मेसा–रुक्ष जलवायुमानाच्या प्रदेशातील सपाट गाळाच्या खडकांत आढळणारी ठळक भूमिरुपे.

मेसा : जवळजवळ उभ्या किंवा तीव्र उताराच्या बाजू व सपाट माथा असलेला उंचवटा. टेबलासारखा दिसणारा असा डोंगर (वा मोठी टेकडी) सामान्यतः एकाकी अथवा सुटा असल्याने सभोवतालच्या मैदानी प्रदेशामध्ये उठून दिसतो. उ. अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागातील मेसा विशेष प्रसिद्ध आहे. ‘मेसा’ (म्हणजे मेज वा टेबल) ही संज्ञा स्पॅनिश भाषेतील असून मूळ लॅटिन भाषेतील ‘मेन्सा’ या शब्दावरून ती आली आहे. कोठेकोठे अशा छोट्या पठाराला ‘टेबललॅंड’, ‘टेबलपर्वत’ असेही म्हटले जाते व काही ⇨ अवशिष्ट शैल मेसाप्रमाणे दिसतात.

मेसाची उंची २,००० मी. पर्यंत आढळली असून याचा माथा बहुधा सपाट (क्षितिजसमांतर) अथवा मंद पण एकसारखा उतार असलेला असतो. माथ्याचे क्षेत्रफळ काही चौ. किमी. पासून शेकडो चौ.किमी. पर्यंत असते आणि काहीतर पठाराएवढे मोठे आहेत. (उदा., कोलोरॅडोतील ग्रॅंड मेसा). मेसाचा माथा बहुधा तांबूस. पिवळसर वा फिकट तपकिरी रंगाचा आणि उघडाबोडका असतो. तथापि काहींचे माथे वनस्पतींनी आच्छादिलेले आहेत.

सर्वसाधारणपणे मोठ्या पठाराची सर्व बाजूंनी झीज होऊन मेसा निर्माण होतो. नद्यांच्या खोऱ्यात झीज विशेष कार्यक्षमपणे होत असते व तेथे मेसा निर्माण होतात. पृष्ठभागी आडवा, कठीण खडकांचा (उदा., अग्निज खडक, पिंडाश्म) थर आणि त्याखाली मऊ खडकांचा (उदा., गाळवटी खडक, शेल) थर अशी परिस्थिती असलेल्या भागात मेसा निर्माण होऊ शकतात. अशा प्रदेशात अधूनमधून किंवा कायम वाहणाऱ्या नद्यानाल्यांनी व काही प्रमाणात वाऱ्याने मऊ खडकाची अधिक झीज होते. कठीण थराने मऊ थराचे काही प्रमाणात रक्षण होते परंतु दीर्घकाळ मऊ थर झिजून कठीण थराचा कडेलगतचा आधार नाहीसा होतो. परिणामी कठीण थराचे कडे तुटून उभ्या बाजू असलेला मेसा निर्माण होतो. कोलोरॅडोच्या अर्धशुष्क व शुष्क पठारी प्रदेशांतील मेसा अशा तऱ्हेने बनले आहेत. काही ठिकाणी वरचा कठीण थर लाव्ह्याचा असतो व त्यात सामान्यतः उभे संधी (भेगा) असतात. अशा संधींना अनुसरून विभंगक्रिया होऊन कडे तुटण्यास मदत होते. यामुळे मेसाच्या बाजू उभ्या होतात व तळाशी साचणाऱ्या डबरीत खडकांचे मोठे तुकडे आढळतात. न्यू मेक्सिको व कोलोरॅडो राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील ‘रॅटन मेसा’ हा अशा प्रकारचा मेसाआहे तो सु. १,८०० मी. उंच असून त्यातील लाव्हाच्या थराची जाडी सु. ३०० मी. आहे. वरीलप्रमाणे झीज होत जाऊन मेसाचे क्षेत्रफळ कमी होत जाते व सु. २·५ चौ.किमी. पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या अशा भूमिरूपाला ⇨ ब्यूट म्हणतात. शेवटी झीज होऊन ब्यूट नष्ट होते.

जगात पुष्कळ ठिकाणी मेसा आढळतात. अमेरिकेच्या कोलोरॅडो, ॲरिझोना, न्यू मेक्सिको, उटा व द.वायोमिंग राज्यांतील मेसांपैकी ‘मेसा व्हर्द’ (कोलोरॅडो) व ‘एन्‌चाटेड मेसा’ (न्यू मेक्सिको) हे विशेष प्रसिद्ध आहेत. यांपैकी पहिल्याचे राष्ट्रीय उद्यान करण्यात आले असून दोन्हींच्या कड्यांवर पूर्वी राहत असलेल्या अमेरिकन इंडियन लोकांच्या घरांचे अवशेष आढळले आहेत. मेक्सिको, स्पेन इ. देशांतही मेसा आहेत.

भारतामध्ये राजस्थानच्या जैसलमीर व जोधपूर आणि कर्नाटकच्या नवलगुंद व नरगुंद भागांत मेसा आढळले आहेत. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील लाव्ह्याच्या थरांची झीज होऊन मेसा व ब्यूट यांसारखी दिसणारी भूमिरूपे निर्माण झाली आहेत (उदा., पाचगणीचे टेबललॅंड, पांडवगड इत्यादी).

ठाकूर, अ. ना.