तारीम : (चिनी तालीमू हो). चीनच्या सिंक्यांग–ऊईगुर स्वायत्त विभागातील प्रमुख नदी. यार्कंदसह लांबी २,०३० किमी. तारीम म्हणजे जलसिंचितभूमी किंवा सरोवराला मिळणाऱ्या नदीचा काठ किंवा मरुभूमीच्या वाळूपासून ओळखून येणारी नदी. तारीम खोऱ्याचा बराच भाग ताक्लामाकान मरुप्रदेशाने व्यापलेला आहे. तिएनशान व कुनलुन पर्वतश्रेणींदरम्यानच्या या विस्तीर्ण प्रदेशाच्या पश्चिमेस कॅश्गार व यार्कंद नद्यांचा संगम होतो. नंतर सु. ३६६ किमी. वर आकसू व आणखी ३२ किमी. वर होत्येन ऊर्फ खोतान या नद्या मिळाल्यावर नदीला तारीम नाव मिळते. यांपैकी फक्त आकसू वर्षभर वाहते. शाह्यार (शाया) पर्यंतच्या भागात ओलीतावरील लागवडी आहेत. नंतरच्या गाळप्रदेशातून जाताना नदीला फाटे फुटून दलदली व सरोवरे निर्माण होतात. काराकुम (वेली) नंतर खोरे अरुंद होऊन तारीम लॉप नॉर या क्षारदलदली सरोवराकडे जाते. गाँजो (गुंग ज्याऊ) नदीचे पाणी तारीमला मिळाले तरच लॉप नॉर भरते, नाहीतर कोरडे पडते. तारीमला डोंगरावरील बर्फाचे पाणी मिळते, परंतु इतर नद्यांप्रमाणे ती उत्तरोत्तर मोठी होत जात नाही, बाष्पीभवन आणि सिंचाई यांमुळे लहान होत जाते. तिचे पात्र वारंवार बदलते. पूर्वी तिला मिळणाऱ्या कुनलुनमधून येणाऱ्या नद्या आता मरुप्रदेशात लुप्त होतात. डिसेंबर ते मार्च तारीम गोठलेली असते. तारीम खोऱ्यात कमाल तपमान ४०° से. व पाऊस १ ते ६ सेंमी. असतो. कॅश्गार, खोतान, काराकुम (वेली) इ. मरूद्याने आहेत. तेथील ऊईगुर, उझबेक, ताजिक, किरगीझ, मंगोल इ. लोक धान्य, कापूस, रेशीम, फळे, लोकर इत्यादींचे उत्पादन करतात. तारीममध्ये मासे पुष्कळ असून भोवतीच्या मरुप्रदेशात विविध प्रकारचे पशुपक्षी आढळतात.

कुमठेकर ज. ब.