सेशेल्स : (रिपब्लिक ऑफ सेशेल्स). पश्चिम हिंदी महासागरातील द्वीपसमूहाचा देश व आफ्रिकेतील दुसरा सर्वांत लहान देश. यात ११५ बेटांचा समावेश असून याचे एकूण भूक्षेत्र ४५५ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ८४,००० (२००९ अंदाज). ही बेटे मादागास्करच्या ईशान्येस ९६५ किमी. व केन्याच्या पूर्वेस १,६०० किमी.वर आहेत. या द्वीपसमूहाचा अक्षवृत्तीय विस्तार ४° द. ते ११° द. आणि रेखावृत्तीय विस्तार ४६° पू. ते ५६° पू. यांदरम्यान आहे. ११५ बेटांपैकी ८३ बेटांना भौगोलिक नावे आहेत व ३३ बेटांवर मानववस्ती आहे. माहे हे यांमधील सर्वांत मोठे बेट आहे. माहे बेटावरील व्हिक्टोरिया ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : हिंदी महासागराच्या उत्तर-दक्षिण वसलेल्या मॅस्करीन रिजचा सर्वांत उंच भाग म्हणजे सेशेल्स बेटे होत. सेशेल्स बेटांचे माहे बेटासह ४० बेटांचा मध्यवतीं, पर्वतमय, ग्रॅनाइटी बेटांचा समूह व ७५ बेटांचा बाह्यवतीं, सखल, प्रवाळखडकयुक्त बेटांचा समूह याप्रमाणे दोन भाग होतात. माहे बेटांसह ग्रॅनाइटी बेटांचे क्षेत्रफळ २३२ चौ.किमी. आहे. माहे बेटाचे क्षेत्रफळ १५३ चौ. किमी. असून हे देशाच्या क्षेत्रफळाच्या एक तृतीयांश आहे. याची दक्षिणोत्तर लांबी २७ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ११ किमी. आहे. यास १२७ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. याचा बहुतेक भाग पर्वतमय असून येथील मार्ने सेशेलोइस (उंची ९१५ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. याशिवाय ट्रॉईल फ्रेरेस हे ७२८ मी. उंचीचे शिखर या बेटावर आहे. माहे या बेटाशिवाय प्रालँ, फ्रिगेट, नॉर्थ अँड डेनीस, सिलुएट, ला दीग ही अन्य महत्त्वाची बेटे या भागात आहेत.

येथे उंच ओबडधोबड कडे, शिखरे, पाण्याच्या घर्षणाने मोठे व सुटे झालेले दगड आढळतात. तसेच उंचावरून कोसळणारे धबधबे, श्वेतवाळूच्या पुळणी, शिंपले, प्रवाळखडक आढळतात. येथील मृदा लॅटेराइट प्रकारची सुपीक आहे. मात्र लॅटेराइट मृदेची जलद गतीने धूप होते.

बाह्य, सखल, प्रवाळखडकयुक्त बेटांचे क्षेत्रफळ २२३ चौ. किमी. आहे. या बेटांवर हिंदी महासागरी खाजणे, प्रवाळखडक भित्ती आढळतात. येथील मृदा हलकी व पाणी धरून न ठेवणारी आहे. यामधील बहुतेक बेटांवर मानवी वस्ती नाही. यामध्ये ॲमिरँटिस बेटे (डेस्रॉचेस पॉइव्हे, पॅरॉस, अल्फॉन्सो ही बेटे) कोएटिव्ही, प्लॅट्टे, फॉरक्वर, सेंट पीअर अँड प्रॉव्हिडन्स, ॲल्डाब्रा, ॲस्टोव्हे, असम्प्शन, कॉझ्मलेदो ही प्रमुख बेटे आहेत.

