टोराँटो : कॅनडातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व त्याच्या आँटॅरिओ प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७,१२,७८६ (१९७१) महानगरी २६,२८,०४३. हे आँटॅरिओ सरोवराच्या उत्तर काठावर डिट्रॉइटच्या ईशान्येस ३६४ किमी. व ओटावाच्या नैर्ऋत्येस ३६८ किमी. वसले आहे.

टोराँटो म्हणजे ह्यूरन इंडियन भाषेत एक जमण्याची जागा असा अर्थ आहे. टोराँटो आयलंड नावाच्या वाळूच्या वक्राकार बांधामागे सु. ५ चौ. किमी. क्षेत्राचे टोराँटो हे उत्तम सुरक्षित नैसर्गिक बंदर आहे. बांधाच्या दोन्ही बाजूंनी काँक्रीटने बांधून काढलेल्या कालव्यांतून बंदरात प्रवेश करता येतो.  ‘सेंट लॉरेन्स सी वे’ मुळे सागरगामी बोटींसही हे बंदर उपयुक्त झाले आहे. बांधावर उद्याने, क्रीडांगणे व विमानतळ आहेत. आँटॅरिओ सरोवराच्या स.स. सु. ८२ मी. उंचीच्या काठापासून सु. २०० मी. उंचीपर्यंत हळूहूळू चढत गेलेल्या सु. १०४ चौ. किमी. भूभागावर टोराँटो शहराचा विस्तार झालेला आढळतो. शहराच्या पूर्वेकडून डॉन व पश्चिमेकडून हंबर या नद्या वाहतात.

क्वीन्स पार्कमधील संसदभवन, टोराँटो.

या शहराची स्थापना ब्रिटिश गव्हर्नर सिम्को याने अपर कॅनडाची राजधानी म्हणून १७९३ मध्ये केली असली, तरी १७४९ मध्ये फ्रेंचांनी येथे किल्ला बांधून स्थानिक लोकांशी फर वगैरेंच्या व्यापारास सुरुवात केली होती. १७५९ मध्ये ब्रिटिशांनी ठाणे जिंकले तेव्हा फ्रेंचांनीच किल्ला उद्ध्वस्त करून टाकला. सिम्कोने शहराचे नाव यॉर्क ठेवले. १८१२ च्या युद्धात संयुक्त संस्थानांच्या फौजांनी शहराची जाळपोळ केली.

नेपोलियन युद्धानंतरच्या मंदीच्या काळात पुष्कळ लोक ब्रिटनमधून येथे आले. १८३४ मध्ये यॉर्क पुन्हा टोराँटो शहर म्हणून प्रतिष्ठत झाले. १८४९ मध्ये मोठी आग लागून सेंट जेम्स कॅथीड्रल, सेंट लॉरेन्स मार्केट व इतर बऱ्याच इमारती, गुदामे वगैरे भस्मसात झाली परंतु त्यातून शहर लवकरच सावरले. १८५० नंतर ग्रँड ट्रंक आणि ग्रेट वेस्टर्न रेल्वेमुळे, संयुक्त संस्थानांशी व्यापारात मिळालेल्या काही सवलतींमुळे प्रांतातील वनसंपत्तीचा उपयोग व शेतीची वाढ केल्यामुळे शहराची वेगाने वाढ झाली. लवकरच हे शहर राजकीय, आर्थिक, व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले.

जानेवारीत व फेब्रुवारीत येथील हवामान अतिथंड असते. हिमवर्षावही  होतो. जानेवारीचे तपमान -५·५° से. तर जुलै-ऑगस्टचे तपमान ३०° सें. व हवा दमट असते. वार्षिक सरासरी पर्जन्य ७८ सेंमी. असतो. शहराला नायगारा आणि स्थानिक जलविद्युत् केंद्रातून वीजपुरवठा होतो.

