कांडला : गुजरात राज्यातील कच्छ आखातावरील भारताचे नवीन बंदर. लोकसंख्या १७,५०२ (१९७१). हे अंजारच्या आग्नेयीस १९ किमी. आहे. लोहमार्गाने व सडकेने दीसा स्थानकाला कांडला जोडल्यामुळे उत्तर भारताच्या सात ते आठ लाख चौ.किमी. क्षेत्रातील आयात निर्यातीची सोय झाली आहे. कराची बंदर पाकिस्तानकडे गेल्यानंतर मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी या बंदराची वाढ करण्यात आली. लांब लांब मालधक्के, खोल पाणी, मोठमोठी गुदामे, विजेच्या याऱ्या व इतर आधुनिक यंत्रसामग्री, लोहमार्ग, रस्ते, तेलसाठ्यांची व्यवस्था अशा अनेक अद्ययावत सोयींनी कांडला बंदर सुसज्ज आहे. नजीकच सिंधमधील निर्वासितांसाठी अमेरिकन नगररचनातज्ञांनी पाऊण ते दीड लाख वस्तीकरिता बांधलेले गांधीधाम कांडलाचाच भाग समजला जातो.

कांडला बंदर : एक दृश्य

ओक, शा. नि.

Close Menu
Skip to content