हवामान : सेशेल्स हा देश विषुववृत्ताला जवळ असला तरी येथील हवामान याच्या सागरी स्थानामुळे उष्णकटिबंधीय आहे. हे हवामान आरोग्यवर्धक आहे. येथे डिसेंबर ते मे हा कालावधी उन्हाळ्याचा असतो व जून ते नोव्हेंबर हा कालावधी हिवाळ्याचा असतो. समुद्रसपाटीवर वर्षभर तपमान सु. २६.६° से. दरम्यान असून ते कचितच २९.४° से. पर्यंत वाढते, तर सस.पासून उंच भागात रात्रीचे तपमान १६° से. पर्यंत असते. मे ते ऑक्टोबर या कालावधीत आग्नेय मोसमी वारे वाहतात. पश्चिम वायव्य मोसमी वारे डिसेंबर ते मार्च दरम्यान वाहतात व या वाऱ्यांपासून पाऊस पडतो. समुद्रकिनारी भागात वार्षिक सरासरी २२८ सेमी. पाऊस पडतो, तर १८३ मी. उंचीच्या भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ३०४ सेंमी. व त्यापेक्षा जास्त उंचीच्या भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३८१ सेंमी. आहे. सेशेल्सचे स्थान चक्रीवादळाच्या पट्ट्याच्या बाहेर असल्याने यापासून क्वचितच नुकसान होते.

सेशेल्स बेटांच्या ४०,००० हे. (८८.९%) भूक्षेत्रावर जंगले आहेत (२००५). सेशेल्स बेटांवर मॅपाऊ, ब्रेडफ्रुट, दालचिनी, नारळ, केळी. पपई, अननस, आंबा इ. वृक्ष आढळतात. येथील नारळाचे वजन १८ किग्रॅ. पर्यंत आढळते. सागरी भागात शार्क मासे आहेत. येथे पाली, कासवे आहेत. बर्ड बेटावरील इस्मेरेल्डा हे कासव अवाढव्य असून याचे वजन ३०४ किग्रॅ. पर्यंत असते. येथे सूर्वपक्षी, कबूतर, रॉबिन, टर्न इ. पक्षी आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : पोर्तुगीज समन्वेषक वास्को-द-गामा याने १५०२ मध्ये त्यावेळी निर्मनुष्य असलेल्या या बेटांचा शोध लावला. ब्रिटिशांना १६०९ मध्ये या बेटास भेट दिली. फ्रेंचांनी १७५६ मध्ये या बेटावर आपला हक्क सांगितला, परंतु येथे त्यांनी प्रत्यक्षात वसाहत करण्यास १७६८ मध्ये सुरुवात केली, फ्रान्सचे तत्कालीन अर्थमंत्री व्ही. देस सेशेल्स यांच्या नावावरून या बेटाचे सेशेल्स असे नामाकरण केलेले आहे. १७९३ ते १८१३ पयंत फ्रेंच व ब्रिटिश यांच्यामध्ये याच्या अधिपत्यासाठी संघर्ष झाले. १८१४ मध्ये पॅरिसच्या तहान्वये ही बेटे व मॉरिशस ब्रिटिश अंमलाखाली आले. ब्रिटिशांनी मॉरिशसहून येथील कारभार पाहण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्यातून गुलामगिरी नष्ट करण्याचा मनोदय केल्यानंतर फ्रेंच जमीनदार त्यांच्या गुलामांसह या देशातून बाहेर गेले. तथापि मळ्यात काम करण्यासाठी भारतीय मजूर व दुकानदारीसाठी चिनो मजूर येथे आले. १८७२ मध्ये मुलकी शासनासाठी मंडळ स्थापण्यात येऊन बेटांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी परिषद व विधानपरिषदेचा १८८८ मध्ये रचना करण्यात आली. ३१ ऑगस्ट १९०३ पासून ही बेटे ब्रिटिश राजनेची वसाहत झाली. विधानपरिषदेच्या चार सदस्यांच्या निवडीसाठी १९४८ मध्ये प्रथम निवडणूक झाली. १९६६ मध्ये नवीन संविधान तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी १९६७ पासून सुरू झाली. सदर संविधानान्वये गव्हर्नर व नियामक परिषदेला राज्यकारभाराचे अधिकार देण्यात आले. तसेच सदर संविधानान्वये सार्वत्रिक प्रौढ मतदानाने विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी डिसेंबर १९६७ मध्ये निवडणूक झाली. सेशेल्सला अंतर्गत राज्यकारभारात अधिक स्वतंत्रता देण्याच्या दृष्टीने संविधानात दुरुस्त्या करण्यात आल्या. १९७५ मध्ये सेशेल्सला अंतर्गत स्वतंत्र राज्यकारभाराचे अधिकार देण्यात आले व २९ जून १९७६ रोजी सेशेल्सला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर हा देश ब्रिटिश राष्ट्रकुलाचा सदस्य आहे. यावेळी कॉन्झर्व्हेटिव्ह पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जेम्स आर. एम. मँक्स याच्या नेतृत्वाखाली संमिश्र सरकार स्थापन झाले. यामध्ये मँक्स हे राष्ट्राध्यक्ष व सेशेल्स पीपल्स युनायटेड पार्टीचे नेते फ्रान्से अल्बर्ट रेने हे पंतप्रधान होते. ५ जून १९७७ मध्ये अवचित मँक्स देश सोडून गेले. सत्तांतरात फ्रान्से अल्बर्ट रेने राष्ट्राध्यक्ष झाले. रेने यांनी संविधान स्थगित केले. मार्च १९७९ मध्ये नवीन संविधान अस्तित्वात आले. त्याअन्वये देशात एकपक्षीय शासन सुरू झाले. रेनेंचा सेशेल्स पीपल्स प्रोग्रेसिव्ह फ्रंट हा एकमेव वैध पक्ष होता. संविधानातील या मोठ्या प्रमाणातील अप्रिय दुरुस्तीमुळे १९८० मध्ये अनेक उठावाच्या घटना घडल्या. परकीय मदतीमुळे पीपल्स प्रोग्रेसिव्ह फ्रंट पक्षावर व नेत्यावर दबाव आला; परिणामी हा पक्ष आणि नेते लोकशाही प्रशासनाकडे वळले. त्यांनी नवीन संविधान १९९३ पासून अमलात आणले. रेने १९८४, १९८९, १९९३, १९९८ व २००१ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. १४ एप्रिल २००४ मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व जेम्स मिचेल हे राष्ट्राध्यक्ष झाले. जुलै २००६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेम्स मिचेल हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचे संविधान संस्थगित करून १९७९ मध्ये नवीन संविधानाप्रमाणे राज्यकारभार सुरू होता. मात्र सदरचे संविधान अधिक्रमित करून १८ जून १९९३ पासून नवीन संविधानाप्रमाणे राज्यकारभार चालतो. सदर संविधानान्वये राष्ट्राध्यक्ष हा देशाचा व सैन्यदलाचा प्रमुख असतो. राष्ट्राध्यक्षांची निवड सार्वत्रिक प्रौढ मतदानाने पाच वर्षांसाठी करण्यात येते. राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांची एक टर्म याप्रमाणे तीन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला जाऊ शकतो. राष्ट्राध्यक्ष हा उपराष्ट्राध्यक्ष पंतप्रधान व मंत्रीमंडळाची नियुक्ती करतो. संविधानाप्रमाणे विधानमंडळ एकसदनी आहे. यासाठी ३४ सदस्य पाच वर्षांसाठी निवडण्यात येतात. यामध्ये २५ सदस्याची निवड सार्वत्रिक प्रौढ मतदानाने करण्यात येते व ९ सदस्यांची निवाप्रमाणशीर प्रतिनिधित्वाने करण्यात येते.

