पेरॉस : ग्रीसच्या सिक्लाडीझ द्वीपसमूहातील पांढऱ्या संगमरवरी दगडांसाठी प्रसिद्ध असलेले बेट. लांबी १९ किमी., रुंदी १० किमी. लोकसंख्या ६,७७६ (१९७१). हे इजीअन समुद्रात नॅक्सॉस बेटाच्या पश्चिमेस सु. ७ किमी. असून बेटावर आयॉसीलीअस (प्राचीन-मार्पेसा) हा ७७१ मी. उंचीचा एकच डोंगर आहे. डोंगराच्या उत्तर भागात अर्धपारदर्शक संगमरवरी दगडांच्या खाणी असून प्राचीन पेरॉसचे चे संपत्तीचे साधन होते. त्यातील संगमरवराचा उपयोग प्राचीन ग्रीक शिल्पकलेत इ. स. पू. सहाव्या शतकापासून केलेला आढळतो.

पेरॉस हे ब्राँझ युगातील असावे. येथे प्रथम आर्केडियनांनी व नंतर आयोनियनांनी वसाहती केल्याचे मानतात. या बेटावरील पेरॉस हे प्रमुख शहर (लोकसंख्या १,९५५-१९७१) असून आयोनियनांनी ते वसविले. त्या काळात एक बंदर, सागरी सामर्थ्याचे प्रतीक आणि इजीअन समुद्रमार्गांवरील वाहतूक केंद्र म्हणून पेरॉस शहराचा खूपच विकास झाला. इ. स. पू. पाचव्या शतकात ते ग्रीक साम्राज्याला जोडले गेले. मध्ययुगात नॅक्सॉसांच्या, तर १५३७ ते १८३२ पर्यंत ते तुर्कांच्या ताब्यात होते. ग्रीसच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ते ग्रीसला जोडण्यात आले.

पेरॉस बेटावर १६२७ मध्ये झालेल्या उत्खननात सापडलेला पेरियन क्रॉनिकल हा संगमरवरी शिलालेख महत्त्वाचा मानतात. या शिलालेखावर इ. स. पू. १००० ते ३५४ पर्यंतच्या ग्रीक इतिहासाचे संक्षिप्त वर्णन आढळते. याचे दोन तुकडे असून एक इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे व दुसरा पेरॉस येथील संग्रहालयात आहे. बेटावर प्राचीन काळातील संगमरवराच्या खाणी, मध्ययुगीन किल्ला, आयोनिक मंदिर (सहावे शतक), पेरॉस शहराजवळील अपोलो व आर्टेमिस देवतांची प्राचीन मंदिरे, चर्च इत्यादींचे अवशेष आढळतात. या बेटाच्या नैर्ऋत्येस अँटिपेरॉस बेटावरील चुनखडकातील गुहा प्रसिद्ध आहेत. पेरॉस बेटावर कापूस, द्राक्षे, रताळी, तंबाखू, ऑलिव्ह, अंजिरे, विविध धान्ये इ. पिके घेतली जातात.

खांडवे, म. अ. चौंडे, मा. ल