कोचीन : भारताचे केरळ राज्यातील प्रमुख बंदर व केरळच्या एर्नाकुलम् जिल्ह्याचे ठाणे. दक्षिणेस याला लागून असलेले मत्तानचेरी बंदरातील विलिंग्डन बेट, एडापल्ली व पूर्वकडील सरोवराच्या पश्चजलफाट्यापलीकडील एर्नाकुलम् यांसह या सर्व शहरगटाची मिळून लोकसंख्या ४,३९,०६६ (१९७१) आहे. हे मदुराईच्या पश्चिमेस २०० किमी. व त्रिवेंद्रमच्या उत्तरवायव्येस १८६ किमी. वर वेंबनाड सरोवराच्या उत्तर टोकाजवळ पश्चिमेकडील चिंचोळ्या भूमीच्या टोकाशी वसलेले आहे. विलिंग्डन बेटावरून लोहमार्गपुलाने ते ३ किमी. पलीकडील एर्नाकुलम्‌शी जोडलेले आहे. दक्षिण रेल्वेचे हे एक अंतिम स्थानक आहे. कोचीन व त्याच्या उत्तरेकडील वायपीन बेट यांमधील वाळूचा बांध फोडून १९३२ पासून हे बंदर मोठ्या सागरगामी नौकांस खुले केले आहे. केरळ व पश्चिम तमिळनाडू येथील नारळ, काथ्याचे दोर, चटया, खोबरे, रबर, चहा, गवती चहाचे तेल, मिरी, सुंठ इत्यादींची येथून निर्यात होते. आधुनिक बंदराच्या सोयी येथे उपलब्ध आहेत. मत्स्योत्पादन, शार्क तेल प्रक्रिया, प्लायवुड, सैनिकी कापड, जहाजदुरुस्ती, जहाजांस कोळसा किंवा तेल पुरविणे, हॉटेले चालविणे इ. व्यवसाय येथे वाढत आहेत. मात्र येथील मूळचे पाणी हत्तीरोगकारक आहे. येथे विमानतळ व मोठे नाविक शिक्षणकेंद्र आहे. येथे सुरू होणाऱ्या जहाजबांधणी कारखान्याचा पाया महामंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी एप्रिल १९७२ मध्ये घातला. मत्तानचेरी येथूनही व्यापार चालतो. ते कोचीनच्या ३८८ पासूनच्या जुन्या यहुदी वस्तीचे केंद्र आहे. पोर्तुगीजांनी येथील राजासाठी १५१५ मध्ये बांधलेल्या राजवाड्यात हिंदू पौराणिक कथांची भित्तिचित्रे आहेत.

पश्चजल कालव्याचे एक दृश्य, कोचीन

एर्नाकुलम् ही जुन्या कोचीन संस्थानाची राजधानी होती. १९६१ मध्ये तेथील लोकसंख्या १,१७,२५३ होती. ऋषिनागकुलम् या प्राचीन मंदिरामुळे येथे वस्ती झाली अशी आख्यायिका आहे. येथील वस्ती प्रामुख्याने हिंदू व ख्रिश्चन यांची असली तरी यहुदी, मुसलमान आणि शीखही येथे आहेत. हे शहर नेटके असून येथे समांतर रस्ते, महाराजांचे व आर्चबिशपचे भव्य प्रासाद, कॅथीड्रल, केरळचे वरिष्ठ न्यायालय, दरबार हॉल, टाउनहॉल, राजेंद्र मैदान, सुभाष बोस, टिळक व ॲनी बेझंट उद्याने, बोटींचा धक्का अशी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. साबण, अत्तरे, खाद्यतेले, ग्लिसरीन, कौले, नारळ आणि मासे यांवर आधारलेले उद्योग, केरोसीन प्रक्रिया व ते डबाबंद करणे, लाकूड कापण्याच्या गिरण्या, खनिजतेलशुद्धी व नौकाबांधणी हे उद्योग चालतात. मसाले आणि काजू यांच्या संशोधनसंस्था, नौसेना व वायूसेना यांचे संरक्षक तळ आणि अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालये येथे असून हे विद्येचे एक प्रमुख केंद्र मानण्यात येते. केरळच्या ‘ओणम्’ उत्सवात होणाऱ्या नाविक स्पर्धांत ३२ वल्ह्यांच्या ५० वर नागनौका भाग घेतात. ते पाहण्यास लाखावर प्रेक्षक येथे जमतात.

चौदाव्या शतकापासून प्रसिद्ध असलेल्या कोचीनचा उल्लेख जोदर्नस, इब्न बतूता, चिनी आणि फारशी प्रवासी यांच्या प्रवासवर्णनांत आढळतो. १५०० मध्ये काब्राल हा पोर्तुगीज दर्यावर्दी येथे येऊन गेला. १५०२ मध्ये वास्को द गामा याने येथे वखार स्थापिली. त्याचे थडगे येथे आहे, परंतु देह मात्र पोर्तुगालला नेऊन पुन्हा पुरला आहे. १५०३ मध्ये अल्बुकर्कने येथे किल्ला बांधला. तो यूरोपीयांचा भारतातील पहिला किल्ला होय. १५३० मध्ये सेंट झेव्हिअरने येथे आपले कार्य सुरू केले. १५७७ मध्ये जेझुइटांनी देशी लिपीतले पहिले पुस्तक येथे छापले. १६३५ मध्ये ब्रिटिश येथे आले परंतु १६६३ मध्ये डचांनी त्यांस हुसकले. डचांच्या अमदानीत कोचीनचे व्यापारी महत्त्व वाढले. आजही शहरातील तेव्हाची डच पद्धतीची घरे प्रक्षेणीय आहेत. १७७६ मध्ये कोचीन हैदर अलीच्या सत्तेखाली होते. १७९५ मध्ये टिपूकडून ब्रिटिशांनी ते घेतले व तेथील तटबंदी पाडून टाकली. १८१४ मध्ये डचांनी ते रीतसर ब्रिटिशांस दिले. १९३६ मध्ये हिंदुस्थान सरकारने बंदराची व्यवस्था आपल्याकडे घेतली व कोचीन हे देशाचे एक प्रमुख बंदर म्हणून घोषित केले. १९५६ मध्ये केरळ राज्य निर्माण होण्यापूर्वी ते त्रावणकोर-कोचीन संस्थानात होते.

ओक, शा. नि.