ब्रह्मपुत्र नदी : आशियातील ही एक प्रमुख नदी तिबेटमध्ये उगम पावून ईशान्य भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळते. लांबी २,९०० किमी. पाणलोट क्षेत्र ९,३५,५०० चौ. किमी. हिमालयाच्या कैलास पर्वतश्रेणीत सस. पासून ७,२०० मी. उंचीवर (८२० १०’ पू. रेखांश व ३०० ३१ ’ उ. अक्षांश) चेमा-युंगडुंग या हिमनदीतून ब्रह्मपुत्रा उगम पावते. हे उगमस्थान मानसरोवरापासून सु. १०० किमी. तर सिंधू नदीच्या उगमापासून सु. १६० किमी. अंतरावर आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांतील उल्लेखांनुसार ब्रह्मपत्रेचा उगम मिचिनू पर्वतातल्या ब्रह्मकुंडातून झाल्याचे मानले जाते. कुबी, आंगसी व चेमा-युंगडुंग हे या नदीचे तीन शीर्ष प्रवाह होत.

भारतात ब्रह्मपुत्र महानद असाच या नदीचा निर्देश करण्यात येत असे. या नदीशी अनेक आख्यायिका निगडित असून त्या महाभारत, कालिकापुराण, कालिदासाचा रघुवंश यांसारख्या संस्कृत साहित्यातूनआढळतात. ‘लौहित्य’ (म्हणजे लाल रंगाची) असेही तिचे नाव असून परशुरामाने क्षत्रिय संहाराने रक्तरंजित झालेला परशू ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहात धुतल्याने तिचे पाणी लाल झाले, अशी एक आख्यायिका आहे. आसाममधील आहोमांच्या राजवटीत रूढ असलेल्या आहोम भाषेत तिला ‘नाम-दाओ-फी’ म्हणजे ‘तारकांची नदी’ असे नाव होते. ‘बुलुम बुथुर’ म्हणजे बुडबुड्यांची नदी या तिच्या मूळ नावाचे संस्कृतीकरण होऊन ब्रह्मपुत्र हा शब्द बनला असावा. आसामी लोक अनेकदा ‘दर्याच’ म्हणून तिचा उल्लेख करतात.

नकाशा


ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो (म्हणजे शुद्ध करणारी), भारताच्या अरुणाचल प्रदेशात दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगला देशात जमुना असे म्हणतात. चिनी लोक हिला या-लू-त्सांगपू चिअँग या नावाने ओळखत असून तिबेटमध्ये तिला काही स्थानिक नावेही आहेत.

