प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ति : प्रवाळद्वीपे व प्रवाळभित्ती यांची निर्मिती हा भूविज्ञानातील एक वादग्रस्त विषय आहे. प्रवाळ निर्मिती करणारे प्राणी [⟶ पोवळे] सामान्यतः ६० मी. खोलीपर्यंत व क्कचितच त्यापलीकडे वाढू शकतात परंतु पॅसिफिक व हिंदी महासागरांत एक हजार मीटर खोलीपर्यंत प्रवाळही खडक आढळतात. त्यामुळे यांची निर्मिती हे एक रहस्यच समजले जाते. 

उष्ण कटिबंधातील समुद्रांत असंख्य प्रवाळ प्राणी आढळतात. २५° ते ३०°से. तपमानाच्या पाण्यात या प्राण्यांची वाढ उत्तम होत असली, तरी २०°से. तपमानालाही त्यांची वाढ होऊ शकते. त्यांच्या वाढीसाठी पाणी उथळ असावे लागते. साधारणतः ५५ ते ६० मी. च्या खाली हे प्राणी सहसा जिवंत राहू शकत नाहीत कारण खोल समुद्रात सूर्यप्रकाश मिळू शकत नाही. क्वचित ठिकाणी हे प्रवाळ ७५ ते ८० मी. पर्यत आढळतात. समुद्राच्या पृष्ठभागावर यांची वाढ होत नाही, कारण पाण्याशिवाय ते जिवंतही राहू शकत नाहीत. पाणी स्वच्छ, गाळरहित व सामान्य क्षारतेचे असावे लागते. गोड्या व गाळमिश्रित पाण्यात यांची वाढ होत नाही. प्रवाळांच्या वाढीस आवश्यक असणारेखाद्य समुद्राकडील बाजूस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने किनाऱ्याकडील बाजूपेक्षा समुद्राकडील बाजूस या प्राण्यांची वाढ वेगाने होत असते. प्रवाळ पाणी सामान्यतः ३०° उ. ते २५° द. या अक्षवृत्तांदरम्यान वाढताना आढळतात. अपवादानेच ते या मर्यादेपलीकडेही सापडतात. उदा.,बर्म्यूडाजवळून जाणाऱ्या गल्फ स्ट्रीम या उष्ण समुद्राप्रवाहामुळे हे प्राणी ३०°उ. पलीकडेही वाढलेले आढळतात.  

 अशा प्रकारचे असंख्य प्राणी समुद्रांत एकमेकांशेजारी तरंगत असतात. या प्राण्यांची शरीरे पिशवीप्रमाणे असून त्यांच्या सांगाड्यांमध्ये चुन्याचे प्रमाण जास्त असते. एक प्राणी मेला की त्याच्याच बैठकीवर दुसरा प्राणी आपले चुनखडीचे वेष्टन तयार करतो. अशा रीतीने या प्राण्यांची मृत शरीरे समुद्रतळभागावर एकावर एक साचली जातात. हा विस्तार उभा व आडवा अशा दोन्ही दिशांनी होत राहतो. अर्थात थर जमण्याची क्रिया सुरू होण्यास प्राण्यांना कोठेतरी स्थिर खडकांचा आधार मिळावा लागतो म्हणजे सर्व बाजूंनी प्रवाळ प्राण्यांची मृत शरीरे चिकटून त्यांचा विस्तार होत जातो. वरच्या थरातील सांगाड्यांच्या वजनामुळे खालचे थर घट्ट व कठीण होतात. अशा प्रकारे एकसंध खडक तयार होतो, त्यालाच प्रवाळ खडक असे म्हणतात. हे खडक मधमाशांच्या पोळ्यांसारखे दिसतात. प्रवाळ प्राण्यांसमवेत शैवल या एकपेशीय हरित वनस्पती आढळतात. प्रवाळ प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळते तर प्रवाळ प्राण्यांना लागणारे अन्न या वनस्पती पुरवितात. अर्थात अन्नोत्पादनासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असल्याने अशा वनस्पतीचे कार्य ६० मी. खालील भागात सूर्यप्रकाश न मिळाल्याने चालू राहू शकत नाही. पर्यायाने प्रवाळ प्राणी यापेक्षा अधिक खोलवर पाण्यात जगू शकत नाहीत.  

