लायबीरिया : पश्चिम आफ्रिकेतील एक स्वायत्त व सार्वभौम देश. त्याचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ लायबिरिया असून लायबीरिया हा शब्द लिबेर (स्वतंत्र) या लॅटिन शब्दावरून बनला आहे. ४° २०’ ते ८° ३३’ उ. अक्षांश व ७° २२’ ते ११° ३३’ प. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाचे क्षेत्रफळ १,११,३३९ चौ. किमी. असून त्याची दक्षिणोत्तर लांबी ३३८ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ३७० किमी. आहे वायव्येस सिएरा लिओन, उत्तरेस गिनी, पूर्वेस आयव्हरी कोस्ट या देशांनी आणि नैर्ॠत्येस (दक्षिण व पश्चिमेस) अटलांटिक महासागर यांनी तो सीमांकित झाला आहे. लोकसंख्या २४,४७,००० (१९८८ अंदाज). मन्रोव्हिया हे देशाच्या राजधानीचे ठिकाण (लोकसंख्या ४,२५,०००-१९८४) असून तेच देशातील सर्वांत मोठे शहर व उत्कृष्ट बंदर आहे.

भूवर्णन : लायबीरिया विषुवृत्ताच्या किंचित उत्तरेस अटलांटिक महासागराला लागून पसरला आहे. भूपृष्ठरचनेच्या दृष्टीने लायबीरियाचे स्थूलमानाने चार प्राकृतिक भाग पडतात. अटलांटिक किनारपट्टीचा भूप्रदेश, त्यालगतचा घनदाट जंगलचा पट्टा, मध्य पठारी प्रदेश आणि पर्वतश्रेणी. किनारपट्टीचा प्रदेश आग्नेयीकडून वायव्येकडे सु. ५६० किमी. लांबीचा व २५ ते ४० किमी. रुंदीचा आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात दाट वस्ती असून देशातील हार्पर, बूकॅनन, ग्रीनव्हिल आणि रॉबर्ट्‍सपोर्ट ही चार प्रमुख बंदरे आहेत. हा भूप्रदेश वालुकामय व सखल असून त्यात अधूनमधून खारकच्छे, दलदलीचा प्रदेश आणि क्वचित कुठेतरी खडकाळ भूशिरे आढळतात. याच्या पलीकडे ईशान्येस सस.पासून सु.१८० – ३०० मी. उंचीवरील पृष्ठवर्ती लहान टेकड्यांचा उतरणीचा पसरलेला पट्टा लागतो. त्याची सरासरी रुंदी ३२ किमी. आहे. या पट्ट्यात घनदाट जंगल आहे. त्याच्या पुर्वेस सस.पासून सु. ४०० ते ६०० मी. उंचीवरील सापेक्षताः सपाट असलेले पठार लागते. त्यात जमिनीची धूप व अपक्षरणामुळे निर्माण झालेल्या अधूनमधून लहानमोठ्या टेकड्या व दऱ्या आढळतात. पठाराच्या पूर्वेस आणि उत्तरेस पर्वतश्रेणींचा प्रदेश आहे. या पर्वतीय प्रदेशाचे ठसठशीत वैशिष्ट्य म्हणजे गिनी-लायबीरियाच्या सीमेवरील सर्वोच्च निंबापर्वत. त्याची उंची लायबीरियाच्या बाजूस सु. १,३८० मी. असून या भागात लोहधातूचे विपुल साठे आहेत. मानो आणि मोरो नद्यांनी देशाची वायव्य सीमा निश्चित केली आहे तर कव्हॅली नदी पूर्वेकडील सीमा मर्यादित करते. या नद्यांव्यतिरिक्त लोफा, सेंट पॉल, सेंट जॉन व सेस या आणखी चार मोठ्या व महत्त्वाच्या नद्या आहेत. त्या सर्व अटलांटिक महासागराला मिळतात. फार्मिंग्टन, द्यू आणि सायनो या काही लहान नद्या आहेत. सेंट पॉल नदीचे शीघ्र प्रवाहाचे स्थान मन्रोव्हियाच्या ईशान्येस सु. २७ किमी.वर असून त्याचा जलविद्युत् केंद्रासाठी उपयोग केला आहे. फार्मिंग्टन नदीवरसुद्धा जलविद्युत् केंद्र उभारण्यात आले आहे.

येथील मृदा पूर्व-कँब्रियन प्राचीन ढाल प्रदेशाप्रमाणे असून ती ग्रॅनाइट, सुभाजा (शिस्ट) व पट्टिताश्म (नाइस) या खडकांची बनलेली आहे. लायबीरियातील काही ग्रॅनाइटचे नमुने अडीचशे कोटी ते छत्तीसशे कोटी वर्षे एवढे प्राचीनतम आहेत. येथील ढाल प्रदेश विभंजन व वलीभवन यांच्या तीव्रतर क्रियांनी बनलेला असल्यामुळे येथील शैलसमूहात लोहधातूचे विशेषतः ईडबिराइट या नावाने प्रसिद्ध असलेले लोहधातुक विपुल प्रमाणात आढळते. समुद्र किनाऱ्यावर वालुकाश्माचे प्रमाण जास्त असून अधूनमधून आगंतुक खडकांचे सुळे वर आलेले दिसतात. त्यांतून मौंट, मेसराडो, पाल्मास यांसारखी भुशिरे तयार झाली आहेत. त्यांपैकी मौंट भूशिराची उंची जवळजवळ ३२६ मी. आहे. मन्रोव्हिया ही राजधानी माँट्सरॅडो या अग्निजन्य खडकाच्या भूशिरावर उभी आहे. देशाच्या पृष्ठवर्ती भागातही भूवैज्ञानिक उद्‌गीरणामुळे काही ठिकाणी असा प्रदेश आढळतो. येथील मृदेत लोहयुक्त प्राणिल आणि तांबूस ॲल्युमिनियम यांचे प्रमाण जास्त आहे. अतिपर्जन्यवृष्टीमुळे मृदेत बारमाही ओलसरपणा आढळतो. वरचा पातळ थर हा वनीकरणास पोषक असून त्यातून फारशी खाद्य पिके निघत नाहीत.

हवामान : देशाचे उष्णकटिबंधीय स्थान व अटलांटिक महासागराचे सान्निध्य यांमुळे किनारपट्टीवरील हवामान २७° से. असते. नोव्हेंबर ते एप्रिल ते कोरडे असते आणि पावसाळ्यात मे ते ऑक्टोबरदरम्यान दमट, पावसाळी असते. मात्र जुलै-ऑगस्ट महिन्यांत ते किंचित कोंदट असते. पृष्ठवर्ती भागात जसजसे जावे, तसतसा हवामानात सापेक्षतः बदल होतो. ईशान्येकडून सहारा वाळवंटावरून डिसेंबर-जानेवारी महिन्यांत येणारे कोरडे व थंड धूलियुक्त हरमॅटन नावाचे वारे येथील हवामानावर परिणाम करतात. नैर्ॠत्येकडून येणारे सौम्य, आर्द्र, मोसमी वारे येथे एकत्र येतात. त्यामुळे हे काही काळ आंतर-उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र बनते. परिणामतः हवामानात लक्षणीय बदल जाणवतो आणि तापमान १०° से.पर्यंत खाली जाते. अतिवृष्टीही होते. येथील तापमान १८° ते २९° से. दरम्यान असते. देशात सर्वांत अधिक पर्जन्य ५२०° सेंमी. मौंट भूशिरावर पडतो आणि सापेक्षतः ईशान्येकडे पृष्ठवर्ती भागात कमीकमी होत जातो. पठारी प्रदेशात त्याचे सरासरी पर्जन्यमान १७७ सेंमी. आहे. मध्य भागात हिवाळ्यात रात्री थंड असतात आणि दिवस आल्हाददायक असतो.

