सॅन सिबॅस्‌चन : स्पेनमधील एक नैसर्गिक बंदर व प्रसिद्घ पर्यटनस्थळ. त्याची लोकसंख्या १,८६,१२२ (२०११ अंदाजे). ते उत्तर मध्य स्पेनच्या बास्क या प्राचीन भूप्रदेशात गिप्यूदकवा प्रांतात फ्रेंच सीमेपासून सु. १६ किमी. आणि बिलबाओच्या पूर्वेस सु. ७७ किमी. वर बिस्के उपसागराच्या किनाऱ्यावर उरूमेआ नदीमुखाजवळ वसले आहे. येथे गिप्यूदकवा प्रांताचे मुख्यालय असून शहराचे जुना व नवा असे दोन स्वतंत्र भाग आहेत. जुने शहर व बंदर तेथील मुख्य भूमी व माँत उर्गूल डोंगर यांदरम्यानच्या संयोग भूमीवर वसले असून डोंगराच्या माथ्यावर मोता (कॅस्तिलो द ला मोता) नावाचा मध्ययुगीन किल्ला आहे. जुन्या नगराला सभोवती तटबंदी होती, ती सांप्रत पडली आहे. नवीन शहर हे मुख्यत्वे ला कोंच उपसागराभोवती व उरूमेआ नदीच्या दोन्ही काठांवर नियोजनबद्घ आराखड्यानुसार बसविण्यात आले असून त्यात रुंद सरळ रस्ते, प्रशस्त चौक व नीटनेटक्या इमारती आहेत. महामार्ग व रेल्वेने ते देशांतर्गत शहरांशी- विशेषतः फ्रान्सशी- जोडले आहे. एका बाजूला डोंगराळ पहाडी प्रदेश आणि समुद्रसान्निध्य यांचा येथे विलक्षण संगम आढळतो. त्यामुळे हे एक सागरकिनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान बनले आहे.

इ. स. १०१४ मधील एका अधिकृत दस्तऐवजात या स्थळाचा प्रथम निर्देश आढळतो. त्यानंतर नव्हारेच्या सांचो द वाईझ ( कार. ११६०–९०) याने एक सनद काढून स्वतःकडे काही हक्क व विशेष अधिकार घेतले. त्याने ज्यू आणि उत्तरेकडील आप्रवाशांच्या संरक्षणासाठी काही कायदे केले आणि नाव्हेरीजची सत्ता स्पेनच्या विस्तृत भागात प्रस्थापित केली. या नगराचे प्राचीन बास्क काळातील नाव डोनोस्तिया होते पुढे सेंट सिबॅस्चॅन नाव त्यास देण्यात आले. फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, पोर्तुगाल वगैरे यूरोपीय देशांनी यांवर अनेकदा इ. स. सोळा ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान हल्ले केले. त्यांपैकी ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नेतृत्वाखालील अँग्लो-पोर्तुगीज लष्कराने केलेले आक्रमण (१८१३) मोठे होते. यात शहर उद्ध्वस्त करून जाळण्यात आले तथापि स्पॅनिश राजांची सत्ता एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होती आणि शाही कुटुंबाचे हे उन्हाळ्यातील निवासस्थान होते. येथे १९३० मध्ये सॅन सिबॅस्चॅननामक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि प्रजासत्ताकाचा जाहीरनामा प्रसिद्घ करण्यात आला. परिणामतः शेकडो वर्षांची स्पेनमधील राजेशाही संपुष्टात आली.

सॅन सिबॅस्चॅन नगराचे अर्थकारण मुख्यत्वे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असून येथे हॉटेल-व्यवसाय तेजीत आहे. त्या खालोखाल मच्छीमारी उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. याशिवाय बंदराशी निगडित वस्तूंची निर्मिती येथे होते. तसेच इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक उपकरणे, सिमेंट, कापड, औषधे, रसायने, धातू उत्पादने, फोनोग्राफ तबकड्या (रेकॉर्ड्‌स), बीअर, चॉकलेट वगैरेंची निर्मिती इ. उद्योग येथे चालतात.

जुन्या शहरात सॅन तेल्मोचे कॉन्व्हेन्ट (१५३१–५१), सान्ता मारिया हे बरोक शैलीतील चर्च (१७४३–६४), सॅन व्हिंसेंट हे गॉथिक शैलीतील चर्च (१५०७), शाही राजवाडा वगैरे वास्तू प्रेक्षणीय आहेत. तेल्मोच्या कॉन्व्हेन्टमधील एका भागात बास्ककालीन मानवजातिशास्त्रविषयक वस्तूंचे संग्रहालय आहे. नवीन शहरात एक कॅथीड्रल असून ते निओगॉथिक वास्तुशैलीत बांधले आहे. या ठिकाणी सत्शील धनगराचा (एल् ब्यूएन पॅस्तर) पुतळा आहे.

आल्हाददायक भूध्य सामुद्रिक हवामान, निसर्गरम्य पुळणी, ला कोंच उपसागरात दरवर्षी २० जानेवारी रोजी सेंट सिबॅस्चॅन याच्या स्मरणार्थ होणाऱ्या उत्सवातील प्रसिद्घ नौकांच्या शर्यती, आंतरराष्ट्रीय जॅझ संगीत जलशाचे सादरीकरण आणि फिल्मोत्सव यांमुळे ते पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे.

देशपांडे, सु. र.