जेद्दा : जिद्दा. सौदी अरेबियाच्या हेजॅझ प्रांतातील महत्त्वाचे आयात बंदर. लोकसंख्या ३,००,००० (१९७२ अंदाज). हे तांबड्या समुद्रावर असून येथूनच यात्रेकरू मक्केला जातात. जेद्दा ते मक्का अंतर सु. ७४ किमी. असून ही दोन शहरे चांगल्या सडकेने जोडलेली आहेत. शहराचे भोवती मोठा तट असून त्याला सहा दरवाजे आहेत. तेथे विमानतळ असून यात्रेकरूंना लागणाऱ्या विविध वस्तूंचे उत्पादन येथे होते. तसेच मच्छीमारी, मोती काढणे इ. व्यवसायही चालतात. डिसेंबर १९२५ मध्ये इब्न सौदने ते ब्रिटिशांकडून जिंकून घेतले.
लिमये, दि. ह.