डेन्मार्क : यूरोपच्या उत्तरेकडील स्कँडिनेव्हिया प्रदेशातील एक सांवैधानिक राजेशाहीचा देश. क्षेत्रफळ ४३,०६९ चौ. किमी. त्यापैकी ७०० चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ५०,३६,१८४ (१९७४ अंदाज). विस्तार ५४° ३३’ उ. ते ५७° ४५’ उ. आणि ८° ४’ पू. ते १५° १२’ पू. यांदरम्यान. पूर्व-पश्चिम विस्तार सु. ४०० किमी. व दक्षिण-उत्तर सु. ३५२ किमी. यात जटलंड द्वीपकल्पाचा सु. ३०,०९५ चौ. किमी. प्रदेश आणि त्याच्या पूर्वेची फ्यून, लॉलान, झीलंड, ॲल्स, ॲर, टॉसिंग, लांगलॅन, साम्स, फाल्स्टर, बॉव, आमॅयर, बॉर्नहॉल्म व पश्चिमेची फान, रम इ. एकूण ४८२ बेटांचा सु. ५,००० चौ. किमी. प्रदेश येतो. बॉर्नहॉल्म बेट बाल्टिक समुद्रात झीलंडच्या पूर्वेस सु. १६० किमी. असून ते स्वीडनपासून फक्त ४० किमी. आहे. जटलंडची दक्षिणेकडील जर्मनीशी असलेली केवळ सु. ६७ किमी.ची सरहद्द सोडली, तर डेन्मार्क हा एक द्वीपसमूहच आहे. डेन्मार्कच्या पश्चिमेस उत्तर समुद्र, उत्तरेस स्कॅगरॅक हा उत्तर समुद्राचा फाटा, पूर्वेस कॅटेगॅट, उरसुंद व बाल्टिक समुद्र हे जलविभाग आणि दक्षिणेस प. जर्मनी व बाल्टिक समुद्र आहेत. द्वीपकल्प व बेटे या भूमिस्वरूपामुळे डेन्मार्कला क्षेत्रफळाच्या मानाने फार मोठा ७,४०० किमी. समुद्रकिनारा लाभला आहे. अटलांटिकमधील ग्रीनलंड – ५९° ४६’ उ. ते ८३° ३९’ उ. आणि ११° ३९’ प. ते ७३° ८’ प. क्षेत्रफळ २१,७५,६०० चौ. किमी. लोकसंख्या ४८,५८१ (१९७२) व फेअरो – ६१° २६’ उ. ते ६२° २४’ उ. व ६° १५’ प. ते ७° ४१’ प. क्षेत्रफळ १.३९९ चौ.किमी. लोकसंख्या ३९,१६२ (१९७२). ही बेटे भौगोलिक दृष्ट्या डेन्मार्कमध्ये नसली, तरी ती राजकीय दृष्ट्या डेन्मार्कचेच अंगभूत विभाग मानले जातात. [⟶ ग्रीनलंड फेअरो]. मध्य यूरोप व स्कँडिनेव्हिया यांना जोडणारा दुवा व बाल्टिक समुद्राच्या पश्चिमद्वारावरील रक्षक या दृष्टीने डेन्मार्कचे स्थान मोक्याचे आहे. त्यामुळे डेन्मार्कद्वारा माल, लोक आणि कल्पना यांची देवघेव दीर्घकाळ होत आलेली आहे. सुपीक व सपाट जमिनीमुळे डेन लोक यशस्वी शेतकरी झाले आणि बहुतेक सर्व बाजूंनी सागरवेष्टित असल्यामुळे ते धाडसी खलाशी आणि कुशल व्यापारी बनले. उत्तर समुद्र व पश्चिम यूरोपीय समृद्ध औद्योगिक राष्ट्रे यांच्या सान्निध्यामुळे आज डेन्मार्क हा एक उच्च जीवनमानाचा प्रगत देश आहे. त्याची कोपनहेगन ही राजधानी आपले पूर्वापार महत्त्व टिकवून आहे. 

भूवर्णन : डेन्मार्क हा भूस्तरावरील हिमयुगीन घडामोडींनी चतुर्थक काळातील बनलेला देश असून लहान लहान चढउतारांनी सर्व भूपृष्ठ ऊर्मिल भासते. जटलंडमधील ईजर बाव्हनहॉज ही सर्वांत उंच टेकडी समुद्रसपाटीपासून केवळ १७३ मी. उंच आहे. डेन्मार्कची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची फक्त ३० मी.च्या आसपास आहे. जटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील निसुम फ्योर्डपासून पूर्वेस व्हीबॉरवरून दक्षिण सीमेवरील प्लेंझबर्ग या जर्मन शहरापर्यंतची रेषा सु. ६ लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शेवटच्या हिमानीक्रियेची सीमा होय. बॉर्नहॉल्म बेटाचा अपवाद वगळल्यास भूशास्त्रदृष्ट्या डेन्मार्क दक्षिणेकडील जर्मन-स्कॉटिश पर्वतश्रेणी व उत्तरेकडील स्कँडिनेव्हिया-रशिया पर्वतश्रेणी यांच्या मधल्या खळग्यात आहे. उत्तर बॉर्नहॉल्ममध्ये स्वीडनमधल्या खडकांसारखे ग्रॅनाइटी खडक आहेत व दक्षिणेकडे त्यांवर वालुकाश्म व शेल यांचे आवरण आहे. तेथे केओलीन मातीही मिळते परंतु डेन्मार्कच्या इतर भागांत चुनखडीचा खडक व हिमयुगीन पीट, लिग्नाइट इ. आहेत. डेन्मार्कचे भूपृष्ठ व जमीन यांची घडण हिमयुगांत व नंतर झालेली असल्याने भूपृष्ठ सामान्यतः हिमप्रवाहाने आणलेल्या गाळाने, चिबड पाणथळ जमिनीने आणि टेकाडांनी बनलेले आहे. जटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर चिबडरान व वालुकामय टेकाडे आहेत, तर पूर्वेकडे व उत्तरेकडे सुपीक, दुमट मैदाने आणि टेकड्या आहेत. झीलंड बेटावर आग्नेयीकडे चुनखडक व टीव्हन्सक्लिंट, बुल्बजर्ग व मॉन्सक्लिंट येथे खडूचे उभे कडे आहेत. 

डेन्मार्कचा काही भाग विशेषतः रिब व ट्यूबॉरन हा जटलंडचा भाग व लॉलान बेटाचा दक्षिण भाग समुद्रसपाटीच्याही खाली असल्याने किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी बंधारे घालावे लागले आहेत. 

डेन्मार्कमध्ये किरकोळ नदीनाले, सरोवरे विपुल आहेत. पूर्वमध्य जटलंडमध्ये उगम पावून रानर्स शहराजवळ कॅटेगॅट समुद्राला मिळणारी १५० किमी.ची गूदनॉ डेन्मार्कमधील सर्वांत मोठी नदी होय. भूवेष्टित जलाशय पुष्कळ असले तरी क्षुल्लक आहेत. उत्तर झीलंडमधील ॲरेसो व जटलंडमधील मॉससो हे सर्वांत मोठे अंतर्गत जलाशय आहेत. 

डेन्मार्कचा किनारा अतिशय दंतूर असल्याने व त्यांत अनेक उपसागर, खारकच्छ, फ्योर्ड वगैरे असल्याने जलवाहतुकीस सोयीचा झाला आहे. उत्तर समुद्रापासून कॅटेगॅटपर्यंत जाणारा लिम फ्योर्ड सर्वांत महत्त्वाचा आहे. कोपनहेगन, एस्बीअर्ग, ऑलबॉर्ग, ऑर्हूस ही डेन्मार्कची प्रमुख बंदरे आहेत. 

पूर्वेकडील बेटे एकमेकांपासून व जटलंडपासून समुद्राच्या पट्ट्यांनी वेगळी झालेली आहेत. त्यांना दी ग्रेट बेल्ट म्हणजे मोठा पट्टा, दी लिट्ल बेल्ट म्हणजे लहान पट्टा व लांगलॅनचा पट्टा म्हणतात. स्वीडनचे दक्षिण टोक व झीलंड बेट यांदरम्यान उरसुंद उपसागर आहे. 

 

हवामान : डेन्मार्क समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्यात आहे. येथे पूर्व यूरोप, आर्क्टिक व अटलांटिक यांवरून अगदी विभिन्न वायुलोट येत असल्यामुळे हवा नेहमी बदलती असते. पश्चिम किनाऱ्याजवळून जाणाऱ्या उत्तर अटलांटिक प्रवाह या गल्फ प्रवाहाच्या अंतिम भागामुळे विशेषतः हिवाळ्यात फार फायदा होतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत सरासरी तपमान –०·१° से. म्हणजे त्या अक्षांशातील सरासरी तपमानापेक्षा सु. १२° से. जास्त असते, तर जुलै महिन्यातील सरासरी तपमान १६° से. जाते. या देशात सामान्यतः पश्चिमी वारे वाहत असल्याने व संपूर्ण देश जलवेष्टित असल्याने दिवस-रात्रीच्या तपमानांत फारसा फरक जाणवत नाही. पाऊस जवळजवळ वर्षभर ४० ते ८० सेंमी. पडतो. पावसाचे प्रमाण वसंतात कमी व अन्य ऋतूंत विशेषतः उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जास्त असते. बर्फाचा काळ किनाऱ्यावर ७० दिवस व अंतर्भागात १२० दिवस असतो. 