प्रवाळ प्राण्यांमुळे तयार होणाऱ्या खडकांची निर्मिती समुद्राच्या पृष्ठभागाखालीच होते. तथापि अंतर्गत हालचालींमुळे ते पाण्याच्या पृष्ठभागावर बेटासारखे उमटतात. त्यांनाच प्रवाळबेटे किंवा प्रवाळद्वीपे असे म्हटले जाते. केरळच्या नैर्ऋत्येस असलेला मालदीव द्वीपसमूह प्रवाळबेटांचाच आहे. प्रवाळद्वीपांची उंची अत्यल्प असते परंतु त्यांची लांबी व रुंदी बरीच असते. मात्र भूहालचालींमुळे निर्माण झालेल्या प्रवाळद्वीपांची उंची कधीकधी जास्तही आढळते. या बेटांवर पाण्याबरोबर व पक्ष्यांबरोबर आलेली वनस्पतींची बीजे रुजतात, त्यामुळे ही बेटे हिरवीगार व रमणीय बनतात. नारळ-पोफळी यांसारख्या वृक्षांची वाढ येथे चांगल्या प्रकारे

प्रवाळनिर्मित ग्रीन बेट, ग्रेट बॅरिअर रीफ (ऑस्ट्रेलिया).

होते. गोड्या पाण्यासाठी मात्र येथे पावसाच्या पाण्याचा साठा करावा लागतो.  

प्रवाळ खडकांच्या उभ्या-आडव्या विस्तारातूनच समुद्रात किंवा किनाऱ्यालगत निर्माण होणारी प्रवाळ खडकांची चिंचोळी व लांबट रांग म्हणजेच प्रवाळभित्ती होय. प्रवाळभित्तीचे तीन प्रकार आढळतात: 

(अ) अनुतट प्रवाळभित्ती: या प्रकारच्या प्रवाळभित्ती समुद्रकिनाऱ्यालगत किंवा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात आढळतात. मात्र ज्या ठिकाणी फार मोठ्या नद्या मिळतात तेथे प्रवाळ खडकाची वाढ चांगल्या रीतीने होत नाही. किनारा व या भित्ती यांमध्ये अरुंद व उथळ ⇨खारकच्छ असते. या प्रवाळभित्तींची रुंदी ४०० ते २,५०० मी. पर्यंत आढळते. भित्तींचा विस्तार प्रामुख्याने समुद्राकडेच होत जातो, कारण त्या दिशेलाच पोषक द्रव्यांचा पुरवठा होत असतो. समुद्राच्या बाजूस यांचा उतारही तीव्र असतो.  

(आ) रोधक प्रवाळभित्ती : अनुतट प्रवाळभित्तींपेक्षा या भित्ती समुद्रकिनाऱ्यांपासून अधिक दूर असतात. समुद्रकिनारा आणि रोधक प्रवाळभित्ती यांमध्ये असलेले खारकच्छ बरेच लांब-रुंद असते. त्याची खोलीही जास्त (३५ से ७५ मी.) असते. खारकच्छाची रुंदी २·५ ते १६ किमी. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आढळते. या प्रकारच्या भित्तीची रुंदी ६ ते ९०० मी. पर्यंत आढळते. त्यांची लांबी जरी जास्त असली, तरी त्या एकसंध नसतात. नद्यांच्या मुखांदरम्यान ठिकठिकाणी त्या खंडित झालेल्या असतात त्यामुळे खारकच्छ व खुला समुद्र यादरम्यान वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होतात. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील सुप्रसिद्ध ⇨ग्रेट बॅरिअर रीफहे या प्रकारची उदारण होय.

प्रवाळ वेचणारे पर्यटक, ग्रेट बॅरिअर रीफ.

