वीसांबूर : फ्रान्सच्या बास – ऱ्हाईन विभागातील एक इतिहास प्रसिध्द नगर. लोकसंख्या ३०,३८४ (१९९०). देशाच्या ईशान्य भागात जर्मन सरहद्दीजवळ वसलेले वीसांबूर स्ट्रॅस्‌बर्ग शहराच्या ईशान्येस सु. ६५ किमी. वर आहे. इ. स. सातव्या शतकात ऑस्ट्रेशियाचा राजा दुसरा डॅगबर्ट याने ‘बेनेडिक्टाइन ॲबी’ (विहार) ची येथे स्थापना केली व पुढे तेराव्या शतकात तेथे चर्च उभारण्यात आले. जर्मन कवी ओटफ्रीड याने एव्हान्गेलीएनबूख हे ख्रिस्तजीवनावर आधारलेले, ओल्ड हाय जर्मन भाषेतील काव्य ८६८ च्या सुमारास येथे पूर्ण केले. येथे झालेल्या दोन महत्त्वाच्या लढायांत ऑक्टोबर १७९३ मध्ये फ्रेंचांनी ऑस्ट्रियाचा काउंट वर्मझर याचा पराभव केला व ऑगस्ट १८७० च्या लढाईत मॅकमहोनच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्याचा प्रशियनांनी (जर्मन) पराभव केला. वीसांबूर हे सरहद्दीवरील ‘सीमाशुल्क केंद्र’ असून येथे अन्नपरिरक्षण, फर्निचर, रबर निर्मिती इ. उद्योग चालतात.  

       चौंडे, मा. ल.