गाझियाबाद : उत्तर प्रदेश राज्याच्या मीरत जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारकेंद्र. लोकसंख्या रेल्वे कॉलनीसह १,२७,७०० (१९७१). हे दिल्लीपासून २१ किमी. ईशान्येस आहे. कलकत्ता–लाहोर हा राष्ट्रीय महामार्ग गाझियाबादवरून जातो. तसेच दिल्लीहून कलकत्त्याकडे आणि मुरादाबादकडे जाणारे लोहमार्गांचे फाटे येथूनच फुटतात. १७४० मध्ये आसफशाहचा मुलगा गाजीउद्दीन याने या शहराची स्थापना केली. दिल्लीच्या सान्निध्यामुळे गाझियाबादची वाढ झपाट्याने झाली. लोहमार्गांच्या वाढीमुळे येथे मोठी रेल्वे कॉलनीच निर्माण झाली आहे. गहू, बाजरी, गळिताची धान्ये, कातडी वस्तू, धातुकाम इत्यादींची ही मोठी बाजारपेठ असून हातमाग, कृषिउद्योग, लोखंड व पोलादाच्या वस्तू इत्यादींचे कारखाने येथे आहेत.

शाह, र. रू.