वेल्लोरचा इतिहासप्रसिद्ध किल्लावेल्लोर : तमिळनाडू राज्याच्या वेल्लोर जिह्याचे मुख्य ठिकाण व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या-शहर १,७५,०६१ महानगर २,४७,८५५ (१९९१). हे चेन्नईच्या नैर्ऋत्येस १२० किमी. अंतरावर पालार नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. १८६६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

वेल्लोरच्या परिसरात पिकणाऱ्या तांदूळ, वाटाणा, ऊस, कापूस, सुंदर सुवासिक फुले इत्यादींच्या व्यापाराचे हे प्रमुख केंद्र आहे. नैऋत्येकडील जावाडी टेकड्यांमधून चंदन, कातडी कमावण्याचे पदार्थ तसेच काबरा वनस्पती व इतर औषधी पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. सिगारेटी व कासे निर्मितीउद्योग पूर्वीपासून चालत आलेले आहेत. उत्तरेस नदीच्या पलीकडे ६.५ किमी. वरील काटपाडी येथे लोहमार्ग प्रस्थानक आहे. वुऱ्हीझ कॉलेज (स्था. १८९८), ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (१९४२), ऑक्झिलिअम कॉलेज (१९५४), गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन (१९५५), मुथुरंगम्‌गव्हर्नमेंट आर्ट्‌स कॉलेज (१९६५), धनबगीयम्‌कृष्णस्वामी मुदलियार कॉलेज फॉर विमेन (१९७२) ही मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये वेल्लोरमध्ये आहेत. येथील ख्रिश्चन वैद्यकीय केंद्र हे भारतातील एक मोठे व सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय आहे. यांशिवाय औद्योगिक विद्यालये व पोलिस प्रशिक्षण केंद्र इ. शैक्षणिक संस्थाही येथे आहेत.                                          

चौधरी, वसंत

 वेल्लोरचा इतिहासप्रसिद्ध किल्ला पालार नदीच्या उजव्या काठावर असून स्थानिक परंपरेप्रमाणे त्याचे बांधकाम भद्राचलम्‌चा आश्रित राजा बोम्मी रेड्डी याने इ. स. १२७४ च्या सुमारास केले व नंतर तो विजयानगरच्या राजांना दिला. तालिकोटच्या लढाईनंतर (१५६५) विजयानगरची अखेरची राजधानी या किल्ल्यात होती. [→ विजयानगर साम्राज्य ]. दक्षिणेच्या स्वारीत शिवाजी महाराजांनी या किल्ल्यास साडेचार महिने वेढा दिला होता. सेनापती नरहरी रुद्र याने तो १६७७ मध्ये घेतला. 1१७१० मध्ये अर्काटचा नबाब दोस्त अलीने तो आपल्या जावयास – चंदासाहेबास -दिला. १७६० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तो घेतला. श्रीरंगपटणच्या लढाईत टिपूचा पराभव झाल्यानंतर (१७९९) त्याच्या कुटुंबियांना व नातलगांना या किल्ल्यात ठेवण्यात आले. १८०६ मध्ये या किल्ल्यात ब्रिटिशांविरुद्ध हिंदी शिपायांनी बंडाचा अयशस्वी प्रयत्न केला. [→ वेल्लोरचे बंड].

किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यात जलकंठेश्वर शिवाचे विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे. किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र चालविले आहे.

खरे, ग. ह.

संदर्भ : 1. Fass, Virginia, The Forts of India, Calcutta, 1986.

           2. Toy, Sidney, The Fortified Cities of India, London, 1965.

           3. Toy, Sidney, The Strongholds of India, London, 1957.