नागदा: मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन जिल्ह्याच्या खाचरोड तालुक्यातील एक औद्योगिक ठिकाण. लोकसंख्या ३२,५६९ (१९७१). हे पश्चिम रेल्वेच्या मुंबई–रतलाम–दिल्ली मार्गावरील स्थानक असून, उज्जैनच्या वायव्येस सु. ४५ किमी. व खाचरोडच्या पूर्वेस सु. १५ किमी. आहे. नागदाहून पूर्वेस, उज्जैनमार्गे भोपाळपर्यंत पश्चिम रेल्वेचा फाटा गेला आहे. येथील वार्षिक तपमान व पर्जन्य, अनुक्रमे ३१·४° से. व १३५ सेंमी. असते. १९६१ साली यास शहर म्हणून मान्यता मिळाली. येथे रसायने, रेयॉन, रेशीम व साखर इत्यादींचे विविध कारखाने निघाल्यामुळे याचा विकास अधिकाधिक होत आहे. येथे नगरपालिका, रुग्णालये, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत.

कांबळे, य. रा.