एंजेल :जगातील सर्वांत उंच धबधबा, व्हेनेझुएला, द.अमेरिका.

धबधबा : (जलप्रपात). उंचावरून खाली कोसळणारा जलप्रवाह.सर्वसाधारणपणे धबधबे नदी प्रवाहाच्या पहिल्या टप्प्यात आढळतात. परंतु कायाकल्प झालेल्या भूमिस्वरूपांच्या प्रदेशातील नद्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतही ते आढळून येतात. पर्वतमय व पठारी प्रदेशात धबधबे आढळतात. अंटार्क्टिकाखेरीज इतर सर्व खंडांत धबधबे आहेत. धबधबे अनेक कारणांमुळे निर्माण होतात. नदीच्या प्रवाहमार्गात कठीन व मृदू खडकांचे अस्तित्व, पठारांच्या व मैदानी प्रदेशांच्या सीमा, प्रस्तरभंग, किनाऱ्यावरील कडे व हिमक्षयित प्रदेशातील लोंबती खोरी धबधब्यांच्या निर्मितीस कारणीभूत होतात.

घबघब्याची निर्मिती

नदीच्या प्रवाहमार्गात असलेली निरनिराळ्या प्रकारची भूस्तररचना धबधब्यांच्या निर्मितीस प्रामुख्याने कारणीभूत होते. प्रवाहमार्गात कठीण खडकांचे थर उभे, आडवे किंवा तिरकस असू शकतात. त्यामुळे नदीच्या प्रवणित पार्श्वदृश्य तयार करण्याच्या (खननाने व संचयनाने अत्यंत सौम्य उताराचा प्रवाहमार्ग निर्मिण्याच्या) कार्यास अडथळा निर्माण होतो. नदीच्या मार्गातील कठीण खडक नदीच्या प्रवाहमार्गाच्या दिशेने कललेले असतील, तर तेथे धबधबा तयार होतो पण खडक जर प्रवाहमार्गाच्या विरूद्ध दिशेने कललेले असतील, तर तेथे धावऱ्यांची-द्रुतवाहांची निर्मिती होते. नदीच्या पात्रातील कठीण खडक आडवे किंवा क्षितिजसमांतर असले आणि त्यानंतरचे खडक मृदू असेल, तर नदीच्या पात्रातच एक कडा तयार होतो. कडा तयार होतो. या कड्यावरून नदी उडी घेते व धबधबा निर्माण होतो. अशा प्रकारच्या धबधब्यामध्ये नदीचे पाणी उंचावरून खाली पडल्याने धबधब्याच्या तळाशी पाण्याच्या आघातक्रियेमुळे विवर तयार होते. २५३ मी. उंचीच्या गिरसप्पा धबधब्याच्या तळाशी सु. ४० मी. खोलीचे तळे तयार झाले आहे.

कठीण खडक आडवे असल्यामुळे किंवा भूपृष्ठाला समांतर असल्यामुळे जे धबधबे तयार होतात, ते बऱ्याच वेळेस नदीच्या उगमस्थानाच्या दिशेने मागे सरकतात याचे कारण असे, की त्या कठीण खडकांखाली मृदू खडक असतात. जेथे प्रत्यक्ष धबधबा तयार होतो तेथे या मृदू खडकांचा काही भाग उघडा पडतो. पडणाऱ्या पाण्यामुळे व विदारण क्रियेमुळे मृदू खडकांची झीज होते. मृदू खडकांत गुहेसारखा पोकळ भाग तयार होतो. त्यामुळे त्यावरील कठीण खडकांचा भाग त्यांना पेलवत नाही. तो लोंबता राहतो आणि कालांतराने तुटून खाली पडतो व धबधब्याचे स्थान मागे सरकत जाते. या क्रियेस प्रतिवाह प्रतिसरण असे म्हणतात.

