हेडीन, स्व्हेन आँडर्स : (१९ फेब्रुवारी १८६५–२६ नोव्हेंबर १९५२). स्वीडिश समन्वेषक आणि भूगोलज्ञ. तसेच प्रदेश नकाशाकार, छायाचित्रकार, प्रवासवर्णनलेखक व प्रकाशक म्हणूनही त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. त्याचा जन्म स्वीडनमधील स्टॉकहोम येथे एका मध्यम-वर्गीय कुटुंबात झाला. वडील स्टॉकहोमचे मुख्य वास्तुविशारद होते. स्टॉकहोम, अप्साला, हाल (एल) व बर्लिन विद्यापीठांमध्ये त्याने शिक्षण घेतले. प्रसिद्ध स्वीडिश समन्वेषक व भूगर्भशास्त्रज्ञ निल्स आडॉल्फ एरिक नूर्दनशॉल्ड याने यूरोप व आशियाच्या उत्तर किनाऱ्यावरील ईशान्य पॅसेज या सागरी मार्गाचे यशस्वी समन्वेषण केले. त्याप्रीत्यर्थ २४ एप्रिल १८८० रोजी संपूर्ण स्टॉकहोम शहरात त्याचा भव्य गौरव समारंभ साजरा केला होता. त्यावेळी पंधरा वर्षे वय असलेला हेडीन या समारंभाचा साक्षीदार होता. हेडीनवर त्या समारंभाची एवढी छाप पडली की, त्याने समन्वेषण हेच आपल्या आयुष्यातील ध्येय ठरवून टाकले. पुढे जर्मनीत फर्दिनँद बारोन फॉन रिख्थोफेन याच्या हाताखाली भूगोलाचे शिक्षण घेऊन हेडीन समन्वेषणाकडे वळला. हेडीनने आशिया खंडाच्या नकाशाचाअभ्यास याच रिख्थोफेनच्या प्रोत्साहनाने सुरू केला. 

 

मध्य आशियातून त्याने प्रवासही केला आणि वेगवेगळ्या सफरीही काढल्या. त्यातून त्याला फार मोठी पुरातत्त्वशास्त्रीय व भौगोलिक माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे मध्य आशियाच्या समन्वेषणातील एक अग्रेसर व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची जगाला ओळख झाली. वयाच्या विसाव्या वर्षी (१८८५) त्याने पर्शियाचा पहिला प्रवास केला. मे १८८५ मध्ये स्टॉकहोम येथील बेस्कोव्स्का या सेकंडरी स्कूलमधून पदवी संपादन केल्यानंतर कॅस्पियनच्या किनाऱ्यावरील बाकू येथील एका खाजगी पाठनिर्देशकाकडे हेडीन दाखल झाला. तेथे त्याने काही आठवडे भूस्वरूपवर्णनशास्त्र तसेच प्रतिमाचित्र आरेखनासंबंधी प्रशिक्षण घेतले. त्याबरोबरच स्वतःहून लॅटिन, फ्रेंच, जर्मन, पर्शियन, रशियन, इंग्रजी, तातार, तुर्कीश, किरगीझ, मंगोलियन, तिबेटन, चिनी यांसारख्या बोलीभाषा शिकण्यास सुरुवात केली. एप्रिल १८८६ मध्ये बाकूहून तो परत स्टॉकहोमला निघाला. स्टॉकहोमला येताना प्रथम कॅस्पियन समुद्रातून क्षेपणी बाष्पनौकेच्या साहाय्याने समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर आला. तेथून तो एल्बर्झ पर्वतश्रेणी पार करून इराणमधील तेहरान, इस्फाहान व शीराझमार्गे इराणच्या आखातावरील बूशेर बंदरात आला. तेथून जहाजाने प्रथम इराणच्या आखातातून व नंतर टायग्रिस नदीमार्गे बगदादपर्यंत आला. बगदादवरून केरमानशाहमार्गे तेहरानला आला. तेथून कॉकेशस पर्वतातून काळा समुद्र किनाऱ्यावरील इस्तंबूल (कॉन्स्टँटिनोपल) येथे आला. त्यानंतर सप्टेंबर १८८६ मध्ये स्वीडनला परतला. त्याने आपल्या या संपूर्ण प्रवासाविषयीचे थ्रू पर्शिया मेसोपोटेमिया अँड दी कॉकेशस हे पुस्तक प्रकाशित केले (१८८७). १८८६–८८ या कालावधीत स्टॉकहोम व अप्साला येथे हवामानशास्त्र, भूविज्ञान, खनिजविज्ञान, प्राणिविज्ञान, तत्त्वज्ञान आणि लॅटिन भाषा यांचा अभ्यास त्याने केला. त्यानंतर१८८९-९० मध्ये बर्लिन येथे रिख्थोफेन याच्याकडे शिक्षण घेतले. 

