इंद्रावती : मध्यभारतांतर्गत नदी. लांबी सु. ५२६ किमी. ओरिसाच्या कालाहंडी जिल्ह्यात भवानी-पटना शहरापासून सु. ४० किमी. नैर्ऋत्येस पूर्व घाटात ही उगम पावते. तेथून ती पश्चिमेकडे वाहत ओरिसाच्या कोरापुट जिल्ह्यातून मध्य प्रदेशाच्या बस्तर जिल्ह्यात जगदलपूरजवळ प्रवेश करते. सागवान, तेंदू, हिरडा इत्यादींची निबिड अरण्ये, खोल दऱ्या, आदिवासी गोंडांची वस्ती असलेल्या प्रदेश यांमधून वाहताना अनेक ठिकाणी ती निसर्गरम्य बनलेली आहे. तिच्यावरील चित्रकूटजवळ बनलेला २९ मी. उंचीचा धबधबा प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या आग्‍नेय सरहद्दीवरून वाहत जाऊन ती पुढे गोदावरीस मिळते.

शाह, र. रू.