 ( इ) कंकणद्वीप प्रवाळभित्ती :जेव्हा रोधक प्रवाळभित्ती गोलाकार किंवा घोड्याच्या नालाच्या आकाराची असते, तेव्हा तिला कंकणद्वीप प्रवाळभित्ती असे म्हणतात. तिच्या मध्यभागी उथळ पाण्याचे खारकच्छ असते. क्वचितच खारकच्छाच्या मध्यभागी लहानसे बेटही असते. ही प्रवाळभित्ती एकसंध नसते, तर ठिकठिकाणी खंडित झालेली असते. कंकणद्वीप प्रवाळभित्ती मध्य व पश्चिम पॅसिफिक महासागरात तसेच मालदीव द्वीपसमूहात आढळतात. 


प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्तींच्या निर्मितीविषयी तीन प्रमुख उपपत्ती आहेत:(१) अधोमन उपपत्ती : प्रवाळ खडकांची रचना व निर्मिती सागराचा तळभाग खचल्यामुळे होते, हिलाच अधोमन उपपत्ती असे म्हणतात. चार्ल्स डार्विन यांनी १८४२ मध्ये ही उपपत्ती मांडली. प्रवाळ प्राण्यांच्या वसाहती प्रथम उथळ समुद्रात आढळतात. त्यांच्यापासून प्रथम अनुतट प्रवाळ खडक तयार होतात परंतु त्यानंतर तळभाग खचल्याने तळभागाबरोबर प्रवाळ प्राणीही खोल समुद्रात जातात. तेथेते मृत स्वरूपात आढळतात. वरच्या भागात प्रवाळ प्राण्यांची वाढ व प्रवाळ खडकांची निर्मिती सुरूच राहते. प्रवाळ खडकांची समुद्रकिनाऱ्याकडे होणारी वाढ व व्याप्ती यांपेक्षा ऊर्ध्वगामी वाढ व बाह्य व्याप्ती अधिक होत असल्याने प्रवाळ खडक व समुद्रकिनारा यांदरम्यान लहानसे खारकच्छ तयार होते. खचण्याची क्रिया चालू राहिल्यास प्रवाळभित्ती व किनारा यांतील वाढत जाते. कालांतराने तेथे रोधक प्रवाळभित्तींची निर्मिती झालेली आढळते. त्यामुळे येथील खारकच्छ आकाराने मोठे परंतु उथळ असते. त्यानंतर समुद्रतळ खचण्याची क्रिया चालूच राहिल्याने मध्यभागी असलेले बेट किंवा किनाऱ्याजवळील उरलेला जमिनीचा भागही जलमग्न होतो. प्रवाळ प्राण्यांच्या वाढीमुळे सर्व बाजूंनी तयार झालेली भित्ती गोलाकार स्वरूप धारण करते व कंकणाकृती प्रवाळशैलभित्ती बनते. 

 या उपपत्तीनुसार प्रवाळ खडक निर्मितीत सागरतळ खचण्याची क्रिया महत्त्वाची आहे. ही खचण्याची क्रिया एकदम न होता टप्प्याटप्प्याने होत असते. त्या वेळी प्रवाळ खडकांची वाढ वरच्या दिशेने होत राहते. १९-२० व्या शतकांतील अमेरिकन भूवैज्ञानिक डेव्हिस व डेना यांनीही या उपपत्तीचा पुरस्कार केला. 