न्यायव्यवस्था फ्रेंच व ब्रिटिश सहितच्या मिश्रणावर आधारित आहे. याअन्वये कोर्ट ऑफ अपिल, सुप्रिम कोर्ट व मैजिस्ट्रेट कोर्ट प्रमाणे स्तरीय न्यायव्यवस्था आहे.

आर्थिक स्थिती : सेशेल्सची अर्थव्यवस्था ही मिश्र व विकसनशील असून ती प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. व्यापारातील तूट व चलनवाढीचा दर वाढता असला तरी येथील अर्थव्यवस्था विकसित होत आहे जिच्या आफ्रिकन देशापेक्षा सेशेल्समधील दरडोई उत्पन्न जास्त आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेती उत्पन्नाचा व कष्टकरी लोकसंख्येत शेतीवर आधारित लोकसंख्येचा हिस्सा काही टक्केच आहे. लागवडीयोग्य क्षेत्र कमी प्रमाणात असून मृदा हलकी आहे. येथे नारळ, दालचिनी, व्हॅनिला यांची लागवड निर्यातीच्या दृष्टीने केली जाते. येथे नारळ ३,२०० मे. टन, भाजीपाला १,९४० मे. टन, केळी १,९७० मे. टन, चहा २१३ मे. टन, दालचिनी २०० मे. टन उत्पादन झाले (२००४). जनावरे २,०००, डुकरे १९,००० व शेळ्या ५,००० होत्या (२००४).