 

ऑक्टोबर १८९० ते मार्च १८९१ या कालावधीत त्याने पर्शियाकडील दुसरा प्रवास केला. ऑक्टोबर १८९० मध्ये ऑस्कर राजाचे स्वीडिश--नॉर्वेजियन शिष्टमंडळ इराणच्या नासिरुद्दीन शाह यांना भेटण्यासाठी गेले असताना दुभाषी म्हणून हेडीन इराणला गेला होता. जुलै १८९१ मध्ये इतर तीन साक्षीदारांच्या साहाय्याने एल्बर्झ पर्वत श्रेणीतील डेमॅव्हेंडशिखर चढून गेला. त्याने आपल्या प्रबंधासाठी तेथील प्राथमिक माहिती गोळा केली. त्यानंतर रेशीम मार्गाने माशाद, अश्गाबात, बूखारा, समरकंद, ताश्कंद व कॅश्गरमार्गे ताक्लामाकान वाळवंटाच्या पश्‍चिम भागापर्यंत गेला. तेथून तो स्टॉकहोमला परतला. जाताना काराकोल येथील रशियन समन्वेषक व विद्वान निकोलाय पर्झीवाल्स्की याच्या समाधी स्थळाला भेट दिली. एप्रिल १८९२ मध्ये रिख्थोफेनच्या हाताखालील आपले अध्ययनाचे काम चालू ठेवण्यासाठी हेडीन बर्लिनला गेला. तेथून जुलै १८९२ मध्ये तो हेल येथील हेल-विटेनबर्ग विद्यापीठात गेला. त्याचवेळी डेमॅव्हेंड शिखरासंबंधीच्या ‘पर्सनल ऑब्झर्व्हेशन ऑफ डेमॅव्हेंड’ या २८ पानी प्रबंधासाठी त्याला डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झाली. यूरोप व आशियाचा (मुख्यतः मध्य आशियाचा) मुख्य समन्वेषक असल्यामुळे त्याला या दोन्ही प्रदेशांतील सत्तांकडून भाषणासाठी निमंत्रण दिले जाई व त्याचा सत्कार केला जाई. 

 

हेडीन याने मध्य आशियाच्या शास्त्रयुद्ध समन्वेषणासाठी चार सफरी काढल्या. त्यांपैकी पहिली सफर १८९३ ते १८९७ या कालावधीत केली. या सफरीसाठी ऑक्टोबर १८९३ मध्ये स्टॉकहोमवरून निघाला. प्रथम सेंट पीटर्झबर्ग व ताश्कंदमार्गे तो पामीर पर्वतीय प्रदेशात आला. यातील मूसताग शिखर सर करण्याचे काही अयशस्वी प्रयत्न केले. त्यानंतर तो चीनमधील कॅश्गार येथे थांबला. एप्रिल १८९५ मध्ये तीन स्थानिक संरक्षक ताफे बरोबर घेऊन तुसलकमार्गे ताक्लामाकान वाळवंट ओलांडून तो खोतान नदीकडे निघाला. पाण्याच्या तुटवड्यामुळे बरोबरचे काही उंट दगावल्याचे सांगितले जाते. ताक्लामाकान वाळवंटाच्या दक्षिण भागातील खोतानच्या ईशान्येकडील डंडन ऑशलिक व काराडुंग या सु. १५०० वर्षांपूर्वी उठून गेलेल्या शहरांना त्याने भेट दिली. मार्च १८९६ मध्ये त्याने बॉस्टेनसरोवराचा शोध लावला. मध्य आशियातील सर्वांत मोठ्या अंतर्गत जलाशयांपैकी हा एक आहे. कारा-कोशून सरोवराचा त्याने नकाशा तयार केला आणि मे १८९६ मध्ये पुन्हा खोतानला आला. तेथून तो तिबेट व चीनमार्गे यायला निघाला. मार्च १८९७ मध्ये बीजिंगला पोहोचला.त्यानंतर बीजिंगवरून निघून मंगोलिया रशियामार्गे तो स्टॉकहोमला आला (१८९७). 

