कैमूर :विंध्य पर्वतश्रेणीची अगदी पूर्वेकडील डोंगररांग. उंची १०० ते ७०० मी. रुंदी सु. २०–८० किमी. लांबी सु. ४८० किमी. ही मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागात नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने, पुढे उत्तर प्रदेशात पश्चिम-पूर्व व नंतर बिहारमध्ये पुन्हा नैऋत्य-ईशान्य दिशेने जाते. मध्य प्रदेशात गोविंदगढ, उत्तर प्रदेशात विजयगढ व बिहारमध्ये रोहतासगढ हे किल्ले यातील डोंगरांवर आहेत. विजयगढजवळील गुहाकपारींत प्रागैतिहासिक मानवाची इत्यारे व भित्तिचित्रे सापडली आहेत. कैमूरची रांग शोण नदीच्या उत्तरेस क्वार्टझाइटच्या सोपानानंतर वालुकाश्म व चुनखडक यांच्या सलग उत्तट रूपाने उभी आहे. या दृष्टीने हा उत्तट सर्व भारतात लक्षणीय आहे. त्यातून कोठेही एखाद्या मोठ्या नदीने मार्ग काढलेला नाही, की कोठे एखादी वारेखिंड नाही. कैमूरचा पठारी भाग उत्तरेकडे सौम्यपणे कललेला असून त्याच्या बुटक्या उत्तटांवरून अनेक प्रवाह गंगेच्या खोऱ्यात उतरले आहेत. बिहारमधील पठारावर कुजलेल्या पालापाचोळ्याची अत्यंत सुपीक मृदा असलेले काही उथळ द्रोणीप्रदेश आहेत.

मध्य प्रदेशात कटनीजवळ कैमूर नावाचे १४,८२१ (१९७१) वस्तीचे औद्योगिक केंद्र आहे. तेथे देशातील मोठा सिमेंटचा कारखाना आहे.

ओक, शा. नि.