स्टॅन्ली, सर हेन्री : (२८ जानेवारी १८४१—१० मे १९०४). मध्य आफ्रिकेचा ब्रिटिश-अमेरिकन संशोधक व समन्वेषक. याचे मूळ  नाव जॉन रोलँड्झ होते. त्याचा जन्म वेल्समधील डेन्बी येथे झाला. स्टॅन्ली अनौरस पुत्र असल्यामुळे व त्याच्या आईच्या दुर्लक्षामुळे त्याचे बालपण  एकाकी गेले. तो वयाच्या पंधराव्या वर्षी गलबतावरील नोकर म्हणून लिव्हरपूलहून न्यू ऑर्लीअन्सला आला. तेथे त्याची भेट हेन्री होप स्टॅन्ली या व्यापार्‍याशी झाली. त्या व्यापार्‍याने त्याला दत्तक घेतले. त्याचेच नाव हेन्रीने स्वतःस लावले.

सर हेन्री स्टॅन्लीअमेरिकेच्या यादवी युद्धात व नंतर नौदलात सेवा केल्यानंतर (१८६१—६४) तो न्यूयॉर्क हेरॉल्ड या वृत्तपत्राचा वार्ताहर म्हणून काम करू लागला. या वृत्तपत्राच्या संस्थेने त्याला स्कॉटिश समन्वेषक व धर्मोपदेशक ⇨ डेव्हिड लिव्हिंग्स्टन याच्या शोधार्थ आफ्रिकेला पाठविले. १८७१ मध्ये स्टॅन्ली झांझिबारमार्गे न्यांग्वे येथे पोहचला. तेथे त्याची लिव्हिंग्स्टनशी भेट झाली ( नोव्हें.१८७१). त्याअनुषंगाने त्याने लिहिलेले हाऊ आय फाउंड लिव्हिंग्स्टन (१८७२) हे पुस्तक विशेष गाजले. १८७४—७७ या काळात स्टॅन्लीने व्हिक्टोरिया सरोवराची जहाजातून परिक्रमा केली आणि एडवर्ड सरोवराचा शोध लावला. यावेळी त्याने मध्य आफ्रिकेपासून काँगो नदीमार्गाने तिच्या मुखापर्यंत ९,७०० किमी. पेक्षा जास्त प्रवास केला. या अनुभवाचे कथन त्याने थ्रु द डार्क कॉन्टिनेन्ट (१८७८) या पुस्तकात केले आहे. यानंतर थोड्या कालावधीसाठी त्याने बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याच्याकडे नोकरी केली. नंतर तो पुन्हा अफ्रिकेत गेला. १८७९—८४ या कालावधीत त्याने काँगोमध्ये बर्‍याच सुधारणा केल्या. त्यामुळे तो प्रसिद्धीस आला. आफ्रिकेतील वास्तव्याच्या उत्तरार्धात त्याने ईजिप्तच्या एमिन पाशाची सुटका केली. 

  १८९० मध्ये स्टॅन्ली इंग्लंडला परतला आणि त्याचवर्षी तेथील डेरोथी टेन्नंट नामक स्त्रिशी त्याने विवाह केला. त्यास ब्रिटिश नागरिकत्व मिळाले आणि तो ब्रिटिश संसदेचा सभासद झाला. १८९९ मध्ये ब्रिटनने त्यास ‘ सर ’ ही पदवी देवून त्याचा सन्मान केला.

 लंडन येथे त्याचे निधन झाले.                

कुंभारगावकर, य. रा.