वनस्पती व प्राणी : या देशात चौदाशे जातींची फुलझाडे, सु. चारशे प्रकारचे शेवाळे, तीस प्रकारचे नेचे व कवक आहेत. देशाचा सु. १०% प्रदेश वनाच्छादित आहे. वृक्षात फर, बीच, स्प्रूस, लार्च, पाइन, ओक जास्त असून ॲश, रेड आल्डर, पॉपलर, एल्म, मॅपल हेही वृक्ष बरेच दिसतात. जटलंडच्या निकृष्ट भागात लहान झुडुपे आहेत. वन्य व हिंस्र पशू डेन्मार्कमध्ये फारसे नाहीत. ससा, काही जातींचे मृग, बिज्जू, बॅजर, खार, मार्टिन, खोकड हे प्राणी बरेच आहेत. येथील पांढरा मिंक प्रसिद्ध आहे. सु. ३३३ प्रकारचे पक्षी डेन्मार्कमध्ये दिसतात. त्यांपैकी १६३ डेन्मार्कमधील असून बाकीचे हिवाळ्यात अन्य देशांहून स्थलांतर करून येणारे आहेत. मासे भरपूर आहेत. तथापि प्रदूषणामुळे गोड्या पाण्यातील मासे वगैरे कमी झालेले आहेत.


इतिहास : डेन्मार्कचा अतिप्राचीन इतिहास फारसा माहीत नाही. सु. ११ हजार वर्षांपूर्वी येथे मच्छीमारी व शिकार करून राहणारा मानव समाज होता असे दिसते. इ. स. पू. दोन-तीन शतके सिंब्री व ट्युटॉनी टोळ्या डेन्मार्कमध्ये राहतहोत्या. त्यांनी अनेक यूरोपीय देशांना सतावून सोडले होते. इ. स. पू. १०२ च्या सुमारास रोमन सैन्याने त्यांचा निकाल लावला, तरीडेन्मार्कमधील निरनिराळ्या टोळ्यांचे इतर देशांवर आक्रमण चालूच राहिले. जटलंडमधील जूट व ॲगल्स टोळ्या इंग्लंडवर चालून गेल्या व इंग्लंडच्या काही भागांत त्यांनी वसाहतीही स्थापन केल्या.

 

मध्ययुगाच्या प्रारंभापासून व्हायकिंग टोळ्यांनी यूरोपभर धुमाकूळ घातला होता. त्यांचा तळ झीलंडमधील ट्रेलबॉर्य येथे असून, तेथूनच फ्रान्स व इंग्लंडवर त्यांच्या स्वाऱ्या होत, असे अलीकडील उत्खननावरून दिसते. ह्या व्हायकिंगांना इंग्लंडच्या ॲल्फ्रेड द ग्रेट याने ८७८ मध्ये वेडमोरच्या तहाने लंडन-चेस्टरच्या पूर्वेकडील मुलूख तोडून दिला. त्यालाच डॅनलॉ म्हणजे डेन लोकांचा प्रांत असे इंग्लंडच्या इतिहासात म्हटले जाते. 

लेखी पुरावा मागे ठेवणारा डेन्मार्कचा पहिला राजा गॉर्म द ओल्ड याने सु. ९०० ते ९४० पर्यंत राज्य केले. याचा मुलगा हॅरॉल्ड ब्लूटूथने नॉर्वेवर ताबा मिळविला व लोकांना ख्रिस्ती बनविले. याचा नातू कान्यूट याने डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, हेब्रिडीझ, ऑर्कनी व झेटलंड बेटे, दक्षिण स्वीडन व एस्टोनिया अशा विस्तृत साम्राज्यावर राज्य केले. याच्या कारकीर्दीत इंग्लिश व डेन लोकांचे संबंध सुधारले व दोन्ही देशांचा उत्कर्ष झाला पण त्याच्या मृत्यूनंतर हे साम्राज्य विस्कळित झाले.

 राजा वॉल्देमार द ग्रेटच्या कारकीर्दीपासून डेन्मार्कचा स्लाव्हवंशीय वेंड जमातीशी बाल्टिक समुद्राच्या परिसरातील मुलुखावरील स्वामित्वासाठी संघर्ष सुरू झाला (११५७). याचा नातू वॉल्देमार दुसरा (द व्हिक्टोरिअस) याने १२१९ मध्ये लिंडानीसच्या घनघोर लढाईत वेंडांचा पराभव करून उ. जर्मनीतील बराच मुलूख जिंकून घेतला. याच लढाईत काही दैवी चमत्काराने डेन्मार्कला आपला राष्ट्रध्वज लाभल्याने लिंडानीसच्या विजयाला डेन्मार्कच्या इतिहासात आगळेच महत्त्व आहे. याच काळात मच्छीमारी, नौकानयन आणि शेतीचा विकास होऊन डेन्मार्कचा उत्कर्ष झाला. लवकरच उ. जर्मनीतील राजांनी डेन्मार्कच्या ताब्यातील मुलूख जिंकून घेतला व खुद्द डेन्मार्कवरही आपला अंमल बसविला. परंतु जटलंडच्या लोकांनी चौथ्या वॉल्देमारच्या नेतृत्वाखाली जर्मनांना हाकून लावले. या संघर्षात एस्टोनिया डेन्मार्कला गमवावा लागला, पण इतरत्र डेन्मार्कचे राज्य विस्तारले.

 डेन्मार्कच्या इतिहासात तेरावे शतक रक्तपात, यादवी युद्धे व अराजक यांनी भरलेले आहे. राजा चौथा  वॉल्देमार याच्या अथक प्रयत्नाने ही परिस्थिती सुधारली. त्याने बाल्टिकच्या मुखावर आपले स्वामित्व स्थापन केले. जर्मन संस्थानिक व हॅन्सिॲटिक संघ यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला परंतु त्याच्या सरदारांनी विश्वासघात केल्याने त्याला आपल्या शत्रूंशी स्ट्रालसुंडचा तह करावा लागला (१३७०). यानंतर वॉल्देमारने अंतर्गत विरोध मोडून काढून आपली जरब बसविली. परंतु १३७५ मध्ये त्याचे निधन झाल्याने त्याचे कार्य अपुरेच राहिले. 

वॉल्देमार निपुत्रिक असल्याने त्याच्या मृत्यूनंतर डेन्मार्कचे राज्य त्याचा नातू (नॉर्वेचा राजा हॉकोन याची पत्नी व वॉल्देमारची मुलगी मार्गारेट हिचा पुत्र) ओलाफ याला मिळाले. अशा रीतीने ओलाफ नॉर्वे व डेन्मार्क या दोन्ही देशांचा राजा झाला परंतु ओलाफ अल्पायुषी ठरला. १३८७ मध्ये त्याचे निधन झाल्यावर मार्गारेटचीच दोन्ही देशांच्या राजपदी नियुक्ती झाली. तिच्याच खटपटीने १३९७ साली कलमारच्या कराराने स्वीडन, नॉर्वे व डेन्मार्क एकाच राजवटीखाली आले. परंतु खरी सत्ता डेन्मार्ककडेच राहणार असल्याने नॉर्वे-स्वीडनने हा करार फारसा कधीच मानला नाही. पुढे १५२३ मध्ये स्वीडन स्वतंत्र झाला. नॉर्वे मात्र १८१४ पर्यंत डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली राहिला.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी आणि नंतरच्या नेपोलियनच्या राजवटीत डेन्मार्कची स्थिती जिकिरीची झाली. तटस्थ राहणे अशक्य झाले. समुद्रावरील जहाजांच्या तपासणीच्या हक्कावरून इंग्लंडचा अनेक यूरोपीय देशांशी वाद सुरू झाला. तेव्हा रशिया, स्वीडन व डेन्मार्क यांनी तटस्थ राष्ट्रांचा संघ स्थापून इंग्लंडला विरोध केला. तेव्हा बाल्टिकच्या नाविक लढाईत इंग्लंडने डेन्मार्कच्या आरमाराची बरीच नासधूस केली. पुढे १८०७ मध्ये डेन्मार्कने नेपोलियनच्या महाद्वीपीय नीतीला विरोध करण्याच्या कामी इंग्लंडला सहाय्य करावे, या ब्रिटिशांच्या धमकीस डेन्मार्क भीक घालत नाही, असे दिसताच इंग्लिश आरमाराने कोपनहेगनवर तोफांचा भडीमार करून सर्व डॅनिश आरमार जप्त केले. साहजिकच डेन्मार्कला नेपोलियनच्या पक्षास चिकटून राहणे भाग पडले, नेपोलियनच्या अंतिम पराजयामुळे डेन्मार्कची अपरिमित हानी झाली. नॉर्वेवर चारशे वर्षे असलेला ताबा त्याला सोडावा लागला.

एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या पंचविशीत श्लेस्विग-होल्स्टाईनच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावरून डेन्मार्कचा प्रशिया-ऑस्ट्रियाशी संघर्ष झाला. यातून दोन युद्धे उद्‌भवून जटलंड द्वीपकल्पाच्या दक्षिण हद्दीवरील हे प्रांत डेन्मार्कला गमवावे लागले. पैकी पहिल्या युद्धानंतर जनता कौल घेऊन उत्तर श्लेस्विग प्रांत पुन्हा डेन्मार्कमध्ये सामील करण्यात आला.

पहिल्या महायुद्धात डेन्मार्क तटस्थ राहिला. दुसऱ्या महायुद्धातही तटस्थतेचे धोरण सांभाळण्यासाठी हिटलरशी अनाक्रमणाचा करारही डेन्मार्कने केला होता परंतु सर्व करार मोडून ९ एप्रिल १९४० रोजी जर्मनीने डेन्मार्कवर अचानक झडप घातली व काही तासांतच संपूर्ण डेन्मार्क ताब्यात घेतला. डेन्मार्कच्या सर्व साधनसामग्रीचा जर्मनांनी यथेच्च उपयोग करून घेतला पण स्वातंत्र्यप्रेमी डेन जनतेने भूमिगत चळवळ उभारून जर्मनांना त्रस्त करून सोडले. मे १९४५ मध्ये दोस्त सैन्याने जर्मनांना डेन्मार्कमधून पिटाळून लावले व स्वातंत्र्यसूर्य पुन्हा डेन्मार्कवर उगवला.


युद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे धोरण स्वीकारून डेन्मार्कने संयुक्त राष्ट्र संघटनेचे सभासदत्व मिळविले. १९४८ मध्ये फेअरो बेटांस स्वराज्य दिले. शंभर वर्षांचे तटस्थतेचे धोरण सोडून १९४९ मध्ये डेन्मार्क नाटो संघटनेत संस्थापक घटक म्हणून सामील झाला. नॉर्वे, स्वीडनबरोबर स्कँडिनेव्हियन देशांचा लष्करी करार करण्याचा डेन्मार्कचा प्रयत्न स्वीडनच्या नकारामुळे फसला पण इतर बाबतींत नॉर्वे-स्वीडनशी डेन्मार्कचे संबंध स्नेहाचे आहेत. १९५२ मध्ये नॉर्डिक कौन्सिल स्थापून सर्व स्कँडिनेव्हियन देशांत सांस्कृतिक विकास आणि बंधुभाव वाढावा म्हणून प्रयत्न करण्यात डेन्मार्कने पुढाकार घेतला. या देशांत आर्थिक सहकार्यासाठी जकातमुक्तीचा करार असून, स्कँडिनेव्हियन देशांतील नागरिकांना पासपोर्टशिवाय एकमेकांच्या देशात संचार करता येतो.

राज्यव्यवस्था : डेन्मार्कमध्ये सांवैधानिक राजेशाही असून येथील राजघराणे यूरोपातील सर्वांत जुने आहे. डेन्मार्कचा राजा ल्यूथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथाचाच असला पाहिजे, असा सांवैधानात्मक निर्बंध आहे. कायद्यानुसार वडील राजपुत्र गादीचा वारस असतो. राजा निपुत्रिक असल्यास १९४३ च्या कायद्यानुसार मुलीला गादी मिळावी अशी तरतूद आहे. १९७२ मध्ये राजकन्या दुसरी मार्गारेट गादीवर आली आहे. पहिल्या मार्गारेटनंतर (सु. १४००) गेल्या सु. साडेपाचशे वर्षांत डेन्मार्कच्या गादीवर स्त्री बसलेली नसल्याने या घटनेला विशेष महत्त्व दिले जाते.

५ जून १९५३ च्या संविधानानुसार हल्ली डेन्मार्कचा राज्यकारभार चालतो. राजा-राणी वैधानिक प्रमुख असून तो संसदेतील बहुमतवाल्या पक्षनेत्यांची महामंत्रिपदावर नियुक्ती करतो. इतर मंत्र्यांची नेमणूक महामंत्र्यांच्या शिफारशीनुसार होते. १९७५ पासून अंकेर यॉर्गेनसेन महामंत्रिपदावर असून त्याच्या मंत्रिमंडळात अन्य १४ सभासद आहेत.

डेन्मार्कचे विधिमंडळ एकगृही असून त्याला ‘फोल्केटिंग’ म्हणतात. त्याचे १७९ सभासद प्रौढ मताधिकारानुसार निवडले जातात. फोल्केटिंगचे अधिवेशन दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या मंगळवारी सुरू होते.

फोल्केटिंगची निवडणूक दर चार वर्षांनी होते. सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव झाल्यास किंवा एखाद्या प्रश्नावर जनमत अजमाविण्याचे सरकारने ठरविल्यास मुदतपूर्व निवडणुका घेता येतात. अनुपाती निर्वाचन पद्धतीनुसार निवडणुका होतात. फोल्केटिंगच्या १७९ सभासदांपैकी फेअरो व ग्रीनलंडचे प्रत्येकी दोन व २३ निर्वाचन क्षेत्रांतून १३५ प्रतिनिधी निवडले जातात. पक्षाच्या लोकप्रियतेनुसार फोल्केटिंगमध्ये प्रतिनिधी असावे म्हणून बाकी राहिलेल्या ४० जागा ज्या पक्षांना निर्वाचन क्षेत्रात विशेष मते पडली नाहीत त्यांच्यात नियमानुसार वाटण्यात येतात.

डेन्मार्कमध्ये अनुपाती निर्वाचन पद्धती नसल्यामुळे व पक्षापक्षांत एकजूट कमी असल्यामुळे तेथे बहुपक्षपद्धती अस्तित्वात आहे. त्यांतील सोशल डेमोक्रॅट्स (४६ प्रतिनिधी), प्रोग्रेस पक्ष (२८), रॅडिकल लेफ्ट (२०), लिबरल (२२), काँझर्वेटिव्ह (१६), सेंटर डेमोक्रॅट्स (१४), सोशॅलिस्ट पीपल्स पार्टी (११), ख्रिश्चन पीपल्स पार्टी (७), कम्युनिस्ट (६), सिंगल टॅक्स पार्टी (३) असे पक्षबल आहे. अनेक पक्ष असल्यामुळे तेथे नेहमी संयुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात असते आणि त्यामुळे राजकीय अस्थैर्य हे राजकीय जीवनाचे वैशिष्ट्य बनते. ऑक्टोबर १९७२ मध्ये घेतलेल्या जनमतानुसार डेन्मार्कने जानेवारी १९७३ मध्ये यूरोपीय सामायिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ई. एफ्. टी. ए. मध्ये तो १९६० मध्येच सामील झाला होता. स्थानीय प्रशासनासाठी डेन्मार्कचे १४ परगणे व २७७ नगरपालिका (कॉम्यूनेर) केल्या आहेत. त्यांचा कारभार लोकनियुक्त जिल्हा कौन्सिले पाहतात. त्या प्रत्येकावर राजाने नेमलेला राज्यपाल असतो. शहरांचा कारभार लोकनियुक्त स्थानिक मंडळे चालवितात. मंडळाचे सदस्य आपल्यातूनच एक महापौर निवडतात. कोपनहेगनसाठी ५५ सदस्यांचे लोकनियुक्त मंडळ व त्या मंडळाने ८ वर्षांसाठी नेमलेल्या ११ जणांचे कार्यकारी मंडळ असते. सर्व निवडणुका दर ४ वर्षांनी प्रौढ व गुप्त मतदानाने अनुपाती पद्धतीने होतात. 

डेन्मार्कमध्ये १०३ अंडररेट्टर म्हणजे लघुवाद न्यायालये, त्यावर लँड्सरेट्टरने म्हणजे वरिष्ठ जिल्हा न्यायालये, त्यावर कोपनहेगनला ऑस्टर लँड्सरेट व व्हीबॉर येथे व्हेस्टर लँड्सरेट ही वरिष्ठतर उच्च न्यायालये व कोपनहेगन येथेच होजेस्टेरेट म्हणजे सर्वोच्च न्यायालय, अशी न्यायालयांची मांडणी असून न्यायालयावर कार्यकारिणीचा ताबा नाही. याशिवाय संसदीय महाभियोग चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व फोल्केटिंगद्वारा दर सहा वर्षांनी नियुक्त झालेले विशेष तज्ञ असतात.

