गंडकी : हल्लीची गंडक– गंगेची हिमालयातून येणारी एक प्रमुख उपनदी. लांबी काली गंडकसह सु. ६७५ किमी, जलवाहनक्षेत्र सु. ४५,८०० चौ. किमी. त्यापैकी भारतात ९,५४० चौ. किमी. मध्य हिमालयात, दक्षिण तिबेटात, ७,६०० मी. उंचीवर उगम पावून नेपाळात काठमांडूच्या पश्चिमेस ८८ किमी. वर आलेल्या काली गंडकला त्रिशूला व इतर प्रवाह मिळून झालेली बडी गंडक नारायणी, त्रिशूलीगंगा किंवा सप्तगंडक म्हणून नैर्ऋत्येकडे वाहू लागते. काली गडंक धौलागिरी आणि गोसाइंतान शिखरांदरम्यानच्या प्रदेशातील पाणी वाहून आणते. नेपाळात गंडकीच्या प्रवाहात शाळिग्राम सापडतात म्हणून तिला शालिग्रामीही म्हणतात. गंडकी शिलांचा उपयोग मूर्तीसाठी–उदा., तुळजापूरच्या भवानीदेवीची मूर्ती–करतात. भारतात त्रिवेणी येथे गंडकी प्रवेश करते व उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर जिल्ह्यातून गोरखपूर व बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यांच्या सीमेवरून व नंतर चंपारण्य व सारन जिल्ह्यांतून आग्नेयीकडे वाहत जाते. बिहारच्या सुपीक प्रदेशातून पुढे सारन व मुझफरपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून थोडे अंतर जाऊन सारनमधील सोनपूर व मुझफरपूरमधील हाजीपूर यांच्या दरम्यान पाटण्यासमोर ती गंगेला मिळते. तिला त्रिवेणी व सारन असे दोन कालवे काढलेले आहेत. जलवाहतूक दृष्ट्या गंडकी अतिशय उपयुक्त असून लाकूडफाटा. अन्नधान्य इ. मालांची वाहतूक तिच्यावर सतत चालू असते. गंडकीला हिमालयातील वितळलेल्या बर्फाचेही पाणी मिळते व तिच्या पुरांमुळे काठच्या प्रदेशास उपद्रव होतो. काही ठिकाणी काठावर बांध घालावे लागले आहेत. कमाल पूर काळात १५,७३० घ. मी./से. पाणी वाहते. बिहारमधील भैसलोटण येथील गंडकवरील आंतरराज्य सहकार्य प्रकल्पामुळे बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळ यांस शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध होत आहे. सप्तगंडक खोऱ्यात तांबे मिळते. त्याशिवाय कोरंडम, अभ्रक, बिस्मथ, कोबाल्ट, अँटिमनी, गंधक, जॅस्पर, लिग्नाइट व बिट्युमिनस कोळसा ही खनिजे आढळली आहेत.

छोटी गंडक नेपाळमधून येऊन गोरखपूर जिल्ह्यातून बडी गंडकच्या पश्चिमेस सारन जिल्ह्यात थोडासाच प्रवेश करून घागरा नदीस मिळते.

बुरी गंडक नेपाळमध्ये सुमेसर डोंगरात उगम पावून आग्नेयीकडे बडी गंडकच्या प्राचीन मार्गाने जाऊन मोंघीरच्या खाली गंगेस मिळते. तिची लांबी ६१० किमी. व जलवाहनक्षेत्र १२,२०० चौ.किमी. आहे.

संदर्भ : 1. Misra, S. D. Rivers of  India, New Delhi, 1970.

    2. National Committee for Geography, Mountains and Rivers of India, Calcutta, 1968.

कुमठेकर, ज. ब.