वनस्पती व प्राणी : लायबीरियात सदारहित वनश्री आढळते. येथील अरण्यांत काही ६० मी. उंचीचे वृक्ष असून यांतील काही वृक्ष व्यापारी दृष्ट्या अत्यंत मूल्यवान आहेत परंतु एकाच जातीचे वृक्ष सलग आढळत नाहीत. त्यामुळे लाकूड उद्योगाच्या दृष्टीने अडचणी उद्‌भवतात आणि वनखात्यास विखुरलेल्या जंगलांत विशिष्ट जातींचा शोध घ्यावा लागतो. जंगलात २६ प्रकारच्या प्रमुख उपयुक्त लाकडाच्या जाती असून लाल जांभा, कॅमवुड, एबनी, मॅहॉगनी या काही चिवट, टिकाऊ व फर्निचरच्या दृष्टीने उपयुक्त जाती आहेत. आफ्रिकन मॅहॉगनी लाकडाचा उपयोग मोठी कपाटे आणि सुबक जोडणी करण्यासाठी करतात. यांशिवाय जंगलांत रबर, कोको, कॉफी आणि विशिष्ट जातीची ताडाची झाडे यांचेही मोठ्या प्रमाणावर वनीकरण झालेले आहे.लायबीरियाचे हे अरण्य रानटी पशुपक्ष्यांना फारसे पूरक नसल्याने येथे विपुल प्राणिजीवन आढळत नाही. जंगलात माकडे व चिंपँझी यांच्या काही जाती असून काळवीट, हरणे व कुरतडणारे बहुविध प्राण्यांचे (खार, उंदीर इ.) प्रकार आढळतात. इतरत्र क्वचित आढळणारा लहान पाणघोडा व काही मुंगीखाऊ प्राणी आढळतात. हत्ती, वनगाई (आखूड शिंगी म्हशी), पाणमांजर आणि लेपर्ड हे प्राणी जंगलातील काही भागांतून दृष्टोत्पत्तीस येतात परंतु ते हळूहळू कमी होऊ लागले आहेत. सापांच्या विभिन्न असंख्य जाती असून त्यांपैकी आठ अत्यंत विषारी सर्प आहेत. यांतील काळा नाग, कॉकस व्हायपर किंवा नाइट ॲडर (मंडली सर्प) हे जहाल विषारी आहेत. तीन प्रकारच्या सुसरी आतापर्यंत ज्ञात झाल्या असून सरडा व विंचू यांच्या काही जाती आढळतात. वटवाघूळ आणि विविध पक्षी यांच्या असंख्य जाती तसेच माशांचे विभिन्न प्रकारही लायबिरियात आहेत. सरोवरात मत्स्यसंगोपन करण्याचा उद्योगही अलीकडे वाढू लागला आहे.


इतिहास : लायबीरियाच्या इतिहाससंबंधीच्या पुरातत्त्वीय पुरावा अस्पष्ट आहे. तथापि पुरातत्त्ववेत्यांना काही गूढ अद्‌भुत अश्मवर्तुळे आणि हाताने केलेल्या काही प्राचीन वस्तू सापडल्या परंतु त्यांवरून फारशी माहिती उपलब्ध होत नाही. स्थानिक दंतकथा व परंपरांनुसार येथील आदिवासी लोक मुस्लिम आक्रमणाच्या भीतीने उतर व पूर्व आफ्रिकेमधून या प्रदेशात इ. स. पंधराव्या शतकात आले असावेत तत्पूर्वी यूरोपियन प्रवाशांनी लायबीरियाचा किनारा पाहिला असावा, असा एक समज आहे. इ. स. १४६१ मध्ये पेद्रो दे सिंत्रा या पोर्तुगीज समन्वेषकाने मौंट भूशिराचा शोध लावला. सोळाव्या शतकापासून डच, इंग्रज, फ्रेंच, जर्मन आदी यूरोपीय व्यापाऱ्यांत, पोर्तुगीज व्यापाऱ्यांत संघर्ष होऊन पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी येथून काढता पाय घेतला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस संयुक्त संस्थानांत आफ्रिकेतील काळ्या निग्रो लोकांना त्यांच्या मायभूमीत परत पाठविण्यासाठी एक चळवळ उभी राहिली. तीतून अमेरिकन कॉलोनायझेशन सोसायटी स्थापन झाली (१८१६). या संस्थेत द. अमेरिकेतील स्वतंत्र झालेल्या आफ्रिकी निग्रो गुलामांचा भरणा होता. सोसायटीने मुक्त केलेल्या अमेरिकन निग्रो लोकांच्या पहिल्या तुकडीने मेसराडो भूशिर हे निवासस्थान निवडले. तेव्हापासून लायबिरियाच्या किनाऱ्यावर निग्रो लोकांच्या वसाहती होऊ लागल्या. पुढे सोसायटीने लायबिरियातील मूळ रहिवाशांकडून काही जमिनी विकत घेतल्या. या १८२२ मध्ये स्थापन झालेल्या वसाहतीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रो यांच्या सन्मानार्थ मन्रोव्हिया हे नाव देण्यात आले. तेच पुढे राजधानीचे स्थळ झाले. अमेरिकेतील काळे लोक येथे बहुसंख्येने येऊ लागले. पुढे सबंध वसाहतीचे लायबीरिया असे नामांतर झाल्यावर गुलामांच्या प्रत्यक्ष वसाहत स्थळाला मन्रोव्हिया असे नाव पडले. त्यावेळी वरील सोसायटीने सर्व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून १८३८ मध्ये तेथील लोकांचे एक विधिमंडळ निवडले. १८४० च्या सुमारास तेथील मूळ आदिवासी आणि नव्याने वसाहत केलेले अमेरिकन काळे लोक यांत संघर्ष उद्‌भवला. तेव्हा काळ्या वसाहतवाल्यांनी स्वातंत्र्य जाहीर केले (१८४७) आणि स्वायत्त राष्ट्र म्हणून त्यांनी जोझेफ जेंकन्झ रॉबर्ट्‌स या १८४१ पासून वसाहतीचा गव्हर्नर म्हणून काम केलेल्या गृहस्थास नवीन प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्ष निवडले.

सुरुवातीस या राज्याची वसाहत प्रामुख्याने किनारपट्टीलगत होती. अमेरिको-लायबीरियन लोकांनी ती हळूहळू आदिवासी लोकांच्या प्रमुखांबरोबर करार-तहनामे करून, तसेच भूमी खरेदी करून वाढविण्यास सुरुवात केली. याच सुमारास प. आफ्रिकेत ग्रेट ब्रिटन, फ्रान्स यांनी वसाहतीकरणास प्रारंभ केला होता. त्याचा उपद्रव लायबीरियाला झाला परंतु अमेरिकेने मध्यस्थी करून लायबीरियाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. किनारपट्टीवर क्रू आणि ग्रेबो या आदिम समूहाने या स्वायत्त राज्यावर चढाया केल्या आणि त्यांनी अमेरिको-लायबीरियन लोकांच्या वसाहती लुटण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीस या भूप्रदेशात दोन प्रजासत्ताक राज्ये होती एक लायबीरिया व दुसरे मेरिलंड. मेरिलंड ही अमेरिकेतील काही निग्रोंनी प. आफ्रिकेतील दक्षिण भागात, लायबीरियात १८३३ मध्ये स्थापन केलेली स्वतंत्र वसाहत होय. पुढे १८५७ मध्ये हा प्रदेश लायबीरियात विलीन होऊन त्यास परगण्याचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स. १८८५ व १८९२ मध्ये लायबीरियनांनी अनुक्रमे फ्रेंच व इंग्लिश यांच्याशी केलेल्या तहाने लायबीरियाचा मुलूख पश्चिमेस मानो नदी व पूर्वेस कव्हॅली नदी यांमध्ये मर्यादित करण्यात आला. पुढे इ. स. १९०३ मध्ये सिएरा लिओन व लायबीरिया यांच्यातील सरहद्द निश्‍चित करण्यात आली व नंतर आयव्हरी कोस्टविषयी फ्रेंचांशी वाटाघाटी होऊन तीही सरहद्द निश्चित झाली. क्रू (क्वा) आदिम समूहाने विसाव्या शतकातही या स्वायत्त सरकारविरुद्ध उठावाची मोहीम चालूच ठेवली. लायबीरियाने पहिल्या महायुद्धात फ्रान्स, ग्रेट ब्रिटन यांना लष्करी पथके पाठवून सक्रिय मदत केली. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लायबीरियात मन्रोव्हियाजवळ रॉबर्ट्‌स फील्ड हा युद्धोपयोगी विमानतळ बांधला. हा विमानतळ यूरोप आणि मध्यपूर्व येथील मित्र राष्ट्रांना युद्धसामग्रीचा पुरवठा करण्यास अत्यंत उपयुक्त ठरला. या युद्धाच्या वेळी अमेरिकेने बुशरॉड बेटावरील मन्रोव्हियाच्या खोल बंदराचा पाणबुड्यांसाठीही उपयोग केला. दुसऱ्या महायुद्धानंतर लायबीरिया संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला.