उत्तर अमेरिकेतील नायगारा धबधबा हा प्रतिवाह प्रतिसरणाचे प्रसिद्ध उदाहरण आहे. ला साल या फ्रेंच पर्यटकाने त्याचा शोध १६७८ मध्ये लावला. हा धबधबा नायगारा नदीवर आहे. या ठिकाणी वरचा थर कठीण अशा डोलोमाइट खडकांचा असून त्याखालचे थर पंकाश्माचे व वालुकाश्माचे आहेत. सु. २५,००० वर्षांपूर्वी लिव्हींग्स्टन शहराजवळ या धबधब्याची निर्मिती झाली असावी परंतु त्या ठिकाणापासून हा घबघबा आता ११ किमी. उगमस्थानांकडे सरकलेला आढळून येतो. या धबधब्याचे साधारणपणे मध्यभागी गोट नावाचे एक बेट असून त्यामुळे नायगाराचे दोन भाग झालेले आहेत व येथेच संयुक्त संस्थाने आणि कॅनडा यांची सीमा असल्याने धबधब्याचा एक भाग संयुक्त संस्थानांत व दुसरा कॅनडात येतो. संयुक्त संस्थानांतील धबधब्यास ‘नायगारा’ व कॅनडातील धबधब्यास ‘हॉर्सशू फॉल’ अशी नावे आहेत. या दोहोंत नायगारा उंच असून त्याची उंची ५१ मी. आहे. हे दोन्ही धबधबे प्रतिवर्षी ३० ते १८० सेंमी. या वेगाने मागे सरकत आहेत व ही क्रिया अशीच चालू राहिल्यास कालांतराने ते ईअरी सरोवराला जाऊन मिळतील. याच सरोवरातून नायगारा नदी उगम पावते. नायगारा धबधब्याच्या खाली सु. ११ किमी. लांबीची व ३० मी. खोलीची घळई तयार झालेली आहे. गुयानामधील काइअतुर धबधबा सु. २५१ मी. उंच आहे. तो पोतारो नदीवर असून तेथे मृदू वालुकाश्मावर व पंकाश्मावर कठीण गुडदाणी खडकांचे आच्छादन असल्याने तो तयार झालेला आहे. पठारी प्रदेश व मैदाने यांच्या सीमेवरही धबधबे तयार होतात. आफ्रिका खंडात अशा प्रकारचे धबधबे आहेत. आफ्रिका खंडाचा बराचसा भाग पठारी आहे. त्या खंडात काँगो, नायजर, नाईल, ऑरेंज अशा मोठ्या नद्या आहेत. यांपैकी काही नद्या पठारी प्रदेशावरून सखल प्रदेशात जेथे प्रवेश करतात तेथे धबधबे तयार होतात. काँगो नदीवर अशा प्रकारचे ३२ धबधबे आहेत. त्यांना ‘लिव्हिंग्स्ट्न फॉल्स’ असे म्हणतात. यांमुळे नदीचे पाणी सु. २९० मी. उंचीवरून खाली येते. ऑरेंज नदीवर ओग्राबीस धबधबा आहे. तेथे ऑरेंज नदीचे पाणी सु. १४६ मी. उंचीवरुन खाली पडते. संयुक्त संस्थानांत तर अशा धबधब्यांची मालिकाच तयार झालेली आहे. संयुक्त संस्थानांतील पठारी प्रदेश व अटलांटिक किनाऱ्यावरील मैदान यांच्या सीमेवर अनेक धबधबे आहेत. त्यांच्या ओळीला प्रपातरेषा (फॉल लाइन) असे म्हणतात. पठारी प्रदेशातील अती जुनाट स्फटिकमय खडक व अटलांटिक किनाऱ्यावरील अवसादी प्रस्तरांचे नवनिर्मित मैदान यांमुळे वरील दोन भूप्रदेशांच्या सीमेवर अनेक धबधबे तयार झालेले आहेत. त्यांवर वीज निर्माण करून ती अनेक शहरांना पुरविली जाते. आफ्रिकेच्या पठारी प्रदेशातील आणि प्रतापरेषा-विभागातील धबधब्यांमुळे जलवाहतुकीस अडथळे निर्माण होतात. इंग्लंडमधील पेनाइन प्रदेशातही असे धबधबे आहेत.


                                                  जगातील प्रमुख धबधबे

नाव व स्थान

उंची मीटरमध्ये

एंजेल (व्हेनेझुएला)

९७९

तूगेला (द.आफ्रिका)

९४८

योसेमिटी (अमेरिका)

७३९

सदर्लंड (न्यूझीलंड)

५८०

मार्दाल्सफॉस (नॉर्वे)

५१७

तॅकाकॉ (कॅनडा)

५०३

रिबन (अमेरिका)

४९१

वॉलामाँबी (ऑस्ट्रेलिया)

४८२

गाव्हार्नी (फ्रान्स)

४२२

क्रिमलर वासेर फॉल (ऑस्ट्रिया)

३८०

स्टाउब्बाख (स्वित्झर्लंड)

३००

गिरसप्पा (जोग) भारत

२५३

काइअतुर (गुयाना)

२५१

शूहकफॉस (नॉर्वे)

२५०

कालांबो (टांझानिया झँबिया)

२१५

फेअरी (अमेरिका)

२१३

रायखनबाख (स्वित्झर्लंड)

२००

मालेत्सून्याने (लेसोथो)

१९२

ब्राइडलव्हेल (अमेरिका)

१८९

व्हरिंगफॉस (नॉर्वे)

१८२

ओग्राबीस (द. आफ्रिका)

१४६

बारात्येरी (इथिओपिया)

१४०

अकाका (हवाई बेटे)

१२८

ग्वाइरा (सेतकेदश)

 

(पॅराग्वाय-ब्राझील)

११४

व्हिक्टोरिया (ऱ्होडेशिया- झँबिया)

१०८

कावेरी (शिवसमुद्रम्) (भारत)

९८

यलोस्टोन (लोअर फॉल्स)

 

(अमेरिका)

९४


चर्चिल (ग्रँड) (न्यू फाउंडलंड)

  ९१

पाउलू आफाँसू (ब्राझील) 

  ८४

ईग्वासू (ब्राझील-अर्जेंटिना)

  ८२

हार्‌स्प्राँगट (स्वीडन)

  ७५

नायगारा-अमेरिकन फॉल्स (अमेरिका)

  ५१

नायगारा-हॉर्सशू फॉल्स (कॅनडा)

  ४८

शविनिगन (कॅनडा)

  ४४

स्टूरा शफालट

  ४०

गिरसप्पा : भारतातील सर्वांत उंच धबधब्बा, कर्नाटक राज्य.