 १९५३ च्या संविधानानुसार शासनाविरुद्ध तक्रारी ऐकण्यासाठी व कायद्यांच्या अंमलबजावणीवर आणि मुलकी प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी एक स्वतंत्र लोकपाल फोल्केटिंगद्वारा नेमला जातो. त्याला फोल्केटिंगेट्स ऑम्बडस्‌मन म्हणतात.

 संरक्षण : देशाची संरक्षण व्यवस्था नाटोच्या योजनेस अनुरूप अशी केली जाते. १९७३ मध्ये दुरुस्त केलेल्या १९६९च्या संरक्षण कायद्यांप्रमाणे संरक्षणप्रमुख हा भूदल, नौदल व वायुदल या तिन्ही दलांचा प्रमुख असतो. तो त्याच्या हाताखालचे अधिकारी, तिन्ही दलप्रमुख आणि त्यांचे काही अधिकारी यांमिळून संरक्षण समादेश (डिफेन्स कमांड) असतो. संरक्षणमंत्र्याच्या मदतीला संरक्षण मंडळ असते. त्यात संरक्षणप्रमुख, त्याचे अधिकारी, डॅनिश ऑपरेशबल फोर्सेसचा प्रमुख व तिन्ही दलांचे प्रमुख असतात. संविधानाप्रमाणे प्रत्येक सुदृढ नागरिकास राष्ट्रीय संरक्षणात भाग घेणे आवश्यक आहे. ही सक्तीची सैनिक सेवा ९ महिन्यांची असून १९ ते २५ वर्षांच्या सर्व तरुणांस सैनिकी शिक्षण देण्यात येते. भूदलात १९७५ मध्ये २४,००० सैनिक आणि ५२,००० सैनिकी गृहसंरक्षक दलाचे स्वयंसेवक होते. नौदलात ६,५०० अधिकारी व सैनिक आणि ३,५०० नाविक गृहसंरक्षक व ४,२०० स्वयंसेवक होते. वायुदलात ९,६०० सैनिक व ११,५०० चे वायु गृहसंरक्षक दल होते. 


आर्थिक स्थिती : पूर्वीपासूनच कृषिप्रधान असलेल्या डेन्मार्कमध्ये कृषिमालाच्या निर्यातीस गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच विशेष महत्त्व प्राप्त झाले. तोपर्यंत डेन्मार्क गरीब शेतकऱ्यांचा देश होता. केवळ एक पंचमांश जमीन उपजाऊ होती व ती जुन्या पद्धतीने कसली जात होती. थोडे धान्य निर्यात करून लोणी, चीज यांसारखे खाद्यपदार्थ आयात करावे लागत. तशातच युद्धामुळे डेन्मार्कला एक तृतीयांश भूमी व दोन पंचमांश प्रजाजन गमवावे लागले. अमेरिकेतून यूरोपात प्रचंड प्रमाणात धान्य आयात होऊ लागले व या स्पर्धेत डेन्मार्कचा निभाव लागणे अशक्य झाले. तेव्हा डेन्मार्कने धान्यांची उपज घटवून जनावरांसाठी गवत, बीट वगैरेंचे उत्पादन वाढविले. यांत्रिक हत्यारांचा वापर, उत्कृष्ट प्रकारची खते, सुधारलेली बी-बियाणे, शास्त्रीय लागवडपद्धती इ. उपायांनी डेन्मार्कने आपल्या शेतीत प्रचंड क्रांती घडवून आणली. शासनानेही कृषिविषयक विशेष धोरण आखून या कृषी क्रांतीचा वेग वाढविला. याच बरोबर सहकारी चळवळीद्वारा शेतकऱ्यांची संघटना, यंत्रसामग्रीचा वापर, उत्कृष्ट बियाण्याची आणि आवश्यक खतांची सुलभता, शेतमाल विक्रीची सहकारी व्यवस्था व मुख्यतः पशुधनाला व दुग्धव्यवसायाला प्राधान्य यांमुळे तेथील आजचा शेतकरी संपन्न व सुखी झाला आहे. 

डेन्मार्कची १९७३ मध्ये ६८·५ % जमीन लागवडीखाली असून १९७० मध्ये ११% कामगार शेतीवर राबत होते. १९७३ मध्ये एकूण १,३३,००० शेतांपैकी ३१% शेते ०·५ ते १० हे. क्षेत्राची, ६४% १० ते ६० हेक्टरांची व ५% त्यापेक्षा मोठी होती. १९६१ मध्ये शेतकामगार १,२०,४२२ होते तर १९७३ मध्ये ते फक्त ३१,९८८ होते तरीही उत्पादन घटले नव्हते. १९७३ मध्ये लागवडीखालील २९,५२,००० हे. जमिनीपैकी ५९·५ % जमीन धान्यपिकांखाली, ०·२४% भुईमूग व घेवडे यांखाली, ९·५% कंदपिकांखाली, ४% इतर पिकांखाली, २६·३% चारा व गवत यांखाली आणि ०·१% पडीक होती.

जव (बार्ली) हे मुख्य पीक असून गहू, राय, ओट, बटाटे, ज्वारी आणि बीट ही पिकेही होतात. गवतही पुष्कळ होते. यांपैकी बरेच धान्य व कंद जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते.

डेन्मार्कमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांना हल्ली विशेष महत्त्व दिले जाते. हा व्यवसाय प्रामुख्याने सहकारी तत्त्वावर उभारलेला असून आधुनिक तंत्राच्या वापरामुळे तो जगात प्रसिद्धी पावला आहे. मांस, मलई, लोणी, चीज, अंडी, बेकन व हॅम आदी प्राणिज पदार्थ डेन्मार्कमधून निर्यात होतात. डेन्मार्कमधील खाटिकखानेही सहकारी तत्त्वावर चालविले जातात. बहुतेक खाटिकखान्यांतील यंत्रसामग्री सहकारी संस्थेच्या मालकीची असते. १९७३ मध्ये देशात ८४,२३,००० डुकरे, २९,५७,००० गुरे, ५६,००० मेंढ्या, ५०,००० घोडे आणि १,७५,६१,००० कोंबड्या व बदके होती व ४७,२९,००० मे. टन दूध, १,४६,००० मे. टन लोणी, १,२८,००० मे. टन चीज, २,०५,००० मे. टन गोमांस, ८,३२,००० मे. टन डुकरांचे मांस, ७४,००० मे. टन अंडी एवढे उत्पादन झाले.

मच्छीमारी हा डेन्मार्कमधील लोकांचा आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला उत्तेजन देण्याचे शासकीय धोरण असून मच्छीमारी बोटी व अन्य यंत्रसामग्रीसाठी सरकारी कर्जे मिळतात. या व्यवसायात १३,००० कोळी व १९७३ मध्ये ७,१२३ मोटारबोटी, ९३ शिडाची जहाजे व ३,३२१ होड्या होत्या. मुख्यतः हेरिंग, कॉड आणि प्लेस हे मासे मिळतात. इंग्लंड वगैरे देश जवळच असल्याने मासे ताजेच निर्यात करता येतात. वरील जातींशिवाय स्प्रॅट, मॅकॅरेल, सॅमन, ईल, ट्यूना, ट्राऊट हेही मासे डेन्मार्कच्या आसपास उपलब्ध आहेत. १९७३ मध्ये१४,२८० लक्ष क्रो. किंमतीचे मासे मिळाले व १५,८४८ लक्ष क्रो. किंमतीचे निर्यात झाले.

वनविकासाला उत्तेजन देण्याचे सरकारी धोरण असून लागवडीपेक्षा जास्त जंगलतोड होऊ नये म्हणून कडक कायदे केलेले आहेत. विसाव्या शतकाच्या प्रारंभी डेन्मार्कमध्ये केवळ पाच टक्के भूमी वनव्याप्त होती, तेथे आता ११·१ टक्के भूमीवर उत्कृष्ट जंगले आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर डेन्मार्कच्या कारखानदारीत व उद्योगधंद्यांत क्रांतिकारक वाढ झाली आहे. डेन्मार्कमधील कारखाने व उद्योगधंदे देशभर विखुरलेले आहेत. खाद्यपदार्थांचे कारखाने लहान लहान शहरांत शेतांच्या आसपास असून बेकन, हॅम, चीज हे डॅनिश पदार्थ जगात नावाजलेले आहेत. गेल्या काही वर्षांत मांसोत्पादन व मांससंवेष्टनाच्या धंद्यात खूपच वाढ झाली आहे. मद्यनिर्मितीच्या आसवन्याही  डेन्मार्कमध्ये पुष्कळच आहेत. शेतमाल प्रक्रियेच्या कारखान्यांपैकी तंबाखू पदार्थांच्या कारखान्यांत जास्तीत जास्त लोक आहेत. तंबाखू मात्र आयातच करावी लागते. त्याखालोखाल आसवन्या आणि मांस प्रक्रिया कारखान्यांचा क्रम लागतो. रासायनिक पदार्थ, अभियांत्रिकी, सिमेंट व त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, डीझेल एंजिने, चिनी मातीची भांडी इत्यादींचे कारखाने आणि कापडगिरण्या कोपनहेगन, ओदेन्से, ऑलबॉर्ग आदी शहरांत आहेत. चिनी मातीची भांडी व सिमेंट यांच्या कारखान्यांत बॉर्नहॉल्मची केओलीन माती व जटलंडमधील चुनखडी वापरली जाते. खनिजे फार थोडी असल्याने लोखंड, बीड, पोलाद, कोळसा वगैरे कच्चा माल आयात करावा लागतो. जहाजबांधणी हा डेन्मार्कचा एक प्रमुख व्यवसाय आहे. त्यासाठी मोठमोठ्या गोद्या कोपनहेगनला बांधल्या आहेत.

