शिपका खिंड : बल्गेरियातील बाल्कन पर्वतश्रेणीमधील एक इतिहासप्रसिद्ध खिंड. मध्य बल्गेरियात १,३३४ मी. उंचीवर अगदी मोक्याच्या ठिकाणी ही खिंड असल्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे. रशिया–तुर्कस्तान युद्धकाळात (१८७७-७८) या खिंडीत घनघोर लढाई झाली होती. उत्तरेस डॅन्यूब नदीकाठावरील रुसेपासून दक्षिणेस स्टारा झागॉरामार्गे तुर्कस्तानातील एदिर्नेपर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर ही खिंड आहे. या खिंडीतून लोहमार्गही काढण्यात आला आहे. खिंडीच्या उत्तरेस गाब्राव्हॉ तर दक्षिणेस काझानलक ही नगरे आहेत.

रशिया–तुर्कस्तान युद्धाच्या प्रारंभी तुर्की फौजांनी शिपका खिंडीचा ताबा घेतला परंतु रशियन जनरल आय. व्ही. गुर्क याने जुलै १८७७ मध्ये अचानक हल्ला करून ही खिंड ताब्यात घेतली. पुढे ७,५०० बल्गेरियन स्वयंसेवकांच्या मदतीने रशियान फौजांनी तुर्की जनरल सुलेमान पाशाच्या ३०,००० सैन्याशी झुंज दिली. ही लढाई सप्टेंबरच्या अखेरपर्यंत चालली. जानेवारी १८७८ मध्ये जनरल एफ. एफ. रॅडेट्स्की याने तुर्की सैन्यावर शिपका खिंडीत हल्ला चढविला. सुलेमान पाशानंतर सत्तेवर आलेल्या जनरल व्हेसिल पाशाने अखेर माघार घेतली (९ जानेवारी १८७८). या लढाईत रशियाचे ५,५०० तर तुर्कस्तानचे सु. १३,००० सैनिक धारातीर्थी पडले.

चौधरी, वसंत