मंगळवेढे: सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १६,८०२ (१९८१). हे पंढरपूरच्या आग्नेयीस सु. २५ किमी. व सोलापूरच्या नैर्ऋत्येस ६७ किमी. आहे. बहमनीपूर्व काळात मंगल नावाच्या हिंदू राजाने याची स्थापना करून ती आपली राजधानी केली. त्यावरून या ठिकाणाला मंगळवेढे हे नाव पडले असावे. किंवा येथे असलेल्या मंगळाईच्या मंदिरावरून हे नाव पडले असावे. संस्कृत व कानडी शिलालेखांत व हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणीत यांची मंगलवेष्टक किंवा मंगळिवेडे अशी नावे आलेली आढळतात. त्यांवरूनही मंगळवेढे हे नाव आले असावे, असेही समजले जाते. भीमामाहात्म्यस्कंदपुराण यांत याचा मेतुलिंगपुरी असा उल्लेख आढळतो. मंगळवेढे इ. स. ८ व्या किंवा ९ व्या शतकांपासून अस्तित्वात असावे. सुरूवातीला हे कल्याणीच्या चालुक्य राजांकडे होते व नंतर ते देवगिरीच्या यादवांकडे आले. चौदाव्या शतकात ते बहमनी राजांकडे, १४८९ मध्ये विजापूरकरांकडे व १६८६ मध्ये मोगलांकडे आले. शाहू दक्षिणेत आल्यावर हळूहळू महाराष्ट्र शाहूच्या ताब्यात येत गेला आणि शाहूच्या पश्चात सांगली-मिरजेच्या पटवर्धनांना जो प्रदेश बाळाजी बाजीरावाने जहागीर म्हणून दिला, त्यात मंगळवेढे पटवर्धनांच्या ताब्यात आले. तेव्हापासून संस्थाने खालसा होईपर्यंत हे शहर सांगलीच्या पटवर्धनांच्या जहागिरीत मोडत होते. १८७४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

येथे पूर्वी एक चौबुरूजी बालेकिल्ल्यासह सात बुरूजी किल्ला होता, पण तो आता भग्नावस्थेत आहे.

दुर्गादेवीच्या भीषण दुष्काळात येथील ⇨दामाजीपंत यांनी सरकारी कोठारातील धान्य गोरगरिबांना वाटून त्यांचे प्राण वाचविले. त्याचप्रमाणे त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कामही येथे केले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पौष महिन्यात येथे एक यात्रा भरते. दामाजीपंतांशिवाय चोखोबा, टीकाचार्य, कान्होपात्रा, गोविंदबुवा, अक्कलकोटकर महाराज, मौनीबुवा, बाळकृष्णबुवा, शिवदास महाराज वाखरीकर, लतीफबुवा व गैबीसाहेब ही थोर संतमंडळी मंगळवेढ्यात होऊन गेली. शहरातील संत दामाजी, संत चोखा यांशिवाय गणपती, भैरव, महादेव इत्यादींची मंदिरे, गैबीसाहेबांचा दर्गा इ. प्रमुख जुन्या वस्तू उल्लेखनीय आहेत. शहरात अनेक जुन्या वास्तूंचे अवशेष, मूर्ती, नक्षीचे दगड, एक जैनधर्मी प्राकृत व काही मराठी, कानडी शिलालेख आढळले आहेत तसेच मुसलमानपूर्व कालीन काही नाणीही येथे मिळाली आहेत.

खरे, ग. ह.