 डेन्मार्कमध्ये कारखाने इंधननिर्मित विजेवर चालतात. यासाठी देशातील हलक्या जातीचा कोळसा अल्प प्रमाणात मिळाला, तरी आयात कोळशावर व तेलांवर बव्हंशी अवलंबून रहावे लागते. लहान कारखाने डीझेल तेलावर चालतात. डेन्मार्कमध्ये १९७१-७२ मध्ये १७,९८० किवॉ .तास वीज निर्माण झाली. स्वीडनकडून काही जलविद्युत् मिळते. सामान्यतः शहरातील वीज केंद्रे नगरपालिकेच्या मालकीची व ग्रामीण भागातील सहकारी संस्थाच्या मालकीची आहेत. उत्तर समुद्राच्या डेन्मार्कच्या भागात तेल आणि नैसर्गिक वायू यांसाठी शोध चालू आहे. आणि ते विशेषतः भरपूर मिळण्याची शक्यता दिसत आहे.

 डेन्मार्कमध्ये लघुउद्योग धंद्यांना फार महत्त्व दिले जाते. दगड, माती, लाकूड, काच, चांदी आदींच्या हस्तोत्पादित पदार्थांबद्दल डेन्मार्कची कारागिरी जगप्रसिद्ध आहे. डॅनिश फर्निचर अलीकडे लोकप्रिय झाले आहे. 


काही विशिष्ट पदार्थांच्या दर्जेदार निर्मितीबद्दल जागतिक बाजारपेठेत नाव मिळवून त्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले असल्याने लघुउद्योग व हस्तव्यवसायाला विशेष उत्तेजन मिळून त्यांचा उत्कर्ष झाला आहे. 

व्यापार : डेन्मार्कमधील अंतर्गत व्यापार लहान लहान दुकानांतून चालतो. डबाबंद माल घेण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते. किंमतीची विशिष्ट पातळी ठेवण्यासंबंधीचे उत्पादकांत करार होतात. ते जनतेच्या हिताविरुद्ध असल्यास सरकार त्यात हस्तक्षेप करते. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने दरवर्षी कोपनहेगनला भरवितात. अन्य देशांतील व्यापारी प्रदर्शनांत भाग घेणाऱ्या उत्पादक वितरकांना शासकीय साहाय्य मिळते. 

१९७२ मध्ये डेन्मार्कची आयात ३,५१६ कोटी क्रोनरची आणि निर्यात ३,०१४ कोटी क्रोनरची होती. १९७३ ची आयात २,३२९ कोटी क्रोनरची व निर्यात २,५९६ कोटी क्रोनरची होती. डेन्मार्कच्या निर्यातीत मुख्यतः शेतमालाचा व बेकन, हॅम, चीज, अंडी, मांस व मासे या खाद्यपदार्थांचा भरणा आत्तापर्यंत असे. अलीकडे मांस व माशांची निर्यात खूपच वाढली आहे. भांडवली मालही खूपच निर्यात होतो. त्यांत मुख्यतः डीझेल एंजिने, जहाजे, यंत्रसामग्री, विजेची उपकरणे, दुग्धोद्योगाची यंत्रसामग्री हे पदार्थ असतात. उलट रासायनिक खते, लोखंड, पोलाद, कोळसा, रबर, खनिज तेले आणि अन्य तेले, मोटारी, लोकर, कापूस, गहू, कॉफी व तंबाखू ह्या पदार्थांची प्रामुख्याने आयात होते. आयात-निर्यात व्यापार मुख्यतः ब्रिटन, प. जर्मनी, अमेरिका व नॉर्वे, स्वीडनशी व काही अंशी बेल्जियम, फिनलंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड यांचेशी चालतो. 

डेन्मार्कचे अधिकृत चलन क्रोन हे असून एका क्रोनचे १०० ओअर होतात. १, २, ५, १०, २५ ओअर व १ आणि ५ क्रोनची नाणी असून १०, ५०, १००, ५०० क्रोनच्या नोटा असतात. मार्च १९७४ मध्ये १ पौंड स्टर्लिंग = १४·६०५ क्रो. व १ अमे. डॉलर = ६·२९ क्रोन किंवा १०० डॅ. क्रो. = ६·८५ पौंड = १५·९० डॉ. असा विनिमय दर होता. १९७४–७५ च्या अर्थसंकल्पात ६,४७८·३ कोटी क्रो. आय व ६,१०४·३ कोटी क्रो. व्यय दाखविला होता.

डॅनिश नॅशनल बँक ही राष्ट्रीय बँक देशातील व्यापारी बँकांच्या पतव्यवहारावर देखरेख व नियंत्रण ठेवते. कागदी चलन प्रसारित करण्याचा अधिकार राष्ट्रीय बँकेला असून तिच्यावर व्यापार मंत्रालयाची देखरेख असते. डेन्मार्कमध्ये १९७३ मध्ये २६२ बचत बँका व व्यापारी, शेती, औद्योगिक इ. मिळून ७६ इतर बँका होत्या. डेन्मार्कची अर्थव्यवस्था मिश्र कल्याणकारी आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा ५५ टक्के भाग खाजगी क्षेत्रात खर्च होतो. सार्वजनिक क्षेत्रात उच्चशिक्षण, संरक्षण, सामाजिक सेवा, शेतीला मदत यांमुळे खर्च वाढला आहे. उत्पन्नाच्या मुख्य बाबी म्हणजे वैयक्तिक उत्पन्नावरील कर, स्थावर मालमत्तेवरील कर, भांडवलावरील कर व जकात आणि अबकारी कर व सीमाशुल्क या होत. अर्थव्यवस्थेतील क्रांतीचा एक परिणाम म्हणजे बेसुमार चलनवाढ हा होय. मार्च-एप्रिल १९७२ च्या संपानंतर वेतनवाढ, कामाचे तास कमी करणे, स्त्रियांस पुरुषांप्रमाणेच वेतन इ. गोष्टी मान्य झाल्या. ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक खर्च आणि घरबांधणीवरील गुंतवणूक गोठविण्यात आली. तसेच बँकदर वाढविणे, किंमती व नफा काही काळ गोठविणे, किंमती स्थिर राखण्यासाठी मालक वर्गास साह्य हे चलनवाढविरोधी उपाय वापरले गेले.

वाहतूक व दळणवळण : व्यापारी जहाज वाहतुकीत डेन्मार्क प्रमुख देशांपैकी एक आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी भरून काढून डेन्मार्क आत्ता या क्षेत्रांत इंग्लंड, नॉर्वे यांसारख्या देशांशी स्पर्धा करू लागला आहे. १९७३ अखेर देशात २० टनांपेक्षा मोठी व ३,२८४ व्यापारी जहाजे होती व त्यांचे एकूण नोंदलेले वजन ४२,५०,१७६ टन होते.

डेन्मार्कमध्ये १९७३ अखेर २७८ किमी. मोठे मोटाररस्ते, ४,३३६ किमी. इतर राज्यरस्ते, ६,७५० किमी. प्रांतिक रस्ते आणि ५३,७४० किमी. व्यापारी रस्ते होते. तसेच १२,३१,७३४ प्रवास गाड्या, २,१५,५८० मालवाहू गाड्या, १२,२१० टॅक्सी व ५,६६८ बसगाड्या आणि ३६,१६६ सायकली होत्या. १९७३ अखेर २,४९३ किमी. लोहमार्गांपैकी १,९९९ किमी. मार्ग शासन नियंत्रित होते. याच्या जोडीला झीलंड व फ्यून आणि झीलंड व स्वीडन यांदरम्यान फेरी बोटींनी नियमित वाहतूक होते. फ्यून व जटलंड यांस जोडणारे दोन पूल आहेत. झीलंड व फाल्स्टर यांस जोडणारा ३·२ किमी.चा स्टॉरस्ट्रम पूल देशात सर्वांत लांब आहे.

डेन्मार्कमधील अंतर्गत हवाई वाहतूक डॅनिश एअर लाइन्समार्फत चालते. ही स्कँडिनेव्हियन एअर लाइन्स सिस्टिमशी संलग्न आहे. कोपनहेगनजवळच्या कास्ट्रूप विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. कोपनहेगन–लॉस अँजेल्‌स ध्रुवप्रदेशावरून कोपनहेगन–बँकॉक–सिंगापूर, ताश्कंदवरून व कोपनहेगन–टोकिओ ध्रुवप्रदेशावरून हे महत्त्वाचे हवाई मार्ग आहेत. दरवर्षी सु. सहा लाख प्रवासी येथून विमान प्रवास करतात.

