ताजिकिस्तान : सोव्हिएट संघराज्याच्या पंधरा घटक प्रजासत्ताकांपैकी एक. क्षेत्रफळ १,४३,१०० चौ. किमी. लोकसंख्या ३३ लक्ष (जानेवारी १९७४). विस्तार ३६° ४०’ उ. ते ३९° ४०’ उ. आणि ६०° २०’ पू. ते ७५°पू. यांदरम्यान, सोव्हिएट मध्य आशियाच्या अगदी आग्नेयीस असलेल्या या प्रजासत्ताकाच्या उत्तरेस किरगीझिया प्रजासत्ताक, पूर्वेस चीन, दक्षिणेस अफगाणिस्तान आणि त्याच्या सोळा किमी. रुंदीच्या वाखान या चिंचोळ्या पट्टीपलीकडे भारत (काश्मीर) व पाकिस्तान आणि पश्चिमेस व वायव्येस उझबेकिस्तान प्रजासत्ताक आहे. दूशान्बे ही राजधानी आहे. आग्नेय भागातील ६३,७०० चौ. किमी. चा गोर्नों–बंदक्शान हा स्वायत्त विभाग आणि त्याची राजधानी खोरॉग यांचा समावेश ताजिकिस्तानातच होतो.

लेनिन चौक, दूशान्बे.

भूवर्णन : हा प्रदेश उंच उंच पर्वतश्रेणींनी व त्यांमधील दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. आग्नेय भागात भव्य, उत्तुंग, हिमाच्छादित पामीर–आलाय पर्वत संहतीमधील ‘जगाचे छप्पर’ या अर्थाचे स्थानिक नाव असलेले विख्यात पामीरचे पठार आणि पश्चिमेकडे गेलेल्या पीटर द फर्स्ट व दरवाझा या रांगा आहेत. पामीरच्या उत्तर भागात सोव्हिएट संघराज्यातील सर्वोच्च शिखरे मौंट कम्युनिझम (७,४९५ मी.) मौंट लेनिन (७,१३४ मी.) व मौंट कार्ल मार्क्स (६,७२६ मी.) आहेत. देशाच्या मध्य भागात दक्षिण तिएनशानच्या तुर्कस्तान, झेरफ्शान (५,५१० मी. पर्यंत उंच), गीसार (हिस्सार) व आलाय रांगा आहेत. पूर्वेकडे ट्रान्स–आलाय. अल्यीचूर व सरिकोल रांगा असून उत्तरेकडे पश्चिम तिएनशानच्या ३,७६८ मी. पर्यंत उंचीचा कूराम व मगॉलताऊ रांगा आहेत. पामीरमधील मौंट कम्युनिझमच्या दक्षिणेस विस्तीर्ण व लांब फेडचेंको हिमनदी आहे. वायव्येचे सिरदर्याचे खोरे, फरगानाखोऱ्याचा तोंडाजवळचा भाग व नैर्ऋत्येची काफिरनिगन, वाख्ष इ. नद्यांची खोरी हा देशाचा सखल प्रदेश आहे.

उत्तरेकडील सिरदर्या व दक्षिण सीमेवरील अमुदर्या या येथील प्रमुख नद्या आहेत. देशातील उत्तरेकडील प्रवाह सिरदर्याला आणि मध्य व दक्षिण भागांतील प्रवाह अमुदर्याला मिळतात. पश्चिमवाहिनी झेरफ्शान पुढे तुर्कमेन प्रजासत्ताकात अमुदर्याला मिळते. आग्नेय सीमेवरील पामीर नदी पुढे पांज नदी म्हणून ओळखली जाते व तिला वाख्ष मिळाल्यावर तीच पुढे अमुदर्या होऊन तिला अगदी नैर्ऋत्य भागात काफिरनिगन मिळते. काही प्रवाह पूर्वेकडे काराकल या येथील सर्वांत मोठ्या व खाऱ्या सरोवराला मिळतात. १९११ च्या भूकंपात मुरगाब नदीला प्रचंड भूमिपातामुळे बांध पडून अत्यंत खोल व नयनरम्य सऱ्येस सरोवर निर्माण झाले आहे. झेरफ्शान रांगेत इस्कंद्येरकुल हे सुंदर सरोवर आहे.