शहराच्या मध्यावर १६ हेक्टरची राणीची बाग (क्वीन्स पार्क) आहे. त्यात लोकसभेची व टोराँटो विद्यापीठाची इमारतही आहे. सेंट लॉरेन्स हॉल, न्यू सेंट जेम्स चर्च, सेंट पॉल अँग्लिकन चर्च, टिमाथि इटन मेमेरियल चर्च, रॉयल बँक ऑफ कॅनडा, टोराँटो विश्वविद्यालय, युनियन स्टेशन, कॅनडियन पॅसिफिक रेल्वे इत्यादींच्या इमारती भव्य आणि सुंदर आहेत. टोराँटो डोमिनियन सेंटर व कॉमर्स कोर्ट या पन्नास मजल्यांहून उंच इमारतीत कार्यालये व बँका आहेत. सिटी हॉल, सायन्स सेंटर, स्कारबरो कॉलेज, मॅसी कॉलेज, व्हिक्टोरिया, यॉर्क व इतर विद्यापीठीय इमारती, तसेच अनेक व्यापारी आणि औद्योगिक इमारती लक्ष वेधून घेतात. शहरात उद्याने राखलेली असून रोडझेल हा वसतिविभाग रमणीय आहे.

१९३० मध्ये टोराँटोत जवळपासची बारा गावे व त्यांच्या नगरपालिका समाविष्ट केल्या गेल्या. १९६७ मध्ये नगरपालिकांची संख्या सहांवर आणून शहराचा कारभार टोराँटो महानगरपालिकेकडे देण्यात आला. शहरात बस, ट्राम, भुयारी मार्ग, रेल्वे इ. वाहतुकीच्या सर्व सोयी असून ६०० किमी. रस्त्यांवरील ९०० ठिकाणांचे वाहतूक नियंत्रण गणकयंत्राद्वारे होते. शहराच्या मध्यापासून पश्चिमेस २७ किमी. अंतरावर ‘टोराँटो आंतरराष्ट्रीय विमानतळ’ आहे.

टोराँटो कापड, मांस, अन्नपदार्थ व पेये, विद्युत् उपकरणे व यंत्रे, लोखंडी व पोलादी सामान, विमाने, कागद, रसायने इ. उद्योगधंद्यांचे मोठे केंद्र असून कॅनडातील जनावरांच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. कॅनडातील नऊ प्रमुख बँकांपैकी चारांची मुख्य कार्यालये १९५८ मध्ये टोराँटोत होती. येथील शेअरबाजार जगातील खाणींच्या शेअरांचा सर्वांत मोठा बाजार आहे. कॅनडातील प्रकाशन व्यवसायाचे हे मोठे केंद्र आहे. कॅनडाच्या निर्मितिवस्तूंपैकी निम्म्या येथे होतात व त्याच्या निर्मिती निर्यातीपैंकी ८०% येथून निर्यात होते.

टोराँटोत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सिंफनी वाद्यवृंद व संगीत संस्था आहेत. तीन मोठी व इतर अनेक नाट्यगृहे, कलावीथी, वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये इ. असून सायन्स सेंटरमध्ये अनेक कल्पक, चालती मूर्तके प्रदर्शनीय ठेवलेली आहेत. कॅनडियन नॅशनल एक्झिबिशन हे एक जगातील मोठे प्रदर्शन दर वर्षी भरविण्यात येते. येथील यॉट क्लब, रोइंग क्लब, स्केटिंग क्लब विख्यात असून बेस बॉल व बर्फावरील हॉकी हे खेळ पाहण्यास मॅपल लीफ स्टेडियम व मॅपल लीफ गार्डन्स येथे फार मोठी गर्दी जमते. नाट्य, नृत्य, चित्रपट, व्याख्याने, परिसंवाद, सभा, चर्च, सिनॅगॉग, मशिदी, देवालये येथील अनेकविध धार्मिक समारंभ, उत्सव, करमणुकीचे व सामाजिक समारंभ यांनी शहराचे सांस्कृतिक जीवन बहरलेले असते.

टोराँटो हे एक मोठे विभागीय पर्यटन केंद्र असून शिकार, मासेमारी, नौकाविहार, बर्फावरील खेळ, अल्गाँक्वियन पार्क, नायगारा धबधबा इ. ठिकाणच्या सहली, गावातील प्रेक्षणीय इमारती व मनोरंजन स्थळे, उद्याने इत्यादींसाठी येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते.

सावंत, प्र. रा.