डेन्मार्कमधील डाकतार व्यवस्था सरकारी मालकीची असून स्थानीय दूरध्वनी खाजगी व्यवस्थेत व अन्य सरकारी आहेत. १९७३ मध्ये देशात १,४०० डाकघरे व १४,०५,३१२ दूरध्वनी होते. आकाशवाणी व दूरचित्रवाणी ही डेन्मार्क रेडिओ या शासकीय नियंत्रणाखाली असून १६ लाख रेडिओ व १४,९७,००० दूरचित्रवाणी संच होते. १९७३ मध्ये देशात ५२ दैनिके असून त्यांचा खप १८·३ लक्ष होता. पैकी ९ दैनिके कोपनहेगनमध्ये निघत. डेन्मार्कमध्ये मजूरांची प्रबळ संघटना आहे. सु. चार हजार मजूर संघ राष्ट्रीय सहकारी मजूर संघटनेला संलग्न आहेत. मालकांचीही संघटना असून मालक-मजूर संघटनांच्या करारांनुसार सर्व व्यवहार केले जातात. वाद निर्माण झाल्यास लवाद मंडळाकडे निर्णयार्थ सोपविले जातात. युद्धकाळात देश जर्मनव्याप्त होता. तेव्हा संप, टाळेबंदी वगैरेंवर बंदी घालण्यात आली होती. १९४५ नंतर ही बंदी उठविण्यात आली. हल्ली डेन्मार्कमधील मालक-मजूर संबंध सलोख्याचे आहेत. 

डेन्मार्कच्या आर्थिक जीवनात सहकारी चळवळीला फार महत्त्वाचे स्थान आहे. १८६६ साली टीस्टेद येथे पहिले सहकारी भांडार स्थापन झाले. तेव्हापासून उपभोक्ता सहकारिता डेन्मार्कमध्ये रुजली आहे. हल्ली देशाच्या अंतर्गत व्यापारापैकी १५ टक्के व्यापार सहकारी भांडारांमार्फत चालतो. ग्रामीण भागात हे प्रमाण खूपच वाढलेले आहे.


उत्पादन क्षेत्रातही सहकारी चळवळीने मोठे कार्य केले आहे. दुग्धव्यवसायापासून उत्पादक सहकारी चळवळीचा प्रारंभ झाला. हल्ली पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मच्छीमारी, मांसोत्पादन व कारखानदारी या सर्व क्षेत्रांत सहकारी उत्पादन आघाडीवर असून दुग्धव्यवसायाच्या दीड हजार संस्था , ६० खाटिकखाने, एक सिमेंट कारखाना, १० लोणी निर्यातसंस्था व काही कोळसा, खते, बी-बियाणे खरेदी-विक्रीसंस्था सहकारी तत्त्वावर चालतात. यांना लागणारे भांडवलही सहकारी पतपेढ्यांमार्फतच उभारले जाते. एकूण भांडवलपुरवठा, वितरण व्यवस्था, उत्पादन व उपभोगिता या सर्वच क्षेत्रांत सहकारी चळवळीने अपूर्व कामगिरी बजावली असून डेन्मार्कचे अवघे जीवन सहकारमय झाले आहे. 

लोक व समाजजीवन : डेन्मार्कचे लोक ट्युटॉनिक वंशाचे असून त्यांची भाषा डॅनिश आहे. ते बहुतेक सर्व स्कँडिनेव्हियन असून १९६० मध्ये ९७·८% लोक डेन्मार्कमध्ये जन्मलेले होते. सामान्यतः त्यांचा वर्ण गोरा, डोळे निळे व केस पिंगट रंगाचे असतात. ते स्नेहल, आतिथ्यशील, उदार, आनंदी व विनोदी वृत्तीचे असतात. वरवर खुशालचेंडू वाटले, तरी ते उद्योगी असून त्यांना स्वदेशातील व जगातील घडामोडींची चांगली माहिती असते. ९८% लोक ल्यूथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. मात्र संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेले असून डेन्मार्कमध्ये काही ज्यू व रोमन कॅथलिक, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट इ. पंथांचे नागरिक आहेत.

 डेन्मार्कच्या लोकसंख्येपैकी ४५% जटलंडमध्ये व ५५% अन्य भागात आहेत. लोकवस्तीची सरासरी घनता दर चौ.किमी. ११६·९ आहे. तसेच १९७१ मध्ये ४५·७% लोकवस्ती शहरी व ५४·३% लोकवस्ती ग्रामीण होती. पुरुष ४९·६९% व स्त्रिया ५०·३१% होत्या. १९७३ मध्ये जननप्रमाण दरहजारी १४·३ व मृत्युप्रमाण दरहजारी १०·१ होते. बेकायदा जन्म १९७२ मध्ये १४·४% व १९७३ मध्ये १७·१% होते. १९७२ मध्ये २५,७६२ लोक देशांतर करून गेले व २१,२०० लोक बाहेरून डेन्मार्कमध्ये आले. 

डेन्मार्कच्या नागरिकांचे राहणीमान पुष्कळच उंचावलेले आहे. त्यांची राहणी आधुनिक भासली, तरी तीत जुन्याचे पुष्कळ मिश्रण आहे. त्यांचा पोशाख अन्य यूरोपीय देशांतील नागरिकांसारखाच असतो. मात्र ग्रामीण भागात कधी कधी जुना रंगीबेरंगी राष्ट्रीय पोशाख घातलेले लोक आढळतात. पोस्टमन, धुराडी साफ करणारा, गवंडी इ. धंदेवाईक लोक त्यांच्या विशिष्ट पोषाखांवरून ओळखू येतात. १९७२ मध्ये डेन्मार्कमध्ये २४,१४,२०० लोक अर्थार्जन करणारे होते त्यांपैकी २,४३,९०० शेती, वने आणि मच्छीमारीत ६,५९,७०० निर्मितीउद्योगांत २,०७,९०० बांधकामात ३,७३,६०० व्यापारात १,५२,७०० वाहतुकीत ५,७५,४०० कारभारात १,५२,५०० सेवांमध्ये व ४८,५०० इतर व्यवसायांत होते.

 गलिच्छ वस्त्या डेन्मार्कमध्ये जवळजवळ नाहीतच. गृहबांधणीला पुष्कळच महत्त्व दिले गेल्याने शहरात सरकारद्वारा, नगरपालिका किंवा सरकारी संस्थांनी बांधलेली भव्य निवासस्थाने आणि खाजगी रीत्या नागरिकांनी बांधलेली टुमदार घरे पुष्कळच दिसतात.

डेन्मार्कमध्ये प्रत्येकाला वर्षाकाठी दोन किंवा तीन आठवड्यांची हक्काची रजा कायद्यानुसार मिळतेच. सुट्टीत बहुतेक नागरिक समुद्रकाठी किंवा वाडीवर जाऊन राहतात. शहराबाहेरील मोठमोठ्या वसाहती बागा हे डेन्मार्कचे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कुटुंबाला बागेत लहान लहान वाफे दिलेले असतात. जवळच राहण्याची व्यवस्था असते. शिवाय सामुदायिक खेळ, नृत्य व अन्य करमणुकीची सोय असते.

डेन्मार्कमध्ये प्रत्येक स्वतंत्र घराला लागून लहानशी बाग असतेच शहरांतून दाराखिडक्यांतून किंवा सज्जातून फुलझाडांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसतात. डॅनिश घरातील फर्निचर साधे, सुटसुटीत, अभिनव रचनाकौशल्याचे व सुंदर असून त्यावरून नागरिकांच्या रसिकतेची कल्पना येते.

डेन्मार्कमध्ये कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे असल्याचे दिसते. संततिनियमनामुळे लोकसंख्यावाढीला आळा बसलेला दिसतो. लैंगिक संबंधाबद्दल काहीसा कानाडोळा केला जातो. चित्रपट अभ्यवेक्षण व अश्लील वाङ्‌मयबंदी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे लैंगिक गुन्हे व अश्लील वाङ्‌मयप्रसार यांना आळा बसला आहे, असा काही लोकांचा दावा आहे. शासनामार्फत प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर वैद्यकीय उपचार उपलब्ध असतात. इतकेच नव्हे, तर नवप्रसवांना घरकामातही मदत मिळण्याची व्यवस्था सरकारतर्फे केली जाते. शाळांतून मुलामुलींची वारंवार वैद्यकीय तपासणी होते व त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

खाद्यपदार्थांच्या विविधतेसाठी व चविष्टतेसाठी डेन्मार्कची विशेष ख्याती आहे. ‘स्मॉरे ब्रॉड’ हा सँडविचसारखा पदार्थ विशेष लोकप्रिय आहे. कोळंबी, सार्डीन, ईल आदी मासे, निरनिराळ्या प्रकारचे सामिष पदार्थ व कढणे (सूप) नागरिकांच्या आहारात असतात. भिन्न भिन्न प्रकारचे खमंग, खारे पदार्थ आणि बिस्किटवजा गोड पदार्थांची बरीच आवड असून त्यांची रेलचेल दिसते.

