लंडनडेरी : उत्तर आयर्लंडमधील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय तसेच बेलफास्टनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व बंदर. लोकसंख्या ९६.१०० (१९८३ अंदाज). हे बेलफास्टच्या वायव्येस सु. १९३ किमी. अंतरावर फॉईल नदी व लॉख फॉईल (समुद्राचा आत आलेला भाग) यांच्या संगमावर ८ किमी. आतल्या बाजूस वसले आहे. शहराचे स्थानिक नाव ‘डेरी’ (आयरिश शब्द ‘डॉइर’ = ओक वृक्षराई असलेले) असे आहे. लॉख फॉईलद्वारे समुद्रात जाण्याच्या मार्गावर वसलेले असल्याने लंडनडेरी बंदराला बरेच महत्त्व लाभले आहे. उत्तर आयर्लंडमधील पश्चिमेकडील परगण्यांसाठीचे वितरणकेंद्र म्हणूनही लंडनडेरीला महत्त्व आहे.

या शहराला बराच जुना इतिहास आहे. ख्रिस्ती संत कळंब ह्याने सहाव्या शतकात (५४६ मध्ये) उभारलेल्या मठाच्या जागेवरच या शहराची स्थापना करण्यात आली. नॉर्स आक्रमकांनी ही वस्ती १२०० पूर्वी सात वेळा जाळून टाकली. स्थानिक आयरिशांच्या विरोधात उद्‌भवलेल्या ट्यूडर युद्धांमध्ये हे शहर अतीव महत्त्वाचे सीमारक्षक ठाणे समजले गेले. १६०० मध्ये इंग्लिश सैन्याने डेरी प्रदेश बळकाविला आणि तेथील आयरिश चर्च व मठ उद्ध्वस्त केले. १६१३ मध्ये इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने लंडनवासियांना डेरी शहर दिले तेथे लंडनवासियांनी नवीन शहराची आखणी केली, भक्कम तटबंदी उभारली आणि वस्ती करण्यासाठी प्रॉटेस्टंट पंथीय इंग्रज व स्कॉटिश यांना पाचारण केले. त्यावेळेपासून शहर अधिकृतपणे ‘लंडनडेरी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. या शहरात कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथीयांत पारस्पारिक संघर्ष अनेकदा उद्‌भवले. याच संदर्भात इंग्लंडच्या राजाशीही अनेकवार संघर्ष निर्माण झाले. १९ एप्रिल ते ३० जुलै १६८९ या अवधीत दुसरा जेम्स राजा याच्या सैन्याने लंडनडेरीला वेढा घातला होता. तो इतिहासात ‘लंडनडेरी सीज’ या नावाने ख्यातनाम आहे. या वेढ्याला लंडनडेरीच्या रहिवाशांनी मोठ्या धैर्याने व निकराने तोंड दिले या झुंजीत २,३०० नागरिक मारले गेले. हे हौतात्म्य प्रतिवर्षी साजरे करण्यात येते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत लंडनडेरीचा नाविकतळ म्हणून वापर करण्यात आला. १९६८ साली अल्स्टर प्रांतात रोमन कॅथलिकांसाठी समान नागरी हक्क मिळावते, म्हणून एक चळवळ उभारण्यात आली. १९६९ मध्ये शहरातील रस्त्यांवर अनेक हिंसक प्रकार उद्‌भवले. १९८० च्या पुढील काळात अधूनमधून शहरात दंगली उसळत असतात. 

लंडनडेरीची शहरीकरणाची प्रक्रिया १८५० पासून विशेषत्वाने सुरू झाल्याचे आढळते. कारण येथूनच पुढे येथील लिनन शर्ट निर्मिति-उद्योगाच्या भरभराटीला मोठा वाव मिळाला. येथील वस्त्रोद्योग हा अतिशय महत्त्वाचा उद्योग समजला जात असून त्यामध्ये कृत्रिम व नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या धाग्यांचा वापर केला जातो. इतर उद्योगांमध्ये अन्नपदार्थ, रसायने, दारू गाळणे, लाकडी सामान, लहान जहाजे, कातडी कमाविणे, संश्लिष्ट रबर, टायर, ध्वनिपुनरुत्पादक साधने (उदा., रेकॉर्ड प्लेअर, फोनोग्राफ) इत्यादींचा समावेश होतो.

शहरात मॅगी युनिव्हर्सिटी कॉलेजचे केंद्र (१८६५) आहे. चर्च ऑफ आयर्लंड कॅथीड्रल (सेंट कलंब कॅथीड्रल १६३३), सेंट यूजीनचे रोमन कॅथलिक कॅथीड्रल इ. प्रेक्षणीय वास्तू आहेत.

डिसूझा, आ. रे.