थिंफू : १९६२ पासून भूतानच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ६०,००० (१९७० अंदाज). हे थिंफू नदीच्या दोन्ही तीरांवर स. स. पासून २,६२५ मी. उंचीवर वसले आहे. आसाम आणि प. बंगाल राज्यांतील हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ वसलेल्या शहरांशी हे हमरस्त्याद्वारे जोडले असून मोटारीने प्रवाशांची व मालाची वाहतूक चालते. या रस्त्यावरच फुंटशोलिंग आणि चेम्बरलिंग ही दोन जकात नाकी आहेत. फुंटशोलिंग हे भूतानचे प्रवेशद्वारच आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत हवा अतिशय थंड असते आणि हिमवृष्टीही होते. या वेळी हे शहर स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य शहरांसारखे वाटते. धुक्यामुळे दृश्यता कमी असते व मोटारीने प्रवास करणे अवघड असते. मार्च ते मेपर्यंत मात्र हवा कोरडी, साधारण थंड व आल्हाददायक असते. शहरात पर्यटकांसाठी आधुनिक उपाहारगृहे व निवासस्थाने असून राजवाडा व सचिवालय प्रेक्षणीय आहेत. या भागास ‘ताशी चो द्‌झांग’ म्हणतात. येथे भूतानच्या परंपरागत शिल्पकलेचे अनेक कल्पक नमुने पहावयास मिळतात. या शहराच्या नैर्ऋत्य भागात डोंगरांच्या पायथ्याशी बांधलेले मातीथांग अतिथिगृह प्रेक्षणीय आहे. पूर्वी हे भूतानच्या राजाच्या निवासस्थानाचा एक भाग होते. येथील ‘इंडिया हाउस’ या आधुनिक वास्तूमध्ये भारत सरकारची कार्यालये आहेत.

येथील बाजारपेठेचा भाग आकर्षक आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना निरनिराळ्या मालाची दुकाने आकर्षक पद्धतीने मांडलेली असतात. या दुकानांत भूतानमधील परंपरागत हस्तकलेच्या वस्तू विक्रीस ठेवलेल्या असतात. याच्या आसमंतात पायऱ्यापायऱ्यांची शेती असून भात, मका व गहू ही पिके होतात. तसेच लाकूडतोड हा मुख्य धंदा असून येथे लाकूड कापण्याच्या पुष्कळ गिरण्या आहेत. शहरातील प्रमुख डाकगृहामधील तिकीटविक्रीचा विभाग हे एक प्रवाशांचे आकर्षण आहे. या विभागात भारत आणि जपानमध्ये छापलेली सुंदर रंगांची भूतान सरकारची तिकिटे विक्रीस ठेवलेली असतात.

दाते, सु. प्र.