131

कूरील बेटे: (जपानी चीशीमा रेट्टो). जपानचे होक्काइडो व सायबीरियाचे कॅमचॅटका यांदरम्यानचा द्वीपसमूह. ओखोट्स्क समुद्र व पॅसिफिक महासागर यांमधील सीमा. ४३२०’ उ. ते ५० ६६’ उ. आणि १४५२४’ पू. ते १५६ ३०’ पू.  क्षेत्रफळ सु. १५,६०० चौ. किमी. लोकसंख्या सु., १५,००० (१९६४). या सु. १,२०८ किमी. लांबीच्या रांगेत ५६ बेटे व असंख्य निर्मनुष्य खडक असून दक्षिणेकडून उत्तरेकडे कूनाशीर, ईतरूप, ऊरुप्पू, सीमूशीर, केटॉय, मात्सूवा, शासुकोतान, ओन्येकोतान, पारामूशीर व शूम्सू ही प्रमूख बेटे आहेत. कूरील बेटे अल्पाइन वलीकरण काळातील भूहालचालींमूळे उत्पन्न झालेली असून पॅसिफिकभोवतीच्या अस्थिर वलयाचा भाग आहेत. त्यांवर सु. १०० ज्वालामुखी असून त्यांपैकी ३८ जागृत आहेत. बेटाबेटांमध्ये समुद्र खोल असून आग्‍नेयीस कूरील-कॅमचॅटका गर्ता ही सु. १०,५४२ मी. खोलीची सागरी गर्ता आहे. ॲतलासाव्ह बेटावरील ॲलाइड ज्वालामुखी हे सर्वोच्च (२,३३९ मी.) शिखर असून, त्याच्या खालोखाल कूनाशीरीवरील चाचानोबोरी हे २,२५० मी. उंच आहे. बेटांवर भूकंप वारंवार होऊन समुद्रात मोठाल्या लाटा उठतात. ऊन पाण्याचे झरे पुष्कळ असून बेटांवर गंधक मिळते. छोट्या तळ्यांतील उकळते पाणी व जमिनीच्या भेगांतून येणारी वाफ अनेक ठिकाणी दिसते. उन्हाळ्यात हवा थंड व दमट असते आणि हिवाळ्यात कडक थंडी पडून हिमवृष्टी होते. ऑगस्टमधील सरासरी तपमान १६ से. आणि फेब्रुवारीमधील -७ से. असते. वार्षिक वृष्टी सु. ७५ ते १०० सेंमी. असून ती बहुधा हिमरूपाने होते. हिमाचा थर २ ते ५ मी.पर्यंत साठतो. ओखोट्स्कचे थंड पाणी व पॅसिफिकचे त्या मानाने उबदार पाणी यांमुळे धुके पडते. येथे जोरदार वारे घोंघावत असतात.

उत्तरेकडे टंड्रातील विशिष्ट वनस्पती असून दक्षिणेकडे फर, इतर सूचिपर्णी वृक्ष व बांबू आहेत. अस्वल, सेबल, खोकड हे विपुल असून ऑटर, सील हे शिकारीमुळे कमी होत चालले आहेत. अनेक प्रकारचे स्थलांतरी पक्षी या बेटांवर दिसतात. समुद्रात कॉड, हेरिंग, व्हेल हे मासे मिळतात आणि व्हेलमाशाची शिकार, मच्छीमारी, लाकूडतोड, शिकार व गंधक गोळा करणे हे लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. दक्षिणेकडे थोडाफार भाजीपाला होतो.

ऐनू हे येथील मूळचे आदिवासी. मार्टीन डी व्हीस या डच नाविकाने १६३४ मध्ये ही बेटे शोधिली. नंतर रशियनांनी उत्तरेकडील व जपान्यांनी दक्षिणेकडील बेटे व्यापिली. सॅकालीनच्या बदलात रशियनांनी ह्या बेटांवरील हक्क सोडला. १८७५ पासून १९४५ पर्यंत ती जपानकडे होती. दुसऱ्‍या महायुद्धानंतर याल्टा करारानुसार ती रशियाने व्यापिली व आपल्या सॅकालीन प्रांतात समाविष्ट केली. १९५१ च्या शांतता तहानुसार जपानने या बेटांवरील हक्क सोडला, परंतु १९५६ च्या वाटाघाटीत कूनाशीर, ईतरूप, शीकोतान ही बेटे व हाबोमाई बेटे परत मागितली. रशियाने १९५९ मध्ये शांतता तह केला, परंतु प्रादेशिक प्रश्न पुढे ढकलला. ईतरूपवरील कूरील्स्क व पारामूशीरोवरील सेव्हिर कूरील्स्क ही मासेमारीची व ते डबाबंद करण्याच्या कारखान्यांची केंद्रे आहेत.

डिसूझा, आ. रे.