सॅन होसे–१ : मध्य अमेरिकेतील कोस्टा रीका देशाची राजधानी. देशातील सर्वांत मोठे शहर व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ३,६५,७९९ (२००६ अंदाज). सॅन होसे परगण्याचेही हे मुख्य ठिकाण आहे. कोस्टा रीकाच्या भौगोलिक मध्यावर एका रुंद सुपीक खोऱ्यात सस.पासून १,१६० मी. उंचीवर हे वसले आहे. कॅरिबीयन समुद्रकिनाऱ्यावरील लिमॉनच्या पश्चिमेस १२९ किमी.वर, तर पॅसिफिक किनाऱ्यावरील पूंता आरेनासच्या पूर्वेस ११४ किमी. अंतरावर सॅन होसे आहे.

कोलंबसनंतर स्पेनने लॅटिन अमेरिकेत धर्मप्रसाराच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. त्यांतील कार्तागोजवळ १७३६ मध्ये स्थापन केलेल्या वसाहतीला व्हिला न्यूएव्हा हे नाव दिले. पुढे कोस्टा रीका स्वतंत्र झाल्यानंतर (१८२१) सॅन होसे आणि कार्तागो यांत संघर्ष उद्‌भवला. त्यानंतर १८२३ मध्ये कार्तागोहून देशाची राजधानी सॅन होसेला हलविण्यात आली. १८४० च्या दशकात सभोवतालच्या सुपीक जमिनीत कॉफीची लागवड झाल्याने कॉफीच्या प्रक्रियेचे-व्यापाराचे हे प्रमुख केंद्र बनले.

कोस्टा रीका हा कृषिप्रधान देश असल्याने पशुपालन व शेती व्यवसायाला विशेष महत्त्व आहे. सॅन होसे प्रांतात कॉफी, स्टॉक, ऊस, कॅकॅओ, भाजीपाला, फळे इ. कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यामुळे त्यांवरील प्रक्रियाउद्योग व त्यांच्या बाजारपेठेचे हे प्रमुख केंद्र बनले आहे. एक औद्योगिक केंद्र म्हणूनही याला महत्त्व आहे. विशेषतः १९५० नंतर शहराच्या औद्योगिक विकासात अतिशय वेगाने वाढ झाली. वस्त्रोद्योग, मद्यार्क- विशेषतः वाईन व बीअर निर्मिती -डबाबंद खाद्यपदार्थ, अन्नप्रक्रिया, चॉकलेट, औषधे, चामड्याच्या वस्तू, साखर, गृहोपयोगी वस्तुनिर्मिती इ. उद्योग येथे चालतात.

नॅशनल थिएटर : सॅन होसे.

वाहतुकीच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. पॅन-अमेरिकन हमरस्त्यावरील हे प्रमुख स्थानक आहे. अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या किनाऱ्यावर असलेल्या बंदरांना जोडणारा लोहमार्ग सॅन होसेतून जातो. त्यामुळे कॉफी, साखर, केळी, पशुधन इत्यादींची निर्यात सुलभ झाली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी असे दोन विमानतळ आहेत.

कोस्टा रीकाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्र असलेल्या सॅन होसे शहराची विसाव्या शतकात लोकसंख्या आणि क्षेत्रिय विस्तारात वेगाने वाढ झाली. वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील घरे बसकी किंवा चार मजल्यांपेक्षा कमी उंचीची होती पण विसाव्या शतकात बांधकामातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या आहेत. शहरातील वास्तुरचना नियोजनबद्घ असून रस्ते व चौक अभिकल्पातील आराखड्यानुसार तयार केले आहेत. नवीन वास्तूंत वसाहतिक स्पॅनिश वास्तुशैली आणि आधुनिक वास्तुशैली यांचे मनोरम मिश्रण आढळते. अशा वास्तूंत सर्वोच्च् न्यायालय, नॅशनल थिएटर, राष्ट्रीय संग्रहालय, युनिव्हर्सिटी ऑफ कोस्टा रीका वगैरे भव्य इमारती असून त्या प्रेक्षणीय आहेत. येथील भव्य राजवाड्यामध्ये काँगेसची सर्व कार्यालये आहेत. शिवाय तीत कोस्टरीकन राष्ट्रीय नेत्यांचा प्रतिमाचित्रसंग्रह (पोर्ट्रेट्स) आहे. म्यूनिसिपल प्रासादात सर्व शासकीय कार्यालये आहेत. राष्ट्रीय संग्रहालयात माया संस्कृतीतील सुवर्णालंकार आणि वसाहतपूर्व अवशेष असून त्यांत मध्य अमेरिकेतील प्राचीन मृत्पात्रांचा मोठा संग्रह आहे. राष्ट्रीय थिएटरच्या उत्तुंग इमारतीत प्रबोधनकालीन वास्तुविशेष दृष्टोत्पत्तीस येतात. याशिवाय राष्ट्रीय ग्रंथालय आणि कॅथीड्रल यांच्या वास्तूही लक्षवेधक आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कोस्टा रीका (१९४०) व नॅशनल युनिव्हर्सिटी (१९७३) ही विद्यापीठे महत्त्वाची आहेत. मुख्य शहराच्या पश्चिमेस ला सबाना हा सुंदरमैदानी भाग असून तेथे सॅन होसेचे सुंदर निवासी उपनगर निर्माण झाले आहे.

देशपांडे, सु. र.