ग्लासगोचे विहंगम दृश्य

ग्लासगो : स्कॉटलंडमधील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ९,०७,६७२ (१९७०) ग्लासगोसह सेंट्रल क्लाईडसाइड कॉनर्बेशन १७,३२,८७०. हे मुख्यतः लॅनार्कशर परगण्यात, क्लाईड नदीच्या दोन्ही काठांवर, नदीमुखापासून ३२ किमी., एडिंबरोच्या नैर्ऋत्येस सु. ७१ किमी. असून त्याचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. आहे. ग्लासगो बंदराची गणना जगातील अत्याधुनिक बंदरात होत असून येथून कापड, यंत्रे, कोळसा, कागद, रसायने, व्हिस्की इत्यादींची निर्यात व कच्चे लोखंड आणि अन्य धातू, गहू, लोकर, साखर, तंबाखू, लाकूड, खनिज तेल यांची आयात होते.

नवाश्म युगापासूनचे अवशेष ग्लासगोच्या परिसरात सापडले असल्याने तेव्हापासून येथे मानववस्ती असल्याचे दिसून येते. सहाव्या शतकात सेंट मंगो (सेंट केंटिगर्ना) याने वसविलेल्या गावाचा विस्तार हल्लीच्या ग्लासगो शहरात झाला असून सतत वाढत्या वस्तीमुळे याच्या परिसरात कॅसलमिल्क, ड्रमचॅपेल, ईस्टरहाउस यांसारखी अनेक उपनगरे स्थापन झाली आहेत.

अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत अतिवेगाने झालेल्या शहरांच्या औद्योगिकीकरणामुळे गलिच्छ वस्त्यांची व गुन्हेगार टोळ्यांचीही झपाट्याने वाढ झाली. मात्र अलीकडेच कार्यान्वित झालेल्या शहर सुधारणेच्या योजनांमुळे गलिच्छ वस्त्यांचे काही अंशी निर्मूलन झाले असून शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणही घटले आहे.

काही गलिच्छ वस्त्यांचा अपवाद वगळता ग्लासगो सुंदर व स्वच्छ शहर असून सरळ रुंद रस्ते, नदीवरील ११ पूल, मोठमोठ्या उत्तुंग इमारती व बागबगीचे, क्रीडांगणे, उपवने इत्यादींनी सुशोभित आहे.

१७०७ पासून म्हणजे स्कॉटलंड इंग्लंडमध्ये विलीन झाल्यापासून ग्लासगोच्या विकासास सुरुवात झाली. लॅनार्कशरमधील कोळशाच्या खाणींमुळे आणि नदीतील गाळ काढून बंदर विकासाकडे विशेष लक्ष दिल्याने शहराच्या औद्योगिकीकरणास गती आली. सुरुवातीस तंबाखू व नंतर कापूस व कापड व्यवसायांत स्कॉटिश व्यापाऱ्यांनी अतोनात पैसा मिळविला. कालांतराने ह्या उद्योगांची पीछेहाट झाली, तरी आजही पेझ्‌ली येथील शिवणाचा दोरा व ग्लासगोचे गालिचे जगप्रसिद्ध आहेत.आज ग्लासगोची ख्याती आहे. ती मुख्यतः जहाजबांधणी व्यवसायामुळे. क्कीन मेरी, क्विन एलिझाबेथसारख्या प्रचंड प्रवासी बोटी येथील गोद्यांतच बांधल्या गेल्या. ब्रिटनची पहिली प्रवासी आगबोट कॉमेट १८१२ मध्ये येथेच तयार झाली. याव्यतिरिक्त येथे रेल्वे व विमान एंजिनांचे व हरप्रकारच्या यंत्रांचे कारखाने आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ निर्यात व्यापारात घट झाल्याने येथील प्रमुख उद्योगधंद्यांना काहीसे अडचणीचे दिवस आले. तेव्हा त्यांना पोषक व पूरक अशा लहान कारखान्यांना उत्तेजन देण्याची योजना अंमलात येऊन शहराच्या आसपास हिलिंगट्‌न वगैरे पाच औद्योगिक वसाहती स्थापन झाल्याने यंत्रे, रसायने, काच, मातीची भांडी, टंकलेखनयंत्रे इ. विविध उद्योगांचे जाळेच येथे निर्माण झाले आहे.

ग्लासगो म्हणजे उद्योगधंदे असे समीकरण होण्याइतकी कारखानदारी येथे असली, तरी सांस्कृतिक विकासाकडे नागरिकांचे दुर्लक्ष झालेले नाही.

ग्लासगो महानगरपालिकेने ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये व कलावीथी यांच्या विकासाकडे विशेष लक्ष पुरविले आहे. येथील ललितकला संस्थेचे कलाक्षेत्रातील काम महत्त्वाचे आहे. ग्लासगो विद्यापीठाने गेली सु. सव्वापाचशे वर्षे विद्याप्रसाराचे कार्य केले आहे. त्याशिवाय विज्ञान आणि तंत्रविद्येची अनेक महाविद्यालये आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहेत. लॉर्ड लिस्टर, लॉर्ड केल्व्हिन, जेम्स वॅट इत्यादींचा ग्लासगोशी संबंध आला होता.

ग्लासगो शहराचे प्रशासन स्वतंत्र महानगरपालिकेकडे असून ट्रॅम, बस, भुयारी लोहमार्ग इ. वाहतुकीच्या सोयी नगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. विविध प्रकारच्या लोकोपयोगी सेवाकार्यामुळे येथील नगरप्रशासन व्यवस्थेचे अन्य देशांतही अनुकरण होऊ लागले आहे.

ओक, द. ह.