साबा : उत्तर बोर्निओ. बोर्निओ बेटावरील मलेशियाचे एक प्रमुख राज्य. ब्रिटिश वसाहतकाळात (१९६३ पर्यंत) हा भूभाग उत्तर बोर्निओ या नावाने परिचित होता. बोर्निओ बेटाच्या उत्तर भागात हे राज्य असून त्याचा समावेश पूर्व मलेशियात होतो. साबाच्या नैर्ऋत्येस मलेशियाचे सारावाक राज्य, वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, ईशान्येस सूलू समुद्र व त्यातील फिलिपीन्स बेटे, पूर्वेस सेलेबीझ समुद्र आणि दक्षिणेस इंडोनेशियाचा बोर्निओ (कालीमांतान ) भाग आहे. साबाचे क्षेत्रफळ ८०,५२० चौ. किमी. व लोकसंख्या ३१,१७,४०५ (२०१०) आहे. राज्याला एकूण १,४५० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोटा किनाबालू (लोक. ४,५२,०५८–२०१०) हे राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : पर्वतीय व उच्चभूमी प्रदेश, मैदानी भाग आणि किनारी दलदलयुक्त प्रदेश असे साबाचे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग पडतात. त्यांपैकी पर्वतीय व उच्चभूमी प्रदेशाचे आधिक्य असून त्याने राज्याचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. वायव्य किनाऱ्याला समांतर पसरलेली क्रॉकर ही राज्यातील प्रमुख पर्वतश्रेणी असून तिच्यामुळे पूर्व व विशेषतः अंतर्गत भागात जाण्यास अटकाव होतो. किनाबालू (४,१०१ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर या पर्वतश्रेणीत आहे. क्रॉकर पर्वतश्रेणीच्या पूर्वेकडील बहुतांश भूमी लाटण किंवा उंचसखल असली, तरी तेथे अनेक सुपीक मैदानी प्रदेशही आढळतात. साबाचा अंतर्गत भाग क्रॉकर, तेरुस माडी व विट्टी या तीन पर्वतश्रेण्यांमुळे निर्माण झालेल्या त्रिकोणाकृती प्रदेशाने व्यापला आहे. मध्यवर्ती भागात लाबुक, क्वामूत सगामा व टावाऊ हे प्रमुख उच्चभूमी प्रदेश आहेत. हे उच्चभूमी प्रदेश सर्वांत एकाकी, दुर्गम, असमन्वेषित व निर्मनुष्य असे भाग आहेत. यांमध्ये १,३०० मी. उंचीपर्यंतचे अनेक कटक आढळतात. क्वामूत उच्चभूमी प्रदेशात किनबतांगान या राज्यातील सर्वांत मोठ्या नदीचे व तिच्या उपनद्यांचे जलवाहन क्षेत्र आहे. सगामा उच्चभूमी प्रदेश मध्यम उंचीचा असून दक्षिणेकडील टावाऊ उच्चभूमी प्रदेशाची उंची मौंट मॅक्डालोनोजवळ १,३०० मी. पेक्षा अधिक वाढलेली आहे. अंतर्गत भागातील पर्वतश्रेण्यांदरम्यान टेनॉन, तांब्रूनान व केनिंगाऊ ही मैदाने आहेत. पेगालाऊ व टेनॉन या नद्यांनी तांब्रूनान व केनिंगाऊ मैदानांचे जलवहन केले आहे. पूर्वेकडील भाग अंशतः विच्छेदित स्थलीप्राय प्रदेश आहे. तेरुस माडी व विट्टी या पर्वतश्रेण्यांदरम्यान सूक मैदान आहे.

पाडास या उत्तरेस व पश्चिमेस वाहत जाणाऱ्या नदीचा अपवाद वगळता साबातील बहुतेक सर्व मुख्य नद्या पूर्व किनाऱ्याकडे वाहत जातात. अंतर्गत भागातील लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी या नद्यांचा उपयोग केला जातो. किनबतांगान ही साबातील प्रमुख नदी असून तीमधून सु. १९३ किमी. अंतरापर्यंत जलवाहतूक चालते. सगामा व लाबुक ह्या साबाच्या पूर्व भागातील प्रमुख नद्या आहेत. नद्यांच्या मुखाशी वारंवार निर्माण होणाऱ्या वाळूच्या दांडयमुळे जहाजवाहतुकीत अडथळा निर्माण होतो.

