौरस दगड बसविला आहे. त्यालाच आता झरणी नरसिंह म्हणतात. मशिदीवरील शिलालेखात वरील घटनेचा उल्लेख आढळतो. यांशिवाय येथील गुरुद्वारा व सेंट पॉल चर्च उल्लेखनीय आहेत.

बीदरच्या आसमंतात ज्वारी, बाजरी, गहू तसेच गळिताची धान्ये इत्यादींचे उत्पादन होते. शंखजिरे, जांभा, काळा बेसॉल्ट यांच्या खाणीही आसमंतात आहेत. येथील बी.व्ही. भूमरड्डी महाविद्यालय कर्नाटक विद्यापीठाशी संलग्न आहे. येथील बीदरचे कलाकाम प्रसिद्ध आहे.

संदर्भ: Yazdani, Gulam, Bidar : Its History and Monuments,Oxford,1947.

संकपाळ, ज. बा.