हवामान : ताजिकिस्तानचे हवामान अत्यंत विषम असून ते उंचीप्रमाणे बदलत जाते. नदीखोऱ्यांत उन्हाळा कडक आणि कोरडा असतो. लेनिनाबाद व कूल्याप येथे जुलैचे सरासरी तपमान अनुक्रमे २७·४° व ३०·३° से. आणि जानेवारीचे अनुक्रमे ०·९° से. व २·३° से. असते. वर्षातून २०० ते २४० दिवस बर्फयुक्त असतात. कडक हिवाळ्यात तपमान –२०° से. पर्यंतही उतरते. वार्षिक सरासरी पाऊस १५ ते २५ सेंमी. पडतो. उंचीप्रमाणे तपमान कमी होत जाते. पूर्व पामीरमध्ये मुरगाब येथे जानेवारीत ते –१९·६° से. असते. कधी कधी ते –४६° से. पर्यंत उतरते. –६३° से. पर्यंत उतरल्याची नोंद आहे. येथे पाऊस फक्त ६ ते ८ सेंमी. असतो. तिएनशान व पामीर–आलाय श्रेणीदरम्यानचा तूर्गे खोऱ्यात पश्चिमेकडील आर्द्र वाऱ्यांमुळे ८० ते १५० सेंमी. पाऊस हिमरूपाने पडतो.

वनस्पती : पर्वतपायथ्याचा सपाट प्रदेश मरुसदृशच आहे. तथापि जो जो उंच जावे तो तो गवत, जंगल, सूचिपर्णी व पानझडी वृक्षांची अरण्ये, विरळ अरण्ये, स्टेप गवत, अल्पाइन कुरणे व शेवटी वनस्पतिरहित, बर्फाच्छादित प्रदेश असा क्रम आढळतो. येथे झाडाझुडुपांचे सु. १५० व फुलांचे ५,००० पेक्षा अधिक प्रकार आढळतात.

प्राणी : प्राणिजीवनही विविध आणि विपुल आहे. करड्या रंगाचे मोठेमोठे सरडे, जर्बोआ, गोफर इ. मरुवासीहरिण, वाघ, कोल्हा, रानमांजर हे वनप्रदेशातील तर पर्वतप्रदेशात तपकिरी अस्वल आणि त्याहीपेक्षा उंच भागात रानबोकड व सोनेरी गरुड दिसतात.


इतिहास व राज्यव्यवस्था : या डोंगराळ प्रदेशात राहणारे ताजिक लोक प्राचीन काळी हल्लीच्या उझबेकिस्तानमधील अमुदर्या व सिरदर्या यांदरम्यानच्या झेरफ्शानच्या सुपीक खोऱ्यातील प्राचीन सॉग्डियाना प्रदेशात राहत असत. अलेक्झांडर, शक, मंगोल इत्यादिकांच्या स्वाऱ्यांच्या दडपणामुळे ते या डोंगराळ प्रदेशात आले. प्राचीन काळी हा प्रदेश इराणच्या आणि अलेक्झांडरच्या राज्यात मोडत असे. आठव्या शतकात अरबांनी अमुदर्या ओलांडून ताजिकांचा सॉग्डियाना प्रदेश घेतला आणि त्यास माव्हे रा अन् नहर म्हणजे नदीपलीकडील प्रदेश असे नाव दिले. नवव्या शतकापर्यंत ते इस्लामी संस्कृतीचे पूर्वेकडील केंद्र होते. दहाव्या शतकात तुर्की लोकांनी आक्रमण केले. तेराव्या ते पंधराव्या शतकापर्यंत मंगोलांचे नियंत्रण होते, नंतर खिया, बुखारा आणि कोकंद येथील खानांचे वर्चस्व सुरू झाले. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ताजिक लोक बुखारा राज्याचा एक भाग म्हणून राहिले. नंतर अफगाणांनी अमुदर्या नदीच्या दक्षिण आणि आग्नेय भागापर्यंतचा प्रदेश जिंकला. १८९५ मध्ये इंग्रज व रशियन यांनी पांज नदी अफगाणिस्तानची उत्तर सरहद्द ठरविली. रशियन क्रांतीनंतर ताजिकिस्तान हा तुर्कमेन प्रजासत्ताकाचा एक भाग होता. १९२४ मध्ये तो उझबेकिस्तानात समाविष्ट झाला आणि १९२९ मध्येताजिकिस्तान हे सोव्हिएट संघराज्याचे एक घटक प्रजासत्ताक झाले.