डेन्मार्कचे नागरिक सामान्यतः लोकशाही प्रवृत्तीचे व समानतेचे भोक्ते आहेत. त्यांचे वागणे, बोलणे मोकळे व अनौपचारिक असते, तरी त्यांना काही जुन्या चालीरीती आणि पदव्या वगैरे विशेष प्रिय असल्याचे दिसते.

 

नाताळ, ईस्टर आदी धार्मिक सणांव्यतिरिक्त नववर्षदिन, राजाचा वाढदिवस, ५ जूनचा घटनादिन हे सुट्टीचे व समारंभाचे दिवस डेन्मार्कमध्ये साजरे होतात. द्वितीय महायुद्धानंतर ५ मेचा मुक्तिदिन–जर्मनांचा अंतिम पराभव–विशेष उत्साहाने साजरा होऊ लागला आहे. याशिवाय १९१२ पासून रेबिल्ड येथे दर ४ जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्सव होतो. यासाठी डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या अमेरिकनांनी निधी जमवून रेबिल्डची टेकडी खरेदी केली आणि ती डेन्मार्कच्या सरकारला अर्पण करताना येथे अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जावा, असा करार केला.


डेन्मार्कमध्ये मैदानी खेळांची खूपच आवड आहे. शाळा-कॉलेजात विद्यार्थी विविध शास्त्रीय व्यायामप्रकार शिकतात. फुटबॉल (सॉकर), टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, शिडाच्या व साध्या नौका चालविणे, बर्फावर घसरण्याचे खेळ हे क्रीडाप्रकार व कसरतीचे व्यायाम लोकप्रिय असून दुचाकीवर भटकणे व पायी वनसंचार करणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. 

समाजकल्याण : आरोग्यविमा, आजारीपणाचा भत्ता, पंगुत्व व वार्धक्य वेतन, प्रसूतिपूर्व व प्रसूतिकालीन रजा व भत्ता, अपघातविमा, बेकारी भत्ता, मुले व तरुण यांची काळजी व कल्याण, मोफत वैद्यकीय सेवा इ. मार्गांनी समाजकल्याण साधले जाते. कोणीही स्वतःला किंवा स्वतःवर अवलंबून असलेल्यांना पोसण्यास असमर्थ असेल आणि दुसरे कोणी त्यासाठी जबाबदार नसेल, तर अशी व्यक्ती सार्वजनिक साह्य मिळण्यास पात्र आहे अशी संविधानात तरतूद आहे.

शिक्षण : डेन्मार्कमध्ये ९८ टक्के लोक साक्षर आहेत. बहुसंख्य नागरिकांना माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण मिळालेले असते. सात ते सोळा वर्षांमधील मुलामुलींना शिक्षण अपरिहार्य असते. बहुतेक शाळा सार्वजनिक व निःशुल्क असतात. खाजगी शाळांना भरपूर अनुदान मिळते. १९७२-७३ मध्ये २,३०५ प्राथमिक व कनिष्ठ माध्यमिक शाळांच्या १ ते ७ वर्गात ५,३७,१४१ आणि ८ते १० या वर्गांत १,७७,७७७ विद्यार्थी व ४७,७२० शिक्षक होते. १०५ वरिष्ठ माध्यमिक शाळांतून ३७,३३२ विद्यार्थी व ३,३२१ शिक्षक होते. यानंतर व उच्च प्रिपरेटरी परीक्षेनंतर विद्यापीठीय वा इतर उच्च शिक्षण घेता येते. सु. १०% शाळा खासगी असून नगरपालिका किंवा शासन त्यांची तपासणी करते. याशिवाय ७९ लोकशाळा, २५ शेतीशाळा, २५ गृह-अर्थ शाळा मिळून १३,४९४ विद्यार्थी, ५४ तांत्रिक शाळांतून ४१,६९६ विद्यार्थी उमेदवार, ५९ व्यापारी शाळांतून १०,६८८ विद्यार्थी, २९ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून १३,९१५ विद्यार्थी, २९ किंडरगार्डन शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांतून ५,७१८ विद्यार्थी होते.

 

डेन्मार्कमध्ये कोपनहेगन (स्था. १४७९), ऑर्हूस (स्था. १९२८), ओदेन्से (१९६४) व रॉस्किल्ड (१९७२) या विद्यापीठांतून अनुक्रमे २५,८५४ १३,५१० २,३१६ व १,४०० विद्यार्थी होते व अनुक्रमे २५७ १२६ २३५ व १५० शिक्षक होते. त्याशिवाय तांत्रिक विद्यापीठांत ३,७६० विद्यार्थी कोपनहेगन व ऑलबॉर्ग येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांत १,५५१ विद्यार्थी औषधी शाळेत ६०७ कोपनहेगन आणि ऑर्हूस येथील दंतवैद्यकी महाविद्यालयांत १,२६३ शाही कला अकादमीत २,७९० कृषि व पशुवैद्यकीय महाविद्यालयांत १,३९१ अर्थ व्यवसाय व्यवस्थापन व आधुनिक भाषा महाविद्यालयांत १०,१०० शाही शैक्षणिक अभ्यास महाविद्यालयांत १,००६ पाच संगीत अकादमीत ७३० व एका ग्रंथालय महाविद्यालयात ९२३ विद्यार्थी होते.

 

डेन्मार्कमध्ये ग्रंथालयाचे जाळेच आहे. सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना शासकीय अनुदान मिळते. कोपनहेगनचे शाही ग्रंथालय व कोपनहेगन व ऑर्हूस विद्यापीठांची ग्रंथालये प्रसिद्ध आहेत. पदार्थ संग्रहालयेही डेन्मार्कमध्ये पुष्कळ आहेत. एकट्या कोपनहेगनलाच सहा प्रसिद्ध पदार्थ संग्रहालये आहेत.

भाषा व साहित्य : डेन्मार्कची भाषा डॅनिश असून ती इंडो-यूरोपीय भाषा कुटुंबाच्य जर्मानिक शाखेच्या स्कँडिनेव्हियन गटाची भाषा आहे.

डॅनिश साहित्याचे आद्यरूप ८०० ते ११०० ह्या कालखंडातील काही शिलालेखांतून पहावयास मिळते. मध्ययुगात सॅकसो ग्रमॅटिकस ह्या डॅनिश इतिहासकाराने लिहिलेला Gesta Danorum हा डेन्मार्कचा ११८५ पर्यंतचा इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या काळातील स्तोत्रे, वीरगीते अशा काही रचनाही उपलब्ध आहेत. सोळाव्या शतकापासून डॅनिश भाषेत विविध प्रकारचे नाट्यलेखन होऊ लागले. लूथव्हीं हॉल्बर्ग (१६८४–१७५४) हा अठराव्या शतकातील श्रेष्ठ सुखात्मिकाकार, आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर हा एकोणिसाव्या शतकात डॅनिश साहित्यात अवतरलेल्या स्वच्छंदतावादी संप्रदायाचा नेता. हॅन्स अँडरसन हा विश्वविख्यात डॅनिश परीकथालेखक ह्याच शतकात होऊन गेला.

सरेन किर्केगॉर हा तत्त्वज्ञ लेखक, हेन्रिक पॉनटॉपिडान, कार्ल गेल्लेरूप, युहानेस येन्सन हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकांतील डॅनिश साहित्यिक प्रसिद्ध असून त्यांपैकी शेवटच्या तिघांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे [⟶ डॅनिश साहित्य].

कला : जवळपासच्या अनेक संस्कृतींच्या मिलाफाने डेन्मार्कच्या कलांवर महत्त्वाचा परिणाम झालेला दिसतो.

वास्तुकला : डेन्मार्कच्या वास्तुकलेत यूरोपीय देशांतील विविध शैलींच्या इमारती पाहण्यात येतात. दिखाऊपणाकडे फारसे लक्ष न देता सौंदर्य आणि उपयुक्ततेची दृष्टी ठेवल्याने डेन्मार्कच्या वास्तुकलेत एक प्रकारची सोज्वळता प्रतीत होते. व्हायकिंग काळातील बायझंटीन शैलीतील कालुनबॉर्गच्या पाच मनोऱ्यांचे चर्च, ग्रामीण भागातील गॉथिक पद्धतीची लहानलहान प्रार्थनामंदिरे, कोपनहेगनच्या ‘अवर सेव्हिअर्स चर्च’ मधील जर्मन बरोक शैली, या इमारतीचा आकाशाला भिडलेला आध्यात्मिकसूचक गोलाकृती मनोरा, अठराव्या शतकातील पॅलेडियन शैलीचे राजवाडे ही याची उदाहरणे आहेत.

