टेबल मौंटन : आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होप भूशिराच्या उत्तरेस आणि केपटाउनच्या दक्षिणेस मेजासारख्या सपाट माथ्याचा व तीव्र उताराच्या बाजू असलेला प्रसिद्ध डोंगर. सु. १,०८५ मी. उंचीचा टेबल मौंटन हा भूपृष्ठाच्या हालचालीत तसाच्या तसाच वर उचलला गेलेला भूभाग असावा. वालुकाश्माच्या आडव्या थरांनी बनल्यामुळे व वारा-पाण्याचे क्षरणकार्य झाल्यामुळे याचा माथा सपाट झाला असावा. याची उत्तरेकडील सु. सव्वातीन किमी. लांबीची बाजू वारा व पाणी यांमुळे खूपच झिजलेली आहे. मॅक्लीअर्स बीकन हा त्याचा सर्वांत उंच भाग (१,०८६ मी.) असून त्याशिवाय ‘डेव्हिल्स पीक’, ‘लायन्स हेड’, ‘सिग्नल हिल’, ‘ट्‌वेल्व्ह ॲपॉसल्स’ ही तेथील पाहण्याजोगी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. माथ्यावर छोटी सुपीक दऱ्याखोरी व प्रवाह असतील असे सकृद्दर्शनी वाटत नाही.

दक्षिण आफ्रिकेतील टेबल मौंटन

येथे वायव्य वाऱ्‍यांमुळे प्रतिवर्षी सु. १५२·५ सेंमी. पाऊस पडतो. पायथ्याच्या केपटाउनला मात्र फक्त ५६ सेंमी. पाऊस मिळतो. या डोंगरावर केलेल्या पाण्याच्या पाच साठ्यांतून केपटाउनला पाणीपुरवठा होतो. आग्नेयीकडून येणाऱ्‍या वाऱ्‍यांतील बाष्पाचा बनलेला ढग उत्तर कडेवरून खाली उतरू लागतो तो खाली पोचण्यापूर्वीच बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ढग दुरून डोंगराच्या कडेवरून खाली सोडलेल्या मेजवस्त्रासारखा दिसतो म्हणून त्याला ‘टेबलक्लॉथ’ हे मजेदार नाव मिळाले आहे.

या डोंगरावरील विपुल वनस्पतींत सिल्व्हर ट्री, स्टिंकवुड, यलोवुड, आयर्नवुड, कॅरियन फ्लॉवर, डिसा ऑर्किड इ. वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व डेझीच्या २५० जाती आढळतात.

डोंगरावर जाण्यास कमीअधिक अवघड अशा तीनशेहून अधिक वाटा आहेत. १९२९ मध्ये चालू केलेल्या दोरगाडीने (केबल वे) प्रतिवर्षी ५०,००० प्रवासी या डोंगरावर जाऊन येतात.

कुमठेकर, ज. ब.