प्रस्तरभंगामुळे धबधबे निर्माण होऊ शकतात. प्रस्तरभंग झाल्यानंतर ऊर्ध्वक्षेपित भाग अधःक्षेपित भागावर राहतो. अशा प्रदेशातून नद्या वाहत असल्यास धबधबे तयार होतात.  इंग्लंडमधील गारडेल बेक धबधबा वरील प्रकारे तयार झालेला आहे. नर्मदा नदीच्या वरच्या टप्प्यात अशा प्रकारचे धबधबे आहेत. परंतु ते जून ते ऑक्टोबर या काळातच दृष्टीस पडतात. उन्हाळ्यात त्यांना पाणी नसते. भेडाघाटाच्या वरच्या बाजूचा सु. १५ मी. उंचीचा नर्मदेवरील धुवांधार धबधबा प्रसिद्ध आहे. आफ्रिकेतील झँबीझी नदीवर ती जेथे असिताश्माच्या पठारावरून सखल प्रदेशात येते. तेथे १०८ मी. उंचीचा व्हिक्टोरिया धबधबा आहे तोदेखील प्रस्तरभंगामुळेच तयार झालेला असावा.

हिमक्षयित प्रदेशात पुष्कळ धबधबे आढळून येतात. ‘यू’ आकाराच्या मुख्य हिमखोऱ्यांना जेथे उपनद्यांची लोंबती खोरी मिळतात, तेथे धबधबे आढळतात. हिमानी क्रियेमुळे मुख्य नदीचे खोरे खोल खणले जाते. उपनद्यांच्या खोऱ्यांत बर्फ कमी असल्याने त्यांची झीज कमी होते. हिमनदी नाहीशी झाल्यावर तेथे धबधबे तयार होतात. वेल्समधील स्नोडोनीया, इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट व स्कॉटलंडचा डोंगराळ भाग यांत तसेच कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी खोऱ्यात असे धबधबे खूप आहेत. येथील काही धबधब्यांची उंची १०० मी. पेक्षा जास्त आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील धबधबे कड्यांवरून कोसळून काही नद्या समुद्रास मिळतात, तेव्हाही धबधबे तयार होतात. इंग्लंडमधील वेमथजवळील ऑसमिग्टन धबधबा वरील प्रकारात मोडतो. सागरी खननामुळे सागरी कडे मागे सरकतात. कालांतराने तेथे एक धबधबा तयार होतो. इंग्लंडमधील डेव्हनशर येथे वरील प्रकारचे धबधबे आहेत. खचणीमुळे किंवा निमज्जनामुळे तयार झालेल्या किनारपट्टीवर वरील प्रकारचे धबधबे आढळून येतात. ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या भित्तीमुळे निर्माण झालेले धबधबे मागे सरकत नाहीत.


धबधब्यांचा तेथील मानवी जीवनावर परिणाम झालेला आढळून येतो. धबधब्यांमुळे जलवाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काँगो नदीच्या खोऱ्यात व आफ्रिकेतील सेल्वाझ प्रदेशात अनेक वन्य जमाती राहतात. परंतु तेथील पठारी प्रदेशात असलेल्या धबधब्यांमुळे त्या वन्य जमातींना बाह्य जगताशी दळणवळण ठेवणे कठीण जाते त्यामुळे त्या अत्यंत मागासलेल्या आहेत. धबधब्यांवर जलविद्युत् निर्माण करता येते. अमेरिकेतील जलप्रपात रेषेवर अनेक जलविद्युत केंद्रे आहेत. धबधबे सृष्टीसौंदर्याची ठिकाणे असतात त्यामुळे तेथे पर्यटन केंद्रे निर्माण होतात. घटप्रभेवरील गोकाकचा धबधबा, गोव्यातील दूधसागर, अमेरिकेतील नायगारा कर्नाटकातील शरावतीवरील गिरसप्पा धबधबा, कावेरीवरील शिवसमुद्रम् येथील धबधबा, ताम्रपर्णीवरील कोर्टालम् धबधबा इ. ठिकाणी पर्यटक गर्दी करतात व त्यामुळे स्थानिक लोकांना एक वेगळा व्यवसाय प्राप्त होतो.

भागवत, अ. वि.