आधुनिक खार्टूम

खार्टूम : सूदान प्रजासत्ताकाची व त्याच्या खार्टूम प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,३०,६०० (१९६९ अंदाज). हे नील नाईल व श्वेत नाईल यांच्या संगमाजवळ, नील नाईलच्या डाव्या तीरावर जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्ट्यावर वसलेले आहे. खार्टूम ह्या अरबी शब्दाचा अर्थ ‘हत्तीची सोंड’ असा आहे. ते नील नाईलवरील पुलाने खार्टूम नॉर्थ–लोकसंख्या १,०९,००० (१९६८) व श्वेत नाईलवरील पुलाने ऑम्डरमॅन–लोकसंख्या २,३२,२०० (१९६९ अंदाज) यांच्याशी जोडलेले आहे. ही तिन्ही मिळून एक मोठे जोडशहर बनलेले आहे. पूर्वीपासून येथे डिंक व हस्तिदंत यांचा व्यापार चालत असे. आता रस्त्यांनी, नदीमार्गे आणि लोहमार्गांनी व्यापार वाढला आहे. येथून वाडी हॅल्फा, पोर्ट सूदान व एल् ओबेद येथे लोहमार्ग जातात. जवळच विमानतळही आहे. तेथे सूदान एअरवेजचे मुख्य कार्यालय आहे. सिमेंट, डिंक, सुती कापड, रासायनिक पदार्थ, कातडी, तेलबिया, काच, कौले, छापखाने यांचे उद्योग येथे आहेत. खार्टूम नॉर्थ हे व्यापारी केंद्र आहे. येथे जहाजांच्या गोद्या व कर्मशाळा आहेत. कापूस, गहू, बार्ली, फळे, जनावरे, यांचा व्यापार तेथे आहे. खार्टूम हे सांस्कृतिक केंद्रही आहे. १९५६ मध्ये प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतर पूर्वीचे गॉर्डन मेमोरियल कॉलेज व किचनेर स्कूल ऑफ मेडिसिन ही एकत्र करून खार्टूमचे विद्यापीठ स्थापण्यात आले. खार्टूमचे बहुतेक लोक न्यूबियन, अरब व निग्रो यांच्या मिश्रवंशाचे व सुन्नी मुस्लिम आहेत. मुख्यतः अरबी व जोडीला इंग्रजी अशा भाषा आहेत. काही ईजिप्शियन, ग्रीक, सायप्रीअट, आशियाई व पश्चिम यूरोपीयही आहेत. येथे प्राणिसंग्रहालय व वनस्पतिविज्ञान, परराष्ट्रांच्या कचेऱ्या असून मध्यवर्ती ‘सूक’ म्हणजे बाजारपेठेत मोटारी, ट्रक, बसगाड्या व गाढवे यांची गर्दी असते. शहरात अनेक मशिदी व चर्च आहेत. १८२२ मध्ये ईजिप्तच्या महंमद अलीने खार्टूमची स्थापना केली. तेथून ईजिप्तला माल व गुलाम पाठविले जात. १८८४ मध्ये मोहमूद आहमदच्या महदीया अनुयायांनी ते जिंकून उद्ध्वस्त केले त्यावेळी ईजिप्ततर्फे लढणारा इंग्रज जनरल गॉर्डन मारला गेला. महदीयांनी ऑम्डरमॅनची वाढ केली. १८९८ मध्ये जनरल– पुढे लॉर्ड किचेनर याने महदीयांच्या खलिफाचा पराभव केला व ब्रिटिश ध्वजाच्या आकारानुसार खार्टूमची पुन्हा उभारणी केली.

लिमये, दि. ह.