स्नेक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वायोमिंग, आयडाहो, ऑरेगन व वॉशिंग्टन या राज्यांतून सामान्यपणे आग्नेय-वायव्य दिशेने वाहणारी कोलंबिया नदीची सर्वांत मोठी उपनदी. एकूण लांबी सु. १,६७० किमी., जलवाहन क्षेत्र सु. २,८२,००० चौ.किमी. अ. सं. सं.च्या पॅसिफिक नॉर्थवेस्ट विभागातील महत्त्वाच्या नदीप्रवाहांपैकी हा एक प्रवाह मानला जातो. स्नेक नदी वायोमिंग राज्याच्या वायव्य कोपर्‍यातील काँटिनेंटल डिव्हाइड ( ग्रेट डिव्हाइड ) पर्वतरांगेत, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानातील शोशोन सरोवरात उगम पावते व दक्षिणेस ग्रँड टीटॉन राष्ट्रीय उद्यानातील जॅक्सन सरोवरास मिळते. हा तिचा सु. २४ किमी. लांबीचा प्रवाह ल्यूइस ( अपर स्नेक ) नावाने व तेथून पुढे स्नेक या नावाने ओळखला जातो. वायोमिंग राज्यातील सॉल्ट रिव्हर रेंज या दक्षिणेकडील पर्वतश्रेणीपर्यंत या नदीने सु. ६४ किमी. लांबीची दरी निर्माण केली आहे. ती जॅक्सन होल नावाने ओळखली जाते. अल्पाइन जंक्शन शहराजवळ ही नदी वायव्य दिशेस वळून आयडाहो राज्यात प्रवेश करते व राज्याच्या दक्षिण भागातून स्नेक रिव्हर प्लेन या लाव्हाजन्य सपाट प्रदेशातून पुढे रिग्बीपर्यंत त्याच दिशेने वाहत जाते. या प्रदेशात तिच्या मार्गात अनेक प्रपात निर्माण झाले आहेत. शोशोन फॉल्स ( सु. ६४ मी. ), ट्वीन फॉल्स (५५ मी. ), अमेरिकन फॉल्स (१५ मी. ), रेक्सबर्ग, आयडाहो, पोकॅटेलो, बर्ली इ. त्यांपैकी महत्त्वाचे आहेत. या भागात नदीने कमानीसारखे मोठे वळण घेतले आहे. नैर्ऋत्य दिशेने ट्वीन फॉल्सपर्यंत गेल्यावर ही नदी एक मोठे वळण घेऊन वायव्य दिशेने ऑरेगन राज्याच्या सरहद्दीपर्यंत जाते. होमडेल शहरापासून पुढे उत्तरेस ४६ ° अक्षवृत्तापर्यंत ही नदी आयडाहो व ऑरेगन आणि आयडाहो व वॉशिंग्टन या राज्यांची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. येथपर्यंत स्नेक नदीला अनेक प्रवाह येऊन मिळतात. या प्रवाहमार्गात सेव्हन डेव्हील्स मौंटन ( आयडाहो ) व वॉलौआ मौंटन ( ऑरेगन ) यांदरम्यान ही नदी हेल्स कॅन्यन या सु. १,२०० — १,७०० मी. खोलीच्या व सु. २०० किमी. लांबीच्या दरीतून वाहते. ही दरी लाव्हाजन्य खडकांमध्ये निर्माण झालेली असून तिचे काठ उभ्या कड्यांचे आहेत. जगातील खोल दर्‍यांपैकी ही एक मानली जाते. या दरीच्या उत्तरेस सॅमन नदीमुखाजवळ प्रसिद्ध ‘ थाउजंड स्प्रिंग्ज ’ हे पर्यटन स्थळ असून येथे सॅमन नदीचे पाणी खूप जोराने दरीतून बाहेर पडते व स्नेक नदीला मिळते. ल्यूइस्टन शहरापर्यंत ही नदी वॉशिंग्टन व आयडाहो राज्यांच्या सरहद्दीवरून जाते. येथे पश्चिमेस वळून ही नदी वॉशिंग्टन राज्यात प्रवेश करते व या राज्यातून वायव्येस, पुढे पुन्हा पश्चिमेस वाहत जाते आणि शेवटी पॅलाउस शहराच्या आग्नेयीस सु. ६ किमी.वर कोलंबिया नदीला डावीकडून मिळते.