ताजिकिस्तान हे १९३७ च्या संविधानाप्रमाणे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असून त्याला स्वतःचा ध्वज व राष्ट्रगीत आहे. तथापि खरी अंतिम सत्ता सोव्हिएट संघराज्याकडेच आहे. या देशाची सत्ता दर चार वर्षांनी निवडल्या जाणाऱ्या सुप्रीम सोव्हिएटकडे आहे. १९७१ च्या निवडणुकांत दर ५,००० लोकांस एक याप्रमाणे ३१५ डेप्युटी (प्रतिनिधी) निवडून आले. त्यांपैकी १०७ स्त्रिया व २१७ कम्युनिस्ट होते. जिल्हा, नागरी व ग्रामीण सोव्हिएटवर गोर्नो–बदक्शान स्वायत्त विभाग धरून दोन वर्षांसाठी निवडून आलेल्या २२,६६२ प्रतिनिधींपैकी ४६% स्त्रिया, २२·७% अपक्ष व ६८·३% औद्योगिक कामगार व सामुदायिक शेती करणारे होते. ताजिक सुप्रीम सोव्हिएटला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ ‘कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स’ म्हणजेच ताजिकी शासन हे देशातील सर्वोच्य कार्यकारी व शासकीय मंडळ आहे.

ताजिकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय, स्वायत्त विभागाचे न्यायालय, जिल्हा आणि नागरी न्यायालये दर पाच वर्षांनी निवडली जातात. नव्वद हजार सभासदांचा ताजिक कम्युनिस्ट पक्ष, दोन लाख सभासदांची यंग कम्युनिस्ट लीग व सु. पाच लाख सभासदांच्या व्यावसायिक संघटना आहेत. त्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांतही लक्ष घालतात.

आर्थिक स्थिती : देशाचा सु. ६७% भाग उघडे बोडके खडक, वाळू दगडधोंडे, हिम व बर्फ यांनी भरलेला आहे. मृदा करड्या रंगाच्या खनमाती (ह्युमस) विरहित परंतु खनिज द्रव्ययुक्त आहेत. मरुप्रदेशात व मरुसदृशप्रदेशात सिंचाईच्या आधारे कापसाची शेते, फळबागा, द्राक्षमळे इत्यादींची वाढ झालेली आहे. सिंचाई नसलेल्या भागात स्टेप मृदा, व तपकिरी डोंगरी मृदा आहेत. अरुंद दऱ्यांतून व डोंगरपायथ्यांशी ‘किश्लाकी’(छोटेखानी खेडी) व त्यांभोवती सफरचंद, तुती, जरदाळू यांची झाडे व छोटीछोटी शेते दिसतात. पर्वतीय कुरणात शेळ्यामेंढ्यांस वर्षभर गवत मिळते.