हवामान : साबाचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे उष्ण व दमट आहे. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून साबामध्ये प्रचंड प्रमाणात वृष्टी होते. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानच्या नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांचा काळ तुलनेने कोरडा जातो. टायफून वादळाच्या प्रभावक्षेत्राबाहेर साबाचे स्थान असले, तरी अधूनमधून वेगवान वारे व गडगडाटी वादळांचा तडाखा बसतो. टायफून पट्ट्यापासून खाली असल्याने सूलू चाचे साबाचा उल्लेख ‘ लँड ब्रिलो द वुइंड ‘ असा करत असत. वार्षिक सरासरी वृष्टिमान १५२ ते ४५७ सेंमी.च्या दरम्यान असते. विषुववृत्ताजवळ असूनही हवामान तुलनेने थंड असते. किनारी भागात रात्रीचे व दिवसाचे सरासरी तापमान अनुकमे २१  ते ३२  से. च्या दरम्यान असते. उच्चभूमी प्रदेशात सरासरी तापमान २० से. आढळते.

वनस्पती व प्राणी : स्थलांतरित शेतीमुळे बरीच जंगलतोड झाली असली, तरी अजूनही राज्याचे सु. ८२ टक्के क्षेत्र दाट अरण्यांनी व्यापलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षारण्ये (सेल्व्हाज) असून जंगलात प्रामुख्याने टणक लाकडाचे वृक्ष आढळतात. पांढरा सेराया, आयर्नवूड, तुती, वेगवेगळ्या प्रकारचे ताड, नारळ, साबुदाण्याचे झाड, कापूर, दालचिनी, जायफळ, लवंगेचे झाड इ. येथील प्रमुख वृक्षप्रकार आहेत. ऑर्किड, ऱ्होडोडेंड्रॉन व पिचर ही फुलझाडे आढळतात.

ओरँगउटान, हत्ती, गेंडा, अस्वल, बिबळ्या, रानडुक्कर इ. वन्य प्राणी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वानर व माकडे जंगलात पहावयास मिळतात. तट्टू व म्हशी-रेडे हे स्थानिक प्राणी आहेत. गरुड, गिधाड, बहिरी ससाणा, घुबड, पोपट, कब्रूतर, तीतर, डोमकावळा, लावा इ. पक्षी येथे आढळतात.

इतिहास : उपलब्ध व उत्खनित पुराव्यांवरुन साबाचा प्राचीन इतिहास ज्ञात होतो. इ. स. पू. सातव्या शतकापासून व्यापारानिमित्त या प्रदेशात चिनी व भारतीय लोकांनी प्रवेश केल्याचे पुरावे मिळतात. फिलिपीन्सचे अनेक शतके या प्रदेशाशी व्यापारी संबंध होते. भारतीयांनी वसाहतीच्या निमित्ताने सुवर्णद्वीपात साम्राज्ये स्थापन केली. पंधराव्या शतकापर्यंत शेजारचा ब्रूनाई भाग श्रीविजय व मजपहित या राजसत्तांच्या अंमलाखाली होता. त्यानंतर ब्रूनाईचे इस्लामीकरण होऊन सुलतानशाहीची स्थापना झाली. ब्रूनाईबरोबरच ही सत्ता बोर्निओ बेटाच्या इतर भागांत विस्तारली आणि यूरोपियनांचा चंचूप्रवेश होईपर्यंत टिकली. दरम्यान साबाचा पूर्व किनारा ब्रूनाईच्या सुलतानांनी वारसाहक्काच्या भांडणात पक्षपाती धोरण अवलंब्रून सूलूच्या सुलतानांना वापरण्यास दिला (१७०४). साबाला अनेक पाश्चात्त्य दर्यावर्दींनी अठराव्या शतकाच्या अखेरीस भेटी दिल्या. त्यांपैकी जोसेफ विल्यम टोरी या अमेरिकन दर्यावर्दी व्यापाऱ्याने ब्रूनाईच्या दुबळ्या सुलतानाकडून येथील काही जमीन खंडाने घेतली. ती पुढे ऑस्ट्रियन सरदार गुस्टाव्हस डी ओव्हरबेक याच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आणि अखेर इंगजी उद्योजक आलफ्रेड डेंट याने ती ब्रूनाई व सूलू येथील सुलतानांशी करार करुन सर्व भूक्षेत्र आपल्या मालकीचे केले. त्याने साबाच्या व्यवस्थापनासाठी ब्रिटिश नॉर्थ बोर्निओ कंपनी स्थापन करुन (१८८१) ब्रिटिशांचे आधिपत्य प्रस्थापित केले. पुढे हा ब्रिटिशांकित रक्षित भाग जाहीर करण्यात आला (१८८८). दुसऱ्या महायुद्घकाळात जपान्यांनी तोघेईपर्यंत (१९४२–४५) तेथे ब्रिटिशांची सत्ता होती. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यास वासाहतिक दर्जा दिला (१९४६). त्याच वर्षी पश्चिमेकडील सागरी भागात असलेली लाब्रूआन द्वितीय वसाहत उत्तर बोर्निओचा एक भाग बनली. मलायन युनियनची स्थापना झाल्यानंतर १६ सप्टेंबर १९६३ रोजी साबा ही ब्रिटिश वसाहत त्यात समाविष्ट करण्यात आली आणि मलेशियाची निर्मिती होऊन साबाला तदांतर्गत राज्याचा दर्जा देण्यात आला.