सुरुवातीस लायबीरिया प्रजासत्ताकाला जे. जे. रॉबर्ट्‌स, आर्थर बार्‌क्ले यांसारखे कार्यक्षम राष्ट्राध्यक्ष लाभले. विल्यम व्ही. एस्. टबमन हा दुसऱ्या महायुद्धानंतर लायबीरियाचा राष्ट्राध्यक्ष (कार. १९४४-१९७१) झाला. त्याने सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत अनेक सुधारणा केल्या आणि लायबीरियात असलेला जातिभेद नष्ट करण्याचा तसेच लायबीरियाच्या एकीकरणाचे धोरण राबविण्याचा प्रयत्न केला. आर्थिक क्षेत्रात त्याच्या मुक्त व्यापरधोरणामुळे (ओपन डोअर पॉलिसी) अमेरिका-यूरोपातील व्यापारी कंपन्यांना लायबीरियातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग साधण्यास उत्तेजन मिळाले. लायबीरियाने टबमनच्या नेतृत्वाखाली आफ्रिकी राष्ट्रांचे आर्थिक-सांस्कृतिक क्षेत्रांत सहकार्य मिळविण्यातही पुढाकार घेतला. टबमनच्या मृत्यूनंतर (१९७१) उपराष्ट्राध्यक्ष विल्यम टोलबर्ट राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याने टबमनचेच धोरण अंगिकारले. १९७५ मध्ये त्याची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्याने आर्थिक बाबतीत ‘मुक्त व्यापारधोरण’ हीच पद्धत ठेवून परराष्ट्रीय धोरणातही पूर्वीचेच धोरण अवलंबिले. टोलबर्टने राष्ट्रीय विकासासाठी लायबीरिकरण आणि स्वयंपूर्णता यांवर भर दिला. त्याच्या ट्रू विग पक्षाच्या एकाधिकारशाहीला प्रोग्रेसिव्ह अलायन्स ऑफ लायबीरिया या पक्षाकडून मे १९७८ मध्ये विराध झाला. एप्रिल १९७९ मध्ये त्याने तांदळाचा दर वाढविण्याचे विधेयक मांडले, तेव्हा देशात दंगेधोपे, लूटमार आणि रक्तपात झाला. परिणामतः टोलबर्टने आणीबाणीतील अधिकार वापरून नगरपालिकांच्या नियोजित निवडणुका पुढे ढकलल्या. १२ एप्रिल १९८० रोजी सार्जन्ट सॅम्युएल डो याच्या नेतृत्वाखाली लष्कराने अवचित सत्तांतर केले, त्यात टोलबर्टचा खून करण्यात आला. डोने लष्करी कायदा जाहीर करून संविधान निलंबित केले, कायदेमंडळ बरखास्त केले आणि राजकीय पक्षांवर बंदी आणली. तो लायबीरियाचा सर्वसत्ताधारी झाला. त्याने प्रशासकीय व्यवस्थेसाठी लोकांचे एक विमोचन मंडळ (पीपल्स रिडेम्पशन कौन्सिल’ – पी. आर. सी.) स्थापन केले. तेरा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना फाशी दिल्याबद्दल जागतिक वर्तुळात त्याच्यावर टीका झाली. डो हा प्रत्यक्षात लायबीरियाचा लष्करी हुकूमशाह झाला. लष्करातील एक अधिकारी ब्रिगेडिअर जनरल टॉमस क्वीओक्‌पा याने नोव्हेंबर १९८५ मध्ये लष्करी उठाव केला. तो निपटून काढण्यात डोला यश मिळाले. डोने क्विओंक्‌पाच्या सु. ६०० पाठीराख्यांना देहांताची शिक्षा दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. विद्यार्थी संघटनांवर बंदी घातली. ६ जानेवारी १९८६ रोजी डोने निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आणि मंत्रिमंडळ बनविले. विरोधी पक्षाने एकत्र येऊन संयुक्तरीत्या शासनाला विरोध केला आणि सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थैर्याची मागणी केली. शिक्षकांचे पगार तटले, त्यावेळी शिक्षक, विद्यार्थी संपावर गेले. या सर्वांचा बीमोड त्याने लष्कराच्या सहाय्याने केला. १९८७-८८ मध्ये खालावलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी डोने सतरा अमेरिकन आर्थिक तज्ञांचा मंत्रिमंडळात समावेश केला आणि त्यांच्याकडून १९८७-८८ चा अर्थसंकल्प तयार करून घेतला. मार्च १९८८ मध्ये रॉबर्ट टबमन नावाच्या तज्ञाची अर्थमंत्रिपदावर नियुक्ती केली आणि मे १९८८ मध्ये डोने भ्रष्टाचाराविरोधी मोहीम उघडली, सर्वोच्च न्यायाधीशाच्या राजीनाम्याची मागणी केली व मंत्रिमंडळात फेरफार केले. एकूण डोच्या हुकूमशाही शासनाविरुद्ध देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे डो शासनाला विरोध करणारे अनेक लोक शेजारील देशांत आश्रयास गेले होते. देशातील असंतुष्ट गटाने राष्ट्रीय स्वदेशी दलाची (नॅशनल पॅट्रिॲटिक फोर्सिस ऑफ लायबीरिया – एन्. पी. एफ्. एल्.) स्थापना केली होती. या दलाने ईशान्य सीमेवरील निंबा परगण्यात डिसेंबर १९८९ मध्ये डो शासनाविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि क्रांतिकारकांनी काही खेड्यांचाही ताबा मिळविला. जानेवारी १९९० मध्ये या क्रांतिकारकांनी डोच्या क्रान जमातीवर हल्ला चढविला. त्यावेळी डोने लष्कराकडे ही मोहीम सोपविली. मार्च-एप्रिल १९९० मध्ये या दलाने लायबीरियातील काही प्रशासकीय कार्यालयांवर सशस्त्र हल्ले केले. अमेरिकेच्या अंदाजानुसार यांचा नेता चार्ल्स टेलर असून या बंडखोरांना शस्त्रास्त्रे व अन्य प्रकारची मदत लिबिया करीत असावा.

