अणुऊर्जा विद्युत् केंद्र, तारापूर.

तारापूर : भारतातील पहिल्या अणुशक्ती वीजकेंद्राचे ठिकाण. लोकवस्ती ५,४५० (१०७१). हे ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेस २५ किमी. व पश्चिम रेल्वेच्या बोयसर स्थानकाच्या पश्चिमेस ६ किमी. आहे. येथील अणुशक्ती वीजकेंद्र १ एप्रिल १९६९ रोजी सुरू करण्यात आले. त्याची १९७६ मध्ये क्षमता ४·२ लक्ष किवॉ. होती. अणुवीज केंद्रातील त्याज्य पदार्थ जमिनीखालील खोल नळांतून दूर समुद्रात नेऊन सोडले असल्यामुळे प्रदुषणाचा धोका अद्याप संभवलेला नाही. येथील वीज ५०% महाराष्ट्राला व ५०% गुजरातला पुरविली जाते. अन्यथा हे गाव कोकणातील भातशेती व मासेमारी करणारे खाडीच्या मुखावरचे शांत खेडे आहे.

हे चिंचणी–तारापूर खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले छोटेसे बंदर असून येथून मासे, लाकूड इ. पदार्थ निर्यात होतात व मीठ, साखर, घासलेट आणि लोहधातू इ. पदार्थ आयात होतात. खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या चिंचणीमुळे हे ठिकाण तारापूर–चिंचणी या संयुक्त नावानेही ओळखले जाते. येथील वस्ती मुख्यतः पारशी लोकांची असून प्रसिद्ध पारशी कंत्राटदार विकाजी मेहरजी याने सु. १८२० मध्ये पारशांचे मंदिर बांधले. येथील किल्ला फार जुना असून पेशव्यांना तो अतिशय महत्त्वाचा वाटे. ‘तारापूर हे निम्मी वसई आहे’ असे पेशवे समजत. चिमाजी आप्पाने हा किल्ला १७३९ साली सर करून समुद्राकडील बाजूचा चांगला बंदोबस्त केला. येथे दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, डाक व तार यांच्या सोयी आहेत.

डिसूझा, आ. रे.