प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची पाच विभागांत व २९ जिल्ह्यांत विभागणी केली आहे. निर्वाचित ४८ सदस्य व ६ नियुक्त अशा ५४ सदस्यांचे विधिमंडळ असून २० मंत्री व मुख्यमंत्री यांद्वारे राज्य-शासन कारभार पाहते. यंग डी-पेर्तुआनेगेरी (राज्यपाल) हा राज्याचा प्रमुख असतो.


आर्थिक स्थिती : खाणकाम व लाकूडउद्योग हे साबाच्या अर्थव्यवस्थेचे मूळ आधार आहेत. तुलनेने शेती व कारखानदारीस कमी महत्त्व आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात येथे मळ्याच्या शेतीस प्रारंभ झाला. १९६० च्या दशकापासून तेलमाड व त्यानंतर कोकोचे महत्त्व कमी होऊन प्रमुख उत्पादन म्हणून त्याची जागा रबर उत्पादनाने घेतली. तेलमाड, रबर, ताग, खोबरे, तंबाखू , कोकोब्रिया व भात ही प्रमुख कृषी उत्पादने आहेत. तांदूळ हे प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्यामधून देशाची तीन चतुर्थांश गरज भागते. पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात रबर व भाताचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. खोबरे, रबर व ॲबाका यांची निर्यात केली जाते. मासेमारी व्यवसायही महत्त्वाचा असून मासे व कोळंबीची निर्यात केली जाते.

खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या उत्पादनात देशातील हे तिसऱ्याक्रमांकाचे राज्य आहे. साबाच्या अपतट सागरी भागात टेबुंगो हे प्रसिद्घ तेलक्षेत्र आहे. साबातून दररोज सु. ६०,००० पिंपे इतके खनिज तेल उत्पादन घेतले जाते. नैसर्गिक वायूचा उपयोग मुख्यत्वे विद्युतनिर्मिती-साठी केला जातो. त्या विजेचा पुरवठा लाबुआन बेटावरील लोह व मिथेनॉल उद्योगांना केला जातो. मौंट किनाबालूच्या दक्षिणेस सस.पासून सु. १,९०० मी. उंचीवर मामूत ही देशातील सर्वांत मोठी तांब्याची खाण आहे. अलीकडे तालिवास या नदीच्या परिसरात सोने सापडले आहे. बांधकामासाठी दगड, वाळू व चिकण माती या गौण खनिजांचे उत्पादन घेतले जाते. साबाच्या एकूण निर्यातीत खाणकाम उद्योगाचा वाटा ४० टक्के तर लाकडाचे ओंडके, प्लायवूड, कापीव लाकूड व व्हिनीअर लाकूड यांचा वाटा ३० टक्के आढळतो. कोटा किनाबालू, संडकान व टावाऊ येथे औद्योगिक वसाहती आहेत.

पूर, नद्यांची रुंद पात्रे, किनारी दलदलयुक्त प्रदेश व पर्वतीय प्रदेश हे रस्ते व लोहमार्ग विकासातील प्रमुख अडथळे ठरले आहेत. साबामधील एकमेव लोहमार्ग म्हणजे कोटा किनाबालू ते मेलालॅप यांदरम्यानचा १८७ किमी. लांबीचा अरुंदमापी लोहमार्ग होय. येथे जलवाहतूक अधिक प्रमाणात आहे. किनबतांगान ही अंतर्गत जलवाहतुकीच्या द्दष्टीने विशेष महत्त्वाची नदी आहे. साबाचा किनारा खूपच दंतूर असून तो दक्षिण चिनी, सूलू व सेलेबीझ समुद्रांनी धुवून काढला जातो. किनाऱ्यावर उत्तम नैसर्गिक सागरी बंदरे असून त्यांत कोटा किनाबालू, व्हिक्टोरिया (लाब्रूआन बेट), उत्तर भागातील कूडाट, पूर्व भागातील संडकान व लआद दातू आणि दक्षिण भागातील टावाऊ ही बंदरे प्रमुख आहेत. कोटा किनाबालू येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