 ( २) निमज्जन अथवा स्थिरमंच उपपत्ती :ज्या ठिकाणी अधोगमन प्रक्रियेचा पुरावा मिळत नाही पण जेथे प्रवाळभित्ती खोलवर आढळतात, त्याच्या स्पष्टीकरणासाठी १९ व्या शतकात ब्रिटिश सागरी प्राणिशास्त्रज्ञ मरी याने ही उपपत्ती मांडली आणि झेंपर, अगास्सिझ या जर्मन व स्विस प्रकृतिवैज्ञानिकांनी तिला पुष्टी दिली. कोणत्याही समुद्रतळभागावर प्रवाळ प्राण्यांच्या वाढीस आवश्यक नैसर्गिक परिस्थिती असल्यास, तेथे प्रवाळ खडकांची निर्मिती होत असते हे या उपपत्तीचे मध्यवर्ती सूत्र आहे. ६० मी. खोलीच्या समुद्रतळभागावर प्रवाळ खडकांची निर्मिती होते. समुद्रतळभागावरील काही उंचवटे ६० मी. पेक्षा जास्त खोलीवर, तर काही त्यापेक्षा कमी खोलीवर असतात. यापेक्षा जास्त खोलीवर असणाऱ्या उंचवट्यावर सागरी निक्षेप साचत जाऊन तो उंचवटा पाण्याच्या पातळीपासून ६० मी. खोलीपर्यत उंच होतो व त्यानंतर त्यावर प्रवाळ खडकांची निर्मिती सुरू होते. तसेच जे उंचवटे ६० मी.पेक्षा कमी खोलीवर आहेत, अशा उंचवट्यांची सागरी लाटांमुळे ६० मी. खोलीपर्यंत झीज होताच, त्यांवर प्रवाळ प्राण्यांची वाढ सुरू होते. अशा प्रकारे प्रथम अनुतट प्रवाळ खडक तयार होतात. त्यांच्या काही भागांची झीज होऊन त्यांचे खडकांच्या पायथ्याशी संचयन होते. त्यामुळे प्रवाळ खडकांची वाढ समुद्रपृष्ठभागास समांतर दिशेने होत जाते. त्यापासून प्रथम रोधक प्रवाळ खडक आणि नंतर कंकणाकृती प्रवाळ खडकांची निर्मिती होते. 

(३) हिमानीय नियमन उपपत्ती : ही उपपत्ती अमेरिकन भूवैज्ञानिक डेली (१८७१–१९५७) याने १९१५ मध्ये मांडली. त्याच्या मते प्लाइस्टोसीन हिमयुगात तपमान खूप कमी असल्याने पाणी गोठून समुद्रपातळी सु. १०० मी. खाली होती. त्यामुळे फक्त विषुववृत्तीय प्रदेशातच प्रवाळांची वाढ शक्य होती. हिमयुगाच्या कालखंडानंतर अधिक तपमानामुळे बर्फ वितळून सागरजलाची पातळी व पाण्याचे तपमान वाढले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहिलेल्या प्रवाळ प्राण्यांपासून त्यांच्या नवीन वसाहती वाढू लागल्या. जो जो पाण्यावी पातळी वाढत गेली, तसतसा प्रवाळ खडकांचा ऊर्ध्वगामी विस्तारही वाढत गेला. अशा रीतीने रुंद चबुतऱ्यावरील अरुंद प्रवाळभित्ती व त्यांची बरीच जास्त खोली यांचे स्पष्टीकरण देता येते. मात्र हजार मी. खोलीपर्यंत प्रवाळभित्ती कशा पोहोचतात, हे या उपपत्तीने स्पष्ट होत नाही.  

यांशिवाय एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लेकाँट (अमेरिकन कीटकवैज्ञानिक), गपी, व्हान इत्यादींनी प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्तींच्या निर्मितीविषयी अभ्यास केलेला आहे. वरील तीन उपपत्तींपैंकी डार्विनची उपपत्ती अधिक प्रमाणभूत मानली जाते. प्रवाळ खडकांच्या वाढीची कल्पना या उपपत्तीने अधिक स्पष्ट होते. प्रवाळद्वीपांचे व प्रवाळभित्तींचे स्पष्टीकरण देण्यासाठी या सर्व उपपत्तींचा समन्वय साधणे आवश्यक आहे.  

पहा : कंकणद्वीप खारकच्छ ग्रेट बॅरिअर रीफ पोवळे.

संदर्भ : 1. Easterbook, D. J. Principles of Geomorphology , New York , 1969.

         2. Lobeck, A. K. Geomorphology, New York , 1939.

         3. Monkhouse, F. J. Principles of Physical Geography, London, 1962.

         4. Strahler, A. N. Physical Geography, New York , 1971.

डिसूझा, आ. रे. चौधरी, वसंत