 

मध्य आशियातील दुसरी सफर त्याने १८९९–१९०२ या कालावधीत केली. या सफरीत तो चीनमधील तारीम खोरे, तिबेट आणि काश्मीर या प्रदेशांत फिरला. यार्कंद, तारीम व कायडू या नद्यांमधूनही त्याने जलप्रवास केला. कोरड्या पडलेल्या कुम-दर्जा नदी पात्राचा व लॅापनॉर (लोबूबो) सरोवराचा शोध लावला. लॉपनॉर सरोवराजवळील लौलान या पूर्वीच्या शाही व तटबंदीयुक्त शहरांचे अनेक भग्नावशेष लाकूड, कागद व रेशमी कापडावरील शेकडो लिखित दस्तऐवज त्याला सापडले. एकेकाळी हे शहर लॉपनॉर सरोवराच्या काठी असावे. परंतु सरोवर कोरडे पडल्यामुळे येथील वस्ती उठली असावी. यूरोपीयनांना मनाई असल्यामुळे त्याचे १८९९ व १९०१ मधील ल्हासाकडे जाण्याचे प्रयत्न मात्र असफल ठरले त्यानंतर तो लेह, लाहोर, दिल्ली, आग्रा, लखनौ व बनारसमार्गे कलकत्त्यापर्यंत आला. तेथे त्याची तत्कालिन ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याची भेट झाली. या सफरीत कागदावरील ११४९ नकाशे तयार करून त्यांनतर त्याने नव्याने शोधलेली भूमी व ठिकाणे रेखाटली. लॉप वाळवंटातील यारदांगया भूविशेष रचनेचे वर्णन करणारी हेडीन ही पहिली व्यक्ती होती. १९०२ मध्ये स्वीडनच्या राजाने त्याचा गौरव केला. 

 

हेडीनने आपली तिसरी सफर १९०५ – १९०८ या कालावधीत पूर्ण केली. या सफरीत त्याने मध्य पर्शियन वाळवंटी प्रदेश, तिबेटच्या पश्‍चिमेकडील उच्चभूमी प्रदेश आणि ट्रान्स हिमालयाचे अन्वेषण केले.त्याने अन्वेषण केलेल्या हिमाद्रीच्या उत्तरेकडील ट्रान्स हिमालय श्रेणीला हेडीन श्रेणी असेही संबोधल जाई. ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावरील जीकात्से (शिगात्से) येथील मठांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेशीलंपो या शहराला त्याने भेट दिली. कैलास प्रदेशातील मानसरोवरआणि कैलास शिखरालाही त्याने भेट दिली. सिंधू, ब्रह्मपुत्रा व सतलज या नद्यांची उगमस्थाने शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम त्याने केले. त्यानंतर भारतातून जपान व रशियामार्गे तो स्टॉकहोमला गेला (१९०८). या सफरीत त्याने वेगवेगळ्या खडकांचे नमुने गोळा करून नेले होते. म्यूनिक विद्यापीठातील पुराजीव व भूविज्ञान विभागांत त्यांवर संशोधन करण्यात आले. त्याद्वारे हेडीनने सफरीदरम्यान भेट दिलेल्या प्रदेशातील भूशास्त्रीय विविधतेवर प्रकाश टाकला. 


