पेच : (१) (प्राचीन पेस्कियम). यूगोस्लाव्हियाच्या सर्बीया प्रजासत्ताकातील शहर. लोकसंख्या ४२,१०० (१९७१ अंदाज). हे कॉसॉव्हॉ-मेटोहीया या स्वायत्त विभागात, प्रीश्टिनाच्या पश्चिमेस सु. ७२.४ किमी. वर नॉर्थ अल्बेनियन आल्प्स व मोक्रा गोरा पर्वतांच्या दरम्यान, बेली ड्रीम नदीच्या उपनदीवर वसलेले आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून नीशहून येणाऱ्या लोहमार्गाचे अंतिम स्थानक आहे. पेच यास धार्मिक केंद्र म्हणूनही महत्त्व आहे. येथे सर्बीयन ऑर्थोडॉक्स चर्चचे मुख्य पीठ होते परंतु तुर्की अंमलात १७६६ मध्ये हे पीठ कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथील ग्रीक धर्मगुरूंच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. पेच धर्मपीठाच्या चार चर्चमधून सुंदर भित्तिलेपचित्रे आढळतात. याच्या दक्षिणेस चौदाव्या शतकातील देकनी धर्मपीठ असून तेथील वास्तुकला व वास्तुसजावट हे सर्बीयन कलेचे उत्तम नमुने समजले जातात. तुर्कांच्या अंमलात हे शहर ‘आयपेक’ या नावाने ओळखले जात होते. मशिदी, अरुंद रस्ते व जुनी तुर्की घरे यांमुळे यास पौर्वात्य नगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे चर्मोद्योग, अन्नप्रक्रिया, हस्तोद्योग इ. उद्योग विकसित झाले असून ही अन्नधान्याची बाजारपेठ आहे. (२) हंगेरीतील बॉरॉन्यॉ परगण्याची राजधानी. लोकसंख्या १,६३,००० (१९७५). हंगेरीतील हे प्राचीन शहर बूडापेस्टच्या दक्षिण-नैर्ऋत्येस २२० किमी., मेचेक पर्वताच्या द. पायथ्याशी वसले असून ते दळणवळणाचे केंद्र आहे. या ठिकाणी केल्टिकांची वसाहत होती. हेड्रिअनच्या कारकीर्दीत येथे लोअर पॅनोनीया या रोमन प्रांताची राजधानी होती. प्रथम ‘सोपिॲने’ असे नाव असलेल्या या शहराचे पुढे ‘क्विंक्वे एक्लेसीए’ (पाच चर्च) असे, तर अकराव्या शतकात ‘पेच’ असे नामकरण झाले. १३६७ मध्ये येथे हंगेरीतील पहिल्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. १५४३ ते १६८६ दरम्यान हे तुर्कांच्या अंमलाखाली होते. १७८० मध्ये हे स्वतंत्र शहर बनते. पेच-कोम्लो या हंगेरीतील महत्त्वाच्या कोळसा क्षेत्राचे हे केंद्र आहे. येथे अभियांत्रिकी, मद्यनिर्मिती, कातडी उद्योग, तेल शुद्धीकरण इ. उद्योगांचा विकास झाला असून मातीची भांडी बनविणे हा येथील एक महत्त्वाचा उद्योग आहे. अकराव्या शतकातील चर्च, तुर्कांनी बांधलेले बुरूज इ. ऐतिहासिक वास्तू प्रेक्षणीय आहेत.

लिमये, दि. ह. गाडे. ना. स.