उगमानंतर ही नदी दक्षिणेकडील हिमालयाची मुख्य पर्वतश्रेणी व उत्तरेकडील नीएन-चेन-टांगला पर्वतश्रेमी यांच्यामधून हिमालयाच्या मुख्य श्रेणीला समांतर अशी पश्चिम-पूर्व देशेने वाहत जाते. तिबेट मधील ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण प्रवाह सु. १,२९० किमी. आहे. या भागातील पी ठिकाणापासून पुढे ती एकदम ईशान्यवाहिनी होऊन ग्याल परी व नामचा बारवा या पर्वतीय प्रदेशातील मोठमोठ्या खोल व अरुंद निदऱ्यांमधून उड्या घेत वाहू लागते. तेथे प्रवाहमार्गात अनेक द्रुतवाह व प्रपातमाला आढळतात. नंतर ती दक्षिणवाहिनी होऊन हिमालय पार करते व भारतात प्रथम सिआँग व पुढे दिहांग नावांनी प्रवेश करते. तिबेटमध्ये त्सांगपोला डावीकडून जो-का त्सांगपू (रागा त्सांगपो), ला-सा हो(चीचू), नि-यांग हो (ग्यामडा चू) तर उजवीकडून न्येन-चू हो (न्यांग) ह्या उपनद्या येऊन मिळतात. चीचू या उपनदीतीरावरच ल्हासा हे तिबेटच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भारतात सदियाजवळ तिला दिबांग व लुहित या उपनद्या मिळाळ्यावर ती नैऋत्यवाहिनी होते व येथून पुढे ती ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. येथूनच तिचे पात्र विशाल होऊन त्यात अनेक बेटांचीही निर्मिती झाल्याचे आढळते. माजुली हे अंतर्गत मोठ्या बेटांपैकी एक बेट या नदीमुळेच निर्माण झाले आहे. आसाममध्ये ब्रह्मापुत्रेचा एक फाटा खेरकुटिया नावाने ब्रह्मपुत्रेपासून वेगळा होतो. पुढे हा फाटा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या सुबनसिरी नदीसह धनसिरीच्या मुखासमोरच मूळ प्रवाहाला येऊन मिळतो. यामुळे ब्रह्मपुत्रेचा मूळ प्रवाह व तिचा खेरकुटिया हा फाटा यांदरम्यान माजुली या १,२५६.१५ चौ. किमी. क्षेज्ञाच्या बेटाची निर्मिती झाली आहे. ब्रह्मपुत्रेला भारतात उत्तरेकडून सुबनसिरी, भरेळी, मानस, चंपावती, सरलभंगा, कोपिली या उपनद्या येऊन मिळतात. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे ‘आसामचे खोरे’ म्हणून ओळखले जाते. या खोऱ्याची लांबी सु. ७५० किमी. व रुंदी सरासरी ८० बांगला देशात प्रवेश करताच जमुनेला उत्तरेकडून तोरसा, जलढाका, तिस्ता या उपनद्या येऊन मिळतात. पुढे गायबांडच्या दक्षिणेस जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीपासून जुनी ब्रह्मपुत्रा हा नदीप्रवाह वेगळा होतो. हाच ब्रह्मपुत्रा नदीचा मूळ प्रवाहमार्ग होय. हा प्रवाहमार्ग जमालपूर व मैमनसिंगवरून आग्नेय दिशेने वाहत गेल्यावर पुढे भैरवबाझारजवळ मेघना नदीला मिळतो तर जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीचा सध्याचा मुख्य प्रवाह दक्षिणेस वाहत जाऊन ग्वालंदोच्या उत्तरेस गंगा नदीला मिळतो. तत्पूर्वी जमुनेला बारल, अत्राई, हुरासागर यांचा संयुक्त प्रवाह उजवीकडून येऊन मिळतो. तसेच धालेश्वरी व बडी गंगा या शाखा तिच्यापासून वेगळ्या होऊन स्वतंत्रपणे मेघना नदीला मिळतात. ग्वालंदोपासूनचा गंगा-जमुना यांचा संयुक्त प्रवाह पद्मा नदी म्हणून ओळखला जातो. पुढे पद्मा नदीला उत्तरेकडून मेघना येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना खाडीमधून व इतर उपप्रवाहांमधून ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्रह्मपुत्रेच्या वरच्या टप्प्याविषयी अज्ञानच होते. किंबहुना त्सांगपो व दिहांग (ब्रह्मपुत्रा) ही एकच नदी आहे. याबद्दल साशंकता होती. भारतीय सर्वेक्षक किनथप याने १८८४ साली व जे. एफ्. नीडम याने १८८६ मध्ये या नदीचे समन्वेषण केले. विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत अनेक ब्रिटिश संशोधक तुकड्यांनीही झीकोत्सेपर्यंतच्या त्सांगपोच्या प्रवाहाचे समन्वेषण केले.

ब्रह्मपुत्रेचे तिबेटमधील खोरे रुक्ष, कोरडे व थंड हवामानाचे, तर बांगला देश व आसाममधील खोरे उष्ण व आर्द्र हवामानाचे आहे. आसामच्या खोऱ्यातील बराचसा प्रदेश रेझिन उत्पादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या साल वृक्षांच्या अरण्यांनी व्यापलेला आहे. दलदलीच्या भागात वेताची जंगले, तर वसाहतीच्या परिसरात फळझाडे आढळतात. बांबूची वने सर्वत्रच आहेत. एकशिंगी गेंडा हा दुर्मिळ प्राणी प्रामुख्याने आसामच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतो. याशिवाय वाघ व हत्तीही या खोऱ्यात आहेत.

तिबेटमधून वाहत असताना गाळाचे प्रमाण कमी असल्यामुळे त्सांगपो नदीचे पाणी स्वच्छ असते. परंतु भारतात मात्र अनेक उपनद्यांमुळे या नदीतील पाणी, त्याचा वेग व गाळाचे प्रमाणही वाढलेले आढळते. आसामचे खोरे उत्तर, पूर्व व दक्षिण बाजूंनी २५० सेंमी. पेक्षा जास्त पर्जन्यमान असलेल्या टेकड्यांनी वेढलेले आहे. आसाम व बांगलादेशात हिमालयातून वाहत येणाऱ्या उपनद्यांची संख्याही खूप असल्याने पाण्याचे प्रमाणही प्रचंड झालेले आहे. त्यामुळे वारंवर गंभीर पूरस्थिती उद्भ वते. संपूर्ण भाग जलमय होतो. पावसाळ्यात तर गोआलपाडा येथे नदीतून प्रतिसेकंदास १४,१५८ घ.मी. पाणी वाहत असते. नदीच्या पात्राची रुंदीही ९.६ किमी. पर्यंत वाढलेली आढळते. दरवर्षी खंडोगणती गाळ वाहून आणून त्याचे संचयन झाल्याने नदीचा तिसरा टप्पा अत्यंत सुपीक बनला आहे. १९५० मध्ये झालेल्या भूकंपात हिमालयाच्या उतारावर मोठ्या प्रमाणात झालेल्या भूमिपातामुळे पाण्याची पातळी एकाएकी वाढून पूरपरिस्थिती धोकादायक बनली होती. १९५० पासून १९७० पर्यंत (१९५१, ५२ व ५८ वगळता) दरवर्षी पूरपरिस्थिती अधिकाधिक गंभीर होत गेलेली दिसते. पुरामुळे बराचसा भाग दलदलमय बनला आहे. दलदलीच्या प्रदेशात जमिनीपासून उंचावर बांबूची घरे बांधलेली आढळतात. दक्षिणेपेक्षा उत्तरेकडून वाहत येणाऱ्या उपनद्या अधिक पाणी व गाळ वाहून आणत असल्याने ब्रह्मपुत्रेचे पात्र थोडेथोडे दक्षिणेकडे सरकत असलेले आढळते.

