फिलाडेल्फिया: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पेनसिल्व्हेनिया राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठे व देशातील चौथ्या क्रमांकाचे इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १८,१५,८०८ (१९७५). हे राज्याच्या आग्नेय भागात डेलावेअर आणि स्कूलकिल नद्यांच्या संगमावर न्यूयॉर्क शहराच्या नैर्ऋत्येस १४५ किमी.वर वसले आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान असलेले हे शहर सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी इ. सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. फिलाडेल्फिया या नावातील मूळ ग्रीक शब्दांचा अर्थ ‘बंधुप्रेम’ असा आहे.

फिलाडेल्फियातीलस्वीडिशांनी १६३६ मध्ये येथे प्रथम वसाहत स्थापन केली व तिला ‘विकाको’ असे नाव दिले. १६८१ मध्ये क्वेकर पंथीय विल्यम पेन या ब्रिटिशाने या शहराची ‘क्वेकर कॉलनी’ म्हणून स्थापना केली. ‘क्वेकर सिटी’ म्हणूनही या शहराचा निर्देश केला जात असे. प्राधान्याने क्वेकर पंथीय ब्रिटिशांचा भरणा असलेल्या या वसाहतीच्या सहिष्णू धोरणामुळे इतरही यूरोपियन या वसाहतीकडे आकृष्ट झाले. १६८३ मध्ये जर्मन व नंतर स्कॉटिश, आयरिश व इतरही यूरोपियन लोकांनी येथे वसाहती उभारल्या. अठराव्या शतकाच्या मध्यास हे अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक शहर बनले. विल्यम पेन व त्यानंतर ⇨ बेंजामिन फ्रँक्‌लिन यांनी या शहरात खूप सुधारणा घडवून आणल्या. छपाई व्यवसायासाठी फ्रँक्‌लिन १७२३ मध्ये बॉस्टनहून येथे येऊन राहिला होता. या शतकाच्या उत्तरार्धात फिलाडेल्फिया अमेरिकन वसाहतींचे सर्वच बाबतींत एक केंद्रच ठरले. फिलाडेल्फियाला अमेरिकन स्वातंत्र्याच्या चळवळीची गंगोत्री मानले जाते. ‘काँटिनेंटल काँग्रेस’ची स्थापना (१७७४) येथेच झाली. या काँग्रेसने केलेले स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व तसेच अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची घोषणा इ. ऐतिहासिक घटना याच शहरात घडल्या. अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर (१७८३) देशाची घटना फिलाडेल्फिया येथेच बनविण्यात आली (१७८७). हे शहर १७९० ते १८०० या काळात देशाची व १७९९ पर्यंत राज्याची राजधानी होते. १७८० मध्ये देशातील पहिली संघटित बँक येथे स्थापन करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात न्यूयॉर्क शहराचा विकास वेगाने होत गेला आणि त्यामुळे फिलाडेल्फियाचे देशातील केंद्रीय स्थान काहीसे मागे पडले.

फिलाडेल्फिया हे जगातील एक उत्कृष्ट नदीबंदर असून व्यापारकेंद्र आहे. ते १२ मी. रूंदीच्या खाडीने अटलांटिक महासागराशी जोडलेले आहे. शहरात कापड, तेलशुद्धीकरण, कागद, रसायने, इलेक्ट्रॉनीय व वीज उपकरणे, औषधे, रग, गालिचे, पोलाद इत्यादींचे कारखाने असून आर्‌सीए यू. एस्. स्टील स्कॉट पेपर कं. सन ऑइल या जगप्रसिद्ध कंपन्या याच शहरात आहेत. यांशिवाय शहरात जहाजबांधणी, तंबाखू उत्पादने, खाद्यपदार्थ प्रक्रिया, छपाई व प्रकाशन हे उद्योग अत्यंत विकसित झालेले असून सर्व प्रकारच्या दळणवळण सुविधा येथे उपलब्ध आहेत.

फिलाडेल्फिया हे इतिहासप्रसिद्ध शहर पर्यटकांचे एक मोठेच आकर्षण ठरले आहे. या शहरातील काही इतिहासप्रसिद्ध वास्तू उल्लेखनीय आहेत. उदा., काँग्रेस हॉल, इंडिपेंडन्स हॉल, कार्पेंटर्स हॉल त्याचप्रमाणे बेंजामिन फ्रँक्‌लिन स्मारकवास्तू इत्यादी. या स्मारकवास्तूतील फेल्स खगोलालय उल्लेखनीय आहे. येथील ‘सिटी हॉल ’मधील विल्यम पेन याचा ब्राँझ पुतळा बसविलेला मनोरा उल्लेखनीय आहे. शहराच्या ‘सोसायटी हिल ’ आणि ‘जर्मनटाउन’ भागांत अठराव्या शतकातील गृहवास्तू मुद्दाम जतन केलेल्या आहेत. स्पॅनिश-अमेरिकन युद्धात (१८९८) मानिला उपसागरातील आरमारी लढ्यात भाग घेतलेले अमेरिकेचे ‘ऑलिंपिया’ हे इतिहासप्रसिद्ध जहाज येथील बंदरात ठेवले आहे. तसेच अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील फोर्ट मिफ्लिन हा किल्लाही जतन करण्यात आला आहे. अमेरिकेचा राष्ट्रध्वज जेथे तयार झाला असे म्हणतात, ते ‘बेट्सी रॉस हाउस’ पर्यटकांना आकर्षित करते. फिलाडेल्फिया विस्तृत अशा उद्यानांचे शहर असून येथील फेअरमौंट पार्क व नॅशनल हिस्टॉरिकल पार्क उल्लेखनीय आहेत. १९५० साली नागरी पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार येथे अनेक मोठी उद्याने उभारण्यात आली. येथील पेनसिल्व्हेनिया, टॉमस जेफर्सन, टेंपल इ. विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. ललितकला व निसर्गविज्ञाने यांच्याही अकादमी तसेच अनेक ग्रंथालये येथे आहेत. येथील ‘जॉन केनेडी स्टेडियम ’ हे राष्ट्रीय पातळीवरील खेळांचे एक मोठे केंद्रच आहे. अमेरिकन संस्कृतीच्या सर्वच क्षेत्रांत फिलाडेल्फियाचे स्थान इतिहासकाळापासून अत्यंत महत्त्वाचे आहे.

जाधव, रा. ग.

चौंडे, मा.ल.