सान पेद्रो सूला : दक्षिण अमेरिकेतील हाँडुरस या देशातील कॉर्तेझ विभागाच्या राजधानीचे ठिकाण. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ६,४६,३०० (२०११). देशाच्या वायव्य भागातील ऊलूआ नदीखोऱ्यात हे शहर वसले आहे. हाँडुरस आखाताच्या किनाऱ्यावरील व देशातील सर्वांत मोठ्या प्वेर्तो कार्तेझ या बंदरापासून महामार्ग व लोहमार्गाने ६० किमी. आत हे शहर आहे. स्पॅनिशांनी १५३६ मध्ये या शहराची स्थापना केली. सांप्रत शहराची संपूर्ण पुनर्रचना केली आहे.

शहराचा परिसर महत्त्वाचा कृषिप्रदेश असून तेथून निर्यातीसाठी केळी तर स्थानिक उपभोगासाठी ऊस, तांदूळ, मका, रताळी, कसाव्हा ही पिके आणि प्राणिज उत्पादने घेतली जातात. देशातील हे प्रमुख औद्योगिक केंद्र असून येथे कापड, कागद, फर्निचर, रंग, प्लास्टिक, सिमेंट, काच, विद्युत् उपकरणे, सायकली, औषधे, रसायने, साबण, बीर, प्रकिया केलेले लाकूड, धातूच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पशुखाद्य व इतर विविध उत्पादनांच्या निर्मितीचे कारखाने आहेत. हाँडुरसच्या उत्तर व पश्चिम भागाचे हे प्रमुख व्यापारी, वित्तीय व वितरणाचे केंद्र आहे. १९७४

मध्ये आलेल्या फिफी या हरिकेन वादळात शहरातील उद्योगधंद्यांचे, तसेच पृष्ठप्रदेशातील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. हे १९७६ मध्ये औद्योगिक खुले व्यापारी क्षेत्र बनले.

चौधरी, वसंत