कायाओ :दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाचे प्रमुख बंदर. लोकसंख्या उपनगरांसह ३,३५,४०० (१९७० अंदाज). हे लीमाच्या नैर्ऋत्येस १२ किमी., समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर असून भूशिरापुढे असलेल्या बेटांमुळे सुरक्षित बनले आहे. बंदरात अद्यावत गोद्या असून त्यांकरिता जागतिक बॅंकेच्या साहाय्याने मोठे धक्के बांधण्यात आले आहेत. पेरूच्या आरमाराचा मोठा तळ आणि नौअकादमी येथेच आहे. पेरू विजेता फ्रॅन्सिस्को पिझारो याने १५३५च्या सुमारास कायाओ वसविले. लीमाचे प्रवेशद्वार असल्याने वसाहतकाळात या बंदरावर फ्रान्सिस ड्रेकसारख्या चाच्यांनी व स्पेनच्या शत्रूंनी अनेकवार हल्ले केले हाते. शहर भूकंपाच्या तडाख्यातून सुटलेले नाही. १७४६ मध्ये ते जलप्रलय आणि भूकंप यांमुळे नष्टच झाले होते १९४० च्या भूकंपातही याची मोठी हानी झाली. समृद्ध पृष्ठप्रदेश आणि उत्कृष्ट नैसर्गिक बंदर यांमुळे कायाओची वाढ झपाट्याने झाली. पेरूची साठ टक्के आयात व निर्यात या बंदरातून होते. शहरात आटा, लाकूड कापणे, धातूकाम, साखरशुध्दीकरण, साबण, मेणबत्या, मांससंवेष्टन, मद्य इत्यादींचे उद्योग असून, आसमंतातील शेतमालाची ही मोठी बाजारपेठ आहे.

शाह,र.रू.