फूजियामा : जपानमधील सर्वांत उंच, पवित्र व निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत. हा होन्शू बेटाच्या मध्यभागी आणि टोकिओच्या नैर्ऋत्येस सु. १२० किमी. असून त्याची उंची ३,७७६ मी. आहे. फूजियामा शंक्वाकार असून तळाशी त्याचा घेर १०१ किमी., ज्वालामुखी विवराची खोली २२३ मी. आणि व्यास सु. ६०० मी. आहे. इ.स.पू. २८६ मध्ये झालेल्या भूकंपाने हा ज्वालामुखी निर्माण झाला, असे म्हणतात. त्याचा शेवटचा उद्रेक १७०७ मध्ये झाला होता. त्या उद्रेकामुळे टोकिओ शहरावर १५ सेंमी. राखेचा थर पसरला होता.

फूजियामा व त्याचा रमणीय परिसर

जगातील रमणीय पर्वतांत फूजियामाची गणना होत असून त्याचा रेखीव आकार, त्यावरील हिरवीगार वनश्री आणि हिमाच्छादित शिखर यांमुळे शतकानुशतके जपानी कवी, चित्रकार यांना त्यापासून स्फूर्ती मिळाली आहे. त्याच्या उत्तरेकडील पायथ्याशी पाच जलाशय असून त्यांपैकी कावागूची-को या संथ जलाशयात पडलेले फूजियामाचे प्रतिबिंब

अप्रतिम दिसते. फूजियामावर जाण्यासाठी सात वाटा असून टोकिओहून बसने त्याच्या शिखरापर्यंत जाता येते. पर्वतावर शिंतो-मंदिर व वेधशाळाही (स्था. १९३२) आहे.

जपानी लोकांच्या जीवनात फूजियामाला महत्त्वाचे स्थान असून दरवर्षी सु. ५०,००० भाविक त्याचे दर्शन घेतात. पूर्वी येथे जाण्यास स्त्रियांना बंदी होती. आता ती उठविण्यात आली आहे. चढण मार्गांवर सर्व प्रकारच्या सोयी करण्यात आलेल्या आहेत.

कापडी, सुलभा