शेती : ताजिक लोकांचे मुख्य व्यवसाय शेती, फळबागा व पशुपालन हे आहेत. गहू, बार्ली, मका, ओट ही प्रमुख अन्नधान्ये असून तांदूळ, भरडधान्ये व भाजीपालाही होतो. तथापि लांब धाग्याचा कापूस हे येथील महत्त्वाचे पीक असून उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान यांच्या खालोखाल आणि सोव्हिएट संघराज्यातील १०% कापसाचे उत्पादन येथे होते. ताग, ऊस, साखर–बीट, बटाटे, अंबाडी, केनॅफ, यूकॅलिप्टस, जिरॅनियम यांचेही उत्पादन होते व रेशीमही होते. पामीरच्या ३,८६० मी. उंचीच्या पठारावरही राज्याच्या वनस्पतिसंशोधन केंद्रातर्फे बार्ली, ओट, गहू, यांच्या विविध जाती व भाजीपाला यांचे उत्पादन होते. १९७३ मध्ये देशात २५१ सामुदायिक शेते (त्यांपैकी २०८ स वीजपुरवठा), १२३ शासकीय शेते, २५,४०० ट्रॅक्टर व २,९०० कापूस व धान्ये यांची कापणी–मळणी यंत्रे होती. गोर्नो–बदक्शानमध्ये ४७ सामुदायिक शेते व ३ शासकीय पशुपालन केंद्रे होती. ताजिकिस्तानात प्राचीन काळापासून फळांचे मोठे पीक येते. त्यांत जरदाळू, डाळिंब, पेअर, सफरचंद, प्लम, क्वीन्स, चेरी, अंजीर, ऑलिव्ह, बदाम, कवचाची फळे व द्राक्षे, लिंबे आणि मुसुंबी यांचा समावेश होतो. देशातील समृद्ध कुरणांमुळे पशुपालनास मोठे महत्त्व आहे. १९७४ च्या सुरुवातीस देशात १०,७६,६०० गुरे, २८ लक्ष मेंढ्या व शेळ्या आणि ९८,८०० डुकरे होती. दक्षिणेकडील ‘गीसार’ ही मेंढी लोकर व चरबी यांसाठी व काराकुल मेंढी लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. गोर्नो–बदक्शानमध्ये गहू, फळे व चारा ही पिके होतात. येथे १९७३ मध्ये ४३,७०० गुरे आणि २,३१,६०० शेळ्या व मेंढ्या होत्या. देशात ४३,००० किमी. सिंचाई कालवे असून त्यांचा उपयोग ५,३५,००० हे. क्षेत्रास होतो.

खनिजे :ताजिकिस्तानात तपकिरी कोळसा, शिसे, जस्त व उत्तर भागात खनिज तेल सापडते. त्यांशिवाय युरेनियम, रेडियम, आर्सेनिक, बिस्मथ ही दुर्मिळ खनिजे व ॲस्बेस्टॉस, सोने, चांदी, अभ्रक, कुरुविंद, एमरी, नीलाश्म, पॉटॅशियमची लवणे, गंधक, टंगस्टन, अँटिमनी व इतर काही खनिजेही सापडली आहेत. गोर्नो-बदक्शानमध्ये सोने, रॉकक्रिस्टल, अभ्रक, कोळसा व मीठ मिळते.

उद्योगधंदे : पूर्वीच्या छोट्या हस्तउद्योगांचे रूपांतर आता मोठमोठ्या उद्योगांत झाले आहे. खाणकाम, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया, कापड, तयार कपडे यांचे मोठमोठे कारखाने आहेत. रेशमाच्या दोन गिरण्यांपैकी लेनिनाबाद येथील गिरणी सोव्हिएट संघराज्यातील सर्वांत मोठी असून कापूस स्वच्छ करण्याच्या सु. बारा गिरण्या, दुशान्बे येथील कापडगिरण्या यांशिवाय विणलेले कपडे, पादत्राणे, कपडे शिवणे व कातडी कमावणे हे उद्योग आहेत. कायराक्कुम येथील गालिच्यांचा कारखाना संघराज्यात सर्वांत मोठा आहे. फळे, मद्ये, नैसर्गिक तेले व तंबाखू यांच्या प्रक्रियेचे कारखाने महत्त्वाचे आहेत. माग, रोहित्रे, केबल, शेतीची अवजारे व घरगुती उपकरणे यांचे कारखाने निघाले आहेत. रासायनिक उद्योगात कल्यीन्यिनबाद येथील नायट्रोजन खतांचा कारखाना, यव्हान येथील विद्युत् रासायनिक कारखाना, ऱ्येगार येथील ॲल्युमिनियम कारखाना हे न्यूऱ्येक वीज उत्पादन केंद्रावर अवलंबून आहेत. वाख्ष नदीवरील हे शक्तिकेंद्र २७ लक्ष किवॉ. क्षमतेचे आहे. दूशान्बे येथे औष्णिक वीज केंद्र असून सिरदर्यावरील १,२६,००० किवॉ.चे कायराक्कुम केंद्र, वाख्षवरील गॉलॉव्हनयाचे २,१०,००० किवॉ.चे केंद्र ही प्रमुख शक्ती उत्पादन केंद्रे आहेत. १९७३ मध्ये ३७९·९ कोटी किवॉ. तास एकूण वीज उत्पादन झाले.


