परभणी जिल्हा: महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील दख्खन पठारावरील व गोदावरी नदीखोऱ्यातील एक जिल्हा. क्षेत्रफल १२,४८९ चौ. किमी. लोकसंख्या १५,०६,७७१, पैकी ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या अनुक्रमे १२,६४,८३३ २,४१,९३८ (१९७१). विस्तार १८° ५८’ उ. ते २०° २’ उ. व ७६° ४’ पू. ते ७७° ४२’ पू. याच्या उत्तरेला बुलढाणा व अकोला, ईशान्येला यवतमाळ, पूर्वेला नांदेड, दक्षिणेला उस्मानाबाद, नैर्ऋत्येला बीड व पश्चिमेला औरंगाबाद हे जिल्हे असून, ईशान्य सीमेवर पैनगंगा (सु. १६०·९३ किमी.) व नैर्ऋत्य सीमेवर गोदावरी (सु. ६४·३७ किमी.) या नद्या वाहतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १२८·७२ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १०४·५८ किमी. आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या ४·१% आणि लोकसंख्या ३% असून, राज्यात याचा क्षेत्रफळाप्रमाणे अकरावा आणि लोकसंख्येप्रमाणे एकोणिसावा क्रमांक लागतो. शासकीय सोयीसाठी जिल्ह्याचे सेलू (सै़लू) व हिंगोली असे दोन विभाग केले आहेत. सेलूमध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी आणि परतुर हे तालुके व हिंगोलीमध्ये हिंगोली, वसमत (बसमथ), कळमनुरी व जिंतूर हे तालुके येतात. परभणी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

भूवर्णन: दख्खन पठाराचाच एक भाग असल्याने जिल्हा समुद्रसपाटीपासून सरासरी ४५७·६० मी. उंचीवर आहे. भूरचनेच्या दृष्टीने त्याचे दोन ठळक विभाग पडतात. उत्तर भागात अजिंठा टेकड्यांचा भाग येतो व त्याला ‘जिंतूर – हिंगोली टेकड्या’ हे स्थानिक नाव आहे. त्यांची उंची ४५० मी. पेक्षा जास्त असून त्यांचा जास्तीत जास्त उंच भाग (५८० मी.) जिंतूर तालुक्यात आहे. दक्षिण सीमेवर बालाघाट टेकड्यांचा भाग येतो. त्यांची सरासरी उंजी ५२५ मी. च्या आसपास आहे. मध्य भागात गोदावरी व तिच्या उपनद्या दुधना आणि पूर्णा यांच्या खोऱ्यांचा भाग येत असून, हा भाग पूर्वेला उतरत जातो.

बेसाल्ट हा तळखडक व कोरड्या हवामानातील विशिष्ट विदारण क्रिया यांमुळे पठारावरील इतर अनेक जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यातील रेगूर मृदा काळी, कसदार असून तिचा पोत बारीक आहे. कमी पाऊस पडणाऱ्या या भागात अशा मृदेचे पाणी टिकवून धरण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. मृदेमध्ये लोह, कॅल्शियम इत्यादींचे प्रमाण भरपूर असले, तरी नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने नत्रखते वापरणे आवश्यक ठरते. मृदेचा थर डोंगराळ भागांत पातळ असून नद्यांच्या खोऱ्यांतील भागांत त्यांनी आणून टाकलेल्या गाळामुळे जाड असल्याचे आढळते. हा मध्यभागच आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे. रेगूर मृदा पावसात ओली झाल्यावर फुगते, तर उन्हाळ्यात तिला भेगा पडतात. या भेगांतून पृष्ठभागावरचे सुटे कण आत जातात. पावसाळ्यात पावसाच्या थेंबांनी वरचे कण खाली गेल्यावर खालचे कण वर येतात. अशा प्रकारे जमिनीची नांगरट आपोआपच होते. या क्रियेला अत्यंत महत्त्व आहे. नाहीतर पाऊस पडल्यानंतर माती इतकी चिकट होते की, नांगराच्या साहाय्याने फार वेळ नांगरट करणे शक्य नसते. मात्र जमिनीचा पोत बारीक असल्याने जलसिंचनासाठी मृदा फारशी उपयुक्त नाही. पाण्याचा निचरा ही एक महत्त्वाची समस्या आहे.

बेसाल्ट खडकाने आच्छादलेल्या या जिल्ह्यात खनिजे नाहीत. इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा दगड व रस्त्यांसाठी लागणारी खडी याच गोष्टी खाणींतून मिळतात.