वायोमिंग राज्यातील स्नेक नदीचे वरचे खोरे अत्यंत अरुंद असून निदर्‍या व प्रपात यांनी युक्त आहे. या भागातील तिच्या खोर्‍यात शोशोन, जॅक्सन ही सरोवरे, तर यलोस्टोन व ग्रँड टीटॉन ही प्रमुख राष्ट्रीय उद्याने असून ती पर्यटकांची आकर्षणे आहेत. हा प्रदेश जंगली प्राण्यांसाठी संरक्षित केला आहे. आयडाहो राज्यातील हेन्री फोर्क, बॉइसी, पेएट, सॅमन, क्लिअरवॉटर तर ऑ रेगनमधील मॅलहूअर, ओवाईही व वॉशिंग्टन राज्या- तील पॅलाउस इ. स्नेक नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. मधल्या टप्प्यात आयडाहो राज्याच्या दक्षिण भागातील या नदीचे खोरे सुपीक जमिनी, तळी व वने यांनी व्यापलेले आहे. या भागात ही नदी लाव्हाजन्य प्रदेशातून वाहत असून तिच्या प्रवाहमार्गातील अनेक प्रपात हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. याच टप्प्यातील अर्धशुष्क प्रदेशात गुरेपालन, धान्योत्पादन इ. व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. येथील शेती उत्पादनांमध्ये बटाटे, कडधान्ये, साखरबीट, गहू, अल्फाल्फा इ. उत्पादने ( विशेषतः स्नेक रिव्हर प्लेन या जलसिंचन सुविधा असलेल्या भागात ) घेतली जातात. खालच्या टप्प्यात सॅमन नदीमध्ये पॅसिफिक व चिनूक सॅमन माशांची मोठ्या प्रमाणात पैदास केली जाते. या खोर्‍यात एल्क, हरणे, गवे, अँटिलोप, मूज, अस्वले, बीव्हर इ. प्राणी व विविध प्रकारचे पक्षी आढळतात. आयडाहो व ऑरेगन राज्यांच्या सरहद्द प्रदेशात या नदीखोर्‍यात व्यापारी दृष्ट्या फळबागांची शेती केली जाते.

स्नेक नदीवर अनेक जलविद्युत् व जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक कालवेही काढण्यात आले आहेत. पॅलिसादेस, अमेरिकन फॉल्स, मिनाडोका ( आयडाहो राज्य ), मिल्नेर व पास्को डॅम ( वॉशिंग्टन राज्य ) हे या नदीवरील प्रमुख प्रकल्प आहेत. पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने स्नेक नदी काही भागात अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरते. मुखाकडील भागात ल्यूइस्टनपर्यंत या नदीतून लहान बोटींतून जलवाहतूक चालते.

स्नेक नदी ल्यूइस व क्लार्क या यूरोपीयांनी १८०५ मध्ये प्रथम पाहिली. कोलंबिया नदीचा उपप्रवाह म्हणून तिला ‘ ल्यूइस फोर्क ’ असे नाव दिले. १८३४ मध्ये नाथान्येल विएथ याने फरच्या व्यापाराचे केंद्र म्हणून फोर्ट हॉल ( आयडाहो राज्य ) ही वसाहत या नदीजवळ स्थापन केली व तेच पुढे ‘ ऑरेगन ट्रेल ’ या प्रसिद्ध व्यापारमार्गावरील प्रमुख ठिकाण बनले. आयडाहो राज्यातील आयडाहो फॉल्स, पोकॅटेलो, ट्वीन फॉल्स, नॅम्पा ही या नदीखोर्‍यातील प्रमुख शहरे आहेत.

चौंडे, मा. ल.