मासेमारी हा परकीय चलन मिळवून देणारा महत्त्वाचा घटक आहे. २००६ मध्ये निर्यातीच्या उत्पन्नातील ५२% भाग मासेमारीचा होता. यावर्षी १,०९६.८ लक्ष सेशेल्स रुपयांची निर्यात केली होती. २००५ मध्ये १,०६,५५५ टन मासे पकडण्यात आले होते. मासेमारीत ट्यूना जातीच्या माशांचे प्रमाण जास्त आहे. येथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू असून यामध्ये अन्नप्रक्रिया, फर्निचर तयार करणे, जहाजबांधणी यांचा समावेश आहे. मासे डबाबंद प्रक्रिया उद्योगात ४०,२२२ टन ट्यूना मासे डबाबंद करण्यात आले होते (२००६). याशिवाय येथे मद्यनिर्मिती, सिगारेट, दुग्ध उद्योग, झिंगा माशांचे पदार्थ तयार करणे इ. उद्योग चालतात.

सेशेल्स रुपया हे देशाचे चलन असून १०० सेंटचा १ रुपया असतो. द सेंट्रल बँक ऑफ सेशेल्स ही देशातील मध्यवर्ती बँक आहे. याशिवाय येथे सहा व्यापारी बँका व परदेशी बँकांच्या चार शाखा आहेत. जागतिक बँकेचा सेशेल्स सदस्य आहे. देशाचे अंदाजपत्रक शिलकी असल्याचे दिसून येते. २००६ मध्ये देशाचे अंदाजपत्रकात महसूल व अनुदाने यांपासून एकूण २,४७६.२ लक्ष सेशेल्स रु. जमा व २,३०१.८ लक्ष सेशेल्स रु. व्यय होती. राष्ट्रीय उत्पादनात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा पर्यटनाचा असून कष्टकरी लोकसंख्येच्या ३०% लोक या व्यवसायात आहेत. २००६ व २००७ मध्ये पर्यटनामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात ५ % वाढ झाल्याचे निदर्शनास आले. २००७ मध्ये १,६१,२७३ पर्यटकांनी देशास भेट दिली होती. २००५ मध्ये ३,७१२.२ लक्ष सेशेल्स रुपयांची आयात व १,८६८.६ लक्ष सेशेल्स रुपयांची निर्यात झालेली होती. आयातीत खनिज इंधन, अन्नपदार्थ, यंत्रसामग्री. दळणवळणसामग्री, रसायने यांचा समावेश असतो. २००५ मध्ये आयात प्रामुख्याने सौदी अरेबिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्समधून झालेली होती. निर्यातीत डबाबंद रचना मासे, औषधे, वैद्यकीय उपयंत्रे, माशांचे खाद्य, गोठवलेले झिंगे यांचा समावेश असतो. २००५ मध्ये निर्यात प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी या देशांना झालेली होती. व्हिक्टोरिया हे प्रमुख बंदर आहे. येथून जलवाहतूक होते. रस्त्यांची लांबी ५०२ किमी. होती व त्यामध्ये ९६% रस्ते पक्के होते (२००६). देशात ६,८०० खाजगी कार, २,६०० व्यापारी वाहने, २१५ बस होत्या (२००६). येथील बेटे ही प्रामुख्याने जलमार्गांनी एकमेकास जोडलेली आहेत. येथील पर्यटन व्यवसाय मोठमोठ्या ‘क्रुझ’ जहाजांद्वारे चालतो. त्यातून मोठे उत्पन्न या देशास मिळते.