 

चीनमधील राजकीय, सामाजिक अशांततेमुळे १९२३ मध्ये हेडीनने अमेरिकेच्या संस्थानांमार्गे बीजींगपर्यंतचा प्रवास केला. या प्रवासात त्याने ग्रँड कॅन्यन तसेच जपानला भेट दिली. बिजींगवरून मोटारीने तो मंगोलियामार्गे रशियाला गेला. या प्रवासात चीनच्या अगदी उत्तरेकडील मांचुरिया व सिक्यांग यांदरम्यान ३२७ पुरातत्त्वशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची तसेच प्राचीन वास्तुकलेची व वास्तुशिल्पांची ठिकाणे शोधून काढली. तसेच अश्मयुगीन संस्कृतीचा शोध लावला. त्या काळात चीन व मंगोलियाला सरहद्दीवर मासेमारी, शेती व शिकार इ. व्यवसाय चालत असल्याचे त्याने पुराव्यांद्वारे सिद्ध केले. रशियातून ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गाने तो मॉस्कोपर्यंत गेला. 

 

हेडीनने आपली सिनो-स्वीडिश ही आंतरराष्ट्रीय सफर १९२७–३५ या कालावधीत काढली होती. आपल्या या चौथ्या सफरीत त्याने मंगोलिया, गोबी वाळवंट आणि झिनजिआंग या प्रदेशांतील वातावरण, भूमिस्वरूपे आणि इतिहासपूर्वकालीन परिस्थितीचे अन्वेषण केले. या सफरीसाठी त्याने स्वीडन, जर्मनी, चीन अशा वेगवेगळ्या देशांतील पुरातत्त्वशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, वनस्पती व प्राणिशास्त्रज्ञ, भूगोलज्ञ, भूशास्त्रज्ञ व हवामानशास्त्रज्ञांचा समावेश केला होता. या सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे काम जवळजवळ स्वतंत्रपणे चालू होते. हेडीनची भूमिका मात्र एक स्थानिक व्यवस्थापक म्हणून स्थानिक प्राधिकरणांशी वाटाघाटी करून निर्णय घेणे, आवश्यक त्या सेवासुविधा उपलब्ध करून देणे, निधी उभारणे आणि अनुसरलेल्या मार्गांच्या नोंदी ठेवणे अशा स्वरूपाची होती. हेडीनने सरसेनापती चँग-कै-शेक याची भेट घेतली. तेव्हापासून तो या सफरीचा आश्रयदाता बनला. 

 

या सफरीच्या पहिल्या टप्प्यात (१९२७–३२) बीजिंगवरून निघून बाओटोमार्गे गोबीच्या वाळवंटातून मंगोलियात गेला. तेथून पुढे झिनजिआंगमार्गे ऊरूमची येथे आला. त्यानंतर तारीम खोऱ्याच्या उत्तर व व पूर्व भागाचे समन्वेषण केले. या शास्त्रशुद्ध सफरीत लोहखनिज, मँगॅनीज, खनिजतेल, दगडी कोळसा, सोने अशा आर्थिकदृष्ट्या उपयुक्त खनिज साठ्यांचा शोध लावला. त्याच्या या कार्याची दखल घेऊन बर्लिन जिऑग्रॉफिकल सोसायटीने फर्दिनंद फॉन रिख्थोफेन पदक देऊन त्याला गौरविले (१९३३). 