अर्वाचीन वास्तुशिल्पांतही इमारतींच्या प्रमाणबद्ध मांडणीतूनच सौंदर्य सूचित होते. काही नवे रचनाविषयक प्रयोग करण्याचे धाडसही डेन्मार्कच्या वास्तुशास्त्रज्ञांनी दाखविले आहे.


शिल्पकला : डेन्मार्कमधील पुरातन शिल्पकृती शिकारी आणि व्यावसायिकांनी पाहिलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतींच्या रूपातच आहेत. सोळाव्या शतकापासून डेन्मार्कमधील शिल्पकारांच्या शिल्पाकृती प्रामुख्याने दिसू लागतात. क्लॉउअस बर्ग, हॅन्स ब्रुगमान, आडाम व्हॉन ड्यूरेन, मार्टीन बुसर्ट हे ह्या शतकातील प्रख्यात शिल्पज्ञ होत. सतराव्या शतकात डच शिल्पज्ञांनी डेन्मार्कमध्ये महत्त्वाची कामगिरी केली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात डॅनिश कला अकादमीने फ्रेंच शिल्पकार जे. एफ्. सालीला पाचारण करून पाचव्या फ्रेड्रिकचा अश्वारूढ पुतळा करवून घेतला. सालीचे शिष्य हार्टमान बीकेन व नीकोलाय डॅयॉन यांच्या अनुक्रमे आदम व ईव्ह शिल्पसमूह व ऋतूंच्या प्रातिनिधिक शिल्पाकृती प्रसिद्ध आहेत. बॅर्‌टेल टुर्व्हाल्सन ह्या डेन्मार्कच्या सर्वश्रेष्ठ शिल्पकाराने जागतिक कीर्ती मिळविली. जेसन, गोल्डन फ्लीसगॅनीमीड फीडिंग, द ईगल ह्या त्याच्या सर्वोत्तम कृती समजतात. मोगेन्स बॉगिल्ड, रॉबर्ट याकॉप्सन, एरीक टॉमसन, गुन्नार वेस्टमन हे हल्लीचे प्रसिद्ध डॅनिश शिल्पकार आहेत.

चित्रकला : भडकपणाचा अभाव, सौम्य सोज्वळ वृत्ती, अभिव्यक्तीतील संयम व निसर्गप्रेम ही डॅनिश चित्रकलेची खास वैशिष्ट्ये दिसतात. डॅनिश चित्रकारांनी प्रचारासाठी कलेला राबविण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. जागतिक प्रदर्शनातही डेन चित्रकारांनी बरेच नाव मिळवले आहे.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात डॅनिश कला अकादमी व ‘रॉयल डॅनिश अकॅडेमी ऑफ फाइन आर्ट्‌स’ स्थापन झाल्या. या काळातील प्रसिद्ध चित्रकार यूल येन्स व एन्. ए. आबिलगॉर होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील क्रिस्तोफर विल्हेल्म एकर्सबर्गला कधीकधी डॅनिश चित्रकलेचा पिता असे संबोधितात. त्याने निसर्गवादाला विशेष प्राधान्य दिले. क्रिस्तेन कोबके, विल्हेल्म मार्स्ट्रान वगैरे एकर्सबर्गचे अनुयायी व मानवी व्यक्ती चित्रकार सी. ए. येन्झेन हे नंतरचे प्रसिद्ध चित्रकार होत. एकर्सबर्गच्या निसर्गवादाविरुद्धच्या प्रतिक्रियेचे प्रणेते यर्गेन सॉनी, जे. टी. लुंडबाय, डँकव्हार्ट ड्रायर यांनी स्वच्छंदतावादी वृत्तीचा पुरस्कार केला.

थीओडोर फिलीप्सेन ह्या दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारापासून डेन्मार्कच्या नव्या पिढीच्या चित्रकारांची सुरुवात होते. स्कागेन चित्रकारांची प्रभावळ फिलीप्सेनच्या समकालीन. पी. एस्. क्रइअर, ॲना अँकर आणि लाउरिट्स टक्झेन हे या गटातील प्रमुख चित्रकार. यांच्याच काळात विल्हेल्म हामेरशॉय, आयनार नील्सन हे प्रतीकवादी चित्रकार झाले. पीटर हानसेन, युहानेस लार्सन, पॉल क्रीस्त्यनसेन हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे व ओलाफ ऱ्यूड, विल्यम स्कार्फ, विल्हेल्म लुंडस्ट्रॉम, हॅगेन म्यूलर, कार्ल बोव्हिन, काइ एस्ट्रूप, रिचर्ड मॉर्टेन्सन, एजलर बिले, एजिल याकॉप्सन हे चालू पिढीतील ख्यातनाम डेन चित्रकार होत.

नाट्य व संगीत : धार्मिक सणसमारंभप्रसंगी बायबल-कथांवर आधारलेल्या ललितवजा नाटकापासून डॅनिश नाट्येतिहासाला सुरुवात होते. रीने मॅग्नॉन माँटेग्यू या मोलियरच्या शिष्याने पाचव्या ख्रिश्चनच्या दरबारात डॅनिश नाटकांचा प्रयोग केल्यापासून आधुनिक डॅनिश नाट्यकलेला सुरुवात होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात रॉयल थिएटरचे उद्‌घाटन झाले. १८४९ पासून सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकारकक्षेत नाट्यविकासाचे पद्धतशीर प्रयत्न होऊ लागले व अलेनश्लेअगर, जे. एल्. हायबेर्ग, हेन्रीक हर्ट्‌स, जे. सी. हॉस्ट्रुप आदी नाटककार प्रसिद्धीस आले. हल्लीही डॅनिश नाट्यकला ऊर्जितावस्थेत असून डॅनिश बरोबरच इंग्लिश फ्रेंच आदी भाषांतील नाटकांचे प्रयोग डेन्मार्कमध्ये होतात. इतर यूरोपीय़ देशांप्रमाणे संगीतिकाही डेन्मार्कमध्ये लोकप्रिय आहेत. डेन नाटककार व नाट्य दिग्दर्शक यांच्या आधुनिक प्रयोगांना योग्य अशी नाटकगृहे डेन्मार्कमध्ये बांधली जात आहेत.

संगीतातही डेन्मार्कची कामगिरी उपेक्षणीय नाही. कार्ल नील्सन डेन्मार्कचा आजचा जगत्‌प्रसिद्ध संगीतकार होय. तीच गोष्ट चित्रपटांची. १९७३ मध्ये डेन्मार्कमध्ये ३५६ चित्रपटगृहे होती आणि त्यांत १,२८,६२२ प्रेक्षकांची सोय होती.

 

उपयुक्त कला : गृहसजावट तसेच चांदी, लाकूड, चिनी मातीची भांडी वगैरेच्या उपयुक्त व सुंदर कारागिरीसाठी डेन्मार्क प्रसिद्ध आहे. कोपनहेगनची रॉयल पॉर्स्लिन फॅक्टरी, बिंग व ग्रॉप्डालची पॉर्स्लिन फॅक्टरी चिनी मातीच्या भांड्यांच्या आकर्षक उत्पादनाविषयी ख्यातनाम आहेत. दैनिक वापरातील सुंदर वस्तूंचे एक कायमचे प्रदर्शनच कोपनहेगनला आहे.

पर्यटन : १९७३ मध्ये २ कोटी ३८ लक्ष परदेशी प्रवाशांनी त्या देशाला भेटी दिल्या. त्यांच्यापासून सु. ३५० कोटी क्रोनरचे उत्पन्न मिळाले. कोपनहेगन (फ्रेडरिक्सबर्ग व गेंटॉफ्टसह), ऑर्हूस, ओदेन्से, ऑलबॉर्ग, एस्बीअर्ग, रॉनर्स व हॉर्सन्स ही डेन्मार्कमधील मोठी शहरे होत. डेन्मार्कची वनश्री, संस्कृती, कला आणि सहकार ही प्रवाशांची खास आकर्षणे आहेत.

संदर्भ : 1. Rothery, Agnes, Denmark : Kingdom of Reason, New York, 1937.

            2. Strode, Hudson, Denmark is a Lovely Land, New York, 1951.

            3. The Royal Danish Ministry of Foreign Affairs, Pub. Denmark, Copenhagen, 1961.

            4. Wuorinen, J. H. Scandinavia, Englewood Cliffs, New Jersey, 1964.

ओक, द. ह.


डेन्मार्क


क्रॉनबर्ग किल्ला, हेल्सिंगर, डेन्मार्क.   कोपनहेगन बंदरातील वैशिष्ट्यपूर्ण पूल, डेन्मार्क.   क्रीडानौका बांधणी, कोपनहेगन.   ऐतिहासिक पवनचक्की, जटलंड, डेन्मार्क.        डेन्मार्कमधील आधुनिक शेती