राजकीय स्थिती : लायबीरिया १८४७ मध्ये स्वायत्त झाला. तेव्हा त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या धर्तीवर घटना स्वीकारली. या घटनेनुसार राष्ट्रीय शासनाचे अधिकार राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रीय सभा (सीनेट आणि लोकप्रतिनिधिगृह) व उच्च न्यायालय यांत विभागलेले होते. राष्ट्रीय सभा द्विगृही होती. सीनेट व लोकप्रतिनिधिगृह यांतील सभासदांची निवड अनुक्रमे नऊ परगणे व चार क्षेत्रीय विभाग यांतील मतदारांकडून होई. प्रस्तुत संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षांची निवड आठ वर्षांकरिता करण्यात येत असे. त्यानंतर त्यांची चार वर्षांकरिता फेरनिवड करता येई. प्रत्येक सीनेटरची सहा वर्षांकरिता निवड होत असून लोकप्रतिनिधीची निवड चार वर्षांकरिता करण्यात येत असे. उच्च व कनिष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करी व ते आमरण आपल्या पदावर राहात. तत्कालीन संविधानाने राष्ट्राध्यक्षास जवळजवळ सर्वाधिकार दिलेले होते आणि सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती तोच करीत असे. १८७७ पासून ट्रू विग पक्षाचा नेता हाच लायबीरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येत असे आणि त्या पक्षाचीच मक्तेदारी तत्कालीन शासनात होती. स्थानिक प्रशासन व केंद्रसत्ता यांत स्वतंत्र सत्ताविभाजन असे नव्हते. प्रशासन व निवडणुका यांकरिता देशाचे नऊ परगण्यांत आणि चार क्षेत्रीय भागांत विभाजन केलेले होते. परगण्यांचे सर्व अधिकारी तसेच मन्रोव्हिया वगैरे मोठ्या शहरांचे महापौर आणि नगरपालिकांचे अध्यक्ष यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्षामार्फतच होई. स्थानिक प्रशासनाला कर लादण्याचा अधिकार नव्हता. केंद्रीय हुकुमांचे पालन आणि कार्यवाही एवढेच त्यांचे मर्यादित स्वरूप होते.


या संविधानानुसार १९८० पर्यंत लायबीरियात नागरी शासन अस्तित्वात होते परंतु त्या वर्षी लष्करी क्रांती होऊन १२ एप्रिल १९८० रोजी लष्करी कायदा जारी करण्यात आला. पुढील सूचना देईपर्यंत संविधान निलंबित केले व विधिमंडळ बरखास्त करण्यात आले तसेच निवडणुका स्थगित केल्या. प्रशासनासाठी लोकांचे एक विमोचन मंडळ स्थापन केले. आपाततः राष्ट्राध्यक्ष हा सर्व राज्याचा प्रमुख आणि सर्व लष्कराचा सरसेनापती झाला. १९८१ मध्ये संविधानाच्या मसुद्याविषयी चर्चा सुरू होऊन १९८३ मध्ये विमोचन मंडळाने संविधानाचा आराखडा मान्य केला. नवीन संविधानानुसार कार्यकारी सत्ता व लष्कराचे सरसेनापतिपद राष्ट्राध्यक्षांकडेच सुपूर्त करण्यात आले. नवीन संविधानानुसार प्रौढ मताधिकाराने राष्ट्राध्यक्षाची सहा वर्षांकरिता निवड व कायदे करण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या सीनेट व लोकप्रतिनिधिगृहांची निर्मिती करण्यात येऊन निवड प्रत्यक्ष मतदानाने करण्याची तरतूद केली. निवडणुकीसाठी शासनाने बहुपक्षीय पद्धत स्वीकारावी असे ठरले. ३ जुलै १९८४ रोजी राष्ट्रीय जनमतपृच्छेद्वारे या संविधानास अनुमती दर्शविली. १९८५ ऑक्टोबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व विधिमंडळाच्या निवडणुका होऊन ६ जानेवारी १९८६ रोजी नवीन संविधान अधिकृतरीत्या कार्यवाहीत आले. त्याच वेळी राष्ट्रीय सभेच्या दोनतृतीयांश बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूदही संविधानात समाविष्ट करण्यात आली.

राष्ट्रीय सभेत सीनेटचे २६ सभासद असून लोकप्रतिनिधिगृहाची सभासद संख्या ६४ आहे. १५ ऑक्टोबर १९८५ रोजी झालेल्या निवडणुकीनुसार पक्षोपपक्षांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते.

पक्षाचे नाव 

सीनेट 

लोकप्रतिनिधिगृह 

एन्‌.डी.पी.एल्‌. 

एल्‌.ए.पी. 

यू.पी. 

एल्‌.यू.पी. 

२२ 

२ 

१ 

१ 

५१ 

८ 

२ 

३ 

यांपैकी नॅशनल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ लायबीरिया (एन्. डी. पी. एल्.) हा पक्ष डो या राष्ट्राध्यक्षाने स्थापन केला असून (१९८४) त्याला त्याच्या क्रान जमातीचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे या पक्षाचेच शासनात वर्चस्व आढळते. अन्य राजकीय पक्षांपैकी जुना ट्रू विग पार्टी हा पक्ष जवळजवळ नामशेष झाला आहे. लायबीरिया ग्रँड कोअलिशन (स्था. १९८३), लायबीरियन ॲक्शन पार्टी, लायबीरियन युनिफिकेशन पार्टी, लायबीरियन लिबरल पार्टी (स्था. १९८७), लायबीरियन पीपल्स पार्टी (स्था. १९८८) व युनायटेड पीपल्स पार्टी हे प्रमुख पक्ष होत. यांतील एल्. पी. पी. आणि एल्. यू. पी. या पक्षांनी १९८० च्या क्रांतीपूर्वी लायबीरियाच्या एकीकरणासाठी तसेच एकात्मतेसाठी प्रयत्न केले असून डोच्या एकाधिकारशाहीस त्यांचा प्रथमपासूनच विरोध आहे. यामुळे या दोन्ही पक्षांवर १९८५ मध्ये काही काळ बंदी घालण्यात आली. निवडणूक आयोगाने मान्यता न दिलेले, अन्य काही पक्षही कार्यरत आहेत.

संरक्षण व न्यायव्यवस्था : लायबीरियाच्या लष्करात भूसेनेला विशेष महत्त्व असून तिची संख्या ५,३०० होती (१९००). तिची सहा पलटणींत विभागणी केलेली आहे. दहा हजारांची लोकसेना राखीव दल म्हणून वापरण्यात येते. राष्ट्रीय पोलीसदलात एक हजार स्त्री-पुरुष आहेत. यांशिवाय ५०० लोकांचे एक टेहळणी व संरक्षक दल किनाऱ्याच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहे (१९८९). तेच लायबीरियाचे नाविक दल असून त्यात तीन कर्तक बोटी, तीन टेहळणी बोटी व एक विमानवाहू जहाज आहे. यांव्यतिरिक्त २,००० लोकांची सैनिकीसम संघटना आहे. हवाई दलाची स्थापना टेहळणी करण्याच्या उद्देशाने झाली असून लायबीरियन भूसेनेची ती एक साहाय्यक शाखा आहे. तीत २५० तज्ञ काम करतात. संरक्षणावर एकूण उत्पन्नापैकी जवळजवळ १० टक्के खर्च करण्यात येतो. १९८६-८७ सालात सु. ३७.७ दशलक्ष डॉलर संरक्षण खात्यावर खर्च करण्यात आले. सोळा वर्षांवरील तरुणांना लष्करी सेवा सक्तीची असून सोळा ते पन्नास वर्षांपर्यंत राष्ट्रसेवेकरिता लष्करात सक्तीने नाव नोंदणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सरंक्षण खाते आणि न्याय खाते लष्करी सेवेची प्रशासनव्यवस्था पाहते. १९८० च्या अवचित सत्तांतरापूर्वी देशात सर्वोच्च न्यायालय, परिक्रम न्यायालय, दंडाधिकारी न्यायालय आणि जस्टिस ऑफ द पीस अशी न्यायव्यवस्था होती. २५ एप्रिल १९८० रोजी लष्करी कायदा अंमलात आल्यानंतर संविधान निलंबित करण्यात आले आणि सर्व वैधानिक व कार्यकारी अधिकार विमोचन मंडळाकडे सुपूर्त करण्यात आले. त्यावेळी विमोचन मंडळाने हुकूमनामा काढून पीपल्स सुप्रीम ट्रायब्यूनल या न्यायालयाची स्थापना केली. या न्यायालयात सात न्यायाधीश असून त्यांची नियुक्ती विमोचन मंडळ करते. त्यांचे अधिकारही मर्यादित करण्यात आले आहेत. तसेच १९८२ मध्ये या न्यायालयाचे नाव पीपल्स सुप्रीम कोर्ट असे करण्यात आले आणि त्याचा अध्यक्ष व सभासद हे अनुक्रमे मुख्य न्यायाधीश व सहन्यायाधीश झाले. त्याचवेळी परिक्रम व दंडाधिकारी न्यायालय यांची पुनःस्थापना करण्यात आली. १९८८ मध्ये कनिष्ठ न्यायालयांचे पूर्ववत काम सुरू झाले आणि पाच उच्च न्यायाधीशांचे सर्वोच्च न्यायालय पुन्हा अस्तित्वात आले.