 

सरसेनापती चँग-कै-शेक याच्या नेतृत्वाखालील क्वोमितांग शासनाच्या वतीने जलसिंचन उपायांचा शोध घेणे, त्याचा आराखडा तयार करणे, तसेच बीजिंग ते झिनजिआंग यादरम्यान रेशीम मार्गाला सोयीेचे असे दोन पर्यायी मोटाररस्ते तयार करण्यासाठीची योजना व नकाशा तयार करण्यासाठी १९३३-३४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिनी सफरीचे हेडीनने नेतृत्त्व केले हेाते. हेडीनने तयार केलेल्या योजनेनुसार प्रमुख जलसिंचन सुविधा तयार करण्यात आल्या, वसाहती उभारल्या आणि बीजिंग ते कॅश्गार यांदरम्यान रेशीम मार्गाला पर्यायी रस्ते काढले. ही सफर पूर्ण करून दक्षिणेकडील रेशीम मार्गाने तो बीजिंगला आला. या मार्गामुळे तारीम खोऱ्यातील ओबड धोबड भूप्रदेश पूर्णपणे टाळता आला. सफरीच्या शेवटी त्याला खूप आर्थिक अडचणी आल्या. बीजिंगमधील जर्मन-एशियन बँकेचे त्याच्यावर मोठे कर्ज होते. आपल्या पुस्तकांपासून मिळालेले शुल्क व स्वामित्व धन आणि व्याख्यानांतून मिळालेल्या पैशामधून त्याने त्याची परतफेड केली. या अखेरच्या सफरीवरून परतल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत त्याने वेगवेगळ्या जर्मन शहरांत १११, तर शेजारील देशांत १९ व्याख्याने दिली. त्यासाठी त्याने लोहमार्गाने सु. २३,००० किमी.चा, तर मोटारीने सु. १७,००० किमी.चा प्रवास केला. एप्रिल १९३५ मध्ये बर्लिन येथे तो ॲडॉल्फ हिटलरला भेटला होता. त्याच्या महान कामगिरीमुळे वेगवेगळ्या देशांनी व संस्थांनी त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गोैरविले. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हायडलबर्ग, अप्साला, म्यूनिक या विद्यापीठांनी त्याला सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले. 

 

समन्वेषणाच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर त्याने राजकारणात प्रवेश केला. तो राजसत्ताक शासनपद्धतीचा पुरस्कर्ता होता. १९०५ पासूनच स्वीडन या आपल्या मातृभूमीत त्याने लोकशाहीकडील वाट-चालीच्या विरोधी भूमिका घेतली होती. तो नाझीचा खंदा पुरस्कर्ता होता. परंतु नाझीला पाठिंबा दिल्यामुळे युद्धोत्तर काळात भारत, रशिया वचीनच्या शासनांचा त्याने रोष ओढवून घेतला. 

 

हेडीनने सु. ७५ पुस्तके, ग्रंथ व प्रवासवर्णने लिहून प्रकाशित केली. थ्रू एशिया (१८९८), सायंटिफिक रिझल्ट्स ऑफ ए जर्नी इन सेंट्रल एशिया, १८९९, १९०२ चे आठ खंड (१९०४-०७), सेंट्रल एशिया अँड तिबेट (१९०३), ॲडव्हेंचर्स अँड तिबेट (१९०४), ओव्हरलँड टू इंडिया, दोन खंड (१९१०), बगदाद, बॅबिलॉन अँड निनेव्ह (१९१७), सदर्न तिबेट – १२ खंड (१९१७-२२), मौंट एव्हरेस्ट (१९२२), माय लाइफ ॲज ॲन एक्सफ्लोर (१९२२), ॲक्रॉस द डेझर्ड (१९३१), द सिल्क रोड (१९३८), द वाँडरिंग लेक (१९४०), सायंटिफिक रिझल्ट्स ऑफ द सिनो-स्वीडिश एक्स्पीडिशन १९२७–३५ चे ३० खंड (१९३७–४९) ही हेडनची प्रमुख ग्रंथ संपदा आहे. त्याच्या लेखनात काही ठिकाणी विसंगती असली तरी त्याचा प्रवास आणि लेखन कार्य वाखणण्याजोगे आहे. तो अविवाहित होता. वयाच्या ८७ व्या वर्षी स्टॉकहोम येथे त्याचे निधन झाले. 

चौधरी, वसंत कुंभारगावकर, य. रा.