वाहतूक व दळणवळण : देशाच्या डोंगराळ स्वरूपामुळे लोहमार्ग थोडेच आहेत. दूशान्बे–टरमेझ २५८ किमी. आणि उत्तरेकडून गीसार खोऱ्यात येणारा लोहमार्ग प्रमाणमापी आहेत. देशातील सु. ६४३ किमी. पैकी ६७% लोहमार्ग अरुंदमापी आहेत. त्यांनी दूशान्बे हे वाख्ष खोऱ्याशी आणि कूल्याप विभागाशी जोडले आहे. देशात १३,५०० किमी. मोटार रस्ते असून त्यांपैकी ८,९०० किमी. पक्के आहेत. त्यात ऑश–खोरॉग, यासुई–बझार–चार्म व दूशान्बे–खोरॉग या रस्त्यांचा समावेश आहे. अमुदर्या आणि वाख्ष नद्यांतून टरमेझ, साराव्हा, जिलिकुलम यांदरम्यान सु. २०० किमी. वाहतूक होते. दूशान्बेहून मॉस्को, ताश्कंद, बाकू आणि देशांतील इतर शहरांकडे विमानवाहतूक होते.

लोक व समाजजीवन : १९७० च्या जनगणनेप्रमाणे ताजिकिस्तानमधील ५६% लोक मूळचे सुन्नी पंथीय ताजिक, २३% उझबेक, १३% रशियन आणि युक्रेनियन होते. प्राचीन सॉग्डियानातील लोकांचे वंशज झेरफ्शान खोऱ्यात आढळतात. किरगीझ, कझाक, तुर्कमेन, ऑसेटी, आर्मोनियन, ज्यू, जिप्सी व अरब हेही अल्पसंख्येने आढळतात. गोर्नो–बदक्शानच्या १,१०,००० लोकांपैकी ८३% ताजिक व ११% किरगीझ होते (१९७४). व्यवसायदृष्ट्या सु. ५४% लोक सामुदायिक शेतीवर, ३१% कामगार व १६% कचेऱ्यांतून काम करणारे होते. सु. ६७% लोकवस्ती नैर्ऋत्य भागात केंद्रित झालेली आहे.

दूशान्बे व लेनिनाबाद ही अनुक्रमे ३,८८,००० व १,१६,००० वस्तीची मोठी शहरे असून कूल्याप, कुर्गान–त्यूबे, उरा–त्यूबे, दूशान्बे, कायारक्कुम, ऑर्जानकिडझियाबाद, कल्यीन्यिनबाद, नूऱ्येक, ऱ्येगार ही सोव्हिएट अंमलात उदयास आलेली आहेत. एकूण नागरी वस्ती सु. १० लाख असून शहरांत नव्याजून्याचे मिश्रण दिसते. घराच्या अंगणात जरदाळू व इतर फळझाडे दिसतात. चहा–फराळाची दुकाने पुष्कळदा झाडांखालीच असतात.

नद्या, कालवे यांच्याकाठी छोटेखानी ‘किश्लाकी’ असतात. सपाट छपरांच्या घरांभोवती मातीचे कुसू असते आणि फळझाडे अथवा द्राक्षवेली असतातच. खेड्यांतूनही शाळा, दवाखाना, सांस्कृतिक केंद्रे, दुकाने इ. सोयी असतात. मोठ्या गावात दुमजली घरे व गट सेवा केंद्रे (कम्युनिटी सर्व्हिस सेंटर) असतात.