पठारावरील स्थानामुळे जिल्ह्याचे हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. मे महिन्यात दिवसाचे तपमान ४०° से. वर जाते, तर रात्री ते २५° से. च्या खाली येते. हिवाळ्यातील तपमान दिवसा ३०°से., तर रात्री १५° से. इतके असते. उन्हाळ्यात तपमान कधीकधी ४५° से. इतके वाढते, तर हिवाळ्यात रात्री १०° से. इतके खाली येते. पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात थोडासा पाऊस मिळतो. पर्जन्यमान सामान्यतः ८२·६६ सेंमी. असून भूरचनेप्रमाणे त्यात फरक पडतो. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी या तालुक्यांत पर्जन्यमान सु. ११० सेंमी. पेक्षा अधिक असते, तर बालाघाटच्या पर्जन्यछायेत येणाऱ्या खोऱ्यातील तालुक्यांत ते ७५ ते ८० सेंमी. च्या आसपास असते. वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने पाण्याचा तुटवडा हा महत्त्वाचा अडसर होय. त्यामुळे जंगलक्षेत्र एकंदरीत कमीच. एकूण क्षेत्राच्या केवळ ३% क्षेत्र जंगलाखाली असून त्यातही पानझडी आणि काटेरी झाडे-झुडपे सापडतात. जंगलक्षेत्र डोंगराळ भागात आढळते. नद्यांच्या खोऱ्यांतील जमीन शेतीखाली आणण्याच्या दृष्टीने तेथे जंगलतोड झालेली आहे. जंगलांत साग, सालई, पळस, खैर, बाभूळ, बोर यांसारखी झाडे आढळतात.

तुटपुंजे व विरळ जंगल आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे जिल्ह्यात जंगली प्राणी व पक्षी फार थोड्या प्रमाणात आढळतात. बिबळ्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी अजूनही आढळतात परंतु त्यांच्या संख्येत पुष्कळच घट होत आहे. वन्य प्राणी शिकार प्रतिबंधक कायद्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत आहे.

नैसर्गिक जलाशय कमी असल्यामुळे जिल्ह्यात पक्षी फारच कमी आहेत. कबूतर, मोर, कवडे, सुतार, पाणकावळा, पाणबदके इ. पक्षी जलाशयांच्या आसपास आढळतात. जंगलांपासून मुख्यतः जळाऊ लाकूड, तेंडूची पाने व रोशा गवत मिळते.

आर्थिक स्थिती: डोंगराळ भाग सोडल्यास जिल्ह्याचा इतर भाग नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापला असल्यामुळे, लागवडीस योग्य जमिनीचे प्रमाण एकूण जमिनीच्या ७५% इतके आहे. अर्थात हे प्रमाण भूस्वरूपानुसार बदलते. जिंतूर, हिंगोली, कळमनुरी यांसारख्या डोंगराळ तालुक्यांत ते कमी असून खोऱ्यांतील तालुक्यांत ते अधिक आहे. मात्र यांपैकी केवळ १३-१४ टक्के क्षेत्रातच एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होते. ज्वारी हे येथील मुख्य पीक असून बाजरी, गहू व भात ही पिकेही थोड्या प्रमाणात घेतली जातात. तूर, हरभरा यांसारखी द्विदल धान्येही पिकतात. नगदी पिकांमध्ये ऊस, कापूस व भुईमूग ही महत्त्वाची पिके होतात. अन्न पिकांखालील जमिनीचे प्रमाण ६७·३% आहे. मात्र जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असलेल्या भागांत नगदी पिकांखालील जमीन वाढत असून, त्यामानाने अन्नपिकांखालील जमीन घटत आहे. जिल्ह्यातील एकूण कामगारवर्गापैकी सु. ८२·५% लोक शेतीच्या व्यवसायात गुंतले आहेत. शेती बहुतांशी जनावरांच्या साहाय्यानेच केली जाते. जनावरांचा शेती व घरगुती दूधपुरवठा यांखेरीज फारसा उपयोग केला जात नाही. कोंबड्या हे प्रथिने पुरविणारे अन्न असले, तरी १९७२ मध्ये कोंबड्यांची संख्या हजार माणसांमागे केवळ १०५ इतकीच होती.

निर्मितिउद्योगांत १९७२ मध्ये ६८ कारखान्यांत १,३६४ लोक काम करीत होते. सरकी काढणे, गासड्या बांधणे, निरनिराळे अन्नपदार्थ बनविणे हे येथील महत्त्वाचे उद्योग होत. लाकूडकाम, मोटार व सायकल दुरुस्ती यांसारखे अनेक छोटे उद्योगधंदेही जिल्ह्यात आढळतात. पूर्णा नदीवरील येलदरी व सिद्धेश्वर या धरणांमुळे शेतीविकासास व वीजनिर्मितीस चालना मिळाली आहे.

विद्युतीकरणाच्या दृष्टीनेही प्रगती फारशी उत्साहजनक नाही. १९७४-७५ पर्यंत फक्त ६२५ गावांचे आणि १२ शहरांचे विद्युतीकरण झाले होते. दरडोई विजेचा वापर केवळ १५·५९ किवॉ. तास होता. शेती आणि उद्योगधंदे यांसाठी विजेचा वापर वाढत आहे.

जिल्ह्यात १९७५ मध्ये २८७ किमी. लोहमार्ग, १,६४८ किमी. रस्ते, २७३ टपालकचेऱ्या व १९ तारकचेऱ्या, ७८५ दूरध्वनी यंत्रे आणि २८,३८५ रेडिओ होते. रस्त्यांची कमतरता ही आर्थिक विकासातील मोठी अडचण आहे.