लोक व समाजजीवन : क्रॉकर पर्वतश्रेणी व पश्चिम किनारा यांदरम्यानचा किनारपट्टीचा मैदानी भाग दाट लोकवस्तीचा आहे. साबात सु. तीस स्वतंत्र वांशिक गट असून त्यांपैकी कदाझान, बाजाऊ, मुरुत हे प्रमुख वांशिक गट असून त्यांशिवाय बिसाया, ओरांग, सुंगेई, कदाझान, इदाहन, रंगू तीगँग, सलूक, ब्रूनाई मलय, चिनी वगैरे लहान वांशिक गट आहेत. या सर्वांची बोलीभाषा, गणचिन्हे, पेहराव, धर्म, चालीरीती भिन्न भिन्न आहेत. पश्चिम भागात राहणारे कदाझान मुख्यतः शेतकरी असून ते प्रामुख्याने भातशेती करतात. एकूण लोकसंख्येत त्यांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. कदाझान लोकांशी जवळीक असलेले मुरुत लोक प्रामुख्याने दक्षिणेकडील अंतर्गत भागातील डोंगराळ प्रदेशात राहतात. राज्यातील छोटा व्यापार चिनी लोकांच्या ताब्यात असून त्यांच्या मोठ्या व्यापारी कंपन्याही आहेत. एकूण लोकसंख्येत मलायी लोक ५% आहेत. बाजाऊ या जुन्या मलाय लोकांचे प्रमाण ११% असून त्यांची वस्ती मुख्यतः पूर्व किनाऱ्यावर आहे. ते मुख्यतः मुस्लिम आहेत. चाचेगिरी या त्यांच्या जुन्या व्यवसायापासून त्यांना सक्तीने परावृत्त करण्यात आले असून आता ते मासेमारी करतात. याशिवाय जावा, भारत व यूरोप येथील लोकही काही प्रमाणात असून शासकीय, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील महत्त्वाच्या पदांवर हे लोक आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंडोनेशियन व फिलिपिनो कामगारांनी रोजगाराच्या निमित्ताने साबाचा आश्रय घेतला असून त्यांचीही संख्या वाढली आहे. १९७० च्या दशकात दक्षिण फिलिपीन्समधील राजकीय अस्थिरतेच्या काळात फिलिपीनो निर्वासित मोठ्या संख्येने या राज्यात आले. मूळ लोक बाजारात धान्य, हस्तकला वस्तू आणि पारंपरिक भांडी विकतात. कदाझान व मुरुत लोकांपैकी बरेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. भारतीयांमध्ये शिखांचे आधिक्य आहे. साबात अनेक आदिवासी बोलीभाषा बोलल्या जातात. येथे ग्रामीण लोकवस्तीचे प्रमाण जास्त आहे. कोटा किनाबालू, संडकान (लोकसंख्या १,२५,८४१–१९९७ अंदाज ), ताबाऊ, लआद दातू, टावाऊ, कूडाट ही राज्यातील प्रमुख नगरे आहेत. शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे माध्यम मलाय भाषा असून मिशनरी विद्यालयांत इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. शासनामार्फत शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये व व्यापारी विद्यालये चालविली जातात. मोठ्या शहरांत चिनी विद्यालयेही आढळतात.

साबामधील संडकानच्या दक्षिणेस पर्वतश्रेणीत असलेल्या गोमातोंग गुहा कबूतर व पाकोळ्यासद्दश पक्ष्यांच्या घरट्यांसाठी प्रसिद्घ असून ही घरटी चिनी लोकांचे आवडते मिष्टान्न आहे. ही घरटी बांबूच्या शिडीद्वारे ९० मी. पर्यंत वर चढून तेथील शेतकरी वर्षातून दोनदा काढून घेतात. याशिवाय किनाबालू राष्ट्रीय उद्यान प्रसिद्घ असून कदाझान आदिवासी किनाबालू पर्वताला मृतात्मे व भूतपिशाच्चां चे माहेरघर मानतात. या उद्यानात सु. ८०० जातीची फुलझाडे, ५०० जातींचे पक्षी आणि जगातील आकाराने सर्वांत मोठे असलेले रॅप्लेशियानामक फूल आढळते. पर्यटकांचे हे प्रमुखआकर्षणठिकाणबनलेआहे.

पहा : बोर्निओ ब्रूनाई मलेशिया.

देशपांडे, सु. र. चौधरी,वसंत