देशात लोहमार्गाची सुविधा नाही. सेशेल्सचा आंतरराष्ट्रीय विमानतळ माहे बेटावर व्हिक्टोरियापासून १० किमी. पाँटे लॅरूए येथे आहे. देशात २००७ मध्ये १,००,००० दूरध्वनीधारक, ७७,३०० भ्रमणध्वनीधारक व ३२,००० महाजालकाचा वापर करणारे होते. पाच डाक कार्यालये होती (२००३). देशात एक दैनिक व तीन साप्ताहिके प्रकाशित होत होती (२००६). दैनिकांचा दैनंदिन सरासरी खप ३,००० होता (२००६), द सेशेल्स ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनमार्फत आकाशवाणी व दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे नियंत्रण केले जाते. येथे दोन नभोवाणी केंद्रे व एक दूरचित्रवाणी केंद्र होते. देशात २२,२०० दूरचित्रवाणी संचधारक होते (२००६). व्हिक्टोरिया येथे एक चित्रपटगृह व ३ नाट्यगृहे होती (२००६).

लोक व समाजजीवन : सेशेल्समध्ये क्रिओल लोक बहुसंख्य असून भारतीय व चिनी वंशाचे लोकही काही प्रमाणात आहेत. लोकसंख्येत ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे. यामध्ये ९०% रोमन कॅथलिक व ८% अँग्लीकन आहेत. तसेच येथे हिंदू, मुस्लिम व बहाई लोकही – आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १८१.१ होती (२००४). येथील जनन दर हजारी १७-४० व मृत्यूदर हजारी ७.३० होता. स्त्री जनन क्षमता प्रमाण २.१ होते (२००४). देशात इंग्रजी, फ्रेंच, क्रिओल या प्रमुख भाषा आहेत. २१% लोक क्रिओल भाषा बोलतात. येथे लिखित स्वरूपात वाङ्मय फारच कमी प्रमाणात आहे. दंतकथा, लोककथा, म्हणी, लोकगीते येथे जास्त आहेत. अँटोइने अवे हा कवी काही प्रमाणात प्रसिद्ध आहे. संगीत व नृत्य यांमध्ये आफ्रिकन, फ्रेंच व आशियन यांचे मिश्रण दिसून येते. ढोल, व्हायोलीन, गिटार या वाद्यांचा उपयोग केला जातो. येथे फ्रेंच कॉंटू, सोनूए, माऊटिआ हे नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत. समाजात मातृसत्ताक पद्धती आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांना न्यायिक, राजकीय, आर्थिक समान हक्क आहेत. वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंत्री यांमध्ये स्त्रिया आहेत.

येथील लोकांचे राहणीमान चांगले आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण कमी आहे. शासन लोकांना तुलनेने चांगल्या आरोग्य सेवा पुरविते. येथे १०७ डॉक्टर, १६ दंतवैद्य, ४२२ नर्सेस, ४ औषधनिमति होते (२००३). सात रुग्णालयांतून ४१९ खाटांची सुविधा होती (२००३). १२ ते २३ महिन्यांच्या बालकांची लसीकरणाची टक्केवारी टीटीपी २९१६ व गोवर ९९% होती (२००४).

६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. येथे २५ प्राथमिक शाळांत ६७० शिक्षक व ९,२०४ मुले होती (२००४). १३ माध्यमिक विद्यालयांत ५९० शिक्षक व ७,८९७ मुले होती. साक्षरता प्रमाण ९६७ होते (२००५) देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ५७% खर्च शिक्षणावर करण्यात आलेला होता (२००१-०३). येथे बास्केटबॉल व फुटबॉल (सॉकर) हे खेळ लोकप्रिय आहेत.

पर्यटनाचे दृष्टीने माहे, प्रॅस्लीन, ला दीग ही बेटे प्रसिद्ध आहेत. येथील हिस्टॉरिकल म्युझीयम, नॅशनल हिस्ट्री म्युझीयम, नॅशनल हेरिटेज म्युझीयम, म्युझीयम ऑफ द इकॉनॉमिक ॲक्टिव्हीटीज ही संग्रहालये व राष्ट्रीय कलाविथी विशेष प्रसिद्ध आहेत. व्हिक्टोरिया हे राजधानीचे शहर देशात सर्वांत मोठे शहर आहे. (चित्रपत्र).

गाडे, ना. स.