येथील लोकांस काम, विश्रांती, शिक्षण वृद्ध आणि अपंग यांच्या निर्वाहाची सोय यांची हमी असते. सर्व नागरिकांस व स्त्रियांसही समान हक्क आहेत. सर्व प्रकारचे शिक्षण मोफत आहे. बहुतेक सर्व लोक साक्षर आहेत. १९७३–७४ मध्ये ३,२०० प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत ८,५०,००० विद्यार्थी, ९ उच्च शिक्षणसंस्थांत ४७,६०० विद्यार्थी, ३९ तांत्रिक महाविद्यालयांत ३७,४०० विद्यार्थी व ताजिक शासकीय विद्यापीठात १२,४६७ विद्यार्थी होते. ४९६ पूर्व प्राथमिक शाळांतून ७८,००० मुले होती. गोर्नो-बदक्शानमध्ये १९७३–७४ मध्ये २७३ शाळांतून ३२,२०० विद्यार्थी आणि तांत्रिक महाविद्यालयांतून १,९०० विद्यार्थी होते. १९५१ मध्ये शास्त्र अकादमी स्थापन झाली. तिच्या १८ संस्था आहेत आणि १,१४० शास्त्रज्ञ कामावर आहेत. ६१ संशोधन संस्थांतून ६,१०० लोक काम करतात. पामीर संशोधन केंद्र हे जगातील सर्वांत जास्त उंचीवरील हवामान निरीक्षण वेधशाळा आहे. १९४० पासून सिरिलिकवर आधारलेली नवीन वर्णमाला अंमलात आली आहे.

देशात १९७३ मध्ये १०,३८,००० खपाची ६० वर्तमानपत्रे होती. त्यापैकी ७,२२,००० खपाची ५० वर्तमानपत्रे ताजिक भाषेतील होती. ताजिक ही इराणीसदृश भाषा असून काही ताजिक लोक पाकिस्तान व अफगाणिस्तान येथेही आहेत. हजारांवर ग्रंथालये असून पुस्तकांस फार महत्त्व दिले जाते.

येथे १२० रुग्णालये असून १९७३ मध्ये ६,१०० डॉक्टर आणि ३१,५०० रुग्णशय्यांची सोय होती. प्रसूतिगृहे, दवाखाने आणि खास रोगांसाठी संस्था आहेत. गोर्नो–बदक्शानमध्ये ११३ डॉक्टर व ८६५ रुग्णशय्या होत्या. पूर्वीच्या प्लेग, कॉलरा आणि मलेरिया या रोगांस जवळ जवळ संपूर्ण आळा बसलेला आहे. सर्व वस्त्यांस वीज पुरविलेली आहे. २०,००० नवीन गावे बांधलेली असून घरांचा तुटवडा कमी होत आहे.

देश प्राचीन संस्कृतीचा असून स्त्री–पुरुषांचे जुने पोषाख इत्यादींसारखी तिची वैशिष्ट्ये टिकविण्याकडे लक्ष दिले जाते. नवरोज (२१ मार्च) चा अथवा विशिष्ट पिकांच्या वेळचे विशिष्ट सणवार पाळले जातात. त्या वेळेस अनेक तऱ्हेचे खेळ, जत्रा, करमणुकी, कुस्त्या इ. भरगच्च कार्यक्रम असतात. रोटी, मांसाचा रस्सा, तळलेले मांस, बटाटे, दही, फळे इ. आहारही पूर्वापारच आहे.

सद्रिदिन आयनी, अबू अल् कासीम लाहूटी, मिर्झो तुर्सुन्झादे इ. ताजिकी कवी, कादंबरीकार व लेखक सोव्हिएट संघराज्यात व बाहेरही प्रसिद्ध आहेत. गाणी, नाच, कसरती, जादू, वाद्ये, नाटके इ. जुने करमणूक  प्रकार लोकप्रिय असून त्यांत नव्यांची भर पडत आहे. चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी इत्यादींची आवड वाढत असून त्यांचा प्रसार होत आहे.

वर्तक, स. ह. कुमठेकर, ज. ब.