ग्रॉझ्नी : रशियन प्रजासत्ताकाच्या चचेनोइंगूश स्वायत्त सोव्हिएट सोशॅलिस्ट प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ३,४९,ooo (१९७१). हे बाकूच्या वायव्येस ४८३ किमी. व मॉस्कोच्या आग्नेयीस १,५oo किमी. अंतरावर आहे. ह्याच्या आसमंतात विपुल तेलविहिरी आहेत. तेलशुद्धीकरणाचे व खनिज तेल रसायनाचे कारखाने, खनिकर्म यंत्रसामग्रीचे उत्पादन, अन्नप्रक्रिया वगैरे व्यवसाय येथे आहेत. खनिज तेल संशोधन केंद्र व शिक्षक महाविद्यालय इ. संस्था येथे आहेत. येथून कॅस्पियन समुद्रावरील मकाच्कलापर्यंत व काळ्या समुद्रावरील रॉस्टॉव्हपर्यंत व तूआप्सेपर्यंत तेलनळ गेले आहेत.

लिमये, दि. ह.