सिरदर्या नदी : प्राचीन नाव जॅकसार्टेझ. मध्य आशियातील एक महत्त्वपूर्ण नदी. नरिन व कारदर्या या दोन नद्यांच्या नामानगान येथील संगमापासूनचा संयुक्त प्रवाह सिरदर्या या नावाने ओळखला जातो. यांपैकी नरिन नदीचा उगम इसिककूल सरोवराच्या दक्षिणेस, अक-शुराक टेकड्यांमधील पेट्रोव्ह हिमनदीतून होतो, तर कारदर्या नदीचा उगम फरगाना टेकड्यांमधील हिमक्षेत्रात होतो. या दोन नद्यांची उगमस्थाने असलेले हे उच्चभूमी प्रदेश तिएनशान पर्वताचेच भाग आहेत. नरिन नदी फरगाना पर्वतश्रेणी पार करुन फरगाना खोऱ्यात वाहत येते. नरिन व कारदर्या नद्यांचे संगमस्थान उझबेकिस्तानच्या पूर्व भागातील फरगाना खोऱ्यात असून, या खोऱ्याच्या सभोवतालचे प्रदेश पर्वतीय आहेत. सिरदर्या नदीचा वरच्या टप्प्प्यातील प्रवाह तसेच तिचे शीर्षप्रवाह सामान्यपणे पूर्व-पश्चिम दिशेत वाहतात. लेननबादजवळ फरगाना खोऱ्यातून बाहेर पडल्यानंतर नदी उत्तरेकडे वाहू लागते. त्यानंतर ती वायव्य दिशेत वाहत जाऊन अरल समुद्राला त्या समुद्राच्या ईशान्य किनाऱ्यावर जाऊन मिळते. फरगाना खोऱ्याच्या पुढे तिला उजवीकडून ओहानगारॉन, चिरचिक, केल्स व आर्यस या उपनद्या येऊन मिळतात. यांपैकी चिरचिक नदीकाठावर ताश्कंद ही उझबेकिस्तानची राजधानी आहे. सिरदर्या नदीची लांबी सु. २,०२० किमी. असून नरिन नदीसह तिची लांबी ३,०२० किमी. आहे. मध्य आशियातील ही सर्वाधिक लांबीची नदी असली, तरी ती अमूदर्यापेक्षाही कमी पाणी वाहून आणते.

फरगाना खोऱ्याच्या पुढील सिरदर्या नदीप्रवाह मार्गाच्या पूर्वेस काराताऊ हा पर्वतीय प्रदेश, तर पश्चिमेस किझिलकुम हा ओसाड वाळवंटी प्रदेश आहे. या भागात जलसिंचित मरुद्याने आहेत. मधल्या व खालच्या टप्प्यात नदीला नागमोडी वळणे प्राप्त झाली आहेत. वाळवंटी प्रदेशात नदीचे पात्र उथळ असून ते वारंवार बदलले जाते तसेच तिच्यातील पाण्याचे प्रमाणही कमी असते. सिरदर्या नदीखोऱ्यातील किरगिजिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान व कझाकस्तान या प्रजासत्ताकांचे जलवहन झालेले आहे. नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला असून त्रिभुज प्रदेशाचा बहुतांश भाग सखल व दलदलयुक्त आहे. येथील काही प्रदेश शेरणी वृक्षांनी वेढलेला आहे.

सिरदर्या नदीच्या वरच्या टप्प्यात असणाऱ्या पर्वतीय प्रदेशातील हिमाच्छादनामुळे नदीला भरपूर पाणीपुरवठा होतो. मार्च किंवा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत नदीतील पाण्याची पातळी अधिक असते. डिसेंबर ते मार्च या कालावधीत नदीचे खालच्या टप्प्यातील पात्र गोठलेले राहते.

सिरदर्या व तिच्या उपनद्यांवर बांधलेल्या धरणांचा उपयोग जलसिंचन व जलविद्युत्‌शक्ती निर्मितीसाठी केला जातो. सिरदर्या व तिच्या उपनद्यांपासून सु. २ द. ल. हे. क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. जलसिंचन सुविधांमुळे फरगाना खोऱ्यात व सिरदर्या नदीच्या मधल्या टप्प्यात कापूस, तर नदीच्या खालच्या टप्प्यात तांदूळ ही प्रमुख उत्पादने घेतली जातात. फारहोड (उझबेकिस्तान), कायराक्कुम (ताजिकिस्तान), शारदारा (कझाकस्तान) हे सिरदर्या नदीवरील प्रमुख प्रकल्प आहेत. फरगाना खोऱ्याच्या पश्चिम टोकाजवळ उभारण्यात आलेल्या दोन जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांतून उपलब्ध झालेल्या विजेमुळे धरणाजवळच लेननबाद व बेगोव्हॅट ही औद्योगिक नगरे साहजिकच विकसित झाली आहेत. चिरचिक नदीवर चॉर्वाक व नरिन नदीवर उचकघॉन हे प्रकल्प उभारले आहेत. कझाकस्तानमधील किझीलॉर्डा व कझाली येथे धरणे आहेत. नरिन नदीवरील टॉकटोगूल हा जलविद्युत्‌- निर्मिती प्रकल्प १९७० च्या दशकात उभारण्यात आला असून १९८० च्या दशकात त्याचा विस्तार करुन नदीचा प्रवाह सुरळीत करण्यात आला आहे. सिरदर्या नदीखोऱ्यातील जलसिंचित प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक आहे. त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी कझालिन्स्क नगर आहे.

सुपीक फरगाना खोरे मध्ययुगीन काळात विशेष भरभराटीस आलेले होते. पर्शिया (इराण) वरील स्वारीच्या वेळी अलेक्झांडर द ग्रेट इ. स. पू. ३२९ मध्ये या नदीखोऱ्यापर्यंत पोहोचला होता. त्याने येथील एका जुन्या नगराच्या जागेवर लेननबाद (कोजेंड) या नगराची स्थापना केलेली असावी.

सिरदर्या नदीचे जास्तीत जास्त पाणी जलसिंचनाकडे वळविल्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस अरल समुद्रातील पाण्याची घटणारी पातळी आणि सिरदर्या नदीच्या त्रिभुज प्रदेशाचा वाढणारा कोरडेपणा यांमुळे मुखाजवळच्या प्रदेशात विषारी उर्वरक व क्षारांचे अवशेष जमिनीवर जमा झाले आहेत. ते वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्याचा परिणाम परिसरातील वनस्पती व प्राण्यांवर होत असून मानवी आरोग्यावरही त्याचे अनिष्ट परिणाम होऊ लागले आहेत.

चौधरी, वसंत