आर्थिक स्थिती : लायबीरियाच्या आधुनिक प्रच्छन्न अर्थव्यवस्थेचे उगमस्थान दुसऱ्या महायुद्धानंतरच्या मुक्त व्यापारी धोरणात आढळते. राष्ट्राध्यक्ष विल्यम टबमन याने हे धोरण अवलंबिले आणि त्यानंतरच्या राष्ट्राध्यक्षांनी तेच पुढे चालू ठेवले. परिणामतः दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चात्य देशांना, विशेषतः अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना, लायबीरियात भांडवल-गुंतवणूक करण्यास चालना मिळाली आणि तेथील मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनियोग होऊ लागला. अन्यथा लायबीरियाची अर्थव्यवस्था मूलतः कृषिप्रधान असून अद्यापही हा देश विकसनशील अवस्थेत आहे. देशातील ७१.८ टक्के लोक कृषिव्यवसायावर अवलंबून आहेत. कृषितज्ञांच्या मते देशातील जमिनीचे सु. निम्मे क्षेत्र शेतीस उपयुक्त आहे. त्यांपैकी सु. आठ लक्ष हेक्टर जमीन लागवडयोग्य असून डोंगरउतारावरील वीस लाख हेक्टर जमिनीत वनीकरण व फळबागा करता येतील. भात व कसावा ही दोन प्रमुख पिके असून केळी, कॉफी, ऊस, कोको, भुईमूग, वाटाणा, बटाटे, सुरण, नारळ, कापूस आणि लिंबू वर्गातील फळे ही अन्य पिके घेतली जातात. यांपैकी बहुतेक सर्व पिके पारंपरिक पद्धतीने मशागत करून घेण्यात येतात. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा तांदूळ देशात पिकत नाही. त्यामुळे प्रसंगोपात्त तांदळाची अमेरिका व ईजिप्त यांकडून आयात करावी लागते. भाताचे उत्पादन वाढावे म्हणून तैवानी, फिलिपिनी तसेच श्रीलंकेतील कृषितज्ञ सांप्रत प्रयोग करीत आहेत. रबर, कॉफी, कोको, ताडफळे ही नगदी पिके आहेत. रबराच्या लागवडीस येथील हवामान आणि जमीन अनुकूल व पोषक आहे. त्याचा फायदा घेऊन अमेरिकन कंपन्यांनी या धंद्यातही गुंतवणुकीस सुरुवात केली. अमेरिकेतील फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीने १९२६ पासून शासनाकडून रबराच्या लागवडीसाठी सवलत मिळविली आहे व ती २०२५ पर्यंत कार्यवाहीत राहील. याकरिता चाळीस हजार मजूर या उद्योगात गुंतलेले असून १९८१ मध्ये रबराच्या पिकासाठी सु. ऐंशी हजार हेक्टर जमीन प्रत्यक्ष लागवडीखाली होती. मन्रोव्हियात लायबीरिया प्रोड्यूस मार्केटिंग कॉर्पोरेशन ह्या कंपनीने देशातील सर्वांत मोठी ताडतेल गाळणारी गिरणी चालविली असून शिवाय देशात व्यापारी तत्त्वावर चाललेल्या दोन ताडतेल गिरण्या आहेत. लायबीरिया इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह या कंपनीने ग्रँड बॅसा परगण्यातील सु. २,४२४ हेक्टरमध्ये ताडाची लागवड केली असून वेस्ट आफ्रिका ॲग्रिकल्चरल कंपनीने ग्रँड केप मौंट परगण्यात सु. १,६१६ हेक्टरमध्ये ताडाची लागवड केली आहे. लायबीरियात कॉफीचे पीक परंपरागत पद्धतीने काढण्यात येते. कॉफीचे दोन प्रकार आहेत : रोबुस्टा आणि येथे लोकप्रिय असलेला लायबीरिका १९८६ मध्ये लायबीरियात पुढीलप्रमाणे शेती उत्पन्न (आकडे टनांत) झाले : तांदूळ २,९५,००० कसावा ३,२६,००० कॉफी ९,००० लिंबूवर्गातील फळे ७,००० ऊस १,५९,००० कोको ५,०००, ताडफळे ८,०००.


लायबीरियात पशुसंवर्धनास पोषक हवामान आणि वनस्पती नाहीत त्यामुळे काही प्रमाणातच कुक्कुटपालन व पशुपालन हे व्यवसाय चालतात. १९८६ मध्ये फाओच्या आकडेवारीनुसार देशात ४३,००० गुरे १,३१,००० डुकरे २,४६,००० मेंढ्या २,४३,००० बकऱ्या व ४०,००,००० कोंबड्या होत्या.

घनदाट अरण्यामुळे लाकूडकाम हा व्यवसायही महत्त्वाचा ठरतो जंगलात एबनी, मॅहॉगनी वगैरे उत्तम प्रकारचे लाकूड मिळते तथापि रहदारीच्या अडचणी आणि जंगलात काम करण्यास मजुरांची कमतरता यांमुळे वनविद्येचा विकास काही अंशी खंडित झाला आहे. त्यास चालना देण्याचे प्रयत्न परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने शासन करीत आहे. त्यामुळे या नैसर्गिक संपत्तीचा अर्थकारणास म्हणावा तसा लाभ अद्यापि मिळत नाही. याउलट लायबीरियातील क्रू व फांटी जमातींतील लोक मच्छीमारी धंद्यात निष्णात असून किनारपट्टीवर मच्छीमारीत त्यांची मक्तेदारी आहे. फांटी हे धानातील असून मच्छीमारीच्या पारंपरिक धंद्यात आहेत. सांप्रत दोन लायबीरियन मच्छीमारी कंपन्यांनी या व्यवसायात पदार्पण केले असून या व्यवसायास चालना मिळाली आहे. याशिवाय तलावांतून मत्स्यबीज व्यवसायास अलीकडे प्रारंभ झाला आहे.

पश्चिम आफ्रिकेत खाण उद्योगात लायबीरिया आघाडीवर असून तेथील नैसर्गिक संपत्तीचा अद्यापि पुरेपूर लाभ घेतला जात नाही. लोहधातूची निर्यात करणारे हे आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र असून लोहधातूव्यतिरिक्त मँगॅनीज, ग्रॅफाइट, सोने, हिरे, बायराइट ही अन्य खनिजे सापडतात. लोहधातू हे खनिज प्रामुख्याने बोमी टेकड्या, बाँग व निंबा पर्वतश्रेणी यांतील खाणींतून मिळते. या खाणी मन्रोव्हिया, बूकॅनन या बंदरांशी अरुंदमापी रेल्वेने जोडण्यात आल्या आहेत. खाणींचे व्यवस्थापन व मालकी परदेशी, विशेषतः अमेरिका, इटली, जर्मनी येथील कंपन्यांकडे आहे. बोमी टेकड्यांतील खाणीत शुद्ध स्वरूपात (जवळजवळ ६६ टक्के) लोहधातू उपलब्ध होतो. याशिवाय पुटू पर्वतश्रेणी (पूर्व भाग), वोलोगिझी पर्वतश्रेणी (वायव्य भाग), किटोमा पर्वत (निंबाचा दक्षिण भाग) येथील खाणींतूनही खनिजे मिळतात. निंबा पर्वतश्रेणीतील साठा हा जगातील एक सर्वांत मोठा व समृद्ध साठा आहे.