एकोणिसाव्या शतकापासून बंगालमधून आसामच्या खोऱ्याकडे अनेक लोकांनी स्थालंतर केलेले असल्यामुळे बंगाली लोकांची संख्या तेथे जास्त आढळते. हे स्थलांतरित लोक सुपीक जमिनीवर शेती व्यवसाय करतात. आजही आसामच्या खोऱ्यात शेजारील देशांतून येणारे स्थालंतरित ही एक अत्यंत चिंतेची बाब बनली आहे.


ब्रह्मापुत्रा नदी तसेच तिच्या उपनद्यांमुळे होणरी धूप व पूरपरिस्थिती आटोक्यात आणणे निकडीचे आहे. १९५४ पासून पूरनियंत्रक प्रकल्पांच्या, बंधाऱ्यांच्या व नदीकाठांवर बांध घालण्याच्या कामाला आरंभ झाला आहे. भारत सरकारने ३१ डिसेंबर १९८१ रोजी ‘ब्रह्मपुत्रा मंडळ’ नेमले असून त्याचे मुख्यालय गौहाती येथे ठेवण्यात येणार आहे. पूरनियंत्रण, नदी खोऱ्याची धूप कमी करणे, जलनिःसारणातील सुधारणा, जलसिंचन, वीजनिर्मिती, जलवाहतूक इ. उपयुक्त सोयींच्या विकासाची सर्व कार्ये या मंडळाकडे सोपविण्यात आली आहेत. जलविद्युतनिर्मितीची क्षमता भरपूर असली, तरी प्रत्यक्षत नदीचा विशेष वापर करून घेतलेला आढळत नाही. मात्र गौहातीजवळील बरपणी व उमिअम हे एकूण सु. ६०,००० किवॉ विद्युतनिर्मिती क्षमता असलेले दोन प्रकल्प उल्लेखनीय आहेत. आसाममधील चहाचे मळे, खनिज तेल, कोळसा, नैसर्गिक वायू व बांगला देशातील ताग ही ब्रह्मपुत्रेच्या खालच्या टप्प्यातील प्रमुख आर्थिक संपदा आहे. नदीच्या पाण्याचा वाहतुकीसाठी भरपूर वापर करून घेतला, तर या संपत्तीचा अधिक चांगल्या द्रुतवाह व धबधब्यांमुळे वाहतुकीस उपयोगी ठरता नाही. आसामचा सु. ५५ % व्यापार या नदीमार्गातून चालतो.

ब्रह्मपुत्रा नदीवर बहुधा पूल नाहीतच. त्यामुळे रस्ते व लोहमार्ग प्रामुख्याने नदीपात्राला समांतर गेलेले आढळतात. १९६३ मध्ये गौहातीजवळ एक पूल बांधण्यात आला आहे. आसाममधील सदिया, दिब्रुगड, जोरहाट, तेझपुर, गौहाती, गोआलपाडा व धुब्री तर बागंला देशातील कुडिग्राम, रहुमारी, चिलमारी, बहादुराबाद घाट, फुलचरी, सरिशाबारी, जगन्नाथगंज घाट, नगरबारी, सिराजगंज व ग्वालंदो ही ब्रह्मपुत्रा नदीतीरावरील प्रमुख शहरे असून नदी पार करण्याच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहेत.

संदर्भ :

1. Bose, S. C. Geography of The Himalaya, New Delhi, 1972. 2/ Dey, N. L.

2. The Geographical Dictionary of Ancient and Medieval India, New Delhi, 1971. 3.

3. Misra, S. D. Rivers of India, New Delhi, 1970.

चौधरी, वसंत