लोक व समाजजीवन: या जिल्ह्यात १९६१–७३ या काळात लोकसंख्या २४·९२% नी वाढली. यात शहरांतील लोकसंख्या वाढीचे प्रमाण ४५·१३%, तर ग्रामीण लोकसंख्या वाढीचे प्रमाण २१·६७% आहे. असे असूनही ग्रामीण भागात ८४% लोक राहतात. लोकवस्तीची घनता दर चौ. किमी. ला १२१ आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण चौ. किमी. ला १०३ इतके खाली येते. साक्षरतेचे प्रमाण १९७१ मध्ये २४·३१% होते पुरुषांमध्ये हे प्रमाण ३६·८५%, तर स्त्रियांमध्ये ते अवघे ११·२५% होते. महाराष्ट्रातील सरासरीचा विचार करता हे प्रमाण फारच कमी आहे. १९७२-७३ मध्ये १,५३७ प्राथमिक शाळांत १,२६,८३८ विद्यार्थी १२६ माध्यमिक शाळांत ४६,१८६ विद्यार्थी आणि ९ महाविद्यालयांत ४,४२३ विद्यार्थी शिकत होते.

जिल्ह्यात आरोग्यविषयक सोयींचीदेखील कमतरताच भासते. १९७३-७४ साली १ रुग्णालय, ५० दवाखाने, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे,              ४ सूतिकागृहे, ९ आरोग्य केंद्रे, ८७ डॉक्टर, १२ वैद्य, ११६ परिचारिका आणि २५७ खाटा होत्या. एक लाख लोकवस्तीला खाटांची संख्या केवळ १७ पडते.

जिल्ह्यात २९ छापखाने असून दोन मराठी दैनिके, चौदा साप्ताहिके (अकरा मराठी, एक हिंदी, दोन इतर भाषांतील) व दोन मराठी पाक्षिके प्रकाशित होतात. परभणी समाचार (हिंदी) आणि जागृति, तरुण महाराष्ट्रलोककल्याण ही मराठी साप्ताहिके प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यातील रहिवाशांमध्ये ३% आदिवासी आहेत. ते मुख्यतः कळमनुरी, हिंगोली, जिंतूर आणि वसमत या डोंगराळ तालुक्यांत आढळतात. खेड्यांतील घरे पर्यावरणात आढळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करूनच बांधलेली असतात. पाऊस बेताचा असल्याने घरे धाब्याचीच असतात. साधारण आर्थिक परिस्थिती बरी असणाऱ्या शेतकऱ्यांची घरे दगड, विटा यांची असतात. सामान्य शेतकऱ्यांच्या घरांचे धाबे लाकडी खांबांवर आधारलेले असून, भिंती मातीच्या असतात. गरीब लोकांची घरे झाडांच्या फांद्या, पाने आणि गवत यांनीच बांधलेली असतात. लोकांचे मुख्य अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, वरण किंवा आमटी, भाजी मांस आणि कधीकधी भात हे होय. धोतर, सदरा, डोक्याला टोपी किंवा रुमाल हा पुरुषाचा मुख्य पोषाख. मात्र जमात व आर्थिक परिस्थित्यनुसार त्यात फरक पडतो. शहरांतील लोकांच्या पोषाखात आधुनिकता वाटते. स्त्रिया लुगडे आणि चोळी वापरतात. जिल्ह्यात १९ चित्रपटगृहे व १२ फिरती चित्रपटगृहे आहेत.

या जिल्ह्यामध्ये परभणी, हिंगोली, वसमत, सेलू, मानवत, पूर्णा, गंगाखेड, जिंतूर, परतूर, पाथरी, कळमनुरी व सोनपेठ अशी बारा शहरे असली, तरी परभणी व हिंगोली हीच खरी मोठी शहरे आहेत.

हा जिल्हा थोर संतांची भूमी होय. संत नामदेवांचा जन्म नरसीचा. संत जनाबाई ही गंगाखेडची. महानुभाव कवी भास्करभट्ट हे बोरीचे. जिल्ह्यातील औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग व जिंतूरचे जैनमंदिर प्रसिद्ध आहेत. (चित्रपत्रे ३, १४).

फडके, वि. शं.


परभणी जिल्हा


प्राचीन नृसिंह मंदिराची वास्तू, परतूर.   मराठवाडा कृषिविद्यापीठ, परभणी.   जलविद्युत् प्रकल्प, येलदरी.   लक्ष्मी-नारायण मंदिराचे अंतर्गत दृश्य, मानवत.      ज्योतिर्लिंग मंदिर, औंढा नागनाथ.   अपर पैनगंगा प्रकल्पाचा परिसर   गोदाकाठचे गंगाखेड      लोअर दुधना प्रकल्पाचे जलक्षेत्र      कापूस कारखान्यातील दृश्य, हिंगोली.   कापसाची बाजारपेठ, परभणी.