लायबीरियातील निर्यातवस्तूंत लोहधातूचे प्रमाण एकूण निर्यातीच्या तुलनेत १९८५ मध्ये ६४% होते. त्याखालोखाल रबराची निर्यात झाली. त्याचे प्रमाण १७.७% होते. १९८६ मध्ये ९०,००० टन रबराची निर्यात झाली. १९६९ साली लायबीरियाने निर्यातीतील उत्पन्नाचा आफ्रिकेत उच्चांक गाठला. ताडतेलाच्या निर्यातीबाबतही लायबीरिया आघाडीवर असून एका फ्रेंच खासगी कंपनीने ताडतेलाचा पहिला शुद्धीकरण कारखाना आणि दुर्लक्षित ताडाच्या बागांचे संवर्धनसंरक्षण करण्याचे काम १९८७ साली हाती घेतले. दुसऱ्या महायुद्धामुळे आणि नंतरच्या अवचित सत्तांतरामुळे निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला आणि परदेशी व्यापारी कंपन्यांनी आपल्या भांडवल गुंतवणुकीत आखडता हात घेतला होता. तथापि अलीकडे अमेरिकेच्या आर्थिक साहाय्याने पुन्हा खाण-उत्पादनावर भर देण्यात आला आहे.

खनिज तेलाच्या बाबतीत परावलंबित्व नष्ट करण्यासाठी शासनाने कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील काही खासगी व्यापारी कंपन्यांना तेल समन्वेषणासाठी सवलती देऊन लायबीरियात खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यास उत्तेजन दिले आहे. तज्ञांच्या मते किनारपट्टीजवळील भागात तेलाचे साठे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

देशातील आठ बँका आर्थिक सेवा देतात. त्यांपैकी राष्ट्रीय बँक, कृषी व सहकारी विकास बँक, सिटी बँक, राष्ट्रीय गृह आणि बचत बँक, लायबीरियन बँक फॉर डेव्हलपमेन्ट अँन्ड इन्‌व्हेस्टमेन्ट या प्रमुख असून लायबीरियन ॲग्रिकल्चरल क्रेडिट कॉर्पोरेशन आणि लायबीरिया डेव्हलपमेंन्ट कॉर्पोरेशन या दोन पतपेढ्यासम निगम आर्थिक साहाय्य देतात.

डॉलर हे देशाचे अधिकृत चलन आहे. अमेरिकी डॉलरशी ते सममूल्य (१९४२ पासून) असले, तरी देशात कागदी चलन नाही. चांदीची, तांब्याची नाणी प्रचलित आहेत. अमेरिकी डॉलरलाही कायदेशीर मान्यत आहे. ३१ डिसेंबर १९८७ रोजी १ स्टर्लिंग पौंड = १.८७८५ लायबीरियन डॉलर व १ लायबीरियन डॉलर = १ अमेरिकी डॉलर असा विनिमय दर होता. देशात ५, १०, २५, ५० सेंटची व १, ५ लायबीरियन डॉलरची चांदीची, तर १ सेंटची तांब्याची आणि २ सेंटची इतर धातूंची नाणी प्रचारात आहेत.लायबीरियात फारसे उद्योगधंदे आणि कारखाने नाहीत. देशाला तंबाखू, मद्यार्क, वंगण, अवजड यंत्रसामग्री, खनिज तेल, मोटारी, व तत्सम वाहने, सुटे भाग, काही प्रमाणात धान्य, विशेषतः तांदूळ, रसायने इ. वस्तू, आयात कराव्या लागतात. इतर सामान्य गरजांसाठी अनेक छोटे कारखाने असून त्यांतून भाजक्या विटा, फरश्या, साबण, खिळे, गाद्या, पादत्राणे, प्लॅस्टिकच्या वस्तू, रंग, आसवन्या, सौम्य पेये, सिमेंट, काड्यापेट्या, बिस्किटे, ऑक्सिजन, ॲसिटिलीन इत्यादींचे उत्पादन होते. अमेरिका, सौदी अरेबिया आणि जर्मनी हे देश आयात-निर्यातीतील प्रमुख व्यापारी देश असून अमेरिका सर्वांत अधिक माल खरेदी करते आणि अनेक वस्तू लायबीरियात पाठविते. १९६५ ते १९८५ दरम्यान स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दरडोई दर घसरला आणि तो वार्षिक सरासरी १.४ टक्के एवढा खाली आला. याच काळात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वार्षिक सरासरीने सु. २.८ टक्क्यांवर घसरले. याला प्रमुख कारण निर्यातीतील घट हे होय.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी लायबीरियात सार्वजनिक क्षेत्रात वीजनिर्मिती फारशी झालीच नाही. फक्त परदेशी व्यापारी कंपन्या आपापल्या उद्योगांकरिता खासगी रीत्या जनित्रावर वीजनिर्मिती करीत. अलीकडे वीजनिर्मिती प्रामुख्याने सार्वजनिक व खासगी रीत्या केले जाते. जलविद्युत् केंद्रांद्वारे प्रामुख्याने वीजनिमिर्ती होते. मात्र काही ठिकाणी खनिज तेलाच्या साहाय्याने जनित्रांवर वीजउत्पादन करतात. देशात १९८६ मध्ये एकूण ८८ कोटी किवॉ. वीजनिर्मिती झाली. रबर उद्योग व लोखंडाच्या खाणींतून स्वतःची विद्युत्‌शक्ती वापरात असून अलीकडे मौंट कॉफी येथे सेंट पॉल नदीवर जलविद्युत् केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र मन्रोव्हिया आणि त्याच्या जवळपासच्या जिल्ह्यांना १,०२,००० किवॉ. विद्युत्‌शक्तीचा पुरवठा करते.

वाहतूक व संदेशवहन : लायबीरियात वाहतुकीच्या सोयी फार कमी आहेत. देशात अद्यापि कच्चे रस्ते मोठ्या प्रमाणावर असून परदेशी कंपन्यांनी मालाची ने-आण करण्यासाठी मर्यादित रस्ते डांबरी करून घेतले आहेत. त्यामुळे देशात फरसबंदी व कामचलाऊ किंवा मोठ्या रस्त्यांना जोडणारे छोटे अरुंद मार्ग आहेत. देशात सार्वजनिक व खाजगी असे एकूण ५,४१२ किमी. लांबीचे रस्ते होते (१९८१). यांपैकी १,८५२ किमी. प्रमुख मार्ग असून १,३२५ किमी. दुय्यम दर्जाचे रस्ते होते. त्यांतील फक्त ५.३ टक्के रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. मन्रोव्हिया-सन्नीकेल्ले हा प्रमुख महामार्ग देशाच्या ईशान्य सरहद्दीवर गिनी प्रजासत्ताकाला गांटाजवळ जोडला असून त्यातील काही जोडरस्ते टापेटा (निंबा परगणा) या गावी जातात. मन्रोव्हिया ते बूकॅनन असाही एक महत्त्वाचा हमरस्ता आहे. मानो नदीवरील पुलाने लायबीरियातील वाहतूक सीएरा लिओनमधील रस्त्यांशी जोडण्यात आली आहे. फ्रीटाउन-मन्रोव्हिया महामार्गाचे काम १९८४ मध्ये सुरू झाले असून ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. हा रस्ता मॉरिटेनिया व नायजेरिया यांच्या संकल्पित महामार्गाला जोडला जाईल. सेंट पॉल नदीवरील पुलामुळे बोमी टेकड्यातील खाणींशी रस्त्याचा संपर्क वाढला आहे.


लायबीरियातील लोहमार्ग हे मुख्यतः लोहधातुकाच्या वाहतुकीसाठी अस्तित्वात आले आणि बहुतेक मार्ग अरुंद मापी असून पहिला लोहमार्ग १९५१ मध्ये मन्रोव्हिया ते बोमी टेकड्या यांदरम्यान सु. ६९ किमी.चा बांधण्यात आला. तोच पुढे नॅशनल आयर्न-ओअर कंपनीपर्यंत म्हणजे ७९ किमी. वाढविण्यात आला. १९८० मध्ये देशात एकूण सु. ५१२ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यांचे नियोजन खाजगी कंपन्या करतात. मन्रोव्हिया, बूकॅनन, हार्पर वगैरे सु. १४ बंदरे लायबीरियात आहेत. एकूण पाच लाख रेडिओ संच आणि त्रेचाळीस हजार दूरचित्रवाणी संच (रंगीत १५,०००) होते (१९८६). लायबीरियन ब्रॉडकास्टिंग सिस्टिम ही शासकीय संस्था सर्वच कार्यक्रमांचे आयोजन करते. मन्रोव्हिया येथे दोन्हींचे प्रमुख केंद्र आहे. देशात आठ दैनिके असून सात नियतकालिके आहेत. त्यांपैकी बाँग क्रायर, डेली ऑब्झर्व्हर, मिरर, सन टाइम्स, सन्डे एक्सप्रेस ही प्रमुख आहेत. द न्यू लायबीरियन हे दैनिक सरकारपुरस्कृत आहे. देशातील लायबीरियन न्यूज एजन्सी ही माहिती व प्रसारण माध्यमाच्या अधिसत्तेखाली काम करते. मन्रोव्हिया, बॅसा, हार्पर, कोलाहून, केप मौंट व ग्रीनव्हिल येथे बिनतारी संदेश केंद्र असून यूरोप व अमेरिकेशी बिनतारी संदेशवहनाची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे.

लायबीरियात बोटींची मुक्त नोंदणी पद्धती आहे. प्रतिवर्षी मन्रोव्हियात २,००० व्यापारी बोटी येतात. शासन बोटींच्या नोंदणीसाठी नाममात्र शुल्क आकारते आणि त्यावर वार्षिक करही तसाच सौम्य प्रमाणात बसविते. शिवाय त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण-विशेषतः लायबीरियन ध्वज लावण्याचे बंधन-ठेवीत नाही. परिणामतः यातून लायबीरियाला अकरा दशलक्ष डॉलर एवढे उत्पन्न मिळाले (१९८६). अलीकडे लाकूड व ताडतेल यांची निर्यात करण्याकरिता हार्पर बंदराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. तसेच ग्रीनव्हिल या बंदराचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बूकॅनन या बंदराचे सर्व व्यवहार लॅम्को ही अमेरिकन-स्वीडिश कंपनी पाहते आणि त्या बंदराचा मुख्यत्वे कच्च्या लोखंडाची निर्यात करण्यासाठी उपयोग होतो. याशिवाय लायबीरिया नॅशनल शिपिंग लाइन (स्था. १९८७) ही शासकीय मालकीची कंपनी असून नॅशनल पोर्ट ऑथॉरिटी मन्रोव्हिया, ग्रीनव्हिल व हार्पर येथील प्रशासकीय व्यवस्थापन पाहते.

लायबीरियात रॉबर्ट्‌स फील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जेम्स स्प्रिग्ज पाइन एअरपोर्ट हे दोन प्रमुख विमानतळ असून देशात विमान वाहतुकीचे अन्य लहानमोठे शंभर तात्पुरते पट्टे आहेत.

लोक व समाजजीवन : लायबीरियातील समाजजीवनावर, विशेषतः उच्चभ्रू समाजावर (अमेरिको लायबीरियन), पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव दिसतो, तर बहुसंख्य आदिवासी असलेल्या समाजात आदिम संस्कृती दृढमूल झाली आहे. लायबीरियातील लोकांचे दोन प्रमुख समूह (गट) पडतात : एक, आदिवासी लोक आणि दोन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील निग्रो लोकांचे येथे वसाहत केलेले वंशज. या वंशजांना अमेरिको लायबीरियन ही संज्ञा रूढ झाली आहे. यांतील बरेच लोक १८२० ते १८६५ दरम्यान अन्य देशांतून येथे येऊन स्थायिक झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात ते फक्त पाच टक्के असून त्यांचे सर्व क्षेत्रांत वर्चस्व आहे. त्यांची वस्ती प्रामुख्याने मन्रोव्हिया व किनारपट्टीतील बूकॅनन, हार्पर, ग्रीनव्हिल, रॉबर्ट्‌सपोर्ट या शहरांतून आढळते. ते मुख्यत्वे इंग्रजी भाषा बोलतात आणि तीच देशाची अधिकृत भाषा आहे. ते ख्रिस्ती धर्मीय असून प्रॉटेस्टंट वा रोमन कॅथलिक चर्चमध्ये जातात. त्यांचा पोषाख व राहणीमान यूरोपीय पद्धतीचे आहे. टेनिस, सॉकर यांसारखे खेळ आणि चित्रपट, निशागृहे ही त्यांची करमणुकीची साधने होत.

देशात आदिवासी व मुसलमान यांची जवळजवळ ९५ टक्के लोकसंख्या आहे. त्यांपैकी १९८५ मध्ये ६,७०,००० मुसलमान होते. पश्चिम आफ्रिकन जमातींचे तीन भाषिक गटांत वर्गीकरण करण्यात येते. हे सर्व नेग्रिटो वंशाचे आहेत. त्यांना अनुक्रमे मांडे, क्रू आणि मेल ही नावे असून त्यांत मानवजातिवर्णनानुसार एकूण १६ जमाती आहेत. त्यांपैकी कपेल, बॅसा, ग्यो, क्रू, ग्रेबो व मानो या प्रमुख आहेत. यांतील काही आदिवासींची वस्ती लायबीरियाच्या शेजारील देशांतही आढळते. प्रत्येक आदिवासी जमातीची बोलीभाषा भिन्न असून चालीरीती, रूढी, परंपरा आणि धर्म यांतही प्रदेशपरत्वे भिन्नता आढळते. सामान्यतः सर्व जमातींत पितरपूजेस महत्त्व असून निसर्गपूजाही रूढ आहे. भूतपिशास्त्र व जादूटोणा यांवर त्यांचा विश्वास आहे. आदिवासींची वस्ती प्रामुख्याने खेड्यांतून असून ती जंगलांच्या सान्निध्यात आढळते. या आदिम समूहांच्या झोपड्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मांडे समूहाच्या झोपड्या गोलाकार असून त्यांचे छप्पर निमुळते शंक्वाकार असते आणि भिंती कुडाच्या असतात, तर क्रू समूहाच्या घरांची रचना आयताकृती असून छप्पर खाली झुकलेले असते आणि भिंती सारवलेल्या कुडाच्या असतात. सामान्यतः शेती, शिकार आणि जंगलातील मध, फळे, मुळे गोळा करणे हे व्यवसाय आदिवासी करतात. अलीकडे खाण उद्योगातून हे लोक मजूर म्हणूनही काम करू लागले आहेत. किनारपट्टीवरील क्रू मच्छीमारीसाठी प्रसिद्ध आहेत. काही जमाती पशुपालक असून गुरे, बकऱ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबड्या, बदके पाळतात परंतु यांचा उपयोग प्रामुख्याने बळी देण्यासाठी व खाण्यासाठीच करतात. वधूमूल्य जनावरांच्या रूपातच देतात. सर्व आदिवासींत वधूमूल्याची चाल असून सेवाविवाहही रूढ आहे. मांडे आदिवासींत लग्नात मामेबहिणीस अग्रक्रम देतात. सर्व जमातींत आप्तसंबंधांना विशेष महत्त्व आहे. व्हाई, बुकेरी या आदिवासींनी एकोणिसाव्या शतकात एक वर्णमाला तयार केली होती. तिचा शोध काही जर्मन तज्ञांना दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लागला. आदिवासींच्या संघटना धर्माचे व शिक्षणाचे संवर्धन करतात. क्रू जमातीत वयोगटानुसार संघटना असून तरुण मुलांना लष्करी शिक्षण दिले जाते.

आदिवासी गाव व झोपड्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यात नृत्य, संगीत आणि कथाकथन यांची परंपरा असून ग्यो जमातीतील मुखवटे आणि मूर्ती यांचा पारंपरिक व्यवसाय प्रसिद्ध आहे. त्यांच्या मूर्ती व मुखवटे आफ्रिका खंडात प्रसिद्ध आहेत. याशिवाय मांडे आदिवासी कपड्यांवर रंगकाम करतात. लोम जमातीतील रंगीत कापडावरील विणकामही प्रसिद्ध आहे. या आदिम कलांना अलीकडे प्रोत्साहन मिळत आहे. बहुतेक आदिवासी इंग्रजी टी या मूळाक्षराच्या आकाराचे कच्च्या लोखंडाचे नाणे हे चलन म्हणून वापरतात.

येथील आदिवासी जीवन स्वच्छंद व परंपरागत चालीरीती व रूढींवर आधारित असले, तरी त्यांना दारिद्र्य, रोगराई यांना दैनंदिन जीवनात तोंड द्यावे लागते. तसेच विसाव्या शतकात त्यांच्यात लोकमत जागृत झाल्यामुळे अमेरिको-लायबीरियन समाजाचे वर्चस्व त्यांना जाचू लागले आहे. परिणामतः त्यांनी या लोकांच्या शासनव्यवस्थेविरुद्ध अनेक उठाव केले. त्यांपैकी १९१५ व १९८० चे उठाव विशेष गाजले.

अमेरिको-लायबीरियन, आदिवासी यांव्यतिरिक्त लायबीरियात अमेरिकन, यूरोपीय व आशियाई या परकीय लोकांचा एक तिसरा समूह असून देशाच्या आर्थिक उलाढालीत त्यांना विशेष महत्त्व दिले जाते. या तिसऱ्या गटातील लोक शिक्षक, व्यापारी, व्यवस्थापक, अभियंता इ. उच्च पदांवर काम करतात आणि त्यांपैकी काही लोकांनी देशात व्यापारी कंपन्या काढून तेथील व्यापारावर व खाणकामावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तथापि त्यांना संविधानानुसार लायबीरियात जमीन खरेदी करण्यास व नागरिकत्व स्वीकारण्यास मान्यता नाही.

लायबीरिया हे ख्रिस्ती राष्ट्र आहे. तथापि संविधानाने धार्मिक स्वांतत्र्य दिले आहे, त्यामुळे ख्रिस्ती व इस्लाम या दोन मुख्य धर्मांव्यतिरिक्त लहान-मोठे अन्य अनेक धार्मिक पंथ मूळ आदिवासींत आहेत. रोमन कॅथलिक चर्चचे प्राधान्य असून ल्यूथरन, प्रॉव्हिडन्स, बॅप्टिस्ट, युनायटेड मेथडिस्ट इ. अन्य चर्चे आहेत.


शिक्षण : लायबीरियात शिक्षणाचा प्रसार फारच मर्यादित प्रमाणात झाला असून फक्त २५ टक्के लोक साक्षर आहेत. १९३९ पासून शासनाने ६ ते १६ वर्षांमधील मुलांना शिक्षण सक्तीचे केले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आहे. देशात एकूण १,६९१ विद्यालये, ९,८५६ शिक्षक व २,६०,५६० विद्यार्थी १९८५ मध्ये शिकत होते. अलीकडे दहा आदिवासी भाषांना शासनाने मान्यता दिली असून त्यांतून काही लेखन होते. देशाची अधिकृत भाषा इंग्रजी असली, तरी बहुसंख्य आदिम लोक आपली परंपरागत बोली भाषाच व्यवहारात वापरतात. त्यामुळे पाश्चात्त्य धर्तीवर देशात युनिव्हर्सिटी ऑफ लायबीरिया (स्था. १९५१) हे एकच विद्यापीठ उच्च शिक्षणाचे ज्ञानार्जन करते. हे विद्यापीठ मन्रोव्हिया येथे असून शासन व मिशनरी लोक बहुसंख्य प्राथमिक विद्यालये चालवितात. विद्यापीठात मानव्यविद्या, तंत्रज्ञान, कृषी, वनविद्या, विधी, वैद्यक, लोकप्रशासन वगैरेंची सात महाविद्यालये आहेत. त्यांतून १९८८ मध्ये एकूण ३,३१७ विद्यार्थी शिकत होते व २५० अध्यापक अध्यापन करीत होते. यांव्यतिरिक्त काही खाजगी शाळा आहेत. व्यावसायिक शिक्षण देणारी तीन महाविद्यालये असून त्यांपैकी बुकर वॉशिंग्टन कृषी व औद्योगिक संस्था काकाटा येथे आहे व पश्चिम आफ्रिका संगणकशास्त्र संस्था आणि टबमन तंत्र महाविद्यालय, वैद्यकीय विद्यालय मन्रोव्हिया येथे आहेत. उच्च शिक्षणासाठी शासनाची अधिछात्रवृत्ती घेऊन विद्यार्थी परदेशांत जातात. टबमन विद्यापीठाची स्थापना नजिकच्या काळात करण्याची योजना आहे.

महत्त्वाची स्थळे : लायबीरियात पर्यटनव्यवसाय अद्यापि विकसित झालेला नाही तथापि पर्यटन कार्यालयाची स्थापना १९८६ मध्ये झाली असून पर्यटन व्यवसाय विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. देशातील महत्त्वाच्या स्थळांत ⇨ मन्रोव्हिया  हे नैर्ॠत्य किनाऱ्यावरील राजधानीचे ठिकाण व उत्तम बंदर आहे. याशिवाय या किनारपट्टीत बूकॅनन, रिव्हर सेस, ग्रीनव्हिल आणि हार्पर ही चार प्रमुख बंदरे वसली आहेत. देशातील रबर, लोहधातुक, ताडतेल आणि इतर खनिजांची निर्यात यांतूनच होते. यांशिवाय देशात व्हॉइन्जाम, झॉर्झार, काकाटा, स्वाकोको, गांटा, सन्नीक्वेल्ले, टापेटा, रॉबर्ट्‌सपोर्ट ही अन्य शहरे आहेत.

संदर्भ : 1. Anderson, R. E. Liberia: America’s African Friend, Westport, 1976.

             2. Clapham, C. Liberia and Sierra Leone, Cambridgte, 1976.

             3. Dunn, D. E. The Foreign Policy of Liberia during the Tubman Era: 1944-71, London, 1979.

            4. Marinelli, Lawrence A, The New Liberia: A History of Political Survey, New York, 1964.

            5. Ministry of Planning and Economic Affairs, Economic Survey of Liberia, Monrovia, 1981.

            6. Schulze, Willi, A New Geography of Liberia, London, 1973.

            7. Schwab, G. Tribes of the Liberian Hinterland, Cambridge (Mass.), 1947.

            8. Shick, Tom W. Behold the Promised Land: A History of Afro-American Settler Society in 19th Century Liberia, Baltimore,

                1980.

            9. Wilson, Charles, Liberia: Block Africa in Microcosm, New York, 1971.

           10. Wreh, Tuan, The Love of Liberty: The Rule of President William V. S. Tubman in Liberia, London, 1978.

देशपांडे, सु. र.

चित्रपत्र ६ लायबीरिया लिख्टेनश्टाइन

चित्रपत्र २२            लायबीरिया लिख्टेनश्टाइन
 राजधानी मन्‍‌रोव्हियातील प्रमुख मार्गाचे दृश्य, लायबीरिया.  मन्‍रोव्हियाची पारंपारिक बाजारपेठ, लायबीरिया.
निंबा पर्वतातील लाहधातुकाची खाण, लायबीरिया. कोळीवाड्यातील जाळी धुण्याच्या मातीच्या टाक्या, मन्‍रोव्हिया बंदर, लायबीरिया.
राजधानी फादूत्स येथील एक प्रमुख रस्ता, लिख्टेनश्टाइन. रबरमळ्यातील कामगाराची पानांनी शाकारलेली मातीची झोपडी, लायबीरिया.
फादूत्स शहराचे एक दृश्य, लिख्टेनश्टाइन. फादूत्स येथील ऐतिहासिक मध्ययुगीन किल्ला, लिख्टेनश्टाइन.