ॲन्नापोलिस : (अनॅपलिस). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मेरिलँड राज्याची राजधानी. लोकसंख्या २९,५९२ (१९७०). सेव्हर्न नदीच्या दक्षिणेस, चेसापीक उपसागराच्या पश्चिमेस तीन किमी., वॉशिंग्टनच्या ईशान्येस ४० किमी. व बॉल्टिमोरच्या आग्नेयीस ४० किमी. अंतरावर हे आहे. १६४८ मध्ये स्थापन झालेल्या या शहराचे पूर्वीचे नाव ‘प्रॉव्हिडन्स’ होते. फळफळावळ, भाजीपाला आणि उपसागरातील मासळी यांचाच येथे व्यापार असला, तरी रेखीव व ऐतिहासिक शहर म्हणून याची प्रसिद्धी मोठी आहे. अमेरिकन काँग्रेसच्या बैठका येथे काही दिवस झाल्या होत्या. अमेरिकेचे संविधान घडविणारी परिषद येथेच भरली होती (१७७६). त्या वेळच्या बऱ्याच वास्तू आजही येथे शाबूत आहेत. १७३७ मध्ये स्थापन झालेले ग्रंथालय, १७८४ मध्ये स्थापना झालेले महाविद्यालय व १८४५ साली स्थापना झालेली नाविक अकादमी या येथील महत्त्वाच्या संस्था होत.

लिमये, दि. ह.