धोम : सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील एक धार्मिक ठिकाण. लोकसंख्या १,१३९ (१९७१). हे वाईच्या वायव्येस ८ किमी. कृष्णा नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. येथील महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय असून मंदिरातील पिंडीची प्रतिष्ठापना महाबळेश्वरहून आलेल्या धौम्य ऋषीने केली, अशी आख्यायिका आहे. याच्या सभोवती नरसिंह, गणपती, लक्ष्मी आणि विष्णु यांची मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे पुण्याच्या महादेव शिवराम नावाच्या सावकाराने १७८० साली बांधली, तसेच शाहूने नदीच्या वरच्या बाजूस महादेवाचे एक लहान मंदिर आणि दुसऱ्या बाजीरावाने राममंदिर बांधले असे सांगतात. दरवर्षी येथे महादेवाची यात्रा वैशाखी पौर्णिमेस, तर नरसिंहाची वैशाख शुद्ध चतुर्दशीस भरते. येथील सर्व मंदिरांची व्यवस्था स्थानिक मंदिर समिती पाहते.

धोम धरणाचे दृश्य

अलीकडे मात्र या ठिकाणास धोम धरणामुळे महत्त्व आले आहे. येथे कृष्णा प्रकल्पातील उगमाकडील पहिले मोठे धरण बांधले जात आहे. येथे कृष्णा नदीचे पात्र सु. ५०० मी. उजवीकडे वळविण्यात आले आहे. या धरणाची उंची ५० मी. आणि लांबी २,४७८ मी. असून ते बव्हंशी मातीचे आहे. याची पाणी साठविण्याची क्षमता ३५२ दशलक्ष घ. मी. असून या धरणामुळे २४,७०० हे. जमिनीस पाणीपुरवठा होणार आहे. हा प्रकल्प २४ कोटींचा असून सु. १४ कोटींचे काम पूर्ण झाले आहे. धरणाचा सुरुवातीचा दीड किमी.चा संयुक्त कालवा पात्राच्या उजवीकडे असून पुढे नदीच्या पात्रावर जलसेतू बांधून त्याचे डावा आणि उजवा असे दोन कालवे करण्यात आले आहेत. डावा कालवा ९३ किमी. तर उजवा ४३ किमी. लांबीचा होणार आहे. या दोन कालव्यांवर एकूण लहान-मोठे नऊ जलसेतू व्हावयाचे आहेत. धरणातून कालव्यात सोडले जाणारे पाणी छोट्या वीजगृहातून सोडण्याची योजना असून त्यामधून हंगामी स्वरूपाची ३ मे. वॉ.पर्यंत वीजनिर्मिती करता येईल. वीजकेंद्राची योजना नऊ कोटींची असून १९७७ पर्यंत प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. धोमला जाण्यास राